श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवे नम: ।  
ॐनमोजी विश्वंभरा । विश्वचालका विश्वेश्वरा । भक्तालागीं अभयकारा । विराट्‍पुरुषा नमोस्तुते ॥१॥
एकदां श्रीगुरुंची स्वारी । भय्यासह पादचारी । फिरता असतां नर्मदातीरी । गिरिगव्हरीं प्रवेशले ॥२॥
तृषा लागली म्हणोनी । गुहेमाजीं गेले झणी । तेथें निर्मळ जल पाहोनी । प्राशन करूं लागले ॥३॥
तेथें एक सतेज योगी । बैसले होते अंतर्भागीं । समाधी उतरोनि वेगीं । बाह्य प्रदेशीं पातले ॥४॥
रामावतार झाला की नाहीं । दर्शना जाऊं लवलाहीं । इच्छा धरोनि समाधी पाही । लावोनियां बैसलो ॥५॥
सद्‍गुरु वदती योगीयासी । रामकृष्ण अवतारासी । होवोनि सांप्रत कलीसी । प्रारंभही झालासे ॥६॥
ऐसी परिसोन वाणी । ओशाळला वृध्द मुनी । जाणोनि हें श्रीगुरुंनीं मस्तकी हस्त ठेविला ॥७॥
ज्ञानोदयें चरण वंदोनी । प्राण सोडिते झाले मुनी । अग्नि संस्कार तया करोनी । उभयतां झाले मार्गस्त ॥८॥
भय्यासाहेब करिती प्रश्न । हे काय आश्चर्य गहन । सद्‍गुरु वदती हास्यवादन । योगिया गती मिळाली ॥९॥
बहुता दिसांचा तापसी । लावोन बैसला समाधीसी । वंचना करित काळासी । सद्‍गतीकारणें ॥१०॥
रामदर्शन करोनी । जावें मुक्त होवोनी । ऐसी इच्छा धरोनी । प्राणापान कोंडिलें ॥११॥
तो काल निघोन गेला । योगी तैसाचि राहिला । आजि भाग्य उदयाला । येतां गेला वैकुंठी ॥१२॥
असो योगियां गती दिली । ऐसी बहुत कार्ये केलीं । दयाळ सद्‍गुरु माउली । भेटली आम्हां सभाग्यां ॥१३॥
निलकंठ दामोदर जोशी । यांचे करविती विवाहासी । कुतुदवाडचे रहिवासी । यांचा प्रकार परिसावा ॥१४॥
विजापूर प्रांतीची कोणी । विप्रस्त्री कन्या घेवोनी । आली गोंदवले श्रीभुवनीं । समर्थचरण वंदितसे ॥१५॥
कन्या घालोन पदकमलीं । विनंती करी तेयेळीं । रोगें बहु ही ग्रासली । नायटे उठती सर्वागी ॥१६॥
अमावास्ये मायळती । पौर्णिमे पुन्हां चिघळती । ऐसी बहुत दिवसांची स्थिती । गती बरवी दिसेना ॥१७॥
म्हणोन घातली चरणावरी । कृपा करा दीनावरी । तूं दीनांचा कैवारी । ऐसी कीर्ती जगांत ॥१८॥
समर्थ वदती अहोमाय । सांकडें निरसील रामराय । परि एक असे उपाय । मानेल तरी करावा ॥१९॥
कन्या देतां गरिबासी । रोगमुक्त होय खाशी । घेवोन पतिअनुज्ञेसी । करा निश्चय सत्वर ॥२०॥
ताबडतोब पत्र लिहिलें । होकारार्थी उत्तर आलें । रामसाक्षीं उदक सोडविलें । कन्या देऊं गरिबासी ॥२१॥
सती वदे समर्थासी । कोणा देऊं सांगा मजसी । विविहमुहूर्त समयासी । कन्यादान करूं तया ॥२२॥
तेसमयीं दर्शनाकरितां । निळकंठ तेथें उभा होता । समर्थ वदती उदर भरतां । काय धंदा करोनी ॥२३॥
निळकंठ वदे भिक्षेसी । नित्य फिरवितों झोळीसी । समर्थ वदती सतीसी । यासी द्या हो कुमारिका ॥२४॥
आज्ञा म्हणे प्रमाण ठरलें । एकमेकीं पत्ते पुसिले । बालिकेचें दु:ख हरलें । कृपावचनें सद्‍गुरुंच्या ॥२५॥
कांही दिवसांउपरी । पिता मनी विचारी । कन्या सुस्वरुप गोजिरी । द्यावी कैसी भिक्षुका ॥२६॥
आम्हीं गृहस्थ धनवंत । जांवई आम्हां न शोभत । भाक विसरला समस्त । कन्यामोहेंकरोनी ॥२७॥
विकल्प होतां मनांत । पुनरपि नायटे उठले बहुत । शीघ्र कन्यादान करित । कुरुंदवाडी येवोनी ॥२८॥
असो समर्थकृपेंकरोन । उभयतांचे कल्याण । झालें तैसे अनंत जन । गुरुकृपें आनंदले ॥२९॥
भवानराव नामेंकरोन । भक्त भावसंपन्न । तयास संकटी दर्शन । वाराणशीं जाहलें ॥३०॥
हर्द्यासी अस्तां गुरुवर । काशीस निघाले सपरिवार । भवानराव भक्त थोर । संगे येऊं आम्हीं म्हणेती ॥३१॥
समर्थ वदती तयासी । तुम्ही रहावे मठासी । आम्ही आलियावरी काशीसी । तुम्ही चलावें ॥३२॥
समर्थ काशीस जावोन येतां । भवानराव निघाले यात्रेकरितां । दरकुच जातां जातां । काशीक्षेत्रीं पावले ॥३३॥
तेथें वदती भटासी । एकांतस्थळ आम्हांसी । जप करित रहावयासी । द्यावे तुम्हीं उत्तम ॥३४॥
ओसाड घर असे भलें । जें समंधपीडे दुषित झालें । तें नामधारकासी दिधलें । काय होतें पाहती ॥३५॥
समर्थशिष्या कोठेही । कळिकाळाचें भय नाही । पिशाच्च काय करिल पाही । प्रकार घडला तो परिसावा ॥३६॥
कांही काल तया स्थानीं । होते जप करोनी । एके रात्री मध्यान्हीं । समंध तेथें प्रगटला ॥३७॥
शुभ्रवस्त्र परिधान । करोनी बोले हास्यवदन । मिठाईचा पुडा देवोन । वदला जपून ठेवावा ॥३८॥
भवानराव नामधारी । समर्थाची पाठीवरी । न डगला अणुभरी । पुडा ठेवीन घेतला ॥३९॥
कांही वेळ गेल्यावरी । पुन्हां आली समंधफेरी । कृष्णवस्त्र परिधान करी । मिठाई मागो लागला ॥४०॥
भवानराव वदले तयासी । शुभ्र प्रावर्णे असती ज्यासी । तेणें दिधला मजपाशीं । तुजला नाही देणार ॥४१॥
उभयतांचा तंटा झाला । समंध उन्मत्त उरीं वैसला । भवानरावें धावा केला । सद्‍गुरु महाराजांचा ॥४२॥
तंव तेथें अभिनव घडलें । लख्ख प्रकाशें अंबर भरलें । गुरुमहाराज प्रगटले । समंध गेला पळोनीं ॥४३॥
शिष्या अभय देवोनी । गुप्त झाली गुरुजननीं । पुन्हां तेथें समंधानी । मुख नाहीं दाखविलें ॥४४॥
सत्ताधारी गुरुमूर्ती । शिष्यसंकटीं उभे असती । हर्द्यासी असोनी काशीप्रती । शिष्यसंकटी प्रगटले ॥४५॥
पिशाच्चमोचन केलें फार । गणती कोण करणार । परि समंधव्याधी भार्येस । तेणें दु:ख भोगिती ॥४७॥
उभयतां आले गोंदवलीं । समर्थ सेवा बहु केली । बारा समंधी गती दिली । माणगंगाप्रवाहीं ॥४८॥
फडणवीसही उदासीन । झाले होते अति गहन । तयासी लावोन साधन । दु:ख हरलें उभयतांचे ॥४९॥
आटपाडीकर पिलाजीपंत । देशपांडेनामें विख्यात । तयाचेही भार्येप्रत । लाग्ले सात समंध ॥५०॥
तयासीही दिधली गती । ऐसे प्रकार नित्य घडती । कांही कथिले तुह्मांप्रती । गुरुसत्ता कळावया ॥५१॥
गोविंदराव केळकर । भार्या सरस्वती चतुर । परी समंध पीडी फार । मोरगिरीवासिया ॥५२॥
येवोन लागती चरणासी । श्रीगुरु वदविती समंधासी । ब्रह्मचारी ह्मणे वेदासी । परि गायत्री अर्ध्य ह्मणी ॥५३॥
साग्र गायत्री ह्मणीन । तरी भस्मचि होईन । ऐसें वदे तें दावोन । समर्थ बोधिती शिष्यासी ॥५४॥
गायत्रीचा महिमा कैसा । ज्ञानरुप तेजोमय ठसा । परी सांप्रत निरर्थक कसा । द्विजालागीं भासतसे ॥५५॥
असो पिशाच्चयोनीतूनि । शिघ्र तयासी काढोनी । गती दिधली समर्थानी । संत दर्शन दुर्लक्ष ॥५६॥
पंचाक्षरी भुतें गाढिती । साधू तयां मुक्त करिती । वासना शेष निवृत्ती । संतदर्शनी होतसे ॥५७॥
गुरुसत्ता अहे किती । तैसी स्वरुपाची व्याप्ती । पहावी कांही दृष्टांतीं । कथन करुं गुरुलीला ॥५८॥
कृष्णराव तरडे ह्मणोनी । कोणी भक्त श्रीसदनी । एकदां जाता आडरानीं ।भुजंग आला आडवा ॥५९॥
राव बहू घाबरला । तंव सर्प जवळीच आला । मग श्रींचीं शपथ तयाला । घालितां राहिला तेथेंची ॥६०॥
हलूं नको जागचा येथ । ह्मणोनि घालिती तया शपथ । येवोनि गुरुसी सांगत । सर्पा भ्यालों ह्मणोनि ॥६१॥
समर्थ वदती जा सत्वरी । दुरुनि शपथ मोकळी करी । जाईल बिचारा आपुले घरी । बंधन कोणा नसावें ॥६२॥
जावोन पाहती मंडळी । सर्प स्थिर त्यास्थळी । तरडे वदतां जा स्वस्थळीं । तेव्हांचि दूर पळाला ॥६३॥
बाळकृष्णभटट नामें जोशी । पुत्राविणें बहुक्लेशी । चार केल्याही स्त्रियांसी । पुत्र नाहीं जाहला ॥६४॥
चौथी स्त्री उपवर । होवोनि गेले संवत्सर । त्रयोदश परि आशांकुर । लोभे नाहीं मावळला । ६५॥
करुणा भाकि श्रीचे चरणीं । निपुत्रिक अभागी ह्मणोनी । श्रीगुरु वदती कोंदंडपाणी । संकटसमयीं स्मरावा ॥६६॥
औटकोट जप करितां । पुत्र प्रसवली द्विजकांता । आनंद न समाये चित्ता । वारंवार स्तवन करी ॥६७॥
महाराज असतां सोलापुरीं । आला एक चितारी । विनवी घ्यावी प्रतिमा बरी । इच्छा पुरवी समर्था ॥६८॥
श्रीगुरु वदले तयासी । द्रव्य मेळवू इच्छिसी । तरी आज या समयासी । न काढितां बरें ॥६९॥
परी आग्रह साहेबीं धरिला । बहुता येईल दर्शनाला । सद्‍गुरुही विनोदे बोला । तुकविती मान ॥७०॥
श्रीसी आसनीं बैसविलें । दोहींकडे साहेब भले । हस्त जोडोन उभे ठेले । यंत्री घेतली प्रतिछाया ॥७१॥
तंव तेथें अघटित घडलें । साहेब मात्र व्यक्त दिसले । महाराज गुप्त झाले । अवघे करिती विस्मय ॥७२॥
चितारी ओशाळला बहुत । पाहोन दयाळू समर्थ । दुजे दिनी काढों देत । सुप्रसन्न वदनानें ॥७३॥
बहुती प्रतिमा काढल्या । तितुक्या भिन्न आल्या । बहुरुपी सद्‍गुरु भला । लीला करोन दाखवी ॥७४॥
मार्तंडबुवा नामें एक । औंध ग्रामीचा श्रीसेवक । हरिदास हास्य विनोदादिक । कीर्तन करी रसाळ ॥७५॥
श्रीगुरुप्रासादेंकरोन । सुत झाला तयालागोन । तोही करी कीर्तन । अल्प वय़ीं गुरुकृपें ॥७६॥
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । गुरुचरणीं भाव थोर । एकदां करिती विचार । स्तवन करावें श्रीगुरुचें ॥७७॥
परी कवित्वाची शक्ती । नाही म्हणुन काकुलती । गुरुचरणांसी प्रार्थिती । कांही सेवा धडावी ॥७८॥
ऐसे मनीं भाविले । ते श्रीनीं ओळखिलें । शिष्यकोड पुरविले । तो प्रकार परिसावा ॥७९॥
रात्रौ तयासी स्वप्नात । एकाएकी स्फूर्ती होत । सहा श्लोक रचोनि स्तवित । असतां आले जागृती ॥८०॥
तंव श्लोक स्मरणीं खासे । लिहोन ठेविती जैसे तैसे । परि अष्टक करावें ऐसें । वाटतां आणिक दोन केलें ॥८१॥
प्रसंगे दावितां गुरुसी । खूण दिधली तयासी । शेवटचे दों श्लोकांसी । फाडोनिया टाकिले ॥८२॥
प्रासादिक आणि पाठक । कवित्वा भेद आत्यंतिक । हाही दाविला विवेक । श्लोकार्थातें विवरितां ॥८३॥
मोरगिरीनजिक कोकिसरे गांवी । वार्ता घडली परिसावी । गर्भिणी अडली ती मुक्त व्हावी । बहुती केले उपाय ॥८४॥
संकटी शूद्रस्त्री पडतां । हरि पाटिलासी आली ममता । अंगारा लावोन नवस करितां । सुट्का करिती श्रीगुरु ॥८५॥
आनंदे मोरगिरीस येवोनी । प्रेमें नमिला कोंद्डपाणी । मठपतीसी विनवोनी । नवल पूर्ण करितसे ॥८६॥
पांडव संख्या मुद्रिकांस । त्वरित पाठविल्या गोंदवलेस । आनंदे श्रीचरणांस वारंवार स्तवितसे ॥८७॥
कोणा नवसें पुत्र होती । कोणाच्या व्याधी हरती । अनंत नवसांसी पावती । द्यावें किती दृष्टांत ॥८८॥
सांगलीस एक भाविक सती । श्रीगुरुपदांकित होती । अवचित तिचे पुत्रावरती । राजक्षोम जाहला ॥८९॥
धरोनि नेती अधिकारी । माय शोक करी भारी । दृढ विश्वास । गुरुवरी । म्हणोन संकट घातलें ॥९०॥
देव्हारीच्या गुरुपादुका । काढोन ठेवी जळी देखा । निरापराधी सुताची सुटका । व्हावी ऐसें प्रार्थितसे ॥९१॥
इकडे गोंदावलेसी श्रीचरण । सुजले पाहती निष्कारण । अनेक उपाय करक्रोन । पाहता गुण येईना ॥९२॥
समर्थ वदती शिष्यांसी । न करावे उपाय यासी । कांही काले आपैसी । सूज लया जाईल ॥९३॥
इकडे खटला चालू झाला । पुत्र निर्दोषी ठरला । तेव्हां काढोन पादुकाला । समाराधना करितसे ॥९४॥
तंव सूज उतरोन गेली । भक्तजनी पृच्छा केली । एकाएकी आली गेली । रहस्य यांतील कथावें ॥९५॥
सद्‍गुरु वदती ते काळी । संकटें घालिती भक्तमंडळी । पादुका ठेविल्या होत्या जळीं । तेणे ऐसे जाहलें ॥९६॥
तंव सांगलीहुन वर्तमान । आलें हरिलें श्रीनी विघ्न । सकळी आश्चर्य पावोन । गुरुचरणा वंदिती ॥९७॥
असो ऐसी गुरुमाउली । बहुतांचे उपयोगा आली । स्वयें तरोनि तारिली । जनसंख्या अनिवार ॥९८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत पंचम::समास :। ओवीसंख्या ॥९८॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP