श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: ।  श्रीराम समर्थ ।
जयजय श्रीरघुराया । अज्ञानें जिणें होय वाया । शरणांगत दर्शन द्याया । विलंब कासया लाविला ॥१॥
गोंदवल्यास असतां गुरुवर । भाऊसाहेब जवळगेकर । करोडगिरीचे नाक्यावर । होते श्रीमान्‍ रोगग्रस्त ॥२॥
पोटी पुत्रसंतान नाही । ह्मणोनि चिंता करिती पाही । भार्या सती गंगाबाई । समर्थचरणी विश्वास ॥३॥
उभयतां आले गोंदवल्यासी । सद्‍भावें पूजोनि गुरुसी । कथन करिती मनोव्यथेसी । उपाय पुसती तेकाळीं ॥४॥
देहव्याधीनें गांजलों । संतान नाहीं ह्मणोन भ्रमलों । संपत्ति असोन मुकलों । संसारसुखासी ॥५॥
रात्रंदिन वाहे चिंता । तंव पदीं ठेविला माथा । आतां तारितां आणि मारिता । तूंचि एक दीनबंधू ॥६॥
ऐसी करिती विनंती । सद्‍गुरु शुध्दभाव पाहती । कृपा करील रघुपती । चिंता कांही न करावी ॥७॥
येथेंचि राहावें उभयतांनी । रामप्रसाद सेवोनी । सर्व काळ वागवा स्मरणी । श्रीरामनामाची ॥८॥
तोचि निवारील सर्व व्यथा । पुत्र होऊन जाईल चिंता । रामचरणीं विश्वासतां । उणें नाहीं भक्तासी ॥९॥
उभयतां मनीं संतोषले । गुरुवचनीं विश्वासले । सेवा करित राहिले । महाराजांची सद‍भावें ॥१०॥
प्रात:कालीं उठोन । मंदिरीं सडासंमाजन । काकडआरती करोन । पूजा करिती आनंदे ॥११॥
पंचारती ओवाळिती । चरणतीर्थ आदरें घेती । सदा मुखें नाम वदती । प्रसाद ही महौषधी ॥१२॥
जो सदा राहे पथ्यावरी । तो मंदिरीं खातां बाजरी । रोग गेला देशांतरी । गुरुकृपा अगाध ॥१३॥
पांडुरता मावळली । शरीरकांती सतेज झाली । कांता गरोदर राहिली । सेवा करितां भक्तीनें ॥१४॥
कांही कालें पुत्र झाला । परी उलटे पायाचा जन्मला । सद्‍गुरु वदती तयाला । दुरित शेष अद्यापि ॥१५॥
आणिक कर नामजप । नेमून दिलें नित्य माप । सरळ होतील जातां पाप । रामप्रसादें करोनि ॥१६॥
करितां करितां रामसेवा । मुलगा सरळ झाला तेव्हां । मग आनंद काय सांगावा । स्तुती करिती परोपरी ॥१७॥
तूं देवांचाहि देव । आह्मां भेटलासी गुरुराव । निरसिले सीत चिंता दैव । कृपा गभस्ती तुमचेनी ॥१८॥
नाहीं ज्ञान नाहीं भक्ती । नाहीं साधन संपत्ती । अज्ञानियां धरोनि हाती । सुमार्गासी लाविले ॥१९॥
निरोप देती उभयतांसी । विसरूं नका श्रीरामासी । येथें नांदाल सुखेसी । अंती सद्‍गती पावाल ॥२०॥
गुरुआज्ञा घेवोन गेले । ऐसें बहुतां तारिलें । जगदोध्दारां निघाले । यात्रामिष करोनि ॥२१॥
आम्ही यात्रे जाणार । ऐसें वदतां गुरुवर । शिष्यसमुदाय निघाला फार । पुरुष स्त्रियां बालकें ॥२२॥
समर्थगृहीं दास कुबेर । तेथें उणें काय पडणार । समुदाय निघाला अपार । रामनाम गर्जत ॥२३॥
शके अठराशें सत्ताविसीं । सद्‍गुरु आले प्रयागासी । वर्षाऋतु श्रावणमासीं । समुदायासमवेत ॥२४॥
तीर्थकृत्यें सकळ करोन । करावया वेणीदान । नौकेमाजी आरोहण । करिते झाले ते समयीं ॥२५॥
मध्यभागीं नौका गेली । तो जलें तुडुंब भरलीं । आणि भोवर्‍यांत सांपडाली । अकस्मात जीर्णनौका ॥२६॥
मग गलबला कोण पुसतां । जीव प्रिय सर्वा भूता । हाहा:कार उडाला सर्वथा । उभयथडी लोक भरले ॥२७॥
पाणी अपरंपार भरलें । मानवी उपाय न चाले । पाहते बुडते घाबरले । काय दशा म्हणती हे ॥२८॥
श्रीगुरुची अखंड शांती । सकल लोकां शांतविती । म्हणती तारील रघुपती । भजन करा स्वस्थाचित्ते ॥२९॥
पवित्र्यावरी उभे ठेले । आणि भजन आरंभिलें । सकलही करुं लागले । उसनें अवसान धरोनि ॥३०॥
सुखासनी गप्पा मारितां । बहुत दाविती समर्थता । प्रसंगें कसोटी पाहतां । टिके ऐसा विरळा संत ॥३१॥
भजनाचा करितां गजर । तत्क्षणीं नाव झाली स्थिर । लोक पाहती चमत्कार । धन्य साधू म्हणती हे ॥३२॥
श्रीगुरु वदती नाविकांसी । दुजी नौका आणा वेगेंसी । चिंता न करावी मानसीं । समर्थ आमुचा पाठिराखा ॥३३॥
दुजी नाव येईपर्यंत । नाव भोवरी असोन स्थिर । तटस्थ लोक पहात । उभय थडी ॥३४॥
दुजी नाव येतां तेथ । एक पद ठेविती त्यांत । चला म्हणती समस्त । हळू हळू एकेक ॥३५॥
समस्त माणसे आलीं । त्रिवार पुसोनि गुरुमाउली । चरण उचलितांच गेली । फुटकी नौका वाहत ॥३६॥
चरणीं लागतां अनंत तरलीं । नौका कशी बुडेल भली । करणी करोनि दाविली । प्रत्यक्ष सद्‍गुरु रायें ॥३७॥
सकळांसी आनंद झाला । नामगजर बहु केला । गौरकायीं थवा लोटला । किल्ल्यावरुनि दर्शना ॥३८॥
कडेस येतां गुरुमूर्ती । नारीनर आरत्या करिती । कोणी पुष्पमाळा घालिती । कोणी करिती दंडवत ॥३९॥
निंदक मनीं पस्ताव झाला । गौरकायीं म्हणती साधु भला । देवसुत पुन्हां अवतरला । म्हणोन टाळी देताती ॥४०॥
तव इकडे काय झालें । ग्रामाधिकारी क्षोभले । उपाध्यायासी धरोन नेलें । किल्ल्यावरी तयांनीं ॥४१॥
जरी नौका फुटकी होती । हाकारिली कैशा रीती । गुन्हा घडला तुमचे हाती । आतां शिक्षा भोगावी ॥४२॥
तया उपाध्यायाचा सुत । महाराजांची प्रार्थित । धरोन नेला मम तात । निरसावें संकट हें ॥४३॥
अजाणपणीं घडला व्यापार । हें जाणती गुरुवर । कृपा करोनि दीनावर । तारी आम्हां गुरुराया ॥४४॥
अभय देवूनि तयासी । सोडविलें उपाध्यायासी । मिरवणूक काढिली खाशी । कुरवंडया करिती सुवासिनी ॥४५॥
दानधर्म केला बहुत । गोप्रदानें सालंकृत । शिष्य झाले अपरमित । उत्तर देशीं ॥४६॥
मागें एकदां काशीस गेले । ते समय़ीं अभिनव घडलें । महामारीनें त्रासले । जन सर्व ॥४७॥
किती पडती कित्येक मरती । कोणा न मिळे मूठमाती । महाराज चालिल्या मार्गावरती । भिक्षाहारी मृत पडलीं ॥४८॥
तियेचें तान्हें मूल । रडोनि करी गोंधळ । स्तनपान्हा उतावेळ । परि दूध न येई ॥४९॥
पाहोन त्या बालकाची स्थिती । दयार्द्र झाली गुरुमूर्ति । काय झालें माउलीप्रती । हाकां मारोनी पहावें ॥५०॥
शिष्य वदती ते काळीं । ही तों मृत झाली । सद्‍गुरु वदती झीट आली । रामतीर्थ आणावें ॥५१॥
तीर्थ शिंपडोन अंगावरी । माउली सावध हो सत्वरी । बालका घेवोन अंगावरी । स्तनपान दे वेगें ॥५२॥
ऐसें वदती गुरुमाउली निर्जिव तनू सजीव झाली । लोक पहातां सांवरी । बाला घेत कडेवरी ॥५३॥
विस्मय वाटे सकळांसी । धन्य साधू तेजोराशी । मानवी कृती नव्हे ऐसी । म्हणोनि चरणीं लोळती ॥५४॥
घटीं मठीं चैतन्य भरलें । हें तों बाणोनिया गेलें । चैतन्य दृष्टी पाहतां आलें । अचेतनासी चेतन ॥५५॥
असो उपाधि होईल बहुत । ह्मणोनि निघाले त्वरित । उध्दरिती अनंत भक्त । रामनाम बोधोनि ॥५६॥
साठये उपनामें न्यायाधीश । सात्विक अधिकारी विशेष । श्रीमान्‍ परि भोगिती त्रास । पोटशूल बाधेचा ॥५७॥
चैन नसे दिननिशी । सदा करिती षथ्यासी । औषधी देशी विदेशी । घेतां गुण न वाटे ॥५८॥
उपाय करोनि थकले । व्यथा अणुभरी न ढळे । तंव भाग्योदयें भेटले । ब्रह्मचैतन्य सद‍गुरु ॥५९॥
श्रींच्या आशिर्वचनीं । व्याधी हरली मुळींहुनि । जैसा उदय होतां तरणी । अंध:कार लया जाय ॥६०॥
येणेंपरी गोंदवल्यासी । असतां करणी केली कैसी । चिंतामणभटट द्विजासी । उदरव्यथा अतिशय ॥६१॥
कर्नाटकीं वस्ती ज्यासी । उदरव्यथा बहु जाची । वाटे आहुती प्राणांची । घेईल आतां निश्चयें ॥६२॥
क्वचित्काळीं स्वल्प अन्न । क्वचित्काळी पय:पान । दु:ख भोगी रात्रंदिन । प्राण जातां बरें म्हणे ॥६३॥
उपाय करितां करिता थकले । दिवसेंदिवस व्याधी प्रबळे । तंव अकस्मात्‍ श्रवणीं पडलें । ब्रह्मचैतन्यचरित्र ॥६४॥
महासाधू गोंदवलेकर । केवळ ईश्वरी अवतार । करावया जगदोध्दार । मर्त्य लोकीं अवतरले ॥६५॥
व्याधिग्रस्त बहुत येती । गुरुप्रसादें मुक्त होती । तुम्ही जावें शीघ्र गती । व्याधी हरण करती ॥६६॥
परिसेनियां ऐसी वाणी । वाटे अमृत पडलें श्रवणीं । सत्वर निघाला तेथोनी । गुरुभुवना पावला ॥६७॥
समाराधना कोणी केली । भोजनापात्रें सिध्द झाली । तंव भटट्जीची स्वारी आली । दर्शन घ्यावया श्रीगुरुचें ॥६८॥
समर्थ वदती विप्रासी । बैसा सत्वर भोजनासी । विप्र वदे विनयेसी । अन्न वैरी आमुचें ॥६९॥
अन्नविणें प्राण जाती । अन्न खातां तीच गती । आठा दिवसां उपरांती । स्वल्प आहार सेवितों ॥७०॥
ते दिनीं अहोरात्र । शूल उदरीं सर्वत्र । ओखटें माझें प्रारब्धसूत्र । दयासिंधू गुरुराया ॥७१॥
श्रीगुरु वदती ते समयीं । रामप्रसादा दोष नाही । भांति सांडोन लवलाही । सेवन करा मिष्टान्नें ॥७२॥
भीत भीत पत्रावरी । बैसला द्विज ते अवसरी । साधुसंनिध मरतां बरी । गती तरी मिळेल ॥७३॥
बहुतां दिसांचा भुकेला । अत्यागृहें तृप्त केला । तधींपासोन शुल गेला । धन्य कृपा श्रीगुरुची ॥७४॥
मोरगिरीचे भक्तजन । श्रीसंनिध येवोन । विनविती प्रेमेंकरोन । रामस्थापने चलावें ॥७५॥
बहुत दिवस विनवितां । कृपा उपजली गुरुनाथा । जावोन स्थापिलें रघुनाथा । आनंदोत्सव बहु झाला ॥७६॥
भक्त नेती घरोघरीं । गुरुपूजा परोपरी । करोनि मस्तक चरणावरी । अघनाशना ठेविती ॥७७॥
गुरुची कीर्ति परिसोनी । समंधग्रस्त शिंपीण जनी । येता मुक्त करिती झणीं । सदगुरु दयाळ ॥७८॥
ऐशा अनंतव्याधीस । गुरुकृपामृतरस । मिळतां होय विनाश । भाग्यवंता लाभतसे ॥७९॥
साधकांसी बोधामृत । वेळोवेळां सद्‍गुरु देत । त्यांची नामें श्रोतें संत । परिसावीं एकचित्तें ॥८०॥
अमृतघुटका मुख्य जाण । परमार्थ न होण्याचें कारण । निस्पृह समास शिकवण । अभंगवचनें अनेक ॥८१॥
आचारविचार स्त्रीधर्म । साधकां बाधक कलिधर्म । याचेंहि कथिती वर्म । करुणसागर गुरुमूर्ती ॥८२॥
मुख्य सार स्वधर्माचरण । जतन करोनि नामस्मरण । करावें अधनाशन । स्वस्वरुपा पावावया ॥८३॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत द्वितियसमास:। ओवीसंख्या ॥८३॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ जयजय रघुवीरसमर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP