मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|उत्तरार्ध|अध्याय दहावा| समास तिसरा अध्याय दहावा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा समास पांचवा समास सहावा अध्याय दहावा - समास तिसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवे नम: । जेव्हां गुरुनिरोप घेवोनि ॥ इंदुरी आली गुरुजननी । तेथें तपतेज पाहोनि । अनेक भक्त जाहले ॥१॥जिजाबाई नामें भक्त । कैसी झाली पदांकित । त्याचा इतिहास तुम्हीं संत । श्रोतेजनीं परिसावा ॥२॥जिजाबाईचा पती । लागला गुरुभजनाप्रती । जिजा म्हणे भोंदू असतीं । कलियुगीं बहुतेक ॥३॥पाहोनि याची परीक्षा । उतरूं साधुत्वाचा नक्षा । मनीं धरुनि आकांक्षा । वरिवरी सेवा करी ॥४॥एकदां भोजना बैसविलें । पती नाहीसें पाहिलें । सत्व पाहूं ये वेळे । साधुत्व कसा लावोनि ॥५॥ऐसा मनीं विकल्प केला । मिरच्या कुटूनि लाडू वळला । पात्रीं आणोन घातला । दुरुनि पाहे कौतुक ॥६॥स्वस्थपणें भक्षण केला । आणिक म्हणती लाडू घाला । पुनरपीहि भक्षिला । हा हा हू हू होईना ॥७॥मनीं ह्मणी हा धूर्त । रानींवनीं असे भ्रमत । उपास घडतां असेल खात । भगवती क्वचित्काळीं ॥८॥निखारे काढिले रखरखीत । पात्रीं आणोनि घालित । सदगुरु सहजानंदांत । तेही खाऊं लागले ॥९॥पाहोनि झाली घाबरी । धांवोनिया चरण धरी । अज्ञानी मी तारी तारी । कृपाळूवा गुरुराया ॥१०॥स्त्रीबुध्दि अविचार । घडला जी दयासागर । पतीसी कळतां विचार । गती बरवी मज नाहीं ॥११॥ढोंगी बहु जगांत । मिरविती म्हणोनि संत । याकारणें अनुचित । कर्म घडलें स्वामिया ॥१२॥साधूसि घालोनि निखारे । केलें सुकृताचें मातेरें । यमदूत छ्ळतील सारे । दुष्ट पातली म्हणोनी ॥१३॥इहपर दु:खाच्या राशी । दिसो लागल्या अविनाशी । आतां मज गती कैसी । सांग सांग सर्वज्ञा ॥१४॥अज्ञानी मी चांडाळीण । उपजतांच जातें मरोन । तरी साधुद्वेष दोष गहन । टळला असता आजिचा ॥१५॥आतां जी दयासागरा । दोषार्णवीं मज तारा । तुम्हांवांचोनि आसरा । दुजा नसे त्रिभुवीं ॥१६॥स्फुंद स्फुंदोनिया रडे । दंड प्राय चरणीं पडे । दयासागर म्हणती वेडे । वृथा शोक न करावा ॥१७॥अनुताप उपजला पोटीं । तेव्हा दोष गेले पाठी । अभय देतों मी शेवटीं । सत्वरी शोक आवरी ॥१८॥हस्ते धरोनि उठविली । मृदुवचनें शांत केली । तधीपासोन लीन झाली । एकनिष्ठ सेवा करी ॥१९॥जिजाबाईचा पती । तैसी जिजा माउली सती । कन्या ताई सुमती । सेवा करिती श्रीगुरुंची ॥२०॥कांही काळ त्यांचेजवळ । वास्तव्य करिती गुरुदयाळ । सेवोनि बोधामृत कवळ ज्ञान । झाले तिघासी ॥२१॥एकदां कुंभारयोगी कोणी । साधनीं अडले म्हणोनि । आशंका काढिती लिहोनी । प्रश्न पुसती बहुतांसी ॥२२॥बहुत साधु शोधिले । परी समाधान नच झालें । तंव कोणी वर्तमान कथिलें । ब्रह्मचैतन्य सद्गुरुचें ॥२३॥तेव्हां आला धांवत । जिजाईचे गृहाप्रत । तंव मंचकी देखिले समर्थ । चरण चुरित जिजा ताई ॥२४॥दुरुन पाहतां म्हणे कांही । साधुत्वाचे लक्षण नाहीं । स्त्रिया चरण चुरिती पाही । योगिया मुळीं विघातक ॥२५॥ऐसें मनीं आणोनि । निघतां झाला तेथोनि । तंव श्रीसमर्थानीं । ताईकडोन बोलाविला ॥२६॥अहो श्रेष्ठ योगिराज । आला होता कवण काज । प्रश्न काढा पाहूं सहज । हास्यमुखें बोलतीं ॥२७॥मनीचा भाव जाणला । पाहोन योगी द्चकला । कागद काढोन पुढें केला । चरण वंदी तेसमयीं ॥२८॥ताईनें वाचिला कागद । अठरा प्रश्नांचा अनुवाद । म्हणे सद्गुरुप्रसाद । होतां प्रश्न सुटतील ॥२९॥आज्ञा होईल मजला जर । उत्तरें देईन सत्वर । निनोदे वदती गुरुवर । पोरबुध्दी कायसी ॥३०॥योगी साधक असती भले । बहुत देश शोधित आले । महानमहान् जेथें थकले । तूं काय बदशील ॥३१॥परि इच्छा असे तुजसी । तरी तूंच बोल वेगेसी । आज्ञा होतांच ताईसी । प्रश्न सोडवूं लागली ॥३२॥एकामागोन एक प्रश्न । सोडवून करी समाधान । योगी आनंदित होवोन । चरण धरित ताईचे ॥३३॥श्रीचे चरना नमोनि । ह्मणे धन्य साधू शिरोमणी । मानवाची नव्हे करणी । सत्यस्वरुप दावावें ॥३४॥धन्य तुमचा प्रसाद । लहान बालिका बोले विशद । जो थोरथोरासी अनुवाद । करितां समाधान होईना ॥३५॥साच नोहे मानवकरणी । म्हणोनि लागला चरणीं । सत्य स्वरुप दावा झणी । पायी घटट मारी मिठी ॥३६॥हाती धरुन उठविला । हनुमंत स्वरुप तयाला । दावोन योगी धन्य केला । समर्थ श्रीसद्गुरुंनी ॥३७॥योगी म्हणे माझे मनीं । विकल्प आला होता झणी । संगती स्त्रिया पाहोनि । क्षमा करणें स्वामिया ॥३८॥ अग्निकाष्ठें भक्षण करी । संगती राहोन निर्विकारी । ऐसा तूं ब्रह्मचारी । दर्शनें पुनित जाहलों ॥३९॥ऐशी स्तुति करी बहुत । वरचेवरी चरण धरित । अनुतापें जाहला तप्त । योगभ्रष्ट झाला जो ॥४०॥विकल्पें योगभ्रष्ट केला । तया बोधें शांतविला । पुनरपि साधनें मुक्त झाला । धन्य धन्य गुरुकृपा ॥४१॥ते समयी गुरुवर । एकांतप्रिय होते फार । क्वचित प्रसाद कोणावर । पूर्वभाग्ये होतसे ॥४२॥राजयोत जेव्हां धरिला । तेव्हा लोकीं प्रकट झाला । प्रसाद बहुता लाधला । कांही श्रोते अवधारा ॥४३॥सांगली येथें सरकारी । डांक खात्याचे अधिकारी । गृहस्थ होते सदाचारी । परि कटटे शिवभक्त ॥४४॥विष्णुपंत नगरकर । नामें असती द्विजवर । करोनिया घरदार । गृहस्थाश्रमीं राहती ॥४५॥विष्णुभक्तांची निंदा भारी । करिती नानापरोपरी । वैष्णव तितुके त्यांचे वैरी । कृष्णलीला निंदिती ॥४६॥नित्य करिती पार्थिवपूजन । सदा ध्याती उमारमण । शिवभक्ती करिती गहन । परि हरीसी निंदिती ॥४७॥महाथोर शिवभक्त । परि न्यूनभाव द्वैत । जाणोनिया सद्गुरुनाथ । कृपादृष्टी पाहती ॥४८॥एकदां तया दृष्टांत झाला । स्वप्नी पूजेसी बैसला । शिवालय़ीं शंकराला । पूजितसे प्रेमानें ॥४९॥तंव अकस्मात् लिंगामागोनी । प्रगट झाली गुरुजननीं । गृहस्थ पाहे दचकोनी । कोणे म्हणी सिध्दपुरुष ॥५०॥चहुंकडे फांकली प्रभा । दिव्यपुरुष सिध्द उभा । कीं हा परमानंदाचा गाभा । रामदासी भासतसे ॥५१॥पायी खडावा रत्नजडित । कंठी तुळशीमाला शोभत । मुद्रा रामनामांकित । पाहतसे प्रेमानें ॥५२॥कफनी फलगुरु घातला । भाळी त्रिपुंड्र शोभला । मस्तकीं जरीकांठ जिला । मखमली टोपी शोभतसे ॥५३॥हाती स्मरणी तुळशीची । झोळी नवविध भक्तीची । कुबडी श्रीसमर्थाची । रघुवीर समर्थ गर्जती ॥५४॥विप्र उभा कर जोडोनि । समर्थ वदती तयालागोनी । तुम्ही शिवभक्त तपोज्ञानी । परि हरीसी निंदिता ॥५५॥हरिहरा भेद नाहीं । श्रुतिस्मृति कथिती पाही । आजपासोन प्रत्यहीं । शालिग्रामही पुजावा ॥५६॥विष्णूचें करितां पूजन । शिव होईल सुप्रसन्न । येविषयी संशयीमन । पुनरपि ठेऊं नये ॥५७॥हा जी म्हणोनि विनविलें । अंगी रोमांच थरारिले । नेत्री आनंदाश्रु भरले । मुखीं शब्द फुटेना ॥५८॥संत पुजावे आरते । देव सारावे परते । अभंगवाक्य तयातें । आठवलें ते काळीं ॥५९॥तेचि साहित्य घेवोनि । पूजिले साधू शिरोमणी । मागुती भेट होईल म्हणोनि । गुप्त झाले दयासिंधू ॥६०॥विप्र जागृतील आला । सकळां दृष्टांत निवेदिला । शालिग्राम पुजूं लागला । तेव्हांपासोनि ॥६१॥परि अंतरी सिध्दध्यान । लागले सदा अनुसंधान । पुनरपि देईन दर्शन । हें वाक्य चिंतीतसे ॥६२॥सिध्द साधू येतां कोणी । दर्शना जाई धांवोनि । नाना क्षेत्रासी पाहोनि । स्वप्नीचें ध्यान धडितसें ॥६३॥कांही केल्या आढळेना । तळमळ लागली मना । सकळां सांगे खाणाखुणा । ऐसा साधू पाहिला कीं ॥६४॥तंव कोणी तया कथिलें । पंढरीसी म्यां पाहिले । गोंदावलेकर महाराज भले । राममंदिरीं वास करिती ॥६५॥शीघ्र गाडीत बैसला । पंढरी क्षेत्री पावला । विठठलचर्णीं लोळला । सद्गुरु भेटवी म्हणोनि ॥६६॥शोधिले राममंदिर । देखिले नयनीं गुरुवर । आनंदाचा भरला पूर । मज दीना वर्णवेना ॥ ६७॥तेंचि रुप पाहतां नयनीं । चरण न्हाणिले अश्रुंनीं । प्रेमें हस्तें कुरवाळोनि । बोलती झाली गुरुमाय ॥६८॥महाथोर शिवभक्त । शिवासी आवडते अत्यंत । कलियुगी ऐसे संत । भेटती विरळा ॥६९॥शालिग्राम पूजितां की नाहीं । कां विसरला स्वप्नसमय़ी । शिव विष्णू एकची पाही । त्रिकाळ सत्य मानावे ॥७०॥जे शिवासी निंदिती । ते हरीसी नावडती । तैसे विष्णूसी निंदिती । तेही शिवा नावडे ॥७१॥असो अनुग्रह प्रसाद देवोन । केलें तयाचे समाधान । शिव विष्णु हे अभिन्न । सांगती सकळांसी ॥७२॥जेथे राममंदिरें बांधिलीं । तेथें शिवालयें स्थापिली । सिध्दारुढांची भेट झाली । तेसमयी तेची कथिती ॥७३॥कर्नाटकी हूबळीं शहरीं । सिध्दारुढ सिध्दस्वारी । एकदां समर्थाची फेरी । जाहली तया स्थानासी ॥७४॥समर्थशिष्य रामनाम । गर्जती उच्चस्वरें परम । सिध्दशिष्य शिवनाम । गर्जती तेसमयासी ॥७५॥दोघे उपदेशिती सकळांसी । भेद नसे हरिहरासी । दोन नेत्रें एका वस्तूसी । पाहता भिन्न दिसेना ॥७६॥असो ऐसी गुरुमाउली । बहुतांप्रती लाभली । महद्भाग्ये फळासी आली । ते ते पुनित जाहले ॥७७॥इति श्रीसद गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत तृतीयसमास:। ओवीसंख्या ॥७७॥॥ श्रीसद्गुरुपादुकार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP