बहु अज्ञ जीवांप्रती उध्दरीले । तसें नास्तिका सत्पथा लावियेलें ॥
समस्तां मुखें नाम हें बोलवीती । नमस्कार त्या ब्रह्म-चैतन्य-मूर्ति ॥१०॥

श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: ।  
श्रीसद्‍गुरु चिन्मयदाता । दोन्हीं कर जोडोनि आतां । चरणकमली ठेवितों माथा । त्रिविधतापें गांजलों ॥१॥
अज्ञान उद्वेग पीडी भारी । शांती झाली पाठमोरी । ह्मणोन हिंडे दारोदारी । श्रमलों देवा अतिशय ॥२॥
अज्ञानदु:ख असे विशद । माजी अनंत पोटभेद । करितां तयाचा अनुवाद । लाजिरवाणे मज वाटे ॥३॥
परी गेलिया वैद्याकडे । न ठेवावें मागेंपुढें । तरीच शीघ्र गुण जोडे । भिडेनें व्याधीं शमेना ॥४॥
भीड सांडोन तुमचे द्वारी । आलों दीन भिकारी । परिसा जी आपत्ती सारी । दीनानाथा गुरुमूर्ते ॥५॥
देहबुध्दी दृढ जाळें । प्रपंच अभिषाचे गोळे । टाकोनि धीवरें दुर्धर काळें । ओढूं आरंभिलें ॥६॥
वासना तस्कर महाथोर । द्वैतसहाय्यें करी बेजार । विवेकी वृत्ति क्षणभर । नसतां लाग साधिती ॥७॥
आशेनं कल्पनातरंग । अनंत उठती वृत्तिभंग । होतां दुरावे श्रीरंग । आर्त तेंही पुरेना ॥८॥
अहंकार पदोपदीं । आडवोन पाडी उपाधी । न कळ्दत कार्य साधी । गुपित पाश टाकितसे ॥९॥
ऐशिया पाशसमुदायीं । जीव अत्यंत कष्टी होय़ी । क्षणभरी उसंत नाही । जगदृष्टीपुढें करितसे ॥१०॥
दारापुत्र मायापाश । मोहें करिती आपुला दास । जगत्पिता जगन्निवास । पारखा झाला ॥१२॥
लोकेषणा सकामकर्म । नीतिव्यवहार कुलधर्म । देहव्याधी कष्टी परम । करिती किती आवरावें ॥१३॥
कामक्रोधाचे तडाखें । अधर्माचीं पेरिती विखें । ऐसे अज्ञानाचे वाखे । दु:ख देती अनिवार ॥१४॥
जीव झाला परम कष्टी । समाधानाची पडली तुटी । कोण निवारील संकटीं । शोधूं लागलों ॥१५॥
वेदशास्त्रीं बर्णिली कीर्ती । आत्मारामीं अखंड शांती । परी त्या रामाची वस्ती । मनबुध्दी अगोचर ॥१६॥
जे कल्पनेसी गवसेना । कैसें जावें तया स्थाना । काय भाकावी करुणा । तयापुढें ॥१७॥
बरें मागे तया न देई । निरिच्छाची पाठ घेई । दातेपणाची नवलायी । ऐसी असे ॥१८॥
सगुण निर्गुण द्वैतभाव । संदेही गुंतला जीव । तरी कवणापाशीं कींव । भाकावी हें उमगेना ॥१९॥
मागण्याची सोय नाहीं । आशा तरी धरणें घेई । परमार्थी हांसती पाही । वेडा अज्ञानी म्हणोनि ॥२०॥
भूक कांही शमेना । अन्न तेंही मिळेना । मागतां बोलती दैन्यवाणा । काय म्हणोनि होतोसी ॥२१॥
असो ऐशी जाहली स्थिती । दोन्हीकडेही फजिती । तंव मार्ग दाविला संती । सद्‍गुरुपदाचा ॥२२॥
म्हणोनि आलों धांवत । दाता एक सद्‍गुरुनाथ । दातृत्व असे कल्पनातीत । बहुतीं खुणा सांगितल्या ॥२3॥
हें शांतीचें निजघर । वेदांताचें माहेर । वासनाक्षय सपरिवार । गुरुपदीं मुळाहून ॥२४॥
सुख येई वस्तीसी । ठाव नसे द्वैतासी । याचकांच्या आर्त राशी । विरोन जाती ॥२५॥
प्रपंच परमार्थ दोन्हीकडे । छ्त्र चालिलें रोकडें । सदा हे महाद्वार उघडें । धन्य देणगी गुरुकृपा ॥२६॥
चरणी घातलें दंडवत । आतां चिंता नको व्यर्थ । पदरीं घेतील समर्थ । बालचिंता मायेसी ॥२७॥
ऐसी ही गुरुमाउली । बहुतांलागीं पान्हवली । अष्टमाध्यायीं कथिली । आणिक पुढती अवधारा ॥२८॥
त्रिविध प्रकृति बोलती । तैसे मानव अनंतजाती । अज्ञ नास्तिक वेदांती । हटनिग्रही कितियेक ॥२९॥
कोणी व्याधिग्रस्त झाले । कोणा भूतें पछाडिलें । कोणी उम्नादें भरलें । निंदा करिती गुरुची ॥३०॥
नररुपें श्रीमारुती । अवतरली गुरुमूर्ती । त्याहीवरी सिध्दस्थितीं । उच्चसाधनें मिळविलीं ॥३१॥
ऐशियांची होतां भेटी । तापत्रयांच्या सुटती गांठी । समाधान पाठीपोटी । रामभक्ति वाढविती ॥३२॥
नित्य घडती चमत्कार । लिहितां ग्रंथ होय विस्तार । विवरण करूं थोडेंफार । कथानुसंधानें ॥३३॥
इंदुरीं असतां गुरुमाय । अनंत धरिती चरणसोय । चुकविती बहुत अपाय । गुरुसेवा करुनी ॥३४॥
साधू ऐसी पसरली कीर्ती । कोणी अधिकारी मंदमती । अधिकारमदें उन्मत होती । आले श्रीसन्निध ॥३५॥
उपहासिती भाविकासी । ढोंगी वदती समर्थासी । सद्‍गुरु हांसती तयासी । अहंकारी म्हणोनी ॥३६॥
तेव्हां तयासी क्रोध आला । अद्वतद्वा बडबडला । परम शांति देखोन झाला । मानसीं चकित ॥३७॥
मग वदे समर्थासी । तुम्ही साधू म्हणवितां आपणासी । जरी भविष्य सांगाल मजसी । तरीच हें सत्य मानूं ॥३८॥
महाराज वदती तयालागून । आह्मी गोसावी अज्ञान । रामनामावांचोन आन । भविष्य नये आह्मांसी ॥३९॥
परी तुमची पुरवील आर्त । गोदू ही भगवद्भत । परिसा स्थीर करोनि चित्त । अहंकार सोडोनी ॥४०॥
दहा वर्षाची बालिका गुरुकृपे वदली देखा । जन समस्त पाहती कौतुका । गुरुमहात्म्य अगाध ॥४१॥
आजपासोन आठवे दिनीं । बालकें मरतील दोन्हीं । पुनरपि पंधरा दिवसांनी । कांता तुझी मरेल ॥४२॥
अधिकारें उन्मत होसी । तोही जाईल विलयासी । पुनरपि श्रीचरणासी । धरशील पश्चातापें ॥४३॥
सहज लीलें वदली गोष्ट । राव मनीं खोंचला धीट । वरी हास्य करोनि विकट । निघोन गेला ॥४४॥
तंव आठा दिवसांनी । ओहळी वाहोन दोन्हीं । बालकें गेलीं मरोनी । स्त्री बुडाली विहिरीत ॥४५॥
लांचेचा आळ आला । अधिकार्‍याचा रोष झाला । मग पश्चात्तापें पोळला । श्रीचरणी मिठी घाली ॥४६॥
तारी तारी गुरुराया । अहंकारें वाहवलों वायां । आतां मुख हे द्डवाया । ठाव देयीं तवपदीं ॥४७॥
तूं दीनाची माउली । तूंचि शांतीची साउली । उपेक्षा न करा वाहिली । तरणोपाय सांगावा ॥४८॥
श्रीगुरु वदती तयासी । प्रारब्धभोग जिवासी । न चुके जाण निश्चयेसी । दोष नाहीं तुम्हांकडे ॥४९॥
होणार तें होवोनि गेलें । आतां स्मरा राम पाउलें । सांकडें निवारील सगळें । नोकरी स्थीर होईल ॥५०॥
गुरुवचनीं धरिला विश्वास । नाम घेई रात्रंदिवस । आळ जाऊन नि:शेष । योग्यता वाढली ॥५१॥
महाराजांची जाहली ख्याती । ही प्रत्यक्ष देवमूर्ती । अघटित करणी करिती । रामभक्त आगळे ॥५२॥
तेथेंचि एक प्रकार । घडला तो करुं विस्तार । चित्त करुनिया स्थीर । श्रवण करावें ॥५३॥
गुरुकथा बहुगोड । सेवितां दवडी होड । पूर्वसंचित असतां जाड । श्रवणीं पडे ॥५४॥
गुरुकथा वर्णायासी । बुध्दि नसे आह्मांसी । वंदुनि तयांचे चरणांसी । बोलविती तें बोलतसें ॥५५॥
गुरुभक्त झाले फार । नित्य करिती नामगजर । हाती स्मरणी घेऊनि सार । जप करिती नामाचा ॥५६॥
त्यांत विप्र होते बहुत । रामनाम जपती नित्य । कर्माभिमानी कांही पंडित । तयांसी हें नावडे ॥५७॥
आम्ही अधिकारी ब्राह्मण । सदा करावें वेदाध्ययन । शुद्रें करावें नामस्मरण ॥ उचित नसे आपणांसी ॥५८॥
आम्ही त्रिवर्णासी पूज्य । आम्ही ज्ञानी उपजत सहज । भूलोकीं देवद्विज । वदती तें पहावें ॥५९॥
शिष्य वद्ती तयांलागून । ज्ञानी तुम्ही अतिगहन । ज्ञानचिन्हें करा कथन । शब्दज्ञान सांडोनी ॥६०॥
कामक्रोध अहंकार । हे तों तुमचें माहेरघर । वैराग्य नसे तिळभर । अन्नार्थ वेदविक्रय करिता ॥६१॥
वंचकवृत्ती धरोनी । वदतां आम्ही बहु ज्ञानी । ऐसीच वदली वेदवाणी । सांगा कीं आम्हांसी ॥६२॥
वेदपुरुष नारायण । तो जयासी प्रसन्न । तो पूज्य सकलांगुन । सांगणें नलगे ॥६३॥
वेद वंद्य आम्हासी । परि पात्रता पाहिजे पठणासी । आहारविहार नियमासी । अतिशुध्द ॥६४॥
तरीच मंत्रसामर्थ्य चाले । ज्ञान होईल शुध्द भलें । परि सांप्रत युग आलें । कैसे पहा ॥६५॥
शक्य तितुकें करावें । सुलभ नाम जपत जावें । ऐसे कथिलें गुरुदेवें । नाम प्रिय देवासी ॥६६॥
नामें घडे भागवदभक्ति । नामें होय ज्ञानप्राप्ती । नामें जोडे सायुज्यमुक्ति । संतसज्जन सांगती ॥६७॥
वेदारंभी हरिनाम । कलीत साधन हेंचि परम । सुगम असोन दुर्गम । भगवत्पदीं नेतसें ॥६८॥
परि तें नायकतीच कोणी । उपहासती तयांलागोनी । शास्त्री होते तोफखानी । ते करिती बहुनिंदा ॥६९॥
एकदां राममंदिरांत । महाराज आले दर्शनार्थ । शास्त्रियास कळली मात । धांवोन आले ते ठायीं ॥७०॥
तुम्हीं भ्रष्टविले ब्राह्मण । उपदेशिता नामस्मरण । अहंकारें भरी भरोन । दुरुत्तरे बोलती ॥७१॥
समर्थ वदती नामप्रताप । कळेल तुम्हां आपेआप । उगाच न करावा संताप । अज्ञानियावरी ॥७२॥
ऐसें पाहिलें बहुत । म्हणोनि गेले गृहांत । तंव गुरुमहिमेची मात । श्रोतेजनीं परिसावी ॥७३॥
एक प्रहर राहतां निशीं । वेड लागलें शास्त्रासी । घेवोन जळके काष्टासी । गृहांतूनि निघाले ॥७४॥
काष्ठांची करुनी टिपरी । मुखी नाम उच्चारी । हिंडतसे गांवभरी । शुध्दी नाही ॥७५॥
धरोनि खाली बैसवितां । हात तोंड नये आंवरितां । यासी काय करावें आतां । भूतें कीं झडपिलें ॥७६॥
परी हे वदती राम । हा साधूनिंदेचा दोष परम । शोधीत आले आराम । ब्रह्मचैतन्य महाराज ॥७७॥
चरणीं आणोन घातले । करुणा भाकों लागले । कृपासागर श्री द्रवले । मस्तकीं हस्त ठेविला ॥७८॥
सहज लागली समाधी । हारपल्या आधिव्याधी । मग येवोन शुध्दी । वंदन करी क्षणक्षणा ॥७९॥
अनुग्रह दीक्षा दिली । निंदकावर कृपा केली । नामसत्ता दाविली । समस्तांसी ॥८०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत प्रथम समास:। ओवीसंख्या ॥८०॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP