अभंग - ८३८१ ते ८३९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३८१॥
श्वासोश्वास निमिषोनिमिषीं । वारी केली पंढरीसी ॥१॥
प्रत्येक वृत्ती वेरझारी । तुझ्या दर्शनासी हरी ॥२॥
प्रेम अंगीं स्वेद कंप । तेचि घेऊनी पताक ॥३॥
गेलों राउळाभीतरीं । सहस्त्रदळाचे माझारीं ॥४॥
संतीं दाविला मारग । अखंडित राजयोग ॥५॥
रंग शिळे उभा ठेलों । तुका ह्मणे धन्य झालों ॥६॥

॥८३८२॥
ऐक ऐक गा किरीटी । गुज योगाची रहाटी ॥१॥
श्वासोश्वासी प्रणवाभ्यास । तोचि आमुचा संन्यास ॥२॥
तयासीच भगवें साजे । येरा मुंड मुंडिलें विराजे ॥३॥
मज भीती त्याच्या दंडें । करिल कृतांताचीं खंडें ॥४॥
तुका ह्मणे सद्गुरुसी । ऐसा विरळा संन्यासी ॥५॥

॥८३८३॥
हृदिस्थाचा कर आत्मशिरीं जोडे । बा तैंच आतुडे समाधान ॥१॥
सोहं हंसामागें सांडी पुढें होय । वेगी धरी पाय हृदिस्थाचे ॥२॥
ॐ तोचि गुरु सोख तोचि शिव । दोहिंचे लाघव पाही डोळां ॥३॥
शास्त्रें धुंडाळोनी पाहिली कुटस्थ । तरी कीर प्रचीत नये चित्ता ॥४॥
कूटस्थाचें ज्ञान पूर्ण समाधान । समाधी व्यूत्थान कदा नोहे ॥५॥
निद्रेचा जो अंत जागृती दीपन । तये संधी मन कैसें राहे ॥६॥
सद्गुरुपद धूळ लावोनियां भाळा । पाहे तो सोहळा आनंदाचा ॥७॥
प्रीती तृतीयाची व्हावी जरी इच्छा । वंदावी पदधूळ देशिकाची ॥८॥
तुका ह्मणे येथें प्रतीतीचें माप । येरातें संताप वाचजल्प ॥९॥

॥८३८४॥
प्रथम सर्व गर्भाकार । तेथें कोणता विकार ॥१॥
जैसें जळ तें निर्मळ । तेथें कोणता रे मळ ॥२॥
लय तेंचि अहंभक्ति । पाहे पुरुष प्रकृति ॥३॥
उभी हात जोडुनियां । भोगी भज स्वामिराया ॥४॥
इच्छा झाली तिसी पूर्ण । पुत्र व्हावे ह्मणवून ॥५॥
आकस्मात गर्भिणी झाली । ब्रह्मा विष्णु रुद्र व्याली ॥६॥
त्याचें लग्न करितां । आपण झाली त्रिविधता ॥७॥
अनुभव ब्रह्मगूढ । तुका ह्मणे सांगूं पुढें ॥८॥

॥८३८५॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथी माया अनिवार ॥१॥
त्याचें रुप सांगू आतां । मन करी एकाग्रता ॥२॥
रक्त श्वेत नीळ शाम । चोहोंमध्यें सोहं ब्रह्म ॥३॥
दृश्य अदृश्य वेगळा । सोहं राम तो आगळा ॥४॥
पिंड ब्रह्मांड व्यापुनि देहीं । दशांगुलें आला पाही ॥५॥
तुका ह्मणे अनुभव घेई । सोहंस्वरुप तोचि पाही ॥६॥

॥८३८६॥
रक्त श्वेत लिंग देह । शाम नीळ चवदा देह ॥१॥
पीत सुनीळ चिन्मय । होता सर्वा दृश्य आहे ॥२॥
नाहीं रुप नाम । तोचि पाहे सोहं ब्रह्म ॥३॥
सोहं ब्रह्म तुका पाहे । सद्गुरुचि कृपा आहे ॥४॥

॥८३८७॥
सोहं तोचि सद्गुरुराव । त्याचे चरणीं ठेवा भाव ॥१॥
सोहं समाधि साधितां । मुक्त होयरे तत्वतां ॥२॥
सोहं समाधि वांचुनी व्यर्थ माय शीण जनी ॥३॥
तुका झाला तेथें दीन । सोहं समाधि लागून ॥४॥

॥८३८८॥
नेति नेति ह्मणोनियां । शरण आले स्वामीराया ॥१॥
दावी आपलें स्वरुप । अठरा जण करिती तप ॥२॥
चार सहा करिती ध्यान । सोहं समाधिलागून ॥३॥
तुका ह्मणे काय बोलूं । सोहं समाधींत खेळूं ॥४॥

॥८३८९॥
सोहंस्वरुप तेंचि जाण । न कळे सद्गुरुवांचून ॥१॥
नामरुपातें बिंबलें । सर्व वृत्ती मौनावलें ॥२॥
गुण निर्गुण आटले । सोहं रुपीं ते मिळाले ॥३॥
तुका ह्मणे कैसें करुं । सोहं समाधींत शिरुं ॥४॥

॥८३९०॥
सोहंरुप तें जाणावे । गुरुमुखें ओळखावें ॥१।
सद्गुरुला शरण जावें । चार शून्यपार व्हावें ॥२॥
पार होऊनियां मागें । सोहं ब्रह्म राहे मागें ॥३॥
आतां उरलें नाहीं कांहीं । तुका खेळे सद्गुरुपायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP