आंधळा पांगुळ - ६९२५ ते ६९३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६९२५॥
पांगुळ झालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ॥
खेटितां कुंप कांटी । खुंटे दरडी न पाहे ॥ आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥
दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥२॥
हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं ॥ न मिळेची दाता कोणी । जन्मदु:खातें वारी ॥
कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी ॥ पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥३॥
या पोटाकारणें गा । झालों पांगिला जना ॥ न सरेचि बापमाय । नाहीं भीक खंडणा ॥
पुढारा ह्मणती एक । तया नाहीं करुणा ॥ श्वान हें लागे पाठी । आशा बहु दारूणा ॥४॥
काय मीं चुकलों गा । मागें नेणवे कांहीं ॥ न कळेचि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ॥
मी माजी भुललों गा । दीप पतंगा सोयी ॥ द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥५॥
दुरोनी आलों मी गा । दु:ख झालें दरुषन ॥ विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥६॥

॥६९२६॥
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों ॥ करुं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों ॥
पायडोळे म्हणतां माझे । तिहीं कैसा मोकलिलों ॥ परदेशी नाहीं कोणी । अंध पांगुळ झालों ॥१॥
आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता ॥ पाटीं पोटीं नाहीं कोणी । निरवी सज्जन संता ॥२॥
चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं ॥ बहुत जणें गेलीं । नाहीं आलीं मागुतीं ॥
न देखें काय झालें । कान तरी ऐकती ॥ बैसलों संधिभागीं । तुज धरुनी चित्तीं ॥३॥
भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव ॥ न भरे पोट कधीं । नाहीं निश्चळ  पाव ॥
हिंडतां भागलों गा । लक्ष चौर्‍याशीं गांव ॥ धरुनी राहिलों गा । हाचि वसता ठाव ॥४॥
भरंवसा काय आतां । कोण आणि अवचिता ॥ तैसीच झाली किर्ति । तया मज बहुतां ॥
म्हणऊनी मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता ॥ लागली भूक थोरी । तूंचि कृपाळू दाता ॥५॥
संचित सांडवलें । कांहीं होतें जवळी ॥ वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी ॥
निष्काम झालों देवा । होतें माझें कपाळीं ॥ तुका म्हणे तूंचि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥६॥

॥६९२७॥
देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टि गेली व आलें पडळ ॥
तिमिर कोंदलेंसें वाढे वाढता प्रबळ । भीत मी झालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥
आतां मज दृष्टि देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारुनियां पापा अंजन लेववूनी ।
करीं मारग सोपा ॥ जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥२॥
होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार ॥ जात होतों जनां मागें । तोही सांडिला आधार ॥
हा ना तोसा ठाव झाला । अवघा पडिला अंधार ॥ फिरलीं कायी माझीं मज ॥ कोणी न देती आधार ॥३॥
जोंवरी चळण गा । तोवरी ह्मणती माझा ॥ मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा ॥ इंद्रियें मावळलीं ।
आला बागुल आजा ॥ कैसा विपरीत झाला । तोचि देह नव्हे दुजा ॥४॥
गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध ॥ मी माझें वाढवूनी । मायातृष्णेचा वाघ ॥
स्वहित न दिसेचि । केला आपुला वध ॥ लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥५॥
लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा ॥ सांडिली वाट मग । झालों निराळा कैसा ॥
पाहतों वास तुझी । थोर करुनी आशा ॥ तुका ह्मणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥६॥

॥६९२८॥
सहज मी आंधळा गा निजनिराकरा पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथें ॥
मी माझें हारपलें ठायीं जेथींच्या तेथें । अदृश्य तेंचि झालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥
सुखी मी निजलों गा शून्य सारुनी तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥२॥
टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा ॥
न मागें मी भीक आतां हाचि झाला भरंवसा । बोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥३॥
ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरुप जागविला दाता घेऊनी छंद ॥
घेऊनी आला दान निजतत्व निजबोध । स्वरुपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥४॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसी ॥
मागोनी आली वाट सिद्धओळीची तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥५॥
वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणीवनागवण नेदी लागो ठाव ॥
म्हणोनि संग टाकीं सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संतीं मागें केला उपाव ॥६॥

॥६९२९॥
आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता ॥
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदु:ख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥२॥
घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ॥
न देखें दुसरें गा झाली अदृश्यदृष्टि । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टि ॥३॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ॥
घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥४॥
बैसोनी खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दु:ख आठवी वेळा ॥
मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें लाज राखिली कळा ॥५॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुख:दुखा मोहो सांडवी धना ॥
आपपर तेंही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी झाली पावे नारायणा ॥६॥

॥६९३०॥
भगवंता तुजकारणें मेलों जीताचि कैसी । निष्काम बुद्धि ठेली चळण नाहीं तयासी ॥
न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥
भुक्ति मुक्ति तूंचि एक होसि सिद्धिचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ॥
सर्वस्वें त्याग केला धांव घातलीं आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३॥
संसारसागरु गा भवदु:खाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ॥
इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिल काय करुं दुर्भर चांडाळ ॥४॥
तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका ॥
जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥
नाठवे आपपर आतां काय बा करुं । सारिखा सोइसवा हारपला विचारु ॥
घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरुं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP