टिपरी अभंग - ६८१८ ते ६८२९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६८१८॥
खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ॥
क्रोधें अभिमान केला पाठवणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी ॥
कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥२॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ॥
टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धलीं नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां ॥
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥४॥
वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती ॥
निर्मळ चितें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ॥
तुका ह्मणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥६॥

॥६८१९॥
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसी भाई रे ॥
त्रिगुणांचे फेरी थारे कष्टी होसी । या चौघांची तरी धरीं सोई रे ॥१॥
खेळ खेळोनियां निराळाचि राहीं । सांडी या विषयाची घाई रे ॥
तेणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥२॥
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे ॥
आपुल्या संवगडिया सिकवूनी घाई । तेणें सतंतर फड जागविला रे ॥
एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ॥३॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे ॥
कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवती नाचती रे ॥
सकळिकां मिळोनी एकी च घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥४॥
रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ॥
पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे ॥
ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तोही खेळ निवडिला रे ॥५॥
ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे ॥
जनार्दन बसवंत करुनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे ॥
एकचि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत झाला रे ॥६॥
आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे ॥
तुका ह्मणे गडे हो हुशारुनी खेळा । पुढिलांची धरुनियां सोई रे ॥
एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥७॥
॥६८२०॥
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ॥
जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥२॥
सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे ॥
विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारूण्य देहभाव बाळा रे ॥३॥
आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानीं रे ॥
आंधळ्यांसी डोळे पांगुळांसी पाय । तुका ह्मणे वृद्ध होती तरण रे ॥४॥

॥६८२१॥
दोन्ही टिपरीं एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ॥
कुसरी अंगें मोडितील परी । मेळविती एका छंदें रे ॥१॥
कांही च न वजे वांयां रे । खेळिया एकचि बसवंत अवघियां रे ॥
सम विषम तेथें होऊंच नेदी । जाणऊनी आगळिया रे ॥२॥
संत महंत सिद्ध खेळतील घाई । तेच सांभाळी माझ्या भाई रे ॥
हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरें मिळोन जाय त्याची सोई रे ॥३॥
विटाळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारुनी काया रे ॥
निवडूनी बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥४॥
प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । नि:शंक होऊनिया खेळें रे ॥
नेणती नेणतींच एके पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥५॥
रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे ॥
तुका ह्मणे कंठ सद्गद्गित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥६॥


॥६८२२॥
यारे गडे हो धरुं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥१॥
फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पाडुंरंग । आजी दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥२॥
हिंडती रानोरान भुंजगांत कांटयावन । सुख तयांहून आह्मां गातां नाचतां रे ॥३॥
तुका ह्मणे ब्रम्हादिका सांवळें दुर्लभ सुखा । आजी येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥४॥


॥६८२३॥
भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे ॥
तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसांवा रे ॥
पुढें गेले ते निधाई झाले । वाणितील त्याची सीमा रे ॥२॥
बळिया आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे ॥
पुंडलील पाटील केली कुळवाडी । तो जाला भव:दु:खा वेगळा रे ॥३॥
संतसज्जनीं मांडिली दुकानें । जया जें पाहिजे तें आहेरें ॥
भुक्तिमुक्ति फुकाच साठीं । कोणी तयांकडे न पाहें रे ॥४॥
दोन्ही चोहाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ॥
न वजों ह्मणती आह्मी वैकुंठा । जिहीं देखिली पंढरीरे ॥५॥
बहुतदिस होती मज आस । आजी घडलें सायासीं रे ॥
तुका ह्मणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥६॥

॥६८२४॥
पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनी सकल रे ॥
टाळ टिपरी मांदले एक नाद रे । झाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥
चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेती काई रे ॥
भाग्यवंत कोणी गेले सांगाती । ऐसें सुख त्रिभुवनी नाहीं रे ॥२॥
आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाविती छंद रे ॥
साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥३॥
भक्तीचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उठया रे ॥
सत्व सुंदर कास घालुनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥४॥
हरि हर ब्रह्मा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे ॥
विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥५॥
वाणितील थोरी वैकुंठचि परी । न पवे पंढरीची सरी रे ॥
तुकयाचा दास ह्मणे नका आळस करुं । सांगतों नरनारीस रे ॥६॥

॥६८२५॥
ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥१॥
मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥२॥
उच्छिष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्यां ॥३॥
तुका ह्मणे जोड झाली । ते हे माउली आमुची ॥४॥

॥६८२६॥
कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट ॥
पाहिलें वाईट । बोलोनियां खोटें ॥१॥
परि तूं न सांडिसी खोडी । करिसी केली घडी घडी ॥
पडिसी रोकडी । तुटी माये आह्मांसी ॥२॥
तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ ॥
चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥३॥
जरी तुझी आई । आह्मी घालूं सर्वा ठायीं ॥
तुका ह्मणे तें ही । तुज वाटे भूषण ॥४॥

॥६८२७॥
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी ॥
काला करी वनमाळी । अन्न एकवटा ॥
देई निवडूनी । माते ह्मणतो जननी ॥
हात पिटूनी मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥
कैसा आळी घेसी । नव्हे तेंचि करविसी ॥
घेई दुसरें तयेसी । वारी ह्मणे नको ॥२॥
आतां काय करुं । नये यासी हाणूं मारुं ॥
नव्हे बुझावितां स्थिरू । कांही करिना हा ॥
त्यांचि केलें एकें ठायीं । आतां निवडूनी खाई ॥
आह्मां जाचितोसी काई । हरिसी ह्मणे माता ॥३॥
त्याचें तयाकुन । करवितां तुटें भान ॥
तंव झालें समाधान । उठोनियां बैसे ॥
माते बरें जाणविलें । अंग चोरुनी आपुलें ॥
तोडियेलें एका बोलें । कैसें सुखदु:ख ॥४॥
ताट पालवें झांकिलें । होतें तैसें तेथें केलें ॥
भिन्नाभिन्न निवडिलें । अन्ने वेगलालीं ॥
विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं ॥
ह्मणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥५॥
हरुषली माये । सुखअंगी न समाये ॥
कवळूनी बाहे । देती आलिंगन ॥
आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी ॥
तुका ह्मणे कोणी । सांडा शेष मज ॥६॥

॥६८२८॥
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥
बहू केली वणवण । पायपिटी झाला सिण ॥२॥
खांदीं भार पोटीं भूक । काय खेळायाचें सुख ॥३॥
तुका ह्मणे धांवे । मग अवघें बरवें ॥४॥

॥६८२९॥
नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥
नाहीं नाहीं रे कान्होबा भय आह्मांपाशीं ।
वळूनी पुरविसी गाई पोटा खावया ॥२॥
तुजपाशीं भयें । हें तों बोलों परी नये ॥३॥
तुका ह्मणे बोल । आह्मां अनुभव फोल ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP