विटूदांडू अभंग - ६८३० ते ६८६९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६८३०॥
सारा विटूदांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥२॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥३॥
एकमेका हाक मारी । सेल जाळी एक धरी ॥४॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥५॥
पुढें एक पाटी । एक ऐकें दोघे आटी ॥६॥
एका सोसा पोटी । एक धांवे हात पिटी ॥७॥
तुका ह्मणे आतां । खेळ मांडावा परता ॥

॥६८३१॥
पाहतां गोवळी । खाय त्याची उष्टावळी ॥१॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥२॥
आली द्यावी डाई । धांवे वळल्या मागें गाई ॥३॥
एके ठायीं काला । तुका ह्मणे भाविकाला ॥४॥

॥६८३२॥
ते काय पवोड नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रक्षिले वनांतरीं ॥१॥
मोवचा वोणवा होऊनी राक्षस । लागला वनास चहुंकडे ॥२॥
गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥३॥
तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहींचा निपट ऐसें झालें ॥४॥

॥६८३३॥
धडाकला अग्नि आह्मा येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥
अरे कृष्णा काय विचार करावा । आलारे वोणवा जळो आतां ॥२॥
अरे कृष्णा तुझें नाम बळिवंत । होय कृपावंत राख आतां ॥३॥
तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥४॥

॥६८३४॥
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥१॥
अरे कृष्णा आतां राखें कैसे तरी । संकटाभीतरीं पडियेलों ॥२॥
वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥३॥
तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वर्णिती सकळ नारायणा ॥४॥

॥६८३५॥
अरे कृष्णा तुवां काळिया नाथिला । दाढे रगडिला रिटा सुर ॥१॥
अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥२॥
गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥३॥
तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥४॥

॥६८३६॥
चहूंकडूनियां येती ते कल्लोळ । सभोवतें ज्वाळ जवळीं आले ॥१॥
सकुमार मूर्ति श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरी ॥२॥
लहान लेकरुं होतें तें सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥३॥
चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरी ॥४॥
तये वेळीं अवघे गोपाळही भ्याले । तुकेंही लपालें भेऊनियां ॥५॥

॥६८३७॥
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥
विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाऊनी रसना ज्वाळ गिळी ॥२॥
जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोठें मुखकमळ त्यांत घाली ॥३॥
तुका ह्मणे अवघा वोणवा गिळीला । आनंद जाहाला गोपाळांसी ॥४॥

॥६८३८॥
गोपाळ प्रीतीनें कसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥१॥
नको रे बा कृष्णा धरुं ऐसें रुप । आह्मां चळकांप सुटलासे ॥२॥
होई बा धाकुटा श्याम चतुर्भुज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥३॥
वोणव्याच्या संगें गिळिशील आह्मां । तुका मेघश्यामा पायां लागे ॥४॥

॥६८३९॥
सांडियेले रुप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥
श्याम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥२॥
गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रुप नारायणा धरियेलें ॥३॥
कैसा वाढलासी विक्राळ झालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥४॥
तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥५॥

॥६८४०॥
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसें येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥
बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईल पोळली नारायणा ॥२॥
बैसें कृष्णा तुझें पाहुं मुखकमळ । असेल पोळलें कोणी ठायीं ॥३॥
घोंगडिया खालीं घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तुका ह्मणे भावें आकळिला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥५॥

॥६८४१॥
एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळे भरी ॥१॥
वासुनियां मुख पाहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥२॥
ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरुपाचा ठाव न कळे याच्या ॥३॥
तुका ह्मणे अवघे विठोबा भोंवतें । मिळाले नेणते लहानथोर ॥४॥

॥६८४२॥
एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥१॥
गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आम्ही चळचळां कांपतसों ॥२॥
ज्वाळांबरोबरी गिळशील आम्हां । ऐसें मेघश्यामा भय वाटे ॥३॥
तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचेंचि ॥४॥

॥६८४३॥
गोपाळांचे कैसें केलें समाधान । देऊनि आलिंगन निवविलें ॥१॥
ज्वाळाबरोबरी तुम्हां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाठीं ॥२॥
निर्गुण निर्भय मी सर्वानिराळा । प्रकृति वेगळा गुणातीत ॥३॥
चिन्मय चिद्रुप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥४॥

॥६८४४॥
पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजी वांचों आम्ही जीवें ॥१॥
धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥२॥
अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनी पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥३॥
सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका ह्मणे जाणसी तें करावें अनंता ॥४॥

॥६८४५॥
भिऊं नका बोले झांकूनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥
बाप रे हा देवाचाही देव । कळों नेदी माव काय करी करवी ते ॥२॥
पसरुनी मुख विश्वरुप खाय जाळ । सारुनियां संधि अवघे पाहाती गोपाळ ॥३॥
तुका ह्मणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥४॥

॥६८४६॥
नेणती तयांसी साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनी ॥२॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगीं ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥४॥

॥६८४७॥
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनी आपुलें तोचि देईल तें खावें ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥२॥
कान्होबा तूं जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीति ॥३॥
तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥४॥

॥६८४८॥
घ्या रे भोंकरे भाकरी । दहींभाताची सिदोरी ॥ ताक सांडीं दुरी । असेल तें सयापें ॥१॥
येथें द्यावें तैसें घ्यावें । थोडें परि निरें व्हावें ॥ सांगतों हें ठावें । असों द्या रे सकळां ॥२॥
माझे आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये ॥ चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥३॥
तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी ॥ नका करुं दुरी । मज पायां वेगळें ॥४॥

॥६८४९॥
काल्याचिये आसे । देव जळीं झाले मासे ॥ पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥
लाजे त्यासी वांटा नाहीं । जाणें अंतरींचें तें ही ॥ दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥२॥
उपाय अपाय या पुढें । खोटें निवडितां कुडें ॥ तोडूनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥३॥
तें घ्यारे सावकाशें । जया फावेल तो तैसें ॥ तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥४॥

॥६८५०॥
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवींची तया आवडी सांगों ॥
एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजी अवघेचि जागों ॥१॥
जाणोनी नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनी बोल आइके कोण कोणाचे कैसे ॥
एक एकाच्या संवादा जाणे न मिळेचि ऐसें । पोटींचें होटा आणवी देतो तयांसी तैसें ॥२॥
एक ह्मणती बहु रे आह्मी पीडीलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ॥
तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनी पायां ॥३॥
एक ह्मणती अरे तुमचें पोट तें किती । मागों गाई ह्मैसी घोडे रे धन संपत्ति हत्ति ॥
देव गडी कान्हो आमुचा आह्मां काय विपति । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥४॥
एक ह्मणती बेटे हो कोण करी जतन ॥ गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान ॥
लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठया डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥५॥
एक ह्मणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर ।
राखोनी राखे आपण ऐसा कइचा शूर । बैसोनी राहों घरीं रे कोण करी हे चार ॥६॥
घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आह्मासी ठावें ॥
चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनी सहज खेळतां भलें गडियासवें ॥७॥
एक ह्मणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ॥
नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणितां लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥८॥
एक ह्मणती खेळतां उगीं राहती पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें ॥
अवघीं येती रागा रे एका ह्मणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकींच खरें ॥९॥
एक ह्मणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझें बोलचि खोटे ॥
ठायीं राहा उगे ठायींच कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥१०॥
तुका ह्मणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ॥
जागा करुं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥११॥

॥६८५१॥
आजी ओस अमरावती । काला पाहावया येती ॥ देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी ॥ तटस्थ त्या ध्यानीं । गाई झाल्या श्वापदें ॥२॥
जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत ॥ गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥३॥
तया सुखाची शिराणी । तींच पाउलें मेदिनी ॥ तुका ह्मणे मुनी । धुंडितां न लाभती ॥४॥

॥६८५२॥
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न ह्मणती सान थोर अवघीं सकळीक ॥२॥
हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालूनियां हरी ॥३॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरली देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥४॥
पुष्पांचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥५॥
यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका ह्मणे सुख वाटे देखोनियां मना ॥६॥

॥६८५३॥
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळों । एक खेळों एकाशीं ॥२॥
घाबरियांच्या मोडा काडया । धाडा भ्याडां वळतियां ॥३॥
तुका ह्मणे देवापाशीं । विटाळशीं नसावीं ॥४॥

॥६८५४॥
हेचि अनुवाद सदा सर्व काळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥
वोसरलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥२॥
संत सनाकादिक गोमटया परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥३॥
तुका ह्मणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥४॥

॥६८५५॥
अधिकाचा मज कांटाळा । तुह्मां गोपाळां संगति ॥१॥
काय नाहीं तुह्मांपाशीं । सकळांविशीं संपन्न ॥२॥
उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥३॥
तुका ह्मणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥४॥

॥६८५६॥
झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥
सरलों हें गे देउनि मोट । कटकट काशाची ॥२॥
सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥३॥
तुका ह्मणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥४॥

॥६८५७॥
या रे करुं गाई । जना निजलेती काई ॥ बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे कुकारे । ज्याची तेणेंचि मोहरे ॥ एवढेंचि पुरे । केलियानें सावध ॥२॥
नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा ॥ दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥३॥
तुका ह्मणे शीक । न धरतां लागें भीक ॥ धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥४॥

॥६८५८॥
वोळलिचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥
घ्याजि हेंगे क्षीर हातीं । निगुतिनें वाढावें ॥२॥
सांगितलें केलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥३॥
तुका ह्मणें नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥४॥

॥६८५९॥
येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥
आवडी तें तुह्मी जाणा । बहु गुणा सारिखी ॥२॥
मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥३॥
तुका ह्मणे राबवा देवा । करनि सेवा सांगितली ॥४॥

॥६८६०॥
अंतरली कुटी भेटी । भय धरुनियां पोटीं ॥ ह्मणतां जगजेठी । धांवे करुणाउत्तरीं ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥२॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता ॥ आईतेंचि दाता । पंगतीस बैसवी ॥३॥
वाहे खांदीं पाववी घरा । त्याचा करी येरझारा ॥ बोबडया उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥४॥

॥६८६१॥
धन्य तें गोधन कांबळी काष्टिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य झाल्या ॥२॥
धन्य ते देवकी जसवंती दोहींचें । वसूदेवनंदनाचें भाग्य झालें ॥३॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्त्र बाळा । यादवां सकळां धन्य झालें ॥४॥
धन्य ह्मणे तुका जन्मा तींचि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥५॥

॥६८६२॥
गौळणी बांधिती धारणासी गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥१॥
धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥२॥
तुका ह्मणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपनालागीं भीक मागे ॥३॥

॥६८६३॥
देखिलासी माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणू पाठीं ॥२॥
मोठें भावार्थाचें बळ । देव झाला त्याचें बाळ ॥३॥
तुका ह्मणे भक्तांसाठीं । देव धांवे पाठोपाठीं ॥४॥

॥६८६४॥
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥
देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥२॥
धालें ऐसें पोट । वरी करुनियां बोट ॥३॥
तुका ह्मणे घरी । मग कैचा या परी ॥४॥

॥६८६५॥
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे ॥ अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥
कां रे धरिला अबोला । माझा वांटा देई मला ॥ सिदोरीचा केला । झाडा आतां निवडेना ॥२॥
भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां ॥ गाई सैरा ओढाळा ॥३॥
तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी ॥ घेता झाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥४॥

॥६८६६॥
आम्हीं गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥
सिदोरीचा करुं काला । एक वांटितों एकाला ॥२॥
खेळों आपाआपणाशीं । आमचीं तीं आह्मांपाशीं ॥३॥
मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवतें ॥४॥

॥६८६७॥
जिवीं जिवा मिठी देऊं । कान्हो नीट झोंबी घेऊं ॥१॥
बाप झोंबी सावळयासी । मी तूं नाहींरे आह्मांसी ॥२॥
तुमची सोडोनी चिकोटी । वेगीं धरुं याची काठी ॥३॥
हातीं रिघाले हात । पाय रिघाले पायांत ॥४॥
जिवीं जिवा पडली मिठी । तुका निरवाणी गोठी ॥५॥

॥६८६९॥
मजसवें पोरा कुस्ती जरी घेसी । तरीच तूं होसी श्लाघ्यवाणें ॥१॥
आह्मासवें कोणा पुरी पडे तुझी । धरी आतां माझी चिकोटी हे ॥२॥
हातां हात डोई न लावितां अंग ॥ झुगारीन चांग पाहे आतां ॥३॥
पाय घालुनियां हाड तें पाहतां  ॥ पाडीन मी आतां उफराटें ॥४॥
तुका ह्मणे नको पळों धीर धरी ॥ नाहीं तरी उरीं टोले खासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP