अभंग - ६७९९ ते ६८१७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


हाल.अभंग.
====

॥६७९९॥
यमुने तटी मांडिला खेळ । ह्मणे गोपाळ गडियांसी ॥१॥
हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥२॥
नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥३॥
तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥४॥

॥६८००॥
बळें डाई न पडे हरी । बुद्धि करी शाहाणा तो ॥१॥
मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥२॥
येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥३॥
तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालूनियां ॥४॥
====

सुतुतू अभंग.
====

॥६८०१॥
जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥१॥
घाली सुतुतू फिरोनि पाही आपुणासी । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिंलासी ॥२॥
खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥३॥
बळिया गांढया तोचि खेळे । दम पुरी तो वेळोवेळां खेळे ॥४॥
हातीं पडे तोचि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥५॥
मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तोचि आधार फिके ॥६॥
आपल्या बळें खेळे रे भाई । गडियाची सांडोनी सोई ॥७॥
तुका ह्मणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सरवें ॥८॥

॥६८०२॥
अनंत ब्रह्मांडें उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥
नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥२॥
पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥
विश्वव्यापक कमळापति । त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥
तुका ह्मणे नटधारी । भोग भोगून ब्रह्मचारी ॥५॥

॥६८०३॥
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥२॥
सदा नाम वाचे गाती । प्रेम आनंदें नाचती ॥३॥
तुका ह्मणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥४॥

॥६८०४॥
मेळवूनी सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥
चला जाऊं चोरुं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी ॥
वेळ लावियेला अझुणी एकाकरितां गडे हो ॥२॥
वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥३॥
अवघाचि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥४॥
घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥५॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥६॥
बोलों नेदी ह्मणे स्थीर । खुणा दावी खा रे क्षीर ॥७॥
जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥८॥

॥६८०५॥
धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनी खातो कृष्ण ॥१॥
अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयांप्रति येईल आतां ॥२॥
तुका ह्मणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥३॥

॥६८०६॥
तुह्मी गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यांचि केला ॥१॥
इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक । माझे सकळिक यम धर्म ॥२॥
मजपासूनियां झाले जीव शिव । देवांचा ही देव मीच कृष्ण ॥३॥
तुका ह्मणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥४॥

॥६८०७॥
कांरे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई ॥ मागें झालें काई । एका तें कां नेणसी ॥१॥
केलास फजित । मागें पुढें ही बहुत ॥ लाज नाहीं नित्य नित्य दंड पावतां ॥२॥
बोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी ॥ धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥३॥
चाल धांवें । मी ही येतों तुजसवें ॥ तुका ह्मणे जंव । तेथें नाहीं पावली ॥४॥

॥६८०८॥
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥
काला वांटूं एकमेकां । वैष्णवां निका संभ्रम ॥२॥
वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥३॥
तुका ह्मणे भूमंडळीं । आह्मी बळी वीर गाढे ॥४॥

॥६८०९॥
कवळाचिया सुखें । परब्रह्म गोरखें ॥ हात गोवूनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥
कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें ॥ ब्रह्मादिकां दुर्लभ ॥२॥
घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी मोहरी ॥ गोपाळांचे फेरी । हरि छंदे नाचतसे ॥३॥
काय नव्हतें त्या घरी खावया । रिघे लोणी चोरावया ॥ तुका ह्मणे सवें तया । आह्मी ही सोंकलों ॥४॥

॥६८१०॥
कान्होबा आतां तुह्मी आह्मीच गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥१॥
वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥२॥
ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारुं ॥३॥
तुका ह्मणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥४॥

॥६८११॥
बहु काळीं बहु काळीं । आह्मी देवाचीं गोवळीं ॥१॥
नाहीं विटों देत भात । जेऊं बैसवी सांगातें ॥२॥
बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥३॥
तुका ह्मणे नांही नांहीं । त्याचें आमचेंसें कांहीं ॥४॥

॥६८१२॥
बहु बरा बहु बरा । यांसांगातें मिळे चारा ॥१॥
म्हणोनी जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ।
बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषें ॥२॥
पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥४॥

॥६८१३॥
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचे समाधान करी ॥१॥
ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवें ॥२॥
स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥३॥
मोहरी पांवा काठी ॥ तुका म्हणे याजसाठीं ॥४॥

॥६८१४॥
बळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥
नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥२॥
नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघेंचि बरें ॥३॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥४॥

॥६८१५॥
म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी ॥ नये क्षणभरी । आतां यासी विसंबों ॥१॥
चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं गाई जमा करुनी ॥२॥
नलगे जावें घरा । चुकलिया येरझारा ॥ सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥३॥
तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट ॥ पाहाणें तें वाट । मागें पुढें राहिली ॥४॥

॥६८१६॥
तुझिये संगती । झाली आमुची निश्चिंती ॥१॥
नाहीं देखिलें तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥२॥
घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥३॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥४॥

॥६८१७॥
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥
तुझ्या राहिलों आधारें । झालें अवघेंचि बरें ॥२॥
तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥३॥
तुका ह्मणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP