बाळक्रीडा - ६६६८ ते ६६८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६६६८॥
देवा आदिदेवा जगत्रयजीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देई प्रेम कांहीं कला ॥२॥
कळा तुजपाशीं आमुचें जीवन । उचित करुन देई आह्मां ॥३॥
आह्मां शरणागतां तुझाचि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायवाट होय तुझ्या नामें । जाळी महाकर्मे दुस्तरें तीं ॥५॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविलिया रामकृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥
संसार तें काय तॄणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करीं ब्रीद साच आपलें आपण । पतितपावन दीनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीं चा मनोरथ ॥११॥
चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥

॥६६६९॥
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥
आपेंआप बेडया तुटल्या शृंखला । बंदाच्या आर्गळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगतां ॥८॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोवा सवें देव ॥१०॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥११॥

॥६६७०॥
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
आलें अविनाश धरुनी आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनाचें पाळण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥
घरोघरी झाला लक्षुमीचा वास । दैन्यदारिद्र्यास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । केलियावांचून जपतपें ॥८॥
जपतपें काय करावीं साधनें । जंव नारायणें कृपा केली ॥९॥
केलीं नारायणें आपुली अंकित । तोचि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणिक दुसरा नाहीं नाहीं ॥११॥
नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका ह्मणे आस त्यजूनियां ॥१३॥

॥६६७१॥
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिहीं अंतर्बाह्यमुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥
दिलें त्यांसी मुख अंतरींचें देवें । जिद्दी एका भावे जाणितला ॥३॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥
ज्याचें कृष्णीं तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेऊनी । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणे इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासी । तुका ह्मणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥

॥६६७२॥
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाऊनियां छंदें जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविलें बंदीहूनी । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ति द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशीं पूर्वील कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणें देव ॥८॥
देव भोळा धांवें भक्ता पाठोपाठी । उच्चारितां कंठीं मागें मागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका ह्मणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥

॥६६७३॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनी शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनियां नवनीत खाय । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । ह्मणऊनि चोरी न सांपडे ॥५॥
न सांपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनी ॥७॥
निवांत राहिल्या नि:संग होऊनी । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविकां तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती न सांपडे ॥१०॥
नलगे वेचावीं टोली धनानांवें । तुका ह्मणे भावें चाड ऐका ॥११॥

॥६६७४॥
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंक ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरीं नाहीं म्हूण ॥२॥
न सांपडे इंद्रचंद्र ब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें ॥३॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजले जे ॥७॥
जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धाराच चित्तीं सांगितलें ॥११॥
सांगितलें संतीं तुम्हां उगवूनी । गर्भासी येऊनी यमदंड ॥१२॥
दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा येणें करुनी संहार । पूर्वअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठीं त्यां ॥१५॥

॥६६७५॥
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समर्पिलें ॥२॥
समर्थे तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाई पशू ॥६॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका धणीवरी ॥७॥
धणीवरी त्यांसीं सांगितली माती । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥
परी यांचे तुह्मी आइका नवल । दुर्गमे जो खोल साधनासी ॥९॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेंचि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हांसतसे ॥११॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥
तो जें जें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वरं दावी सोपें ॥१३॥

॥६६७६॥
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥
वस्त्रें घोंगडिया घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना बळतियां ॥५॥
त्यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचे हिरोनियां घ्यावें । उच्छिष्ट तें खावें धणीवरी ॥७॥
वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥
छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलों ॥९॥
विसरलीं वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका ह्मणे संगें भक्तांचिया ॥१२॥

॥६६७७॥
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ऋणी ॥२॥
रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुह्मां न वजे पासूनी । अवघिया जणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी ह्मणे वैकुंठींचा पति । तुह्मी माझ्या चित्तीं सर्वभावें ॥५॥
भाव जैसा माझ्या ठायीं तुह्मी धरा । तैसाचि मी खरा तुह्मांलागीं ॥६॥
तुह्मां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचाचि जीव तुह्मां ग्वाही ॥७॥
ग्वाही तुह्मां आह्मां असे नारायण । आपलीच आण वाहतसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥
एकी क्रिया नाहीं अवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥
तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्तीं काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्तीं ॥१५॥
चित्तें ही चोरुनी घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥
तयांसी आवडे वैकुंठनायक । गेलीं सकळींक विसरोनी ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव ह्मणुनी तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारासी घरीं । लाज ते अंतरीं आधीच ना ॥२०॥
नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका ह्मणे वाचा काया मनें ॥२१॥

॥६६७८॥
मनें हरिरुपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांचीं धरुनियां रुपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रुप ॥४॥
रुप याचें आहे अवघेंचि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥
लेंकरुं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥
कवतुक केलें सोंग बहुरुप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥७॥

॥६६७९॥
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तियेपुढें ॥३॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंत ॥४॥
मायावंत विश्वरुप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥५॥
बाळपणीं रिठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळां बांधवूनी उखळासीं दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनात जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकीं उतरुनी खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरीं दुधें डेरे भरले रांजण । खाय ते भरुन दावी दुणी ॥१०॥
दूणी झालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरुनियां ॥११॥
आशाबद्धा देव असोनी जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥
मुळें याच देव न कळे तयासी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥१३॥
लेकरुं आमुचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तोचि भाव ॥१४॥
भाव जाणावया चरित्र दाखवी । घुसळितां रवि डेरियांत ॥१५॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनी । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥
हातीं धरुनियां काढिला बाहेरी । देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यासी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांसा । देव आपणसा कळों नेदी ॥२०॥
नेदी भाव राहों लोभिकांचे चित्तीं । जाणतांचि होती अंधळीं तीं ॥२१॥
अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥

॥६६८०॥
ओळखी तयांसी होय एकाभावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वांया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांचीं ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापा रीण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP