माघ वद्य १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


महात्माजींच्या उपोषणाची समाप्ति !

शके १८६४ च्या माघ व. १२ रोजीं सबंध देशाला चिंताग्रस्त करणारें महात्मा गांधींचें उपोषण सुटलें. आठ ऑगस्टच्या प्रसिद्ध ठरावानंतर सर्व प्रमुख पुढार्‍यांना अटक झाली. आणि देशांत एकप्रकारचें नवचैतन्य खेळूं लागलें. हिंदुस्थानभर सर्वत्र अत्याचार होऊं लागले. सरकार त्याची जबाबदारी महात्माजींच्यावर टाकीत होते. परंतु गांधीजी तें मान्य कसें करणार ! आणि ऑगस्टचा ठराव तरी मागें कसा घेणार ! सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा निर्वाळा गांधींनीं दिला. परंतु पुढें प्रश्न फारच विकट झाल्यानंतर गांधींनीं आपला उपोषणाचा बेत जाहीर केला. "तुमच्याकडून न्याय मिळत नाहीं, म्हणून सर्वश्रेष्ठ न्याय देवतेपुढें माझें गार्‍हाणें मांड्ण्यासाठी उपोषण करणें येवढें सत्याग्रही या नात्यानें माझें कर्तव्य आहे." अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली. सर्व हिंदुस्थानला काळजी वाटूं लागली. कारण गांधीजी आतां चौर्‍याहत्तर वर्षांचे झालेले होते. त्यांना हें दिव्य कसें सहन होणार, याचीच चिंता ज्यांना-त्यांना होती. गांधींच्या निर्धाराचा पहिला फायदा झाला कीं, त्यांची सक्तीची कैद संपली आणि सरकारनें त्यांना येरवडा तुरुंगाशेजारीं आगाखान पॅलेसमध्यें ठेवलें. गांधींच्या उपोषणाचें दिवस जसजसे वाढत होते तसतसें देशांतील वातावरण अधिकच प्रक्षुब्ध होऊं लागलें.  "स्वदेशाच्या व जगताच्या कल्याणासाठीं गांधीजींचें प्राण वांचोत, आणि त्यासाठी ईश्वर औदार्य व शहाणपणा यांचा त्याग करणार्‍यांना ते दोन गुण अर्पण करो. या पृथ्वीतलावर नांदणार्‍या प्राणिमात्रांमध्यें सर्वश्रेष्ठ अशी ही विभूति ईश्वर जिवंत ठेवो." अशा आशयाच्य प्रार्थना सर्व देशभर होऊं लागल्या. ‘शिकागोसन्‍’ या अमेरिकन पत्रानें गांधींची सुटका ताबडतोब करा अशी सूचना केली. लक्षावधी लोकांचीम चित्तें गांधींच्याभोवतीं गोळा झालीं. डॉ. बिधनचंद्र रॉय, डॉ. नायर, डॉ. गिल्डर हे महात्माजींच्याजवळ होते. प्रकृति दिवसेंदिवस खंगून अगदीं अखेरची वेळ येऊन ठेपली . परंतु सुदैवानें ती काळरात्र उलटली. सरकारनेंहि नमतें घेतलें आणि माघ व. १२ रोजीं गांधीजींचें उपोषण सुटलें.

- ३ मार्च १९४३

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP