माघ वद्य १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


माघ व. १

(१) श्रीनिवृत्तिनाथांचा जन्म !

शके ११९५ श्रीमुखसंवत्सर माघ व. १ प्रात:काळीं विख्यात तत्त्वज्ञानी संत ज्ञानदेव यांचे श्रीगुरु निवृत्तिनाथ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनीं - विठ्ठलपंतांनीं संन्यास घेऊन नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांतच चार मुलें झालीं. साहजिकपणें तत्कालीन समाजाकडून या कुटुंबाचा अत्यंत छळ झाला. आईबाप निघून गेले. पोरकीं मुलें निराश्रित झालीं. निवृत्तिनाथ सर्वांत वडील होते. त्यांना गहिनीनाथांचा उपदेश असला तरी घरांतील भक्ति विठ्ठलाची होती. निवृत्तींच्या लहान वयांत त्यांच्या अंगीं जो सर्व बोध तयार होता तो त्यांनीं ज्ञानेश्वरादि भावंडांना दिला. निवृत्तिनाथांचे चारशें अभंग उपलब्ध आहेत. त्यामध्यें कांहीं अभंग योगपर, अद्वैतपर व कांहीं कृष्णभक्तिपर आहेत. "निवृत्तीची ओळख ज्ञानाशिवाय कोणाला होणार ?" ज्ञानेश्वरांनीं निवृत्तिनाथांना यथार्थ जाणिलें. या आपल्या गुरुचा गौरव ज्ञानेश्वरींत अनेक निवृत्तिनाथांना यथार्थ जाणिलें. या आपल्या गुरुचा गौरव ज्ञानेश्वरींत अनेक ठिकाणीं ज्ञानदेवांनीं मुक्त कंठानें गाईला आहे. ज्ञानेश्वरीच्या उपोद्धातांतच ज्ञानदेव म्हणतात :-

"कां चिंतामणि आलियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ॥
तैसा पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेव म्हणे -"

वडील बंधु आणि गुरु या दोनहि भूमिका निवृत्तिनाथांनीं स्वीकारल्या होत्या. वडील बंधु आणि गुरु या दोनहि भूमिका निवृत्तिनाथांनीं स्वीकारल्या होत्या. हे परंपरेनें नाथसांप्रदयांतील असले तरी त्यांच्या अभंगांतून सर्वत्र कृष्णभक्ति, विठ्ठलस्तुति दिसून येते. "निवृत्तीचें गोत्र कृष्णनामें तृप्त । आनंदाचें चित्त कृष्णनामें," अशी त्यांची भूमिका होती. त्यांचें उत्कट विठ्ठलप्रेम असें होतें-
"सुमनाचेनि वासें भ्रमर भुलले । मार्ग पै विसरले इंद्रियांचा ॥१॥
तैसे हे संत विठ्ठलीं तृप्त । नित्य पै निवात हरिचरणीं ॥२॥
नाठवे हा दिन नाठवे हे निशी । अखंड आम्हांसी हरिराजा ॥३॥
तल्लीन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरीचे राजहंस ॥४॥
टाहो करुं थोर विठ्ठलकीर्तनें । नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥५॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच अबोला हरिसंगें ॥६॥

- २९ जानेवारी १२७४
--------------------------

(२) नरहरि सोनार यांची समाधि !

शके १२३५ च्या माघ व. १ रोजीं पंढरपूरचे प्रसिद्ध भगवद्‍भक्त नरहरि सोनार यांनीं समाधि घेतली. प्रारंभीच्या आयुष्यांत नरहरि सोनार हे एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याही देवाचें दर्शन घ्यावयाचें नाहीं असा यांचा बाणा होता. पंढरपूरला राहूनहि यांनीं विठ्ठलाचें दर्शन घेतलें नाहीं. एकदां एका विठ्ठलभक्त सावकारानें विठोबाच्या कमरेस येईल असा सोन्याचा करगोटा करण्याचें काम नरहरि सोनारांना सांगितलें. परंतु माप घेऊनहि करगोटा लांब तरी होत असे किंवा आखूड तरी होत असे. असें चारपांच वेळां घडलें. शेवटीं डोळे बांधून नरहरि सोनार देवळांत गेले, आणि विठ्ठलास चांचपूं लागले. तों त्यांच्या हातांना पांच मुखें, सर्पालंकार, मस्तकीं जटा, व त्यांत गंगा अशी शंकराची मूर्ति लागली. तेव्हां त्यांनीं डोळे उघडले; तों पुढे विठ्ठलाची मूर्ति ! पुन: डोळे झांकले तो शंकराची मूर्ति ! असा प्रकार पाहिल्यावर हरिहर हे एकरुपच आहेत याचा बोध त्यांना झाला. नरहरि सोनार वारकरी मंडळांत येऊन मिळाले. याबद्दलचा अभंग प्रसिद्ध आहे -
"शिव आणि विष्णु एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥१॥
धन्य ते संसारीं नर आणि नारी । वाचें हरि हरि उच्चारिती ॥२॥
नाहीं पै तो भेद अवघाचि अभेद । द्वेषाद्वेष संबंधा उरीं नुरे ॥३॥
सोनार नरहरि न देखे पै द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरुप" ॥४॥

शिव आणि विष्णु यांच्यांत भेद नाहीं असा प्रचार फक्त महाराष्ट्रांतच वारकरी सांप्रदायानें जोरानें केला; त्यामुळे शैव-वैष्णवांचे वाद तेथें मुळीच माजले नाहींत. नरहरि सोनारांच्या जीवितांत यांचें स्पष्ट प्रतिबिंब दिसतें. ज्ञानदेवांच्या तीर्थयात्रेंत हे होतेच. ज्ञानदेवादि भावंडांवर त्यांची फारच भक्ति बसली. माघ व. १ रोजीं नरहरि सोनार समाधिस्थ झाले, "शककर्ता शालिवाहन । बारा शतें पस्तीस जाण । प्रमादीनामें संवत्सर पूर्ण । माघ कृष्ण प्रतिपदा । भूवैकुंठ पंढरी क्षेत्र । नरहरि सोनार पमम पवित्र । मध्यान्हि येतां कुमुदिनी मित्र । देह अर्पिला तयानें "

- फेब्रुवारी १३१४

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP