माघ वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) श्रीचक्रधरस्वामीचें प्रयाण

शके ११९४ च्या माघ व. ४ रोजीं महानुभाव पंथाचे आद्य संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांनीं प्रयाण केलें. बाराव्या-तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत नामदेव-ज्ञानदेवांनीं पारमार्थिक तत्त्वज्ञान समाजाच्या खालच्या थरापर्यंत लोकभाषेंत सांगण्याला सुरुवात केल्यामुळे एक अपूर्व क्रांति घडत होती. पण तत्पूर्वीच एक-अर्ध शतक तरी महानुभाव पंथानें या कार्यास सुरुवात केली होती. भडोच येथील मल्लदेव राजाचा प्रधान विशालदेव याला श्रीदत्ताच्या कृपेनें शके १११६ मध्यें एक पुत्र झाला. त्याचें नांव हरिपालदेव. शके ११४३ मध्यें या हरिपाल देवाचें निधन झालें. त्याचें प्रेत स्मशानांत जेव्हां नेलें त्या वेळीं श्रीचांगदेव उर्फ श्रीचक्रपाणि यांनी द्वारकेंत योगबलानें देहत्याग करुन हरिपालदेवाच्या मृत कायेंत प्रवेश केला. हरिपालदेव जिवंत झाले. यात्रेंत असतांना ११४५ शकांत ऋद्धिपूर येथें गोविंदप्रभु यांच्याकडून त्यांना शक्तिस्वीकार झाला. त्यांचें नांव ‘चक्रधर’ असें प्रसिद्ध झालें. त्यांनीं सुमारें चाळीस वर्षे भारतांत प्रवास करुन समाजाजी पाहणी केली. त्या वेळीं धर्माचें स्थान कर्मकांडांनें बळकाविलेलें त्यांना दिसलें. स्त्रीवर्ग, शूद्रवर्ग यांना मोक्षमार्ग खुला नव्हता. तेव्हां ही अडचण दूर करण्यासाठीं व मोक्षप्राप्तीच्या साधनांत संसारप्रवर्तक देवतोपासनादि प्रवृत्त वैदिक कर्माची अनुपयुक्तता व संसार निवर्तक परमेश्वरोपासनादि निवृत्त वैदिक कर्माची उपयुक्तता प्रतिपादन करण्यासाठीं श्रीचक्रधरांनी पैठण येथें शके १९९० मध्यें संन्यासदीक्षा घेऊन महानुभाव पंथाची स्थापना केली. या पंथानें बरीच कामगिरी केली. मध्यंतरीच्या कालांत महानुभाव पंथासंबंधीं पुष्कळ गैरसमज पसरले असले तरी अलीकडे डॉ. कोलते प्रभृतींच्या प्रयासानें महानुभावांच्या आचाराचें व तत्त्वज्ञानाचें उज्ज्वल आणि सत्य स्वरुप लोकांच्या ध्यानांत येत आहे. श्रीचक्रधरांनीं स्वत: कोणताहि ग्रंथ लिहिला नाहीं. पण प्रसंगानुसार त्यांनीं केलेल्या उपदेशपर आणि तत्त्वज्ञानपर वचनांचा संग्रह म्हणून केशवराजसूरी यांनीं ‘श्रीचक्रधरसिद्धांतसूत्रपाठ’ या नांवाचा ग्रंथ तयार केलेला आहे.

- ७ फेब्रुवारी १२७३
------------------------

रमाबाई पेशवे हिचें निधन !

शके १७१४ माघ व. ४ रोजीं सवाई माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाई हिचें निधन झालें. सन १७९४ पासून महाराष्ट्रांत दैवी, मानवी आपत्ति कोसळूं पाहत होती. पुण्य़ाच्या नदीचें पाणी नासून महामारीचा उपद्रव सुरु झाला होता. दक्षिणेंत सर्वत्र दुष्काळानें आपलें स्वरुप अधिकच विक्राळ केलें होतें, तशांत पेशव्यांची बायको रमाबाई हिला बहुत दिवस समाधान नव्हतें, तीनचार महिने ताप येत होता, पण कळूंच दिलें नाहीं. पुढें नानांस कळल्यावर उपाय होऊं लागले. पण गुण न येतां माघ व. ४ रोजीं माहेरी थत्ते यांचे घरीं देवाज्ञा झाली - सवाई माधवराव व रमाबाई या दांपत्याचें कोडकौतुक सबंध महाराष्ट्राला होतें. अनेक देवतांना महाराष्ट्रांतून नवस होऊन मोठ्या आणीबाणीच्या वेळीं सवाई माधवरावांचा जन्म झाला होता. या बालपेशव्याचें संगोपन नाना फडणिसांनीं अत्यंत दक्षतेनें केलें. माधवराव-रमाबाई यांच्या लग्नाचा थाट अपूर्व असाच झाला. सर्व सरदार होळकर, रास्ते, पटवर्धन, घोरपडे, आदि प्रमुख लोक लग्नास हजर होते. सवाई माधवरावांचें हें लग्न अवघ्या महाराष्ट्राला आपल्याल घरचें कार्य वाटलें. अहल्याबाई होळकर हिनें मोठ्या आपुलकीनें चौकशी केली. नानांचें अगत्याचें बोलावणें असूनहि बाई लग्नास आली नाहीं. ती बोलली - "लक्ष प्रकारें आम्हीं जावें. पूर्वसूचना असती तर फौजेचा वगैरे सरंजाम केला असता. आतां तीथ समीप आली. एकलें थोड्या लोकांनिशीं जाणें वडिलांच्या स्वरुपास योग्य कीं काय ! तेथें तुकोजी बाबा आहेत तेच आम्ही आहोंत. -" लग्नानिमित्त तिनें श्रीमंतांस उत्कृष्ट पोशाख व जवाहीर, गोपिकाबाई, सगुणाबाई, पार्वतीबाई, नाना, आदींना देकार पाठविले. - पण हा आनंदाचा सोहळा फार दिवस टिकला नाहीं. रमाबाई बरेच दिवस जीर्णज्वरानें आजारी पडली. त्यांतच तिचा अंत झाला.

- ३१ जानेवारी १७९३
--------------------------

(३) मोतिलाल नेहरु यांचें निधन !

शके १८५२ च्या माघ व. ४ रोजीं भारतांतील प्रसिद्ध राज्यघटनाशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी मुत्सद्दी व वादविवादपटु पंडित मोतिलाल नेहरु यांचें निधन झालें. नेहरुंचें मूळ घराणें काश्मीरमधील, परंतु अनेक पिढ्यांपूर्वी हे अलाहाबादेस येऊन दाखल झालें. मोतिलाल तीन महिन्यांचे असतांनाच त्यांचे वडील वारले. तेव्हां त्यांचें संगोपन थोरल्या बंधूनें केलें. हायकोर्ट वकिलीची परीक्षा देऊन सुवर्ण-पदक मिळविल्यावर नेहरुंनीं वकिली करण्यास प्रारंभ केला. थोड्याच अवधींत त्यांचा जम बसला आणि त्यांचें नांव सर्वत्र गाजूं लागलें. हें घराणें मूळचेंच श्रीमंत होतें. त्यामुळें खूप पैसे मिळवावे, ऐषारामांत दिवस कंठावेत आणि प्रसंगी प्रागतिकांच्या राजकारणांत भाग घ्यावा असा ठराविक कार्यक्रम यांचा असे. परंतु पुढें महात्मा गांधींच्या सहवासानें या घराण्यांतच आमूलाग्र बदल झाला; आणि ते गांधीच्या चढाईच्या सहवासानें या घराण्यांतच आमूलाग्र बदल झाला; आणि ते गांधींच्या चढाईच्या राजकारणांत सामील झाले. गांधींच्या बरोबरीनें सर्व तर्‍हेचें राजकारण मोतिलाल खेळले तरीसुद्धां "म. गांधी आणि हे अगदीं भिन्न प्रकृतीचे लोक होत. मोतिलाल त्यांना एक थोर मनुष्य म्हणून मान देत, पण महात्मा म्हणून त्यांची टरच उडवीत. म. गांधी संन्यासी संस्कृति निर्माण करणारे तर मोतिलाल विलासी प्रकृतीचे, तथापि मूलत: भेद असूनहि दोघांची एकमेकांवर पूर्ण श्रद्धा होती. म. गांधीच्या त्यागाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरवहि मोतिलाल आपल्या उमद्या स्वभावानुसार मनमोकळेपणानें करीत. - " अर्थात्‍ मोतिलाल नेहरुंच्या मृत्यूनें म. गांधींना विशेष धक्का बसला. "माझी शेवटची झोंप मी परतंत्र देशांत घेणार नाहीं; स्वतंत्र देशांत घेईन" असें वाक्य उच्चारून मोतिलालजींनीं माघ व. ४ रोजीं प्राण सोडला. सर्व भारताला धक्का बसला. आणि अगदीं निकटचा सहकारी गेला म्हणून महात्माजीहि विव्हळ झाले. आपल्या दु:खाचें त्यांनीं वर्णन केलें आहे :" माझी स्थिति एखाद्या विधवेपेक्षांहि करुणास्पद झाली आहे. पतीशीं निष्ठावंत राहून तिला आपल्या पतीच्या कीर्तीचा उपभोग घेतां येईल. तसें कांहींहि करण्याचें सामर्थ्य मजजवळ नाहीं."

- ६ फेब्रुवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP