माघ वद्य ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) मदोन्मत्त रावणाकडून सीताहरण !

माघ व. ८ या दिवशीं लंकेचा राजा रावण यानें श्रीरामचंद्रांची पत्नी सीतादेवी हिला कपटानें पळवून नेलें. आपल्या नासिकाच्छेदनाचा वृत्तांत शूर्पणखेनें रावणास सांगितला, आणि तिनें सीतेच्या सौंदर्याचेंहि भरपूर वर्णन केलें. त्यानंतर रावणास अभिलाषा निर्माण होऊन त्यानें सीतेचें हरण करण्याचें ठरविलें. मारीच नांवाच्या राक्षसानें रावणाच्या आग्रहावरुन सुवर्णमृगाचा वेष धारण केला आणि तो सीतेच्या आश्रमाभोंवती हिडूं लागला. त्या सुंदर मृगाकडे पाहून सीतेला अत्यंत हर्ष होऊन तिनें रामाला सांगितलें, "आर्यपुत्रा, हा सुंदर मृग मला आणून द्या." यानंतर लक्ष्मणाला सीतेचें रक्षण करण्यास सांगून रामचंद्र धनुष्यबाणासहित सुवर्णमृगाच्या पाठीमागें गेले. लांब पल्ल्यावर गेल्यावर रामानें त्या मृगावर बाण सोडला, परंतु कपटानें त्यानें " हा सीते, हा लक्ष्मणा !" अशी आरोळी मारली.
सीतेनें तो आर्त स्वर ऐकला आणि लक्ष्मणास तिने सांगितलें कीं, "रामाच्या साह्यास तुम्हीं जावें." लक्ष्मणाला यांत सत्य कांहीं वाटलें नाहीं. परंतु सीतेनें कटु बोलण्यास आरंभ केल्यावर मात्र लक्ष्मण रामाच्या साह्यार्थ निघून गेला. रावणानें ही संधि साधली. त्रिदंडी संन्याशाचें रुप घेऊन तो रामाच्या आश्रमाच्या दारांत आला. शोकग्रस्त झालेली सीता अश्रुविमोचन करीत होती. बाहेरच्या ‘संन्याशा’ नें तिला सविस्तर हकीगत विचारली; आणि सांगितलें, "मी लंकेचा अधिपति रावण आहें. तूं माझी भार्या हो, मी तुला पट्टराणी करीन. लंकेचें सर्व वैभव तुझ्या पायीं ओतीन." यावर सीता संतप्त होऊन बोलली," महापराक्रमी अशा रामाची मी पतिव्रता भार्या आहें. तू सिहाच्या बायकोची इच्छा करितोस ! तुला लाज नाहीं वाटत ? दुष्टा, तू वैश्रवणाचा भाऊ म्हणवतोस. आणि परस्त्रीवर अशी नजर ठेवतोस या तुझ्या दुष्ट वर्तनानें सर्व राक्षसांचा, तुझा, आणि तुझ्या लंकेच्या राज्याचा नाश होईल." यानंतर रावणास क्रोध येऊन त्यानें आपलें नेहमीचें उग्र रुप धारण केलें. आणि ‘उन्मत्त सीते ! पहा माझा पराक्रम !’ म्हणून त्या नराधमानें तिला उचलून आश्रमाबाहेर आणलें. आणि खांद्यावर टाकून मोठ्या वेगानें तो निघाला.
---------------------

(२) डॉ. बा. शि. मुंजे यांचें निधन !

शके १८६९ च्या माघ व. ८ रोजीं लो० टिळकांच्या राजकीय परंपरेतील निष्ठावंत कार्यकर्ते, अखिल भारतीय हिंदुसभेचे माजी अध्यक्ष, आणि सरचिटणीस, नाशिक येथील भोसला लष्करी विद्यालयाचे संस्थापक डॉ. बा. शि. मुंजे यांचें निधन झालें. विलासपूर आणि रायपूर येथें प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण झाल्यानंतर यांनीं मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्यें अभ्यासास प्रारंभ केला. सन १८९८ मध्यें यांनीं एल्‍. एम्‍. अँड एस्‍. ही पदवी शस्त्रक्रियेंतील नैपुण्याबद्दल ‘ग्रे मेडल’ मिळवलें. मुंबईत कांही दिवस काम केल्यावर सन १९०० सालीं आफिकेंत सुरु असलेल्या बोअर युद्धांत सर्जन म्हणून कॅप्टनच्या हुद्यावर ते दाखल झाले. अलौकिक शौर्य आणि उत्तम कामगिरी यांबद्दल त्यांना बहुमानाचें पदक प्राप्त झालें. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर काम करीत असतांनाच दरबान येथें यांची व महात्मा गांधींची पहिली भेट झाली. आफ्रिकेंतून परत मायदेशीं आल्यावर नागपूर येथें स्थायिक होऊन यानीं डॉक्टरकीच्या धंद्यास सुरुवात केली. मोतिबिंदूच्या विकारावर शस्त्रक्रिया करण्याची एक अभिनव पद्धत शोधून काढून उत्कृष्ट नेत्रविशारद म्हणून मुंजे यांनी कीर्ति संपादन केली. याजबरोबर त्यांचें राजकारणाकडेहि लक्ष होतेंच. देशबांधवांची सर्वतोपरि सेवा करतां यावी म्हणून यांनी लो० टिळकांचें अनुयांयित्व पत्करुन हिंदीं स्वराज्य संघाची चळवळ सुरु केली. कांहीं दिवस डॉ. मुंजे काँग्रेसमध्येंहि होते. परंतु पुढें मतभेदामुळें ते हिंदुमहासभेच्या राजकारणाकडे वळले. सन १९३३ मध्यें फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादि देशांतील लष्करी केंद्रांना यांनीं भेटी दिल्या व तेथील अभ्यासक्रमांची सूक्ष्म माहिती करुन घेतली. आणि हिंदु तरुणांत क्षात्रवृत्ति निर्माण होण्यासाठीं यांनीं सन १९३७ मध्यें नाशिक येथें ‘भोसला मिलिटरी स्कूल’ नांवाची लष्करी शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. ही यांची फार मोठी कामगिरी होय. शेवटपर्यंत याच संस्थेच्या हितासाठीं यांनीं आपलें सर्वस्व खर्च केलें.

- ३ मार्च १९४८

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP