माघ शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘अजिंक्य तारा’ जिंकला गेला !

शके १७३८ च्या माघ शु. ६ रोजीं मराठ्यांच्या राजधानींतील सातारचा ‘अजिंक्य तारा’ इंग्रजांनीं जिंकला व त्यावर आपलें निशाण उभारलें. मराठ्यांच्या राज्याचें सर्व सामर्थ्य त्यांच्या किल्ल्यांतून होतें. तेव्हां इंग्रजांनीं एकामागून एक असे किल्ले घेण्यास सुरुवात केली. सिंहगड व पुरंदर यांसारखे मोठे किल्ले इंग्रजांकडे आले. सर्वत्र फंदफितुरी माजून राहिली होती. सातारचा किल्ला सर्वांत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा असा होता. सातारा मराठ्यांच्या राजधानीचें शहर असल्यानें त्यास विशेष योग्यता प्राप्त झालेली होती. त्याकडे इंग्रजांचा मोर्चा वळला. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ आणि जनरल प्रिझलर यांच्या हाताखालील फौजा कोरेगांवजवळ एकत्र झाल्या, आणि माघ शु. ५ रोजीं त्यांचा मुक्काम सातार्‍याजवळ झाला. लागलीच किल्ल्यावर मारा करण्यास प्रारंभ होऊन सर्वत्र दाणादाण उडाली. किल्ल्यावर चारपांचशें लोक असून पंचवीश मोठाल्या तोफाहि होत्या. परंतु त्या तोफांच्या पाठीमागें प्राण पणाला लावून लढणारे त्यागी वीर नव्हते. सर्व मुत्सद्दी लोक बाळाजीपंत नातूंच्या वशिल्यानें इंग्रजांकडून स्वार्थ साधण्यास गुंतले होते. स्वत्वाची जाणीव कोणालाहि नव्हती. फितुरखोर व निमकहराम लोकांनीं किल्ला अगोदरच पोखरुन ठेविला होता. त्यावर इंग्रजांच्या तोफांचा प्रभाव चारसहा तासांतच झाला. सायंकाळीच किल्ल्याचा पाडाव झाला, आणि दुसर्‍या दिवशीं माघ शु. ६ ला सातारच्या ‘अजिंक्य
तार्‍या’ वर इंग्रजांचे युनियन जॅक लागलें. आणि क्रमाक्रमानें महाराष्ट्रांतील सर्व किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन झाले. राज्याचें सर्व बळ याच किल्ल्यांत एकवटलेलें होतें. यांच्याच मदतीवर श्रीशिवाजी महाराजांनीं हिंदुपदपातशाहीची स्थापना केली होती. त्यांच्यांनंतरहि याच किल्ल्यांनीं दोनतीन शतके देशाचें रक्षण केलें. परंतु किल्ल्यावर वावरणारीं माणसें मात्र स्वाभिमानी न राहिल्यामुळें महाराष्ट्राचें दुर्दैव उभें राहिलें ! शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता यांची कमतरता मुळींच नव्हती. वाण होती ती ऐक्याची, प्रामाणिकपणाची व स्वार्थत्यागाची.

- ११ फ्रेब्रुवारी १८१८

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP