माघ शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"सत्य गुरुरायें कृपा मज केली ! "

शके १५५४ मधील माघ शु. १० ला गुरुवारीं पहांटे भंडार्‍याच्या डोंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकारामबोवा यांना स्वप्नांत गुरुपदेश झाला. हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे. शके १५२० मध्यें एकनाथमहाराज समाधिस्थ झाल्यावर दहाच वर्षांनीं तुकोबांचा जन्म देहू येथें झाला. त्यांच्या घरामध्यें भगवद्‍भक्ति पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणें चालू होती. घरीं थोडी शेती, व्यापारधंदा व सावकारी होती. या कुटुंबांत वयाची तेरा वर्षे तुकोबांनीं आनंदांत घालवलीं. त्यानंतर त्याचें लग्न झालें. पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरें लग्न केलें. बोल्होबांनीं सर्व संसार तुकोबांच्या गळ्यांत टाकला. तुकाराम बोवांनींहि आरंभाच्या काळांत चोखपणें संसार केला.- पण त्यानंतर एकामागून एक दु:खाचे डोंगर कोसळले. वयाच्या सतराव्या वर्षी वडील निवर्तले. भावजय मरुन गेली. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थयात्रेस निघून गेला. तुकोबा थोडे दिवस खिन्न झाले. त्यांचें प्रपंचांत मन लागेना. त्यांच्या उदासीनतेचा फायदा लोकांनीं घेतला. देणेकर्‍यांनीं पैसे बुडविले, घेणेकर्‍यांनीं तगादे लावले, तुकोबांना कर्ज झालें, वडिलार्जित मालमत्ता नाहींशी होऊन दुकानाचें दिवाळें निघालें, दुष्काळ पडून घरचीं गुरेढोरें मरुन गेलीं, व्यापारांत अतोनात नुकसान झालें, लोकांनीं फजितवाडा आरंभला, वडील बायको अन्नान्न करुन मरुन गेली ! तुकोबांच्या मनाला लज्जा वाटली. शेवटीं ‘विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्‍याचे काज -’ असा निश्चय करुन गावांतील विठ्ठलाची पूजाअर्चा ते करुं लागले. नव्या साधनमार्गात असतांना माघ शु. १० रोजीं -

"सत्य गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांहीं ।
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥
बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरी ।
माहो शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥-"

यानंतर तुकोबांना ‘नित्य नवा दीस जागृतीचा’ दिसू लागला.

- ९ जानेवारी १६३३

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP