माघ शुद्ध १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


महादजी शिंदे यांचे निधन !

शके १७१५ च्या माघ शु. १३ रोजीं प्रसिद्ध मराठा वीर आणि मुत्सद्दी महादजी शिंदे यांचें निधन झालें. मरणसमयीं महादजी शिंदे वानवडी येथील छावणींत होते. आठदहा महिने पाटिललबोवांना ज्वरबाधा झाली होती. महादजी हा राणोजी शिंद्यांचा मुलगा. त्यानें प्रथम तळेगांव-उंबरीच्या लढाईत शौर्य गाजवून नांव मिळविलें. औरंगाबाद, साखरखर्डा, पंजाब इत्यादि मोहिंमातूनहि त्यानें मोठा पराक्रम केला. पानिपतच्या लढाईंत एका पठानानें याच्या डाव्या पायावर वार करुन महादजीस कायमचें लंगडें केलें होतें. पानिपतच्या लढाईनंतर महादजीनें उत्तरेंतील कारस्थानें व भानगडी यांची चांगली माहिती करुन घेतली. उत्तर हिंदुस्थान जिंकून पानपतचें अपयश धुवून काढण्यांत महादजींची बरीच कर्तबगारी दिसून येथे. लढाया, कारस्थानें, राज्यव्यवस्था, फौजेची उभारणी इत्यादि गोष्टींतील तपशील पाहिला म्हणजे असें वाटतें कीं, "हिंदुपदपातशाही सिद्धीस नेण्याचा मराठेशाहीच्या आद्यचालकांचा प्रधान हेतु जर कोणीं सफल केला असेल तर तो महादजीनेंच. यानेंच पानपतचें अपयश धुऊन काढलें, आणि अटकेपावेतों नेलेल्या झेंड्याचें सार्थक केलें. फांद्या तोडीत बसण्यापेक्षां मूळच उपटून काढावें ही कल्पना खरी करुन दाखविणारा पुरुष मराठेशाहीत एकच झाला आणि तो म्हणजे महादजी शिंदा होय". महादजींचा वर्ण काळा असूनही, चेहर्‍यावर बुद्धीची व औदार्याची चमक होती. त्यांचे वर्तन साधें व अकृत्रिम असून तत्कालीन मराठी बाणा महादजींच्या ठिकाणीं मूर्तिमंत होता. तो चांगला बहुश्रुत असून धर्मनिष्ठ होता. हा रणवीर एक प्रेमळ भगवद्‍भक्त म्हणूनहि प्रसिद्ध आहे. स्वत: भक्तिपर पदें रचून तो म्हणत असे. ‘माधव विलास’ या संज्ञेनें त्याचीं पद्यें प्रसिद्ध झालीं आहेत. साधुसंतांवर त्याचा विश्वास होता. त्याचें चारित्र्य धुतल्या तांदुळाप्रमाणें होतें. "उत्तरेंत विदुर नामाभिधान पावलेला महादजी धन, सत्ता, लौकिक, ऐश्वर्य यांच्या परमावधीस पोंचवूनही अंतबाह्य वर्तनानें सर्वथा निर्मळ राहिला. शत्रूला त्यानें आदरानें व औदार्यानें वागविलें. "

- १२ फेब्रुवारी १७९४

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP