ज्येष्ठ शु. २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


हळदीघाटाचा घनघोर संग्राम

शके १४९८ च्या ज्येष्ठ शुध्द २ रोजीं अकबरपुत्र सेलिम आणि महापराक्रमी राणा प्रताप यांची हळदीघाट येथें घनघोर लढाई झाली.
राणा प्रताप आपलें सामर्थ्य वाढवून चित्तोड परत घेण्याची गर्जना करीत आहे हें अकबरास समजल्यावर त्यानें मानसिंग आणि सेलिम यांना राणा प्रतापचा पराभव करण्यास पाठविले. दोनहि सैन्यांच्या गांठी हळदीघाटाच्या खिंडींत पडल्या. प्रतापसिंह मानसिंहावर डोळा ठेवून होता. राणा बेफामपणें सैन्याच्या मध्यभागीं शिरला व त्यानें आपला चित्तक घोडा सेलिमच्या हत्तीवर घातला. “चित्तक हत्तीच्या गंडस्थळावर पाय ठेवून उभा राहिला. प्रतापनें तीव्र वेगानें सेलिमच्या वक्षावर भाल्याचा प्रहार केला. परंतु सेलिम बचावला ... या झटापटींत प्रतापास सात जखमा झाल्या. चित्तकाचा पायहि जखमी झाला होता. त्यानें आपल्या धन्यास वांचविण्याची पराकाष्ठा केली.” दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयापलीकडे चित्तकनें एकदां उडी मारुन राण्याला शत्रुसैन्यांतून दूर केलें. चित्तक थकून गेला होता. प्रतापास पाठीवर घेऊन तो एकसारखा धांवत होता. या संकटाच्या काळीं अकबरास फितुर झालेला प्रतापाचा भाऊ पश्चात्तापानें शुध्द होऊन राण्यास भेटला. आपल्या धन्यास आधार मिळाला असें पाहून त्या मुक्या जनावरानें जमिनीला पाठ लावून धन्याच्या पायाशीं प्राण सोडला. या स्वामिभक्त ‘चित्तक’ चें स्मारक एक चबुतरा बांधून करण्यांत आलें.
हळदीघाटाच्या लढाईत राण प्रतापाचें पुष्कळच सैन्य कापलें गेलें. किल्ल्याच्या संरक्षणासाठीं प्रतापानें बराच टिकाव धरला. पण कोणा दुष्टानें ज्या पाण्यावर राण्याची उपजीविका होत होती त्या विहीरींत विष कालविलें ... प्रताप आश्रयहीन झाला.सेलिम व प्रताप या दोघांचेहि अनेक हाल झाले. प्रतापाच्या चौदा हजार सैन्याची कत्तल झाल्यामुळें त्याच्यावर भयंकर प्रसंग ओढवला गेला. या कत्तलीमुळें मेवाडमधील प्रत्येक घरांत रडण्याचा सूर ऐकूं येत होता.
- ३० मे १५७६

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP