ज्येष्ठ वद्य ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


राजमाता जिजाबाईचा अंत !

शके १५९६ च्या ज्येष्ठ व. ९ रोजीं शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यांचें निधन झालें.
जिजाबाई ही लखूजी जाधवरावांची मुलगी. वाडयांत रंगपंचमीचा दरबार झाला तेव्हां मालोजी भोसले आपल्या लहानग्या शहाजीसह हजर होते. दरबारांत जिजाबाई व शहाजी मुलांच्या स्वभावास अनुसरुन रंगाचा खेळ खेळूं लागलीं. त्या समयीं थोडा रागव्देषाचा संवाद झाला तरी पुढें भोसल्यांचा लौकिक वाढल्यानंतर हे लग्न पार पडलें. त्यांच्याच पोटीं पुढें स्वराज्यसंस्थापक श्रीशिवराय जन्मास आले. शिवाजीला योग्य शिक्षण देऊन त्याचेकडून मराठयांचें स्वराज्य स्थापण्याची तयारी जिजाबाईनें केली. आरंभींच्या राजकीय मसलती हिच्याच सल्ल्यामुळें होत असत. फलटणच्या बाटलेल्या बजाजी निंबाळकरास शुध्द करुन घेण्याची खटपट तिनेंच केली. प्रारंभीचें जीवन खडतरपणें गेलें असलें तरी आपला मुलगा छत्रपतिपदावर शोभलेला पाहून या माउलीला केवढी धन्यता वाटली असेल ! डोळयांदेखत राज्याभिषेकाचा समारंभ झाल्यानंतर बारा दिवसांतच तिचा मृत्यु झाला.
जिजाबाई मानी, निश्चयी, स्वतंत्र विचाराची व धाडसी होती. तिला स्वत:ला लिहिता - वाचतां येत असून शिवाजीला धार्मिक शिक्षणाचें बाळकडू तिनेंच पाजलें. शहाजी कर्नाटकांत होता तेव्हां पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था जिजाईच पाही. तिनें न्यायनिवाडेहि केले होते.
रायगडावरील पावसाळी हवा सोसवत नव्हती, म्हणून शिवाजीनें तिची व्यवस्था गडाखालीं पांचाड गांवीं केली. तेथेंच तिचा अंत झाला. मातु:श्रीच्या सेवेसाठीं शिवरायांचें एक स्वतंत्र खातेंच होतें. पहार्‍याचे शिपाई, पुजारी, पुराणिक, वगैरे नेमून देवपूजेची व दानधर्माची स्वतंत्र व्यवस्था लावून दिलेली होती. एक दिवाण, एक चिटणीस, एक फडणीस व एक पोतनीस इतके कामगार व कारकून मंडळी जिजाबाईच्या तैनातीस असत. आईच्या व्यवस्थेंत थोडा जरी बिघाड झाला तरी शिवाजीला खपत नव्हता.
- १७ जून १६७४
-----------------
ज्येष्ठ व. ९
भय्या दार उघडेना !

शके १८३६ च्या ज्येष्ठ व. ९ रोजीं लोकमान्य टिळक यांची मंडाले येथील दीर्घकालीन कारावासातून मुक्तता होऊन ते पुण्यास येऊन पोंचले.
सहा वर्षापूर्वी राज्यद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल टिळकांना जबरदस्त शिक्षा झाली होती. ती संपूर्ण भोगल्यानंतर टिळक नक्की केव्हां सुटणार याचा अंदाज लोकांना नव्हता. सरकारनेंहि त्यांच्या सुटकेची बातमी अगदीं गुप्त ठेविली होती. तरी आपल्या मनाशीं सुटकेचा दिवस नक्की ठरवून पोलिस इन्स्पेक्टर सदावर्तें हे पुण्याहून मंडालेस गेले होते. त्यांनीं ज्येष्ठ व.९ रोजीं टिळकांना आणून मध्यरात्रीस पुण्याच्या गायकवाडवाडयासमोर उभे केलें. सर्वच कांहीं अपनेक्षित होते. दरवाजाच्या देवडीवर भय्या झोंपला होता. टिळकांना त्यानें ओळखिलें नाहीं. दरवाजा उघडण्यास तो नाखुष होता ! शेवटीं सर्व खुलासा झाल्यावर टिळकांचा प्रवेश स्वत:च्या वाडयांत झाला. अर्ध्या तासांत सर्व पुण्यांत ही शुभवार्ता पसरली. माणसांची रीघ सुरु झाली. टिळकांच्या दर्शनास हजारों स्त्री - पुरुष येत होते. शेंकडों गांवाहून अभिनंदनाच्या तारा व गौरवाचीं पत्रें येत होतीं. ‘टिळक सुटले’ या अग्रलेखांत ‘केसरीळ’ नें ईश्वरी शक्तीचे आभार मानिले. दोनतीन दिवसांनंतर अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालीं सार्वजनिक सभेंत एक सभा भरुन टिळकांच्या सुटकेबद्दल पानसुपारीचा जाहीर समारंभ करावा असें ठरलें; त्याप्रमाणें गायकवाडवाडयांत प्रचंड सभा भरली. नागपूर, वर्‍हाड, खानदेश,सोलापूर, बेळगांव, इत्यादि ठिकाणांहून मंडळी उपस्थित झाली होती. ‘‍टिळक महाराज की जय’ असा जयघोष करुन लोकांनीं टिळकांचें स्वागत केलें. सुटकेनंतरच्या आपल्या जाहीर भाषणांत टिळकांनीं उद्रार काढाले, “सुखाला भागीदार मिळाले कीं तें वाढतें. आज येथें जमलेला समाज व गेले दोनतीन दिवस माझ्या भेटीसाठीं आलेली मंडळी यांना पाहून माझ्या सुटकेपासून मला जें सुख झालें असेल त्याची वाढ सहस्रपट नव्हे लक्षपट झाली आहे.” लोकमान्यांच्या या कारागृहवासांत ‘गीतारहस्य’ या अव्दितीय ग्रंथाचा जन्म होऊन ‘गीतारहस्य बाला, कमला विनायकाला, दे स्फूर्ति गावयाला, ती धन्य बंदिशाला’ या काव्यपंक्ति सार्थ पावल्या.
- १७ जून १९१४

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP