ज्येष्ठ शु. १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“आकाश - पृथ्वी शब्देंकरुन पूर्ण जाली !”

शके १५९६ च्या ज्येष्ठ शु. १३ रोजीं रायगडावर हिंदवी राज्याचे संस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक झाला.
बालपणापासून केलेल्या उद्योगाची सांगता राज्याभिषेकानेंच होणें योग्य होतें. हिदूंचा त्राता, त्यांचा रक्षक, त्यांचा राजा, धर्मरक्षणास सिध्द आहे हें राज्याभिषेकामुळेंच जगाला जाहीर होणार होतें. मनांत अढी धरुन बसणार्‍या सरदारांना व शत्रुत्वानें वागणार्‍या अदिलशहा, कुतुबशहा वगैरे पातदशहांना शिवाजीची योग्यता समजून येण्यास हेंच एक साधन होते. आपलें क्षत्रियत्व सिध्द करुन विरोधकांचीं तोंडें शिवाजीमहाराजांनी बंद केलीं. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी जोरांत सुरु झाली.“महानद्यांची पुण्योदकें;  सुलक्षणी गजाश्व, व्याघ्रचर्मे व मृगचर्मे, छत्रचामरादि राजचिन्हैं, सुवर्णकलश, सिहासन, असें सर्व साहित्य जमविण्यांत येऊन आप्तजन, विव्दान्‍, पंडित, लहानमोठे सरदार व सेवकजन, इत्यादि लोकांना निमंत्रणें पाठवून बोलविण्यांत आले.” ज्येष्ठ शु. ४ ला मुंज व शु. ६ ला समंत्रक विवाह, हे विधि झाले. मंगलस्नान करुन वस्त्रभूषणे परिधान केल्यानंतर ज्येष्ठ शु. १३ रोजीं तीन घटका रात्र उरली तेव्हां शिवाजी महाराजांनीं सिंहासनारोहण केलें. त्यानंतर ब्राह्मणानीं मंत्राक्षतांची व इतरांनीं सुवर्ण - रौप्यपुष्पांची वृष्टि शिवरायांवर केली. राज्यांत तोफांची सरबत्ती झाली. गागाभट्टांना एक लक्ष रुपये दक्षिणा व बहुमोल वस्त्रभूषणें मिळालीं. त्याचप्रमाणें गोसावी, तापसी, गोरगरीब यांचाहि योग्यतेनुरसार समाचार घेण्यांत आला.
या राज्याभिषेकप्रसंगी शिवाजीस इंग्रजांनीं एक अंगठी, एक चांगली खुर्ची, एक हिरेजडित शिरपेच, दोन हिरेजडित सलकडीं व तीन मोती असे जिन्नस दिले. समारंभाचा खर्च पन्नास लाखांचेवर झाला असावा. नवीन राज्यभिषेक शक सुरु करण्यांत आला. पांचसहा शतकें पारतंत्र्यांत रगडून निघालेलें हिदुराष्ट्र स्वतंत्र झालें. याचा उल्लेख बखरकार करतात, ‘ते समयीं मंगलवाद्य,भेरी, गायनादि समारंभ होऊन सर्वहि आकाश - पृथ्वी शब्देंकरुन पूर्ण जाली !”
- ६ जून १६७४

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP