ज्येष्ठ वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


मराठी राज्याची समाप्ति !

शके १७३९ च्या ज्येष्ठ व. १४ रोजीं बाजीरावानें इंग्रजांशीं ‘१३ जूनचा’ तह करुन मराठी राज्य घालविलें !
मराठेशाहीच्या अस्ताचे जे निरनिराळे दिनांक मानण्यांत येतात त्यांमध्यें ज्येष्ठ व. १४ ( १३ जून १८१७ ) हा फार महत्त्वाचा आहे. या समयीं शेवटचा बाजीराव पेशवा गादीवर असून त्याचा हस्तक त्र्यंबकजी डेंगळे अटकेंतून सुटून देशांत पुंडावा करीत होता. त्याला बाजीरावाचें साहाय्य आहे असें समजून एल्फिन्स्टन साहेबानें ‘त्रिंबकजीस आमच्या स्वाधीन करा’ असा आग्रह बाजीरावाजवळ सुरु केला.  शेवटीं युध्दापर्यत पाळी आल्यावर बाजीरावानें एल्फिन्स्टनला बोलावून सांगितलें “गैरसमज उगाच वाढत आहेत. तुमच्याबद्दल माझे मनांत यत्किंचितहि व्देषबुध्दि नाहीं. तुमच्याच आश्रयानें लहानाचा मोठा झालों आहें. माझें हें शरीर नखशिखांत इंग्रजी अन्नानें वाढलें आहे हें मी कसें विसरेन ? तुमच्याशीं मी युध्द करीन तरी कसा ?” बाजीरावाचें हें मिठ्ठास भाषण ऐकूनहि एल्फिन्स्टनवर विशेष परिणाम झाला नाहीं. त्यानें बजाविलें “एक महिन्याचे आंत त्रिंबकजीस स्वाधीन करा आणि जामीन म्हणून रायगड, पुरंदर, सिंहगड हे किल्ले स्वाधीन करा” किल्ले इंग्रजांकडे गेले. त्र्यंबकजीस पकडण्यांत बाजीरावास यश आलें नाहीं. जाहीर बक्षीस लावूनहि त्र्यंबकजी सांपडला नाहीं. प्रत्यक्ष युध्द करण्याची धमकी बाजीरावांत नाहीं हें जाणून एल्फिन्स्टन साहेबानें तहाचीं कलमें तयार केलीं. त्यायोगें महाराष्ट्राबाहेरचा चौतीस लाख वसुलाचा सर्व प्रदेश इंग्रजांकडे जाऊन इतर मराठे सरदारांशीं बाजीरावाचा कांहीं एक संबंध राहणार नव्हता. तहास मान्यता देण्यास अखेरपर्यंत बाजीरावानें टाळाटाळी केली. पण शेवटीं, मोठया नाखुषीनें ज्येष्ठ व. १४ रोजीं त्यानें तहावर सही केली. “वास्तविक याच तहानें बाजीरावानें मराठेशाहींतील पुढारीपण गमावलें. तो केवळ एक लहानसा संस्थानिक बनला. येणेप्रमाणें मराठी राज्यास उतार लागून राज्य बुडण्याचे दिवस येऊन ठेपले. मराठी राज्यसंस्थापना हें एक दैवी कार्य होते. परंतु त्याचा वारसा बाजीरावाच्या नामर्दपणामुळें इंग्रजांकडे जाऊं लागला.”
- १३ जून १८१७

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP