ज्येष्ठ वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


टिपूविरुध्द त्रिवर्गाचा तह !

शके १७१२ च्या ज्येष्ठ व. ४ रोजी म्हैसूरच्या टिपूचा पराभव करण्यासाठीं मराठे, निजाम व इंग्रज या त्रिवर्गानें एक मोठा तह केला.
चारपांच वर्षापूर्वीच मराठयांनीं टिपूवर मोहीम काढून त्याचा पराभव केला होता. पण त्या वेळीं त्याला पुरती दहशत बसली नव्हती, आणि तहहि घाईनें करण्यांत आला होता. तेव्हां सहजच टिपूचा पुन: एकदां जंगी पराभव करावा अशी उत्कंठा मराठे व निजाम या दोघांना लागून राहिली होती. थोडयाच अवधींत म्हणजे शके १७११ मध्यें टिपूनें इंग्रजांचा मित्र त्रावणकोरचा संस्थानिक किरीटी रामराजा यावर स्वारी केली. त्यामुळें इंग्रजहि टिपूचा समाचार घेण्यास सिध्द झाले. आणि टिपूवर संयुक्त स्वारी करण्याचें निजाम, मराठे व इंग्रज यांनीं ठरविलें. तिघा स्वतंत्र सत्ताधीशांमध्यें युध्दासारख्या कामगिरीसंबंधीं वाटाघाटी सुरु झाल्या. कोणीं कोणाच्या हाताखालीं वागावयाचें, मोहीम केव्हां कशी करावयाची, इत्यादि व्यवस्था वर्ष - सहा महिने चालली होती. शेवटीं ज्येष्ठ व. ४ रोजीं पुण्यास सह्या होऊन तह कायम झाला. त्याचीं मुख्य कलमें तीन होतीं:
पावसाळयापूर्वी व नंतर मराठे व निजाम यांनीं टिपूच्या उत्तर सरहद्दीवर पंचवीस पंचवीस हजार फौजेनिशीं स्वारी करुन साधेल तेवढा मुलूख ताब्यांत घ्यावा.
लाँर्ड काँर्नवाँलीस या इंग्रजी गव्हर्नर जनरलनें वेळ पडली कीं दहा हजार इंग्रज स्वारांची फौज दोघांकडे पाठवावी. अर्थात्‍ फौजेचा खर्च इंग्रजांनींच करावयाचा. स्वारीवर निघालेल्या मराठे व निजाम यांच्या सैन्यांच्या मदतीस इंग्रजांनीं दोन दोन पलटणी व सहा सहा तोफा द्याव्यात. त्यांचा खर्च मात्र मराठे व निजाम यांचेकडे असावा.
टिपूचा मुलूख जो मिळेल तो तिघांनीं सारखा वांटून घ्यावा. याखेरीज आणखी अकरा कलमें होतीं, पण तीं तितकीं महत्वाचीं नाहींत. मोहिमेंत मराठयांबरोबर मँलेट व निजामाबरोबर केनावे हजर होते. इंग्रजांकडे सेनपति म्हणून प्रथम मेडोझ व नंतर शेवटपर्यंत स्वत: काँर्नवाँलीस होता. मराठयांचे तर्फे हरिपंत फडके व परशुरामभाऊ पटवर्धन हे प्रमुख होते.
- १ जून १७९०

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP