मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
अश्म गीता

अश्म गीता

अश्म गीता


वैशंपायन सांगतात,
बांधवाविषयींच्या शोकानें संत्रस्त होऊन प्राणत्याग करण्याची इच्छा करणार्‍या ज्येष्ठ पांडवांचा शोक व्यासमुनींनी घालविला. ॥१॥
व्यास म्हणाले,
युधिष्ठिरा, याविषयी अश्मनमक ब्राम्हणानें कथन केलेला हा एक प्राचीन इतिहास सांगत असतात तो तू ऐक. ॥२॥
हे नरश्रेष्ठा, पूर्वी ज्ञानसंपन्न अशा अश्मनामक ब्राम्हणाला दु:ख आणि शोक यांनी व्याप्त झालेल्या जनक राजाने एक संशयाविषयीं प्रश्न केला. ॥३॥
जनक म्हणाला, बांधव अथवा द्रव्य यांची प्राप्ती किंवा नाश झाला असता कल्याणेच्छू पुरुषाला कल्याणाची प्राप्ती कोणत्या प्रकारे होते ? ॥४॥
अश्म म्हणाला,
मनुष्याचे हें शरीर निर्माण झाले की, लागलीच तीं तीं दु:खे व तीं तीं सुखे त्याच्या पाठीमागे लागतात. ॥५॥
त्या दोहोंपैकी ज्या कोणा एकाची प्राप्ती होते, ती मेघाला आकर्षण करणार्‍या वायूप्रमाणे तत्काल त्या पुरुषाची ज्ञानशक्ती हरण करते. ॥६॥
मी मोठा कुलीन आहें, आणि केवल मनुष्यच नसून सिद्ध आहें, असें त्याला वाटूं लागले; व या तीन गोष्टींमुळे त्याचें अंत:करण शिथील होऊन जातें. ॥७॥
आणि तसें झाले म्हणजे, पित्याने संचय करून ठेवलेल्या उपभोग्य वस्तूंचा व्यय करून हीन दिशेस पोहोंचून तो परद्र्व्याचा अपहार करणे हेच उत्तम असे समजतो. ॥८॥
ह्याप्रमाणे मर्यादेचें उल्लंघन करून अयोग्य प्रकारें परद्र्व्याचा अपहार करूं लागल्यानंतर, पारधी बाणांच्या योगानें मृगाचा वध करतात त्याप्रमाणे राजे त्याचा वध करतात. ॥९॥
हे पृथ्वीपते, जे लोक आज वीस वर्षांचे किंवा तीस वर्षांचे आहेत, ते कांही शंभर वर्षांच्या पुढें असावयाचे नाहीत. ॥१०॥
इतस्तत: सर्व प्राण्यांचे वर्तन कोणत्या प्रकारचें आहे इकडे दृष्टी देऊन, आपल्या बुद्धिनेच त्या दारिद्र्यप्रभृती आत्यंतिक दु:खावर उपचार केले पाहिजेत. ॥११॥
अंत:करणाचा विक्षेप अथवा अनिष्ट गोष्टींची प्राप्ती ही दोनच मानसिक दु:खाच्या उत्पत्तीची साधनें होत. तिसरें कांही कारण युक्तींने सिद्ध होत नाही. ॥१२॥
याप्रमाणे ही व विषयासक्तीपासून उत्पन्न होणारी नानाप्रकारची ती ती दु:खे मनुष्यावर ओढवतात. ॥१३॥
प्राणी दुर्बल असोत अथवा बलिष्ठ असोत, लहान असोत अथवा मोठे असोत, त्यांना जरा आणि मृत्य़ू हे एखाद्या लांडग्याप्रमाणे भक्षण करीत असतात. ॥१४॥
कोणीही मनुष्याने जरी ही समुद्रवलयांकित पृथ्वी जिंकून घेतली, तरी त्याला जरा आणि मृत्यू यांचे उल्लंघन करता येणार नाही. ॥१५॥
सुख अथवा दु:ख जे काही प्राण्यांवर ओढवेल, तें सर्व पराधीनपणे त्यांनी भोगले पाहिजे; त्याला काही उपाय नाही. ॥१६॥
हे प्रजाधिपते, पूर्ववयांत, तारूण्यात अथवा वार्धक्यात आपल्या इच्छेच्या विरुद्ध अशाही प्राप्त झालेल्या या गोष्टीचा त्याग करता येत नाही. ॥१७॥
अप्रिय मनुष्याचा समागम आणि अत्यंत प्रिय मनुष्याचा वियोग, अर्थ, अनर्थ, सुख आणि दु:ख ही सर्व दैवावर अवलंबून आहेत. ॥१८॥
प्राण्यांची उत्पत्ती, देहत्याग, द्रव्यप्राप्ती, श्रम आणि द्रव्यप्राप्तीचा अभाव ही देखील सर्व त्यावरच अवलंबून आहेत. ॥१९॥
ज्याप्रमाणें एखाद्या फलाचा वास, रंग, गोडी आणि स्पर्श हे स्वभावत:च पालटतात, त्याप्रमाणें सुखे आणि दु:खे ही दैवाच्या अनुरोधाने प्राप्त होतात. ॥२०॥
सर्वही प्राण्यांचे बसणे, निजणे, जाणे, उठणे, जलादी प्राशन करणे आणि भोजन इत्यादि सर्व कृत्ये केवळ कालाच्याच योगाने घडून येतात. ॥२१॥
कित्येक लोक वैद्य आहे, रोगी आहेत, बलवान्‍ आहेत, निर्बल आहेत,श्रीमान्‍ आहेत आणि षंढही आहेत; ही सर्व कालाचीच विचित्र गती आहे. ॥२२॥
सत्कुलामध्ये जन्म, वीर्य, आरोग्य, सुस्वरूप, उत्कृष्ट प्रकारचे ऐश्वर्य आणि सुखोपभोग यांची प्राप्ती दैवयोगानेच होते. ॥२३॥
दरिद्री लोकांना इच्छा नसली तरी त्यांना पुष्कळ पुत्र होतात; आणि वैभवसंपन्न असणार्‍या लोकांना एकही पुत्र नसतो. सारांश, दैवगती विचित्र आहे. ॥२४॥
व्याधी, अग्नी, जल आणि शस्त्र यांची भीती, क्षुधा, संकटे, विष, ज्वर, मरण आणि उच्च प्रदेशापासून पतन ही सर्व प्राण्याला दैवगतीच प्राप्त होतात. ॥२५॥
ज्याच्या नशीबी जसे लिहिलेले असेल त्याच मार्गाने तो जात असतो. दैवगतीची कोणीही अतिक्रम करू शकत नाही, व कोणीही त्यातून सुटला आहे, असेही दिसत नाही. ॥२६॥
एखादा द्र्व्यसंपन्न मनुष्य तारूण्यामध्येच मरण पावला आहे असे दिसून येते व दरिद्री शंभर वर्षांचा वृद्ध होऊन क्लेश भोगीत असल्याचे दिसते. ॥२७॥
सारांश, दरिद्री पुरुष दीर्घायुषी असलेले दिसतात आणि वैभवसंपन्न अशा वंशामध्ये निर्माण झालेले लोक पतंगाप्रमाणे नाश पावतात. ॥२८॥
बहुतकरून श्रीमंत लोकांना भोजन करण्याचे सामर्थ्य नसते; आणि दरिद्री मनुष्याने जरी काष्ठे भक्षण केली तरी ती देखील सर्व पचून जातात. ॥२९॥
कालाच्य प्रेरणेने मनुष्य स्वत:स जे जे इष्ट असेल ते ते करण्याचे मनात आणतो व त्याने तृप्ती न झाल्यामुळे तो दुरात्मा पाप करु लागतो. ॥३०॥
मृगया द्युत, स्त्रिया आणि मद्यप्राशन यांमध्ये आसक्त होणे हे सुज्ञ लोकांनी निंद्य मानले आहे; पण बहुधा असलेलेही लोक या गोष्टींमध्ये आसक्त होऊन राहिलेले दिसतात. ॥३१॥
याप्रमाणें या लोकांमध्ये इष्ट अथवा अनिष्ट अशा सर्व प्रकारच्या गोष्टींशी कालगतीनेच प्राण्याचा संबंध जडतो; त्याचे दुसरे काही कारण दिसत नाही. ॥३२॥
वायू, आकाश, अग्नी, चंद्र, सूर्य, दिवस, नक्षत्रे, नद्या आणि पर्वत यांना कोण निर्माणे करतो आणि त्यांचे पोषण करतो ? अर्थात्‍ कालच. ॥३३॥
शीत अथवा असह्य उष्ण ह्यांची ज्याप्रमाणे कालाच्याच योगाने प्राप्ती होते, त्याप्रमाणेच, हे नरश्रेष्ठा, मनुष्यांनाही सुख-दु:खाची प्राप्ती होते. ॥३४॥
औषधे, मंत्र, होम अणि जप हे मृत्य़ूने ग्रस्त केलेल्या अथवा जरेने व्याप्त झालेल्या मनुष्याचे संरक्षण करु शकत नाहीत. ॥३५॥
महासागरांत दोन काष्ठे परस्परांस येऊन मिळतात, व मिळताच अलग अलग होऊन जातात, त्याचसारखी प्राण्यांच्या समागमाची गोष्ट आहे. ॥३६॥
ज्यांच्यापुढे स्त्रीया गायन करीत व वाद्ये वाजवीत राहिलेल्या असतात असे विलासी पुरुष, व परान्न भक्षण करणारे अनाथ लोक, ह्या दोहोंवरही कालाची क्रिया सारखीच चाललेली असते. ॥३७॥
आम्ही संसारामध्ये हजारों मातापितर आणि शेकडो पुत्र व स्त्रिया यांचा अनुभव घेतलेला आहे; पण ते तरी आमचे कोण ? व आम्ही तरी त्यांचे कोण॥३८॥
कारण, या प्राण्याचा संबंधी कोणी नसतो व हाही कोणाचा संबंधी नसतो. स्त्रिया, बंधु आणि सुह्यजन यांच्याशी जो हा समागम होतो, तीर एक मार्गात होणारी भेटच होय. ॥३९॥
म्हणून त्यांचा वियोग झाला, तर, मी कोठे आहे, कोणीकडे जाणार, कोण आहे, काय उद्योग करीत आहे, आणि कोणाविषयीचाही शोक का करावा, ह्याचा विचार करून अंत:करण स्थिर केले पाहिजे. ॥४०॥
प्रिय वस्तूंचा समागम हा क्षणिक असल्यामुळे व संसाराची गती चक्रासारखी असल्यामुळे माता, पिता, भ्राता आणि सखा यांचा समागम ही केवळ मार्गातील भेट होय. ॥४१॥
परलोक हा पूर्वी कधी प्रत्यक्ष पाहिला आहे असे ज्ञानी लोक सांगत नाहीत. तथापि ज्याला अभ्युदयाची इच्छा असेल, त्याने शास्त्र-मार्गांचे उल्लंघन न करता त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. ॥४२॥
सुज्ञ मनुष्यानें पितृकृत्ये आणि देवकृत्ये करावी; इतरही धार्मिक कर्मे आचरण करावी; अथाविधी यज्ञ करावे; आणि धर्म, अर्थ, व काम या त्रिवर्गाचे सेवन करावे. ॥४३॥
हे जग जरा आणि मृत्यू ह्या मोठमोठया मकरांनी युक्त असणार्‍या अगाध कालसमुद्रांत मग्न होणार आहे, हे कोणालाही कळून येत नाही. ॥४४॥
केवळ आयुर्वेदाचेच अध्ययन करणारे वैद्य आपल्या परिवारासहवर्तमान व्याधिपीडित झाले आहेत असे दिसून येते. ॥४५॥
ते कषायांचे आणि घृतांचे प्राशन करीत असता; पण समुद्र जसा आपली मर्यादा उल्लंघन करून जाऊन शकत नाही, त्याप्रमाणे ते मृत्य़ूचें अतिक्रमण करु शकत नाहीत. ॥४६॥
उत्कृष्ट प्रकारे रसायनांचा प्रयोगे केलेले रसायनवेत्ते लोक सुद्धा, अत्यंत बलिष्ठ हत्तींकडून चूर होऊन जाणार्‍या हत्तींप्रमाणे, जरेच्या योगानें नाश पावले आहेत असे दिसून येते. ॥४७॥
तसेच, तपस्वी, वेदाध्ययनामध्ये आसक्त होऊन राहिलेले, दानशूर अथवा यज्ञकर्ते हे देखील जरा आणि मृत्यू यांना तरून जात नाहीत. ॥४८॥
जन्म पावलेल्या कोणाही प्राण्याचे गेलेले दिवस, महिने, वर्षे, पक्ष अथवा रात्री ही परत येऊ शकत नाहीत. ॥४९॥
हा क्षणिक असलेला मनुष्य कालगतीने पराधीन होऊन अविनाशी अशा या विशाल संसारमार्गात येऊन पडतो; ॥५०॥
व मरणोत्तर देह जीवाकडे जात असो अथवा जीव देहाकडे येत असो, कसेही झाले तरी या संसारमार्गामध्ये पुनरपि दुसर्‍या बंधूंचा आणि स्त्रीयादिकांचा समागम होतो. ॥५१॥
ह्या समागमाची प्राप्ती अगदी कायम अशी कोणालाही होत नाही. फार काय ? दुसर्‍या कोणाच्याही समागमाची तर गोष्ट राहूच द्या, पण प्रत्यक्ष आपल्या शरीराचा सुद्धा समागम कायमचा नसतो. ॥५२॥
राजा, आज तुझा पिता कोठे आहे ? आणि पितामहप्रभृती तुझे पितर तरी कोठे आहेत ? हे निष्पापा, आज तेही तुला पाहू शकत नाहीत व तूही त्यांना अवलोकन करु शकत नाहीस. ॥५३॥
हे प्रजाधिपते, स्वर्ग आणि नरक हे काही मनुष्याला आपल्या नेत्रांनी पहाता येत नाहीत. शास्त्र हेच त्यांना अवलोकन करण्याचे सुज्ञ लोकांचे नेत्र आहेत. वास्तव, तू त्याचेच अवलंबन कर. ॥५४॥
पितर, देव आणि मनुष्ये यांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी निर्मत्सरपणें ब्रम्हचर्याचे आचरण करुन प्रजोत्पत्ती केली पाहिजे आणि यज्ञही केले पाहिजेत. ॥५५॥
यास्तव मनुष्यानें प्रथम ब्रम्हचर्याचें आचरण करून आणि नंतर प्रजोत्पत्तीकडे लक्ष देऊन निर्मल अशी ज्ञानरूपी दृष्टी संपादन करावी, आणि हृदयातील दु:खाचा त्याग करून इहलोक आणि परलोक या दोहोंचीही प्राप्ती करुन घ्यावी. ॥५६॥
राजाने संपूर्ण धर्माचे आचरण केले असता व योग्य प्रकारे द्र्व्यसंपादन करुन यज्ञादी धर्मकृत्ये चालू ठेविली असता त्याची ह्या सर्व चराचर लोकांमध्ये विपुल कीर्ती होते. ॥५७॥
हे कुंतीपुत्रा युधिष्ठिरा, याप्रमाणे हे युक्तिपूर्ण असलेले अश्म्याचे संपूर्ण भाषण लक्षात घेऊन, अंत:करण शुद्ध झालेला तो विदेहदेशाधिपती जनक शोक शांत होऊन आपल्या गृहाकडे निघून गेला. ॥५८॥
हे धैर्यसंपन्ना इंद्रतुल्या, तूंही त्याचप्रमाणे शोकाचा त्याग कर, ऊठ; आनंदित हो तूं क्षत्रियधर्मानें ही पृथ्वी जिंकून घेतलेली आहेस, वास्तव तिचा अनादर न करिता उपभोग घे. ॥५९॥
महाभारतातील राजधर्मानुशासनपर्वातील अश्म गीता समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP