मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
अजगर गीता

अजगर गीता

अजगर गीता

युधिष्ठिर म्हणाला -
हे आचारज्ञानसंपन्न, कोणत्या प्रकारचे आचरण केले असता मनुष्य शोकमुक्त होऊन या भूतलावर राहू शकतो ? व ह्या लोकामध्ये मनुष्याने काल केले असता त्याला सद्‍गती मिळते ? ॥१॥
भीष्म म्हणाले -
ह्याविषयी प्रर्‍हाद आणि अजगरवृत्तीने राहणारा एक मुनी ह्यांचा संवाद पुरातन इतिहासाच्या रुपाने सांगत असतात. ॥२॥
ज्ञानसंपन्न असल्यामुळे संमाननीय अ:तकरण स्थिर असलेला व व्याधिशून्य असलेला कोणी ब्राम्हण संचार करीत असता बुद्धिमान अशा राजा प्रर्‍हादाने त्याला विचारले. ॥३॥
प्रल्हाद म्हणाला -
हे विप्र, आपणाला विषय आकृष्ट करीत नसून आपण दंभादिशून्य, दयासंपन्न, जितेंद्रिय, कर्मेच्छाशून्य, कोणावरही दोषदृष्टी नसाणारे, सत्यवादी, कल्पनाशक्तीसंपन्न, विचारचतुर, आणि तत्वज्ञानी
असूनही अज्ञाप्रमाणे संचार करीत आहात. ॥४॥
कसलीही प्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा नाही व कोणतीही प्राप्ती न झाली तरी आपणास वाईट वाटत नाही. हे ब्रम्हनिष्ठ, आपण सदैव तृप्त आहात व कोणास इष्ट अथवा अनिष्ट समजत नसता. ॥५॥
कामादी वेग लोकांना खेचून नेत आहेत, पण आपणास कामादिकांचे मूळ जे अंत:करण तेच नाही असे दिसते.  धर्म, काम आणि अर्थ ह्या पुरुषार्थाविषयीची क्रिया आपले ठिकाणी मुळीच वास्तव्य करीत नाही असे दिसते. ॥६॥
आपण धर्माचे अथवा अर्थाचे आचरण करीत नाही आणि कामामध्येही आपली आसक्ती नाही. आपण इंद्रियांच्या कोणत्याही विषयाकडे मुळीच लक्ष न देता, साक्षिभूत असणार्‍या परमात्म्याप्रमाणे बंधमुक्त होऊन राहिलेले आहात. ॥७॥
हे ब्रम्हनिष्ठ, आपणाला कोणते ज्ञान, शास्त्र आणि आचरण श्रेयस्कर वाटते ते मला लवकर सांगा. ॥८॥
भीष्म म्हणाले -
प्रल्हादाने ह्याप्रमाणे विचारले असता, ;लौकिक आणि धार्मिक कर्तव्याचे ज्ञान असलेला असा तो बुद्धिमान ब्राम्हण सौम्य व अर्थपूर्ण अशा वाणीने त्याला म्हणाला. ॥९॥
प्रल्हादा, पहा प्राण्यांची उत्पत्ती, वृद्धी, र्‍हास आणि विनाश ही सर्व कारणशून्य अशा परमात्म्यापासून होतात. म्हणूनच मला त्यापासून आनंद होत नाही व दु:खही होत नाही. ॥१०॥
कोणत्याही प्राण्यांच्या असणार्‍या प्रवृत्ती स्वभावत:च या असतात. त्या सर्वही आत्मस्वरुपाच्याच ठिकाणी आसक्त असतात, हे पूर्णपणे जाणिले पाहिजे. म्हणजे कशानेही अगदी ब्रम्हप्राप्तीनेही तो संतुष्ट होत नाही. (कारण आत्मस्वरूपापुढे ब्रम्हादी लोक अगदी तुच्छ आहेत.) ॥११॥
हे पहा प्रर्‍हादा, संयोगाचा शेवट वियोग हा असून संचयाचा शेवट नाश हाच आहे. म्हणूनच मी कोणाकडेही लक्ष देत नसतो. ॥१२॥
सत्व, रज इत्यादी गुणांनी युक्त अशी जेवढी भूते अथवा प्राणी आहेत, त्या सर्वांचा नाश होणार आहे. असे ज्ञान झाले व उत्पत्ती आणि मृत्यू ह्यांचे स्वरूप कळू लागले, म्हणजे प्राण्यांचे दुसरे कर्तव्य ते काय राहते ? ॥१।३॥
महासागरामध्ये वास्तव्य करणारे सूक्ष्म अथवा धिप्पाड असे जे जलचर प्राणी त्या सर्वांचाही नाश होतो असे माझ्या दृष्टोत्पत्तीस येत आहे. ॥१४॥
हे दैत्याधिपते, पृथिवीपासून उत्पन्न होणार्‍या स्थावर-जंगमात्मक सर्व प्राण्यांना मरण आहे असे मला दिसून येते. ॥१५॥
हे वनुकुलोत्पन्ना, आकाशामध्ये संचार करणारे, उत्कृष्ट प्रकारचे पक्षी जरी बलवान्‍ असले, तरी त्यांना यावयाचा त्या वेळी मृत्यू हा येतोच. ॥१६॥
आकाशामध्ये भ्रमण करणारी लहान-मोठी नक्षत्रे ही वेळ येताच पतन पावतात असे दिसून येते. ॥१७॥
सारांश, मृत्यू हा सर्वही भूतांच्या पाठीमागे जडलेलाच आहे, हे लक्षात ठेवून ज्ञानसंपन्न पुरुषाने परब्रम्हनिष्ठ व म्हणूनच कृतकृत्य होऊन सुखाने झोपावे. ॥१८॥
प्रर्‍हादा, मला साहजिक रीतीने जर मोठाही ग्रास मिळाला तरी तो भक्षण करतो व काही मिळाले नाही तर अनेक दिवसापर्यंत उपाशीही झोपतो. ॥१९॥
मला एखादे वेळी कोणी माधुर्यादी अनेक गुणांनी संपन्न असे अन्न पुष्कळ खाऊ घालतात आणि एखादे वेळी थोडे व एखादे वेळी अगदीच कमी तर कधी कधी मुळीच अन्न मिळत नाही.॥२०॥
मी एखादे वेळी कण्या मिळाल्या तरीही भक्षण करितो, एखादे वेळी पेंडही खातो व एखादे वेळी साळीचा भात किंवा कमी-अधिक प्रतीचे मांसही भक्षण करितो. ॥२१॥
एखादेवेळी भूमीवरही निजतो व एखादे वेळी मला एखाद्या बंगल्यातही शयन करण्याचा योग येतो. ॥२२॥
मी एखादे वेळी तागाच्या अथवा जवसाच्याही सालीची वस्त्रे परिधान करितो व एखाद्या वेळी अत्यंत मूल्यवान अशीही वस्त्रे धारण करितो. ॥२३॥
धर्मबाह्य नसणारी एखादी उपभोग्य वस्तू जर साहजिक रीतीने प्राप्त झाली तर मी तिचा निषेध करीत नाही व ती दुर्लभ असल्यास मिळविण्याच्या उद्योगासही लागत नाही. ॥२४॥
ह्याप्रमाणे सुदृढ, मृत्यू आणि शोक ह्यांच्या विरुद्ध, विद्वज्जनांस मान्य, पवित्र, निरूपम, मोहग्रस्त लोकांस संमत नसलेले व म्हणूनच आचरण न केलेले जे अजगव्रत त्याचे मी आचरण करीत असतो. ॥२५॥
मी निश्चल बुद्धीने, स्वधर्मभ्रष्ट न होता, मागच्या-पुढच्या गोष्टी लक्षात वागवून, संसारयात्रा मर्यादित करून व भीती, राग, लोभ आणि मोह ह्यांचा त्याग करून हे पवित्र अजगरव्रताचे आचरण करीत आहे. ॥२६॥
मी पवित्रपणे जे हे अजगरव्रत आचरण करीत आहे त्यात भक्ष्य, भोज्य अथवा पेय ह्यांचे फल अमुक असावे असा नियम नाही. देश व काल ह्यांचही व्यवस्था केवल दैवयोगावरच अवलंबून आहे. विषयलुब्धांनी न आचरलेले अंत:करणास सुखदायक असे आहे. ॥२७॥
अमुक मिळावे, तमुक मिळावे अशा आशेने ग्रस्त होऊन गेलेले पण धनप्राप्ती न झाल्यमुळे खेद पावत असलेले जे लोक, त्यांजकडे तात्विकदृष्ट्या सूक्ष्मपणे अवलोकन केल्यामुळेच मी शुचिर्भूतपणे हे अजगरव्रत आचरित आहे. ॥२८॥
अनेक प्रकारचे श्रेष्ठ लोकही द्रव्यप्राप्तीच्या उद्देशाने दीनपणे अनार्याचा आश्रय करीत आहेत, हे अवलोकन केल्यामुळेच वैराग्यावर माझे प्रेम जडले व मी मनोनिग्रह करून व शांतिसंपन्न होऊन शुचिर्भूतपणे हे अजगरव्रत आचरू लागलो. ॥२९॥
सुख, दु:ख, द्रव्याची प्राप्ती आणि आणि अप्राप्ती संतोष अथवा असंतोष व मरण अथवा जीवित ही केवल दैवाधीनच आहेत असे तत्वदृष्ट्या अवलोकन केल्यामुळेच मी शुचिर्भूतपणे ह्या अजगरव्रताचे आचरण करीत आहे. ॥३०॥
अजगर काहीही उद्योग करीत नाहीत, तथापि त्यांना जे फल मिळायचे ते आपोआपच मिळते असे पाहाण्यात आल्यावरून भीती, राग, मोह आणि गर्व ह्यांचा त्याग करून व धैर्य, विचारशक्ती आणि निश्चय ह्यांचा अवलंब करुन अत्यंत शांतपणे व पवित्रतेने मी ह्या अजगरव्रताचे आचरण करीत आहे. ॥३१॥
माझे शयन अथवा आसन ह्यांमध्ये नियमीतपणा राहिलेला नाही; तथापि मी स्वभावत:च इंद्रियदमन, नियम, व्रते, सत्य आणि शुचिर्भूतपणा ह्यांनी युक्त आहे व योगजन्य फलसमूहाचा त्याग करुन आनंदाने हे अजगरव्रत आचरीत आहे. ॥३२॥
अंत:करण हे परमात्म्याविषयी पराड्मुख असून ते दुर्निवार व आशाळ बनलेले आहे व विषयांदिकांशी संबंध असल्यामुळे ते परिणामी दु:खकारक होणार आहे असे कळून आल्यामुळे विकार करून, परमात्म्याच्या ठिकाणी लय होईल अशा रीतीने त्याचा निग्रह करण्यासाठीच मी शुचिर्भूतपणे अजगरव्रत आचरीत आहे. ॥३३॥
मी कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी हृदयधर्म आणि वाणी व मन ह्यांच्या अनुरोधाने वागत नसून प्रिय आणि सुख ही दुर्लभ व अनित्य आहेत हे पाहत आहे आणि म्हणूनच शुचिर्भूतपणे ह्या अजगरव्रताचे आचरण करीत आहे. ॥३४॥
त्या त्या शास्त्रामध्ये आपल्या व दुसर्‍या मतांच्या अनुरोधाने, आत्मा म्हणजे अमुक अमुक आहे असा गहन तर्क करणारे व आपल्या कीर्तीचा प्रसार करणारे जे ज्ञानसंपन्न कवी त्यांनी ह्या व्रताचे पुष्कळ वर्णन केलेले आहे. ॥३५॥
प्रत्यक्षादी प्रमाणांनी सिद्ध असलेले जे हे जग ते एखाद्या पर्वताच्या कड्याप्रमाणे केवळ नाशास कारणीभूत आहे. हे प्ररमात्म्याहून भिन्न आहे असा अज्ञ लोकांचा ग्रह आहे; पण वस्तुत: अविनाशी, निर्दोष आणि परिच्छेदशून्य असे जे सनातन ब्रम्ह त्याहून हे भिन्न नाही असा माझा पूर्णपणे विचार ठरलेला आहे, व म्हणूनच मी कामादी दोष व आशा ह्यांचा त्याग करून लोकांमध्ये वागत असतो. ॥३६॥
भीष्म म्हणाले -
जो महात्मा पुरुष राग, लोभ, मोह, क्रोध आणि भीती ह्यांचा त्याग करून ही अजगरव्रताचरण करील, तो भय, लोभ, मोह आणि राग यातून मुक्त होऊन या जगात सुखाने राहील. ॥३७॥
॥ अजगरगीता समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP