मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
श्रीदत्तलहरी

श्रीदत्तलहरी

श्रीदत्तलहरी


अनुवादक : ( जोशी, पट्टणकर, बडोदे )

अहो श्री दत्तप्रभू ! आपण तर अनादी व अनंत ! आपल्या स्नेहमयी दृष्टीनंच ह्या विश्वाला काही कमी नाही ! अन्नागारं नी जलागारं ही आपलीच कृपा ! वस्त्रही आपलीच नी शस्त्रही आपलीच ! युद्ध अन् बुद्ध ही आपलेच ! भक्तसंचरण अन् शक्तिसंक्रमणही आपलंच ! भव्य आलय, थोर महात्मे अन् अमर काव्य ही आपलीच !
(१) योगिराजा ! आपणच हे विश्व सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणात्मक प्रकृतींनी निर्माण केले ! आपणच त्याचे रक्षणकर्ते ! आपण विश्वव्यापक अन्नित्यानंदरूप ! सर्व वैदिक वाड्मयांत शोर्भागी असलेल्या उपनिषदांच्या अध्ययनानेच आपला महिमा समजू शकतो ! आपणच सत्यरूप अन् सज्जनांना आश्रयदाते आहात ! आपल्या कृपेने चारही पुरूषार्थ ( धर्म, अर्थ, काम, मोक्ष ) साधता येतात. पण मोक्षपदाची प्रपती ही एक आगळ्याच आनंदाची आपली एकमेव कृपा आहे ! आपण म्हणजे ज्ञानसागरच ! ह्या ज्ञानलहरींनीच आपण, अत्रिपुत्रा ! ह्या विश्वास आनंदित करा - अलंकृत करा !
(२) अत्रिवरदा ! आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय करू शकणार्‍या ब्रह्मा, विष्णू महेशांचेच एकत्र रूप ! आपणच विश्वकर्ते आणि विश्वपाल ! आपल्या कृपेनंच इंद्र, अग्नी इत्यादी देवांस दिशांचे अधिपत्य प्राप्त झाले आहे ! आपल्या कृपेनंच नारदादि देवर्षींस श्रेष्ठ तत्त्वज्ञान लाभले आणि चंद्र सूर्यासही आपल्याच कृपेनं निर्मल तेज प्राप्त झाले !
(३) दत्तात्रेया !  सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि अग्नी ही आपल्याच तेजाची आगळीं रूपं ! विनम्र भावाने ज्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व स्वीकारले, त्यांचे त्यांनी कल्याणच केले ! त्यामुळे ते अर्थातच लोकप्रिय झाले !
(४) कालाग्निशमना ! सर्व जीवात्मक विश्व आपल्याच मायेचं रूप आहे ! वेद आणि उपनिषदंही असंच म्हणतात ! अहो सर्जनहारा ! आपणच हे जग अनेकदा जोडले आणि मोडले ! त्यामुळे नवनिर्मित जागापेक्षा आपला अनुभव अर्थातच अधिक आहे ! म्हणून ह्या जगात आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा पूर्ण प्रभाव कोण जाणू शकेल ?
(५) योगिजनवल्लभा ! आपण वस्तुतः अजन्मा ! तरीही आपल्या जन्मांच्या कथा सांगितल्या जातात आणि जयंत्या साजर्‍या होतात ! विश्वरक्षण आणि लोकशिक्षणासाठीच आपण जन्म घेतो असे आपण दाखवता ! आपण तर निरिच्छ आणि अकर्ते ! तरी पण आपली कार्ये सर्वांच्या आणि वेदांच्या अर्थांच्या सत्यप्रतीतीसाठीच आहेत !
(६) लीलाविश्वंभरा ! आपण मन आणि वाणी ह्यांस अगम्य ! निर्मल ज्ञानस्वरूप आणि ऐश्वर्यसंपन्न ! गुणातीत आणि अविद्यातीत ! असे असतानाही आपणांस जे अविद्यायुक्त आणि गुणवान म्हणतात त्यांची बुद्धीच आपल्या मायेने नष्ट झालेली असते !
(७) सिद्धराजा ! आपण तर स्वैरसंचारी आणि शुद्धस्वरूप ! ‘ संभवामि युगे युगे ’ म्हणूण जलजंतू, पशुपक्षी आणि मानवरूप धारण करून आपल्या भक्तांच्या हृदयांगणावर स्वैरसंचार करून त्यांस पवित्र करता, हा आपला केवढा थोरपणा !
(८) ज्ञानसागरा ! आपण आद्य व परमपुरुष ! आपण भक्तरक्षणार्थ आणि विश्वपालनार्थच ज्ञानसंचार करता ! असे असताही काही अज्ञानी जीव आपणास केवळ मानवच मानतात ! आपणच द्वापरयुगात यदुकुलात अवतार घेतला आणि दुर्जनांचा संहार करून सज्जनांना विहार करण्यास योग्य समय प्रपत करून दिला ! असे असताही आपणास केवळ श्रीकृष्ण यादव मानणारे मूढजीव होतेच ना ?
(९) विश्वंभराऽवधूता ! आपण तर चतुर योगीश्वर ! आम्ही सामान्य - बुद्धी लोक आपणांस कसे समजू शकणार ! तरीपण आपल्या कृपाप्रसादाने मला आपल्या महानतेची जाणीव झाली आहे ! आणि त्यामुळेच मी आपल्या चरणकमलांच्या स्मृतिरूप काव्ये करू शकतो !
(१०) मायामुक्तावधूता !  ह्या अपार संसारात बघा सर्व जीव कसे पुत्र मित्र आणि दारा ह्यांच्या पाशात अडकलेले ! वास्तविक आपल्या चरणकमलांची सेवा करून ह्या उपाधीतून मुक्त होण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा ! पण ते तर सदैव धन आणि स्वजन ह्यांच्या चिंतनातच मग्न ! म्हणून ते दुःखाच्या माहेरघरातच पिचत पडतात !
(११) आदिगुरू ! काय हे आपले वैभव ! अमृताचा सागर, त्यात सुवर्णद्वीप, त्या सुवर्णद्वीपात एक कल्पतरू नव्हे तर कल्पतरूंचे कुंजवन ! कल्पत्यरूंच्या वनातही एक उत्कृष्ट मंडप ! आणि मंडप तरी कसा ? नवरत्नखचित खांबांवर आधारलेल्या मोत्यांच्या झालरी असलेल्या चांदण्याने आच्छादिलेला ! अशा अलौकिक मंडपात आपले विराजमान होण्याचे सुवर्ण सिंहासन तरी कसे ? असंख्य तेजोमय हिरे माणकांनी शोभा देणारे, कमलाच्या आकाराचे ! त्यावर मध्यभागी त्रिकोणपीठावर उपस्थित आपली दिव्यकांती, सुप्रसन्न, सर्वज्ञ मूर्ती ! भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार्‍या अशा आपल्या करुणावर मूर्तीची मी आराधना करून आनंडित होतो.
(१२) शिवरूपा ! आपण गुणज्ञही आहात ! कसे ते पहा ! अग्निमंडलाने युक्त मूलाधारचक्राचा स्वामी श्री गणेश ! स्वाधिष्ठानचक्राचा स्वामी ब्रह्मा, मणिपूरचक्राचा स्वामी लक्ष्मीनाथ नारायण ! अनाहतचक्राचा स्वामी रुद्र, वडवानल, ह्या सर्वांचे योगविद्यांनी उल्लंघन करून ब्रह्मरंध्रात प्रवेश करणार्‍या आपल्या गुणी योगी भक्तांस आपण दिव्यकांती तर देताच पण असामान्य श्रेष्ठत्वही देता !
(१३) देवदेवावतारा ! पूर्ण चंद्रासारखे शीतल असे आपले परमहंस गुरुस्वामी आणि आपण ( हंस ) मस्तकांतील ब्रह्मरंध्रचक्रात असलेल्या सहस्रपत्रयुक्त कमलांत वास करता ! आपणांस जो योगीभक्त जाणतो तो नाभीपासून ब्रह्मरंध्रांपर्यंत गेलेल्या सुषुम्नानाडीद्वारा आलेल्या आपल्या चरणपीठरूप चंद्रातून स्रवणार्‍या अमृताने सुस्नात होऊन, मणिपूर, अनाहत व आज्ञाचक्रांत असलेल्या सत्त्व, रज आणि तम ह्या तीन ग्रंथींचा भेद करून आपल्याशी एकरूप होऊन अखंडानंडरूपानेच राहतो.
(१४) दिगंबरा ! आपण महान तेजस्वी ! अवर्णनीय ! आधारशक्ती, पृथ्वी, कूर्म, धर्म, ज्ञान, वैराग्य इत्यादींच्या समूहांत, जे वैश्वानर अग्नीचे निवासस्थान असून अपान वायुचेही घर आहे, शरीरातील पृथ्वी व आकाश तत्त्वांनी युक्त मूलाधारचक्राच्या महापीठावर विराजित असणारे देवेंद्रासहित देव, ब्रह्मेंद्रासहित ब्रह्मदेव ज्यांची स्तुती पूजा करतात, वेदांचे आश्रयस्थान आहेत अशा तेजोनिधे ! मी आपले आदरयुक्त चिंतन करतो.
(१५) श्यामकमललोचना ! वेदवाणीच उच्च रवाने सांगत आहे की संसारसागरातून तारून नेणार्‍या तारूप्रमाणेच आपल्या चरणकमलांची सेवाही हा महान संसारसागर तरून जाण्याचे खात्रीलायक साधन आहे. अहंकाराने घोरदुःखात पडलेल्या मला इहपरलोकी तरून जाण्यासाठी आपले चरणच एकमेव शरण ( आश्रय ) आहेत ! अशी खात्री झाल्याने मी अंतःकरणपूर्वक आपली पूजा, अर्चा आणि भजन करतो.
(१६) सर्वज्ञावतारा ! जसा अग्नी विविध प्रकारांच्या लाकडाच्या आकारामुळे विविध आकारांचा भासतो ! जसा चंद्र एकच असून त्याचे चंचल पाण्यात पडलेले प्रतिबिंब विविध आकारांचे भासते ! अगदी तसेच, अहो विविध स्वरूपादत्ता ! ह्या विश्वातील वैचित्र्य आणि वैविध्य आपण वस्तुतः एकच असून विविधस्वरूपी दिसता !
(१७) परमोदारा ! काय आपल्या चरणकमलांची थोरवी ! देवा ! भक्त लोक असंही समजतात की श्रेष्ठत्व प्राप्तीसाठी विद्या, रूप आणि कुल या तीन गोष्टीच कारणीभूत आहेत. परंतु तसे नाही हो देवा ! तसे नाहीच नाही ! आपल्या भक्त दरिद्री, मूर्ख व पाषाणहृदयी असला तरीही आपल्या कृपेनं अन् केवळ कृपेनंच तो थोराहुनहि थोर होतो !
(१८) कृपासागरा ! आपल्या कृपेनेच सर्वकाही होतं ! होत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं होतं ! हेच पहाना ! सर्वगुणसंपन्नही आपल्या कृपेशिवाय अंधारात जन्मतो, जगतो अन् अंधारातच मरतो ! कुणी त्याची दखलही घेत नाही ! तेंच आपला कृपापात्र असलेला पंगुहि पर्वत चढू शकतो, मुका बोलू शकतो ! इतकेच काय रेडाही वेद म्हणू शकतो ! हा केवळ आपल्या कृपेचाच प्रसाद नाही का ? तन्वंगी सुंदर असली तरी तिच्या पतीचा अनुरागच तिच्या सौंदर्याचे खरे साफल्य आहे नाही का ? प्रियानुरागरहित सुंदरा विराग्नीतच वैफल्यात काळ कंठते ! म्हणून हे कृपासागरा ! आपल्या अनुग्रह झाला तरच सर्वत्र साफल्य आहे !
(१९) कल्याणरूपा ! आपणच शरणागतासी आधार ! आपणच साधू सज्जनांचे परित्राण करणारे ! आणि गुणसागर ! अहो तेजोनिधे ! आपकारकर्त्यांवर सुद्धा श्रेष्ठ, सज्जन सतत उपकार करीत असतात ! आपण तर दयासागर ! तेव्हा माझ्यासारख्या अनाथ आणि दीन भक्तावर दया करा, कृपा करा !
(२०) सर्वात्मका ! महाश्वेतद्वीपातील देववृक्षांच्या सुंदर वनात, रत्नखचित पीठावरील कमलासनावर, अग्नी, चंद्र व सूर्य ह्यांच्यामध्ये बसलेले, गदा, चक्र, कमल व तलवार धारण करणारे, मुर दैत्याचा वध करणारे ! असे आपण म्हणजेच ज्ञान आणि आनंद ! म्हणून अहो ज्ञानानंदा ! आपले जो मनःपूर्वक ध्यान करतो तो धन्य होय.
(२१) वाक्प्रभुवरा ! मेरू पर्वताच्या स्वर्गीय रत्नानी सुशोभित शिखरांवर कल्पतरूंनी वेष्टित, सूर्य व चंद्र ह्यांच्या किरणांनी विकसित झालेल्या कमलावर, ऐं बीजरूप वाक्पीठावर आपण आरूढ आहात ! ब्रह्मदेव व बृहस्पतीही आपल्या चरणकमलांस चंदन लावून वंदन करतात व धन्य होतात ! तर जे योगीभक्त आपली हृदयपूर्वक सेवा करतील त्यांजवर आपण प्रसन्न होऊन ते वाक्प्रभूंचेही प्रभु होऊन सर्वत्र विजयी होतीलच होतील ह्यात संशय नाही.
(२२) कर्पूरकांतिदेहा ! उदयास येणार्‍या सहत्र सूर्याच्या किरणांची कांती असलेले ! गोगलगायीच्या देहाप्रमाणे कोमल, सुंदर आणि आरक्त वर्णदेह असलेले ! क्लीं बीजरूप कामबीज पीठावर आसनस्थ ! शंख, चक्र, गदा, कमल व तलवार ही पंचायुधे धारण करणारे आदिदेव ! आपले सतत चिंतन, मनन नि निदिध्यासात जो सर्वकाळ मग्न असतो तो आपणांशी एकरूप होऊन जातो ! अशारीतीने आपलेच रूप पावलेला कीटभ्रमरन्यायाने निश्चित जगन्मोहनच होतो.
(२३) सर्वमंगला ! अहो देवा आपण तर कल्पतरूच ! आपल्या भक्तजनांस हवे ते देणारे ! आपण निर्धनांस द्रव्य, पीडितांस रक्षण, भयभीतांस अभय, साधूंस आश्रय, इतकेच काय कामनिकांची इच्छा - पूर्तीही करणारे, उपासकांस इच्छित वर देणारे असे सर्व शक्तिमान आहात.
(२४) नटेश्वरा ! विस्व्ह हा तर आपल्या हातचा कठपुतळीचा खेळ ! कठपुतळी नाही का आपल्या इच्छेनुसार कृत्ये आणि नृत्ये करीत ! कुंभार त्याच्या चाकाला गती देतो आणि ते सतत फिरत राहते ! तसेच हो तसेच, हे विश्वदेवा ! आपणही ह्या विश्वचक्रास प्रथम गती दिली आहे आणि कालगणनेनुसार येणारे हे सर्व मनू, आपल्या आणि आपल्याच प्रेरणेनुसार वाग असतात ! हे त्रिभुवनेश्वरा ! आता आपणच सांगा, ह्या जगात खरोखरी स्वतंत्र कोण आहे ? कोणीच नाही !
(२५) विश्वरक्षका ! झाडाचे पानही आपल्या इच्छेशिवाय हलू शकत नाही ! आपल्या आज्ञेनेच, ब्रह्मा सर्जन करतात, विष्णू रक्षण करतात नी शिव संहार करतात ! सूर्य प्रकाशतो नि वारा वाहतो ! नागराज शेषही आपल्या आज्ञेनेच पर्वत आणि द्वीपांनी युक्त पृथ्वीचा भार धारण करतात ! अहो सर्वशक्तिमान देवा ! भीतिशिवाय प्रीति नाही हेच खरं ! कारण आपल्या भयानेच सर्व देवसुद्धा आपल्यावरील भक्तीनें आपल्या आधीन, आधीन होऊन जातात आणि आपली इच्छा पूर्ण करतात.
(२६) आशादीपा ! भक्तांस मुक्ती देण्यापूर्वी त्याने केलेल्या पुण्यकृत्यांमुळे त्यांस आपण सत्त्वगुणयुक्त करता ! आपल्यावरील प्रीती त्यांच्या पापांचा नाश करते ! त्यांचे कल्याण करते ! आपल्याच इच्छेनुसार वायू हलू शकतो ! मग इतरांची काय कथा ? ‘ कर्तुमकर्तुम अन्यथाकर्तुम- ’ असे आपले सामर्थ्य ! ह्या श्रद्धेमुळेच आपले भक्त कालक्रमण करतात !
(२७) जगत्कारणा ! जे होणारे आहे ते सर्व आपल्या आधीन ! सांख्यशास्त्रात सांगितलेले पापपुण्य ( प्रकृती ) कर्म जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारण आहे म्हणणे उचित नाही ! कारण प्रकृती व कर्म ही नाश पावणारी आहेत ! आणि आपण तर प्रकृती व कर्म ह्यांचे स्वामी ! स्वतंत्र ! एवढ्याचसाठी श्रुती व स्मृती असे सांगतात की आपणच ह्या जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लयास सकारण आहात !
(२८) विश्वक्षेमकरा ! आपली कृपा गाढ अज्ञानांधकराचा नाश करणारी तेजस्वी दीपशिखाच ! संसाराग्नीवर झालेला जलवर्षावच ! समाधानी आणि मायारहित भक्तजनांवर झालेला अमृतवर्षावच ! ह्यामुळेच ते स्वतःसाठी वेदाध्ययन आणि जनतेसाठी लोकशिक्षणाची कार्ये करण्यास समर्थ होतात.
(२९) मोक्षगुरो ! ‘ अतिपरिचयात् अवज्ञा ’ हेच खरे ! कारण काशीत राहणारा अल्पबुद्धी माणूस गंगोदक सोडून वेळ वाचविण्यासाठी अंगणातल्या विहिरीवर स्नानास जातो ! त्याचप्रमाणे, अहो अत्रिपुत्रा ! धर्मार्थकाममोक्षदात्या आपणांसारख्या सामर्थ्यसंपन्नास सोडून तो अल्पलाभासाठी क्षुद्र गुरूचा आश्रय घेतो ! ‘ त्वमेंकं दुर्लभं मन्ये शिष्य चित्तापहारकः ॥ ’ हेंच खरे !
(३०) योगींद्रा ! वेदाध्ययन करणारा निश्चल मनाचा योगीच आपला भक्त आणि आपण ! त्रिभुवनास आनंड देणारे, पार्‍याने केलेले लोकोत्तर नेत्रांजन धारण करणारे, ललाटांमध्ये प्रकाशमान ! दोन्ही डोळे बंध करून ललातांमध्ये, आपणास विशुद्ध चक्राच्या स्थानी, अधोमुख होऊन, ज्ञान दृष्टीने मनःपूर्वक ध्यान करणारा योगी आपल्या कृपेने नवनिधींयुक्त असा योगसिद्धींचा अधिपती होतो.
(३१) हारकेयूरमंडिता ! आपण महामायेचे मंत्राक्षर ‘ र्‍हीं ’ असलेल्या कमलासनावर पद्मासन घालून बसलेले आहात ! आपली कांती नीलमण्याप्रमाणे आहे. आपण चंदन, काळा धोत्रा व गोक्षीर ह्यांच्या मिश्रणाचा तिलक लावलेला आहे. आपणांस मधुप्राशनाने धुंद झालेल्या युवतींनी वेढून टाकलेले आहे. अशा ह्या आपल्या स्वरूपाचे भावपूर्वक भजन करणार्‍यावर आपण कृपा करता व त्यामुळे तो ह्या पृथ्वीवर अदृश्य रूपानेही वावरू शकतो !
(३२) बलवंता ! आपण सुंदर अशा श्वेतकमलाच्या रत्नखचित महापीठावर विराजमान झालेले आहात. ह्या महापीठाचा आधार अमृतरूप परब्रह्म परमात्मा आहे. हाच सर्व जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत आहे. आपले हे सिंहासन अत्यंत तेजस्वी अशा भास्कराच्या बिंबासारखे आहे. वेदवाड्मयाच्या मूर्तीसारखे आहे ! देवसमुदायानेही वेष्टिलेले आपण सर्व सामर्थ्यसंपन्न आहात म्हणूनच जो आपले भक्तिभावपूर्वक चिंतन करतो त्यास अमृतमय आरोग्य प्राप्त होते.
(३३) महानाथा ! एखादा देव अथवा गुरू स्वर्गसुख देणारा असला तर ऐहिक सुख देऊ शकत नाही व ऐहिक सुख देणारा असला तर पारलौकिक सुख देऊ शकत नाही. परंतु आपली मनोभावे सेवा करणार्‍या भक्तास आपणच मात्र इहपरसुख देऊ शकता.
(३४) नानारूप, विभूषित दत्ता ! तुम्ही तर नटवर आहात ! केव्हा केव्हा जरतारी पीतांबरधारी असे राजयोगी असता ! केव्हा तुमची ‘ भस्मविलेपित कांती साजे ’ असे दर्शन असते तर केव्हा ‘ अंगी चंदनाची उटी ! पुढे उभा जगजेठी ’ असे दर्शन होते. केव्हा तुम्ही राजयोगी होऊन राजभोगांचा आनंद घेता, तर केव्हां विरक्त योगी होऊन अरण्यात संचार करता. तुमच्या ह्या वेषवर्तनवैविध्यामुळे ज्ञानीमुनी सुद्धा तुम्हास ओळखू शकत नाहीत तर मजसारख्या पामराची काय कथा ?
(३५) मुनिजनमानसचंद्रा ! केव्हा तुम्ही विशुद्ध चैतन्यरूपाने प्रतीत होता तर केव्हा अगदी जडासारखे होऊन जाता !  केव्हां शास्त्र जाणणारे ज्ञानी असता तर केव्हा अगदी जडमूढ अज्ञानी होऊन जाता ! आपण एकटे असूनही केव्हा केव्हा अनेक रूपांनी दर्शन देता ! मोठमोठ्या ज्ञानी, विद्वान, मुनीवरांसही तुम्ही परमतत्त्वांचे दर्शन घडविता ! म्हणून तर चार मुखांचे ब्रह्मदेव, पाच मुखांचे सदाशिव, सहा मुखांचे स्कंद, इतकेच काय सहस्र मुखांचे शेषही आपल्या ह्या वेषवर्तनवैविध्यामुळे रसपूर्ण जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकत नाहीत.
(३६) सिद्धेश्वरा ! आपणापाशी मणी, मंत्र, विविध सिद्धी, अष्टांगयोग अशी अनेक सिद्ध साधने असून, त्यापैकी एकेकाने सुद्धा आपण त्रिभुवनास जिंकून घेऊ शकाल ! असे असून सुद्धा आपण असे ‘ मेणाहुनि मऊ ’ आहात की आपली सेवा करणार्‍या भक्तासच काय पण स र्व त्रिभुवनासही वश होऊ शकता, हे एक आश्चर्यच नव्हे काय ?
(३७) सदासर्वद निर्मल दत्ता ! आपण दर्शन तरी कोणास देता ? ज्याला परा वाणी वश झाली आहे त्याला ! आणि परा वाणी कशी ? तर भगवती वाग्देवता सरस्वतीच्या कृपाप्रसादाने पावन झालेल्या वायूच्या प्रेरणेने पुनीत झालेली ! आणि आपण तर षड्दलयुक्त स्वाधिष्ठान कमलासनावर अधिष्ठित होऊन सर्व भुवनांवर कृपादृष्टी ठेवू शकता. असे आपण तेजस्वी, सर्वगुणसंपन्न आणि सर्वश्रेष्ठ ! असे आपले दर्शन केवळ परा वाणी प्राप्त झालेल्या योगी भक्तांसच घडते आणि तो पावन होतो.
(३८) स्वाधिष्ठान कमलासीना ! अहाहा ! काय हे आपले हंसरूप दर्शन ! आपण स्वाधिष्ठान कमलावर विराजमान झालेले ! आणि स्वाधिष्ठान कमल कसे तर विद्युल्लता आणि सूर्य ह्यांच्यासारखे तेजस्वी ! सहा पाकळ्यांनी सजलेले ! ब्रह्मदेवच स्वामी असलेले ! असे स्वाधिष्ठान कमलासन आणि उदकतत्त्वरूप, अनुपम सौंदर्यसंपन असे आपण ! अशा आपल्या कांचनरूप स्वरूपाचे मनःपूर्वक ध्यान करणार्‍यास आपण आपणासारिखे तात्काळ करू शकता ! तो मदनासारखा सुंदर होऊन, सर्वत्र विजयी भवेत् ! अशा आपल्या कृपेस पात्र होतो.
(३९) रत्नसिंहासनासीना ! आपण रं आणि र्‍हीं ह्या अग्नी व माया ह्यांच्या बीजमंत्रांनी शोभिवंत झालेल्या कमलासनावर विराजमान झालेले आहात. आणि हे आपले कमलासन तरी कुठे आहे ? एक नव्हे, तर अगणित रत्नखचित कलाकृतींनी अलंकृत अशा रत्नखचित आनंदमंदिरात ! आणि हे रत्नखचित आनंद मंदिर तरी कुठे आहे ? एक नव्हे, तर अनेक सभोवती आदराने उभे राहून सुवर्ण पुष्पांची वर्षा करीत आहेत. अशा आपल्या पावन रूपाचे नित्य स्मरण करणार्‍या भक्तास उत्कृष्ट शरीर संपत्तीचा लाभ होतो.
(४०) सच्चिदानंदा ! आपण देव व नक्षत्रे ह्यांच्यासारख्या तेजस्वी सुवर्ण कमलावर विराजमान आहात ! आपण वेदवाड्मयमूर्तीच आहात ! त्यामुळे वेदांच्या अध्ययनानेच आपले सम्यक् ज्ञान होऊ शकते ! वेदवाड्मयाच्या स्वाध्यायाद्वारा, तादात्म्य भावनेने आपली उपासना करणार्‍यांना, आपण आपणा सारिखेच तात्काळ करता व त्यांना मायेचा स्पर्शही नसलेले सच्चिदानंद पद प्रपत होते.
(४१) उत्तमोत्तमा ! आपण अमृताने पावन झालेले आहात ! ऐ बीजाने अलंकृत आहात ! आपला निवास हृदयाकाशातील निर्दोष कमलावर आहे ! मानव तर काय पण देवांनाही आपल्या अनंतत्वाचा पार लागत नाही ! तरी पण भावपुष्पादी पूजा साधनांनी आपली सेवापूजा करणार्‍या भक्तावर आपण प्रसन्न होऊन त्यासच आपण अद्वितीय परब्रह्मरूप देता. हा आपला केवढा थोरपणा !
(४२) आज्ञाचक्रवर्ती ! आपण शरीरांतर्गत सर्व नाड्यांमधून चैतन्यरूपाने वावरणारे आहात ! आपली अंगकांती सुवर्णासारखी तेजःपुंज आहे ! आपण वेदवाड्मयाचे प्राणच आहात. सूर्य, अग्नी व चंद्र हे आपले नेत्रच आहेत. विजेप्रमाणे दिव्यतेजयुक्त, भ्रुकुटिस्थानी असलेल्या द्विदल कमलयुक्त आज्ञाचक्रावर, महायोग्यांना दर्शन देणारे आपण, अष्टांग योगसाधनेन सुलभ कलापीठावर अधिष्ठित आहात.
(४३) भयनाशका ! कृपा करा ! बहुभार्याकृत पुरुषांस त्याच्या कोमलांगिनी स्वार्थाने आकर्षित करीत असतात, त्यामुळे त्याची केविलवाणी अस्थिर अवस्था होते. अगदी तसेच रे तसेच. कृपा करा ! माझी वाचा, रसना, कान व डोळे आणि इतर इंद्रिये भोगलोलुपतेकडे मला आकर्षित करीत असतात. त्यामुळे तुझ्या भयनाशक, पावनकारी चरणद्वयांवर चित्त स्थिर करून ध्यान करणे मला शक्य होत नाही.
(४४) कल्पितदातारा ! स्नान करणेही शक्य होत नाही तर जपाची गोष्टच कशाला ? घरात अन्नाचे दुर्भिक्ष्य झाल्याने अतिथिसत्कारही करू शकत नाही. गुरूची सेवाही घडू शकत नाही तर ज्ञान कसे मिळणार आणि ध्यानधारणा कशी होणार ? तरी पण तुझी सेवा घडल्यामुळे, आता मला सर्व काही साधेल ही एक आस मनी उरली आहे.
(४५) भक्तगृहप्रवेशका ! आपण श्रेष्ठ मंदारवृक्षासन्निध तेजस्वी रत्नखचित सिंहासनावर सुखेनैव आसनस्थ झालेले आहात ! देवेन्द्र आणि मुनीन्द्रही आपणापुढे विनम्र होऊन वंदन करीत आहेत. तरी पण आपण भक्तांच्या हृदयसिंहासनावरही नित्य अधिष्ठित होता आणि जे भक्त आपल्या हृदयस्थजनार्दनाची नित्य सेवा करतात त्यांजवर आपण कृपा केल्याने ते लोकमान्य तर होतातच पण देवमान्यही होतात.
(४६) सर्वज्ञा ! आपले सामर्थ्य अचाट आहे. आपण तृणाला मेरू करू शकता आणि मेरूला तृणही ! अशा आपल्या अघटित घडवून आणणार्‍या अपार सिद्धी साधनेचे सामर्थ्य विद्वानांनाही आकलन होत नाही. खरंच, आपली माया सर्वांना मोहून टाकणारी आहे.
(४७) नाना नाटक सूत्रधारिया ! आपण एकच असूनही विविध वेष परिधान करून विविध रूपांनी भक्तांना दर्शन देता ! आकाश एकच असून घटाकाश, मठाकाश, गुहाकाश इत्यादी विविध प्रकारांनी प्रत्ययास येते. सुवर्णधातू एकच असून कंकणे, अंगुली वलये, मुक्ताहार अशा विविधालंकारांनी बहुविध दिसते. गंगेचे नीर वस्तुतः एकच असून विविध आकाराच्या पात्रांत ते विविध आकाराचे दिसते ! तसेच हे बहुकृतवेषा नटेश्वरा ! आपणही वस्तुतः एकच असून ह्या त्रिभुवनांत नाना रूपांनी वास करीत आहात.
सुवर्णमेकम् बहुभूषणानि ! भिनाश्च देहाः परमार्थ एक !
(४८) श्री दत्तप्रभू ! आपण तर त्रिकालज्ञ ! आपण सहस्र सूर्यांच्या एकत्रित तेजाप्रमाणे कांतिमान आहात ! सर्वोत्कृष्ट अशा हंस नामक विमानात आपण स्थित आहात ! अमृतवर्षाव करणार्‍या शीतल चंद्रासारखे आहात आणि रजोगुणरहित आज्ञचक्रावर विराजित आहात ! आपल्या सुलक्षणी पदस्पर्शाची जे इच्छा करतात व तिच्या पूर्तिस्तव जे मनःपूर्वक प्रार्थना करतात, त्यांवर आपण कृपा केल्याने ते अंतरिक्षात पक्ष्याप्रमाणे स्वैरसंचारही करू शकतात ! केवढे हे आपले सामर्थ्य !
(४९) ज्ञानविज्ञानकारका ! आपण तर विद्यासावरच आहात ! आपण मूलाधारचक्रावर अधिष्ठित आहा ! आपली सुवर्णाप्रमाणे तेजःपुंज अंगकांती सौंदर्यालाही लाजविणारी आहे ! आपण अग्नीच्या प्रज्वलित ज्वालांनी वेष्टित असूनही महासागराप्रमाणे शांत आहात ! आपण श्रेष्ठ असे सत्यरूपच आहात ! योगीजन, भ्रुकुटीमध्यावर असलेल्या द्विदलयुक्त आज्ञाचक्राच्या सिंहासनावर स्थित अशा आपली मनःपूर्वक सेवा करतात आणि आपणही त्यांजवर प्रसन्न होऊन त्यांस रस ( पार्‍याविषयीच्या सर्व विद्यांत पारंगत ) निष्णात करता.
(५०) सर्वभूतनिवारका ! अहो श्री दत्तप्रभू ! आपण तर रूपज्ञ ! आपल्या मस्तकावर कुरळे कुरळे लांब केस आहेत ! शेकडो सूर्यांच्या एकत्रित तेजाप्रमाणे तेजस्वी सुवर्णकुंडले आपल्या कानांत शोभत आहेत ! आपण अगदी अतुलनीय आहात ! अक्ष हा लंकाधीश रावणाचा पुत्र ! वायुपुत्र हनुमंतांनी त्याचा नाश केला. आणि वायुपुत्र हनुमंत हे तर आपलेच एक स्वरूप ! आपली ह्या स्वरूपाची जे भक्तिभावपूर्वक उपासना करतात, त्यांजवर आपण प्रसन्न होता आणि आपल्या ह्या कृपाप्रसादाने ते भक्त सर्वभूतनिवारक होतात.
(५१) वाग्वरदायका ! आपल्या महिमा वेदांनाही आकलन होत नाही आणि आपण तर योगींद्र ! आहांत तेजस्वी अमृतकुंभ घेऊन दोन चंचल सुवर्णपंखानी सर्व लोकांत भ्रमण करणारा गरुडही आपले रूप आहे. आपली ह्या गरुडस्वरूपाची उपासना करणार्‍या भक्तांवरही आपण कृपा करता ! आणि आपल्या कृपाप्रसादाने भक्तही सभांमध्ये अजिंक्य असे वक्ते तर होतातच पण कपटि आणि सापविंचू वगैरे विषयुक्त जंतू ह्यांचा नाश करण्यातहे निपुण होतात.
(५२) अत्रिपुत्रा ! आपण तर अनसूयात्मज ! आपणास नम्र भावाने शरण आलेल्या भक्तांस आपण कल्पतरूसारखे फळ देता तर आपल्या नामस्मरणाची निंदा करणार्‍या सन्निध उभे राहणार्‍यांची सुद्धा घोर निराशा करता ! आपल्या स्वरूपवैभवाचे दर्शन कोणास होते ? तर निर्मल ज्ञानी जनांस ! अशा निर्मल ज्ञानसंपन्न अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी काहीही दान केलेले नसतानाही आपण मात्र त्यांस सर्वस्वाचे दान केलेत आणि दत्त झालात अनसूयात्मज झालात - अत्रीपुत्र झालात ! केवढे हे औदार्य !
(५३) गुणगंभीरा ! आपले नाम तर सर्व वेदानी स्तुती केलेले ! इच्छित फल देणारे ! तेव्हा त्या नामाचा जप तर गुप्ततेनंच व्हावयास हवा ना ? शिवाय ते ब्रह्मा, विष्णू, माया, सूर्य व काम ह्या बीजांनी व स्वाहाःकाराने युक्त झालेले ! अशा आपल्या नाम वैभवाच्या जपाने आपणांस संतुष्ट करणार्‍या आपल्या भक्तांवर आपण प्रसन्न होता आणि आपल्या कृपेने ते देवेन्द्रांच्या वैभवासारखे वैभव प्राप्त करून ह्या जगातील सर्व सुखांचा आनंद मिळवितात.
(५४) परमोदारा ! आपले नामच आधी इच्छित फल देणारे, त्यात ते परा, माया, वाणी, मदन आणि कमला ह्यांच्या बीजांनी युक्त केले ! मग काय विचारता ? सोन्यात सुगंधाचेच मिश्रण झाले ! अशा आपल्या त्या एका मंत्राचाच निश्चल मनाने सतत जप केला, तेव्हा आपल्या कृपेने मला अतिशय ऐश्वर्य मिळाले आणि कधी न ऐकलेल्या विद्यांतही नैपुण्य प्राप्त झाले ! मनोजय आणि परब्रह्माशी ऐक्यभावही साधता आलाच. मला दिलेला आपल्या कृपेचा लाभ हे परमोदारा ! आपण आपल्या अन्य भक्तांसही तात्काळ द्याल यात संशय नाही.
(५५) उद्धरका ! आपण तर सर्वज्ञच आहात ना ? मग माझ्या विषयीच आपले हे मन निष्ठुर का केले ? का मी पापी आहे म्हणून आपल्या कृपेस पात्र नाही ? कसेही असो, हे करुणाकरा ! आपण मजवर अतुलनीय अशी कृपा करा आणि माझा उद्धार करा !
(५६) सुप्रसन्ना ! आपण तर निराधारांचे आधार ! आश्रितांचे कल्पतरू आणि करुणेचे सागर ! मग माझ्या चित्तवृत्तींना संतुष्ट करण्यास विलंब का ? चतुर भ्रमरी जशा अरविंदासव सेवनास्तव भ्रमण करतात तशा माझ्या चित्तभ्रमरीही आपल्या चरणारविंदांतील कृपासवाच्या सेवनास्तव आतुर आहेत. म्हणून हे दयासागरा ! आपल्या ह्या भक्तावर प्रसन्न व्हा आणि त्याला ऐश्वर्यसंपन्न करा.
(५७) लोकपाला ! आपले जीवन म्हणजेच गती ! ह्या गतीला खरोखर अनेक अर्थ आहेत आणि त्या अर्थांची जाणीवही विद्वानांना आहे. ह्याच गतीचा वास्तविक अर्थ न समजणारे अज्ञानी तिला भटकंती म्हणतात. ह्याला कोण काय करणार ? खरे म्हणजे आपण असे केले नाही तर साधू, भक्त आणि स्वकीय जनांचे अपनच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परित्राण ( रक्षण ) तरी कसे होणार ?
(५८) शक्तिसंक्रामका ! आपली लीला अगाध आहे. आपला प्रिय शिष्य कार्तविर्यार्जुन हा कृतविर्य राजाचा पुत्र ! ह्या आपल्या सत्शिष्यांच्या केवळ स्मरणानेही दुर्जनांपासून रक्षण होते. शत्रू, चोर, सर्पादि विष जंतूंचे भय नाहीसे होते तर आपल्या सांप्रतच्या शिष्यांपासूनही तसेच रक्षण आपण सिद्ध शक्तिसंक्रमक असल्याने, होईल ह्यात काय संशय ?
(५९) भक्तप्रियकरा ! आपणांला भक्तप्रियकर म्हणाव तर आपण आपल्या मित्र साधुसज्जनांची सेवाही स्वीकारत नाही. ते निर्धन आहेत म्हणूनच की काय आपण असे वागता ? की हे वरवरचे नाटक आहे ? ते कसेही असो, मी मात्र आपला भक्त असतानाही जन्म मरणाद्सि फेर्‍यांनी अगदी त्रस्त झालो अहए, दीन, दीन झालो आहे. तरी हे भक्तप्रियकरा ! कृपा करा आणि माझ्या पायांतील ह्या भ्रमरूपी बेड्या तुटतील असे करा ! दया करा, दया करा ! आपल्या शिवाय मजवर दया करणारे कोण आहे ?
(६०) दंड कमंडलू शोभित दत्ता ! त्वमेव माता पिता त्वमेव ! आपणच आमचे मातापिता ! खरे ना ? मग आई ज्या प्रमाणे खट्याळ आणि खोडकर मुलांचेही लालनपालन करून लाड पुरविते, अगदी तसेच, हे अनसूयात्मजा ! आपणही आमचे रक्षण करून आमचे लाड पुरवावेत ! असे करण्यास हे वत्सल प्रभो ! आपणच अगदी योग्य आहात !
(६१) सर्वसत्ताधीशा ! आपणास ह्या त्रिभुवनात काय असाध्य आहे ? आपण मुक्यास वेदवाचस्पती करू शकता तर पंडिताची मती खंडित करू शकता ! महातेजस्वी, दृष्टीस तपविणार्‍या भस्कराला इतका शांत शीत करू शकता की तो दृष्टीगोचर होऊ शकतो ! आपल्या ठिकाणी कर्तुमर्तुमन्यथाकर्तुम शक्ती आहे असे असतांना ह्यापूर्वी मी प्रार्थनापूर्वक जे मागितले आहे ते आपण कृपया द्यावे.
(६२) सुप्रसन्ना ! आपण तर भाग्यदाते ! जे भक्त आपली येता जाता, उठता बसता, असंभाव्य अशा भाग्याचा लाभ होतो. ते लोकादरास पात्र होतात. अशा ह्या सुकीर्तिमान भक्तांचे सर्वांस आश्चर्यचकित करणारे महद्भाग्य अर्थातच इतरेजनांस लाभत नाही.
(६३) सामर्थ्यसंपन्ना ! आपण असे बलवंत की अत्यंत दारिद्र्यावस्थेत असणार्‍या भक्तांस आपल्या कृपाप्रसादाने देवादि सुरागनांना प्रपत होणारे वैभव मिळून ते इंद्रपदासही पावतील ! दुर्भाग्याने जो आपल्या उपेक्षेस पात्र होईल तो सर्वश्रेष्ठ इंद्र जरी असेल तरी त्याचे सर्व ऐश्वर्य नष्ट होऊन तो कःपदार्थ होईल.
(६४) भक्तरूपधारका ! आपलं वागणंही कसं आदर्श आहे बघा ! आपल्या भक्तांनी समंत्र जप करावा तर आपणही मंत्राचाच जप करता ! त्यांनी तंत्रमार्ग स्वीकारला की आपणही तसेच करता ! आपण ब्रह्मानंदामृतातच क्रीडामग्न असता, तरी आता एवढीच प्रार्थना आहे की आपण आमच्यावर दया करून आम्हास ऐश्वर्यसंपन्न करावे.
(६५) नृसिंहरूपा ! तुरीयाग्नी, श्वेतद्युति, दिनकृत आणि अर्क ही तर महाविद्येची चार खंडे ! आणि ही सर्व प्रिय अशा अनुष्टुभ छंदांत रचलेली ! अशा अनुष्टुभ छंदांत रचलेल्या महामंत्राची देवता अर्धांगी लक्ष्मी सन्निध आहे आणि आपण चारही हातांत चन्द्र, कमल, अकुंश व पाश धारण केले आहेत. आपल्या नृसिंहरूपाचे भजन करणार्‍या भक्तावर आपण कृपा करता आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्याचेच ठिकाणी मुख्यत्वेकरून वास करतात.
(६६) राजयोगी विश्वनाथा ! आपल्या हेममुगुटाचे काय वर्णन करावे ! उत्तमोत्तम माणिक त्यास बसविलेले ! आणि ती माणिकं तर कशी ? असंख्यात सूर्याच्या तेजोराशी सामावलेली ! तेजस्वी प्रकाश झोत टाकणारी ! दाट अंधःकाराचा नाश करून पृथ्वीवर प्रकाश विद्यमान करणारा तो हेममुगुट ( अप्रत्यक्ष आपण ) नसता तर हे राजयोगी विश्वनाथा ! ह्या विश्वातील विविधलोक, भूतमात्र आणि मुनिजन त्या अंधःकारात नष्ट झाले असते.
(६७) सुमनोहरा ! आणि हा रत्नखचित हेममुगुट तरी कसा आहे ? त्याला तीन शिखरे आहेत ! हे मुगुटाचे तेज आपल्या सुवर्णकांती देहावर पसरून धन्य झाले आहे. आपले हे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे शरत्सौदामिनीने प्रकाशमान झालेल्या महामेरूचीच ती अवर्णनीय शोभा !
(६८) आदिदेवा ! शिवांच्या मस्तकावरील चंद्रखंड तर जगप्रसिद्धच आहे. अनादिकालापासून त्याची महती ज्ञानी उपदेशकांना सुविज्ञात आहे. ह्या सुविख्यात चंद्रखंडापेक्षाही सुंदर आणि निष्कलंक चंद्रबिंब - रत्नखचित मुकुट आपल्या मस्तकी आहे ! ह्यामुळे हे आदिदेवा ! जोत्स्नेप्रमाणे शांत आणि शीतल अशी आपली तेजोमूर्ती ही निःसीम भक्तांच्या दारिद्र्यांधःकाराचा नाश करते.
(६९) अवधूता ! आपल्या कपाळावरील ॐ म्हणजे अकार, उकार आणि मकार ह्या तीन मात्रायुक्त असे श्वेत चंदन आणि तीन रेषांनी सुंदर दिसणारे त्रिपुंड आपण धारण केले आहे ! मूलाधारचक्रात वास करणार्‍या सहस्रार चक्राकडे गमन करू इच्छिणार्‍या, पराशक्तीच्या चरण कमलांना भुलविणार्‍या, आरक्तवर्ण आळित्याच्या रंगाने रंगलेल्या आणि चंद्रकांत मण्यांनी तयार केलेल्या ह्या तीन पायर्‍याच आहेत.
(७०) विशालाक्षा ! आपण विशालाक्षही आहात ना ? हेमंतऋतूत कमलाच्या गाभ्याचा आश्रय घेणे हितवाह आहे ह्या विचाराने आपल्या ह्या दोन भुंग्यांनी ( म्हणजे आपल्या डोळ्यांतील कृष्णवर्ण बुबुळांनी ) आपल्या नेत्रकमलांचाच आश्रय घेतला आहे. पूर्ण चंद्राच्या पसरलेल्या किरणांनी दूर सारलेला अंधःकार जेथे एकत्र झाला आहे त्या विद्युच्चंचल अशा आपल्या श्वेत नेत्रकमलांना हा मिटवीत आहे हे ही एक नवलच नाही का ?
(७१) कमलावरा ! आणि मधुर गुंजारव बंध करून आपल्या नेत्रकमलांत बंधिस्त होऊन पडलेल्या ह्या भ्रमरांना ( कृष्णवर्ण बुबुळांना ) पाहून ‘ कमले कमला शेते ’ अशा लक्ष्मीने आपली नेत्रकमले उमलविली आहेत. तर आता हे सुप्रसन्ना ! तनमनाने प्रेमपूर्वक सेवा करणार्‍या भक्तांवर आपण कृपाकटाक्षांनी वर्षाव करा ! म्हणजे ते निश्चितपणे धनसंपन्नही होतील !
(७२) आनंदरूपा ! आतून कमलेच्या आणि बाहेरून उदयाचलावर येणार्‍या भास्कराच्या करस्पर्शांनी हळुहळू उमलणार्‍या आअल्या नेत्रकमलांच्या मध्यभागी संचरणारे दोन नीलवर्ण भुंगे आपल्या कानांतील मकराकार सुवर्णकुंडलांच्या जवळ संचार करतात. त्या वेळी ते सोनचाफ्यांच्या फुलांच्या गुच्छातच बंदिवान झाल्यासारखे दिसतात.
(७३) प्रकाशवीरा ! सर्व विश्वालाच प्रकाशित करणारे ! ऋग्वेद, यर्जुवेद, आणि सामवेद ह्या तीन विद्या म्हणजे आपले तीन दिव्य देह ! आणि सूर्यासारखा आपला आत्मा मकराकर सुवर्णकुंडलांत प्रवेश करून त्यांना हलवितो, त्यांना चैतन्यमय करतो, तेव्हा ते आपल्या आत्म्याचे वैभवच प्रगट करतात.
(७४) रूपज्ञा ! आपल्या गोर्‍या गोर्‍या आरशासारख्या स्वच्छ गालांत मकराकार सुवर्णकुंडलांचे प्रतिबिंब पडत राहून ते बिंबाशी सतत संघर्ष करीत असतात. त्यामुळे प्रतिदिन त्यांची शोभा वाढतच असते. तरी पण हे रूपज्ञा ! आपली स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशित कांतिसंक्रमक, सर्वश्रेष्ठ स्वयंसिद्ध अंगकांती खरोखर अनुपम आहे.
(७५) विश्वरक्षका ! राहूच्या भीतीने चंद्राने आपल्या मुखचंद्रात प्रवेश केला ! त्यावेळी आर्थातच त्याच्या षोडश कला द्विगुणित झाल्या ! त्यामुळे त्याचे भय तर नाहींसे झालेच झाले ! इतकेच नव्हे तर तो द्विजराज ख्यातनाम झाला म्हणून तर हे जगत्पोषका ! जे आपल्या आश्रयाला येतात ते निर्भय तर होतातच, पण त्यांना मोठेपणाही प्राप्त होतो हे निश्चित आहे.
(७६) अतुलनिया श्रेष्ठा ! कुणी कुणी म्हणतात की आपला बिंबोष्ठ म्हणजे पोवळ्याची वेलच ! पण हे खरे आहे का ? दोन फळांचे दोन ओठांशी साम्य कल्पिले तर वेलीच्या एका लांबोळ्या पानाशी त्याचे साम्य कल्पावे लागेल ? खरोखरी तर आपण अतुलनिय आहात. तेव्हा अशा तुलना न करणेच बरे नाही का ?
(७७) सकलाश्रया ! अहाहा ! आपण मुधुराधर आणि वाग्देवी सरस्वती मधुरानना ! काय चमत्कार आहे पहा ! आपल्या मधुर अधरद्वयांतून बाहेर पडणारी अमृतवाणी खरोखरी श्रवणानंद देणारीः पण तिने तर वाग्देवता सरस्वतीचा अहंकारच फुलविला ! आपले वास्तविक स्वरूप जाणणारी असून सुद्धा ती आपणांस जिंकण्यास प्रवृत्त झाली ! पण खरोखरी काय घडले ? तीच पराजित झाली आणि सर्पासारख्या चंचल असलेल्या जिव्हाग्राच्या मिषाने आपल्या बिंबाधरांच्या शुभ्र मौक्तिक दंतावलीच्या सुशोभित गृहातच तिने प्रवेश केला !
(७८) अहो भस्मधारिन् ! आपल्या कंठावर ह्या तीन भस्म रेषा कशा शोभून उठत आहेत. मला वाटते त्या शंखाकृती दिसतात ! आणि शंखाकृती तरी आपल्या तीन शिरांस कशी आधारभूत झाली आहे. तसे नसेल तर आपला कंठ हा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांच्या आकृतीरूपच आहे ! आणि तसेहि नसेल तर तो ऋग्वेद, यदुर्वेद आणि सामवेद ह्या तीन वेदांचेच स्वरूप आहे असे मला वाटते.
(७९) सत्संगदायका ! हा सत्संगतीचा महिमाच आहे ! कारण ‘ सत्संगतीने तुटती कुबुद्धी ’ असेच हे दर्शवित नाही काय ? असे पहा, नागांचा स्वामी अनंतही विषधर आणि सर्वश्रेष्ठ वासुकीही विषधर ! हे दोघेही मानवांना भयदायक आणि नाशकारक ! परंतु हेच दोघे आपली प्रतापी बाहू आहेत असे मानणार्‍यांचे ते अभय देणारे प्रेमळ स्नेही तर होतातच, पण इच्छित फलही देतात !
(८०) त्रिगुणसहिता ! आपण अत्यंत तेजस्वी व शुभ्र तीन सूक्तांनीयुक्त असे यज्ञोपवित धारण केले आहे. ते पाहिले की हे देवतात्मा हिमालयांतून निघालेल्या पवित्र गंगेचे तीन प्रवाहच आहेत किंबा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीन मूर्तीच सूत्ररूपाने प्रगट झाल्या आहेत असे वाटते.
(८१) औदुंबरप्रिया ! आपण तर त्रैलोक्यांतील अद्भुत गुणरत्नांचे महासागरच ! स्वर्गात देवांना अनेक लाभ देणारा मेरू पर्वत महान दाता म्हणून देवांत प्रसिद्ध आहे ! अगग्दी तसेच हे औदुंबरप्रिया ! आपले हातही ह्या लोकांत ख्यातनाम आहेत ! आपल्या पदपद्मांची प्रेमपूर्ण आणि पावन सेवा भक्तिभावाने करणार्‍यांना आपण चतुर्विध पुरुषार्थाचे स्वामी करता ! म्हणूनच आपण पूजनीय आहात !
(८२) सदापूर्णा ! आपल्या नाभीवर शोभणारी ही रोमराजी ( केस ) म्हणजे आपल्या नाभिसरोवरांतून निघालेला पाटच ! आपल्या पोटावरील तीन रेषा म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तीन लोकांच्या जणू सीमारेषाच होत !
(८३) महाविष्णू ! आपल्या कमरेभोवती असलेल्या मुंज गवताच्या तीन दोर्‍या म्हणजे भक्तजानांच्या कल्याणाचे संरक्षण करणारे कोटच ! किंवा आपल्या हृदय - शयनागारात प्रवेश करू इच्छिणार्‍या महालक्ष्मीसाठी तयार केलेला सुवर्ण सोपानच !
(८४) पीतांबरधारका ! आपल्या मांड्या म्हणजे उदरातील सर्व भुवनांना आधार देण्यासाठी उभारलेले पर्वताचे दोन कडेच ! आपल्या कंबरेचा विस्तार म्हणजे पर्वत शिखरांवर पसरलेल्या फळ्याच ! आपण विश्वाधार असल्यानेच अशी अंगे धारण केली आहात !
(८५) विश्वंभरा ! ज्ञाते लोक असे सांगतात की जे आपले भक्त नाहीत त्यांचे निवासस्थान म्हणजेच हे आपले दोन सुदृढ जानुयुगुल ! ( गुढगे )
(८६) पुरुषोत्तमा ! जगन्मूल आणि जगत्कर्ता ब्रह्मदेव अति कुशल. त्याने आपल्या पोटर्‍यातरी किती सुंदर निर्माण केल्या ? इतक्या सुंदर की मदनालाही मत्सर वाटावा ! म्हणून तर हे सर्वलक्षणसंपन्न प्रभो ! तो मदन आपल्या पासून दूर गेला !
(८७) सुखमोहना ! आपले शरीर तेजःपुंज व सौंदर्यसंपन्न आहे ! आपल्या पुष्ट चरणांवरील गोल घोटे म्हणजे नाना प्रकारच्या फल देणार्‍या पार्‍याच्या गोळ्य़ाच ! किंवा सौंदर्यवती तन्वंगीच्या पुष्ट स्तनांवरील गोल व सुंदर भोवरेच आहेत !
(८८) सकलाश्रया ! सर्वांचे आधार, अत्यंत पूज्य आणि फार सुंदर असे आपले अजिंक्य चरणाग्र ! कासवांचा राजा अकूपार ह्याची अशी भावना झाली की ते त्याने जिंकले आहेत ! म्हणून त्याने पृथ्वीस आधार देण्यासाठी नतमस्तक होऊन पृथ्वीच्या खाली प्रवेश केला ! परंतु चमत्कार तर पहा ! कूर्माच्या जातीचे शिर ऊंच असावे असे असूनही ते नतमस्तक होऊन फिरतात !
(८९) सर्वज्ञा ! मला अशी शंका येते की मी केलेली दानादी कृत्ये आपणांस कळली नसावीत. म्हणूणच मला असा निस्तेज आणि पापमय जन्म प्राप्त झाल ! वास्तविक तर आपली चरणसेवा सुखसंपत्तीदायक आहे. तेव्हा हे दीनदयाळा ! आपण कृपा करून माझे चित्त आपल्या चरणी तत्पर करून घ्या.
(९०) दुःखहारका ! आपले चरणकमल हे अमृत किरण प्रसवणारे एक आगळेच स्थान आहे, हे जाणून चंद्राने शिवाच्या जटालयावर आश्रय घेतला ! आपली चरणसेवा स्वीकारणार्‍यांची दुःखे नाहीशी होतात हे जाणणारे ब्रह्मलोकांतील श्रेष्ठ पुरुषही आपले भक्त अवश्य होतील.
(९१) सदानंदा ! आपल्या भक्तांना सर्वकाल प्रार्थित फळ आपण देताच; पण अतुलनीय अशी ब्रह्मदेवांची संपत्ती, सुख, संरक्षण, पापनाश, वासनाक्षय, शिवपदप्राप्ती, शंखनिधी, परमनिधीच काय पण कल्पवृक्षादि फळेही प्रत्यक्ष देता, यात काय आश्चर्य ?
(९२) मंत्रमूला ! आपण तर मंत्रज्ञही आहात ! हे प्रभो, आधी श्री विद्येचा मंत्र श्रेष्ठ ! त्याच्या तीन खंडांणी वाढविलेला आपला महामंत्र ! तो दुर्जनांस संहारकच ! आपला महामंत्र हेच आपले तेजोमयरूप ! ते न्रिमल चंद्रसूर्यासारखे तेजस्वी ! ज्ञानानंदरूप आणि प्रकृति पुरुषात्मक ! ह्या आपल्या ज्योतिस्वरूपाचे मंगलमय दर्शन मला सदासर्वकाळ होत राहावे हीच मनोकामना !
(९३) सायुज्यपददायका ! आपण बालार्काप्रमाणे आरक्त कांतिमान् वाग्बीजरूप आणि कामबीजरूपही ! आधारचक्राधिष्ठित आणि हृत्कमलावर शक्तिबीजरूपाने वास करणारे ! मस्तकांतील सहस्रदलात चंद्रासारख्या धव कांतीने विलसणारे ! आपल्या ह्या स्वरूपाचे चिंतन, मनन आणि निदिध्यासाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.
(९४) त्रिकालज्ञा ! आपण चैतन्ययुक्त आहात ! आपल्या कल्याणकारी स्वरूपात ब्रह्मा - विष्णू - महेशही अंतर्भूत आहेत ! आपल्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयकर्त्या रूपाचे मंगलकारी ध्यान करण्याची प्रेरणाही ब्रह्मदेवानेच दिली आहे !
(९५) महद्दिव्या ! हे प्रभो अघटित तुझी ही करणी ! ‘ चांदवा नभावा केला ! रविचंद्र लटकवी त्याला ! जणूं झुंबर सुबक छताला ! ’ हे प्रभो ! आपण तर विश्वाचे अचल मूलाधार शिव ! आपल्या जटाही चंद्र आणि सर्प यांनीं विभुषित अशा आहेत ! हे जाणूनच स्थिरमती मुनींनी सभेत आपल्या मस्तकावर दिग्वासनांचा हिरव्या तंतुंनीयुक्त असा शुभ्र चांदवा उत्तम प्रकाराने बांधला आहे ! आणि वार्‍याने उडविलेल्या आकाशगंगेतील सुवर्णयुक्त जल बिंदूंनी आपणांस उत्तम प्रकाराने अभिषेकच करीत आहेत.
(९६) सहजसाध्वा ! मी तर दुराचारी, चंचल, पराधीन ! परदारा आणि परद्रव्याचा आषक ! बहुजन विरोधी ! काही विचारू नका ! माझे अवगुण लिहिता धरणीही लहान पडेल असा ! पण आपल्या चरण परिसाचा पुनित स्पर्श होताच ह्या कृष्णवर्ण लोहाचे पिवळे धमक बावनकशी सोने झाले आहे. हे काय आश्चर्य आहे ? छे ! छे ! हे तर आपल्या पुनित चरणस्पर्शांस सहज साध्य आहे !
(९७) आश्रयदात्या करुणाकरा ! द्रव्यासाठी दाही दिशा भटकलो. कुलपरंपरागत अयाचक वृत्तीही सोडली. कुटिल नृपालांची उपहासगर्भ सेवाही केली ! पण सुखी झालो नाही ! म्हणून आता हे करुणाकरा ! आपल्या चरणकमलांच्या कल्पवृक्षांच्या छायेत आलो आहे.
(९८) अज्ञाननाशका ! त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव ! त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम गेह देह ! हे प्रभो, आपणच आतां माझे आईवडिल ! आपणच बंधू आणि सगे सोयरे ! आपणच पुत्र आणि मित्र, धन आणि स्वजन ! इतकेच काय आपणच माझे प्राण आहात ! आणि माझा देह हेच आपले निवासस्थान. हे ! असे असताही श्रेष्ठांना जे कळतं ते मलाच कळत नाही ! काय हा दैवदुर्विलास ?
(९९) ॐ कारस्वरूपा ! प्रणाम ! अमृतसागरनिवासिन् देवा ! आपण तेजोमय आहात ! ब्रह्मा, विष्णू, महेश, मुनी आणि इंद्रादि दिक्पालही आपली सेवा करतात ! मनन करणार्‍या मुनींची मनंही आपल्याच चरणी लीन होतात. आपण कोट्यवधी मनूंचे - मंत्रांचे स्वामी आहात ! आपणांस कोटी कोटी प्रणाम !
(१००) प्रणवाकारा ! इंद्रादि देवांनाही आपला महिमा आकलन होत नाही ! दशदिशांना आपली कीर्ती पसरलेली आहे ! इंन्द्रादी दिक्पालही त्यांची शिरोभूषणे आपल्या चरणांवर अर्पण करतात. आपले तेजस्वी दिव्य शरीर म्हणजे भक्तजनांचा कल्पतरूच ! आणि हा कल्पतरू म्हणजे तरी काय ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांच्या तेजोमय आकृतींनी धारण केलेले श्री दत्तात्रेय स्वरूपच ! आपणांस कोटी कोटी प्रणाम !
(१०१) श्रीगुरुदेवदत्ता ! आपण पापांचा नाश करणारे वज्रच आहात ! तर दारिद्र्यांधःकाराचा नाश करणारे श्री सूर्यच आहात ! आपली कृपादृष्टी म्हणजे रोगीजनांस दिव्यौषधीच ! माझ झालेलं कल्याण माझ्या दैवानं नव्हे तर आपल्या कृपेचंच ते फळ आहे ! म्हणून आपल्या पवित्र चरणद्वयांस कोटी कोटी प्रणाम !
(१०२) भक्तवत्सला ! ज्ञानलहरी नावाची ही कृती श्री दत्तस्तुती आहे ! ही केवळ श्री दत्तस्तुती नव्हे तर हा अमृताचा महापूरच आहे ! कारण ह्यात सर्व वेदांचे सार आलेले आहे ! आणि हे सार कसे ? तर असार संसारांतून आनंदानं पसार होण्याचं साधनच ! म्हणून ह्या श्री दत्तलहरींची आवर्तने करणारे भाग्यशाली होतात ! त्यांस आयुरारोग्य, विद्या, सत्ता, धनधान्य व मोक्ष ही आपण दिलेल्या आश्वासनाने प्राप्त होतातच होतात. त्यामुळे ही सकलाल्हादजनिकाच आहे. म्हणून ही श्रेष्ठ काव्यकृती आपल्या वरप्रसादाने अमर असो । अक्षर असो !

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP