अध्याय ८५ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तयोः समानीय वरासनं मुदा निविष्टयोस्तत्र महात्मनोस्तयोः ।
दधार पदाववनिज्य तज्जलं सवृन्द आब्रह्म पुनद्यदम्बु ह ॥३६॥

हर्षेंकरूनि वरासनीं । सुखें उपविष्ट बंधु दोन्ही । तयांचे चरण तिये क्षणीं । प्रक्षाळणीं प्रवर्तला ॥५७॥
मानवी न म्हणोनि वसुदेवतोक । महान् म्हणिजे त्रिजगात्मक । जाणोनि सपर्याविवेक । करी उत्सुक होत्साता ॥५८॥
सम्यक उभयतांचे चरण । निजकरतळें प्रक्षाळून । ज्या चरणांचें अवनेजन । कैसें पावन तें ऐका ॥५९॥
ब्रह्मयापासूनि काडीवरी । अखिल जगातें पावन करी । येव्हढी पवित्रतेची थोरी । लाहे वरी ज्या चरणें ॥२६०॥
परिवारेंसीं पादोदक । मस्तकीं वंदूनि सम्यक । गृहें प्रोक्षूनि एकें एक । दैत्यनायक काय करी ॥६१॥

समर्हयामास स तौ विभूतिभिर्महार्हवस्त्राभरणानुलेपनैः ।
ताम्बूलदीपामृतभक्षणादिभिः स्वगोत्रवित्तात्मसमर्पनेन च ॥३७॥

मग तो बळि बळश्रीपति । पूजिता जाला सप्रेमभक्ति । स्वसदनींच्या श्रेष्ठ संपत्ति । महाविभृति ज्या म्हणिजे ॥६२॥
तिहीं करोनि सर्वोपचार । महामूल्याढ्य अलंकार । अर्पूनि नीळपीतांबर । दिव्यवस्त्रें उत्तरीयें ॥६३॥
दिव्यगंधें अनुलेपनें । टिळे माळा अवतंस सुमनें । परिमळद्रव्यें उधळितां गगनें । निवती मनें दिविजांचीं ॥६४॥
अगुरुदशांगधूप निगुती । प्रदीप्तपोतास एकारती । अमृतनैवेद्य अर्पूनि भक्ती । फल तांबूल निवेदिलें ॥२६५॥
स्व म्हणिजे संपत्तिधन । गोत्र म्हणिजे बंधुसंतान । वित्त म्हणिजे कोशद्रविण । आत्मा तनु मन जीवधृति ॥६६॥
एवं सर्वस्व दक्षिणा । अर्पिली कृष्णा संकर्षणा । मंत्रपुष्पें प्रदक्षिणा । अर्पूनि चरणां अभिवंदी ॥६७॥

स इन्द्रसेनो भगवत्पदाम्बुजं बिभ्रन्मुहुः प्रेमविभिन्नया धिया ।
उवाच हानन्दजलाकुलेक्षणः प्रहृष्टरोमा नृप गद्गदाक्षरम् ॥३८॥

मग तो इन्द्रसेन म्हणिजे बळी । भगवच्चरण हृदयकमळीं । सुस्निग्ध वारंवार आकळी । प्रेमें विह्वळ होत्साता ॥६८॥
अष्टभावें भरला पूर्ण । प्रेमें विह्वळ बुद्धि मन । आनंदजळें स्रवती नयन । वदनीं वचन पांगुळलें ॥६९॥
हृष्ट सर्वांगीं थरकले रोम । जाला तन्मूळीं पुलकोद्गम । झरझरा स्वेदें पाझरे वऽर्म । कांपे तनुसम सीतार्ता ॥२७०॥
पवनसाठें जलाशयकांठा । वारंवार आदळती लाटा । तेंवि स्फुंदनयोगें कंठा । घोष मोठा घुमतसे ॥७१॥
ऐसा अष्टभावीं भरला । तैसाचि स्तवना प्रवर्त्तला । अक्षरोच्चार न वचे केला । तो बोलिला सद्गदाक्षर ॥७२॥
बेंबळवाणीच्या उच्चारें । वदनीं निघती सद्गदाक्षरें । स्फुंदनें येती वारंवारें । स्तवनादरें कलभाषीं ॥७३॥

बलिरुवाच - नमोऽनन्ताय बृहते नमः कृष्णाय वेधसे ।
साङ्ख्ययोगवितानाय ब्रह्मणे परमात्मने ॥३९॥

भो अनंता तुजकारणें । नमन माझें अनन्यपणें । बृहते म्हणिजे विस्तीर्णपणें । ब्रह्मांड धरणें निजमौळीं ॥७४॥
सच्चिदानंदघनश्रीकृष्ण । त्या तुजकारणें माझें नमन । विधात्रादिजगत्सृजन । करिसी म्हणोन वेधा तूं ॥२७५॥
सांख्य योग आणि कर्म । या तिहींचें एकात्मधाम । तो तूं केवळ पुरुषोत्तम । त्या तुज प्रणाम पैं माझा ॥७६॥
सांख्यें निरसूनि तत्त्वें तत्व । बोधिलें सन्मात्र जें वास्तव । तन्मय व्हावया निरसूनि माव । योगउपाव निरूपिला ॥७७॥
योगसांख्याची दशासिद्धी । व्हावया मीमांसा यथाविधी । आचरणें जे अभेदबुद्धी । तो तूं त्रिशुद्धी एकात्मा ॥७८॥
सांख्ययोगवितानें करून । निर्धारिलें ब्रह्म पूर्ण । ब्रह्मने म्हणून त्या तुज नमन । परमात्मया परिपूर्णा ॥७९॥

दर्शनं वां हि भूतानां दुष्प्रापं चाप्यदुर्लभम् । यन्नः प्राप्तौ यदृच्छया ॥४०॥

योगेश्वरास ही दुर्लभ । सर्वथा तुमचा दर्शनलाभ । तो मज जाहला परमसुलभ । हा आश्चर्य कोंभ न मानावा ॥२८०॥
रजस्तमाक्तस्वभावी जन । त्यांसी दुर्लभचि तव दर्शन । तथापि तुझिये कृपेकरून । सुलभ सज्जन मानिती ॥८१॥
जिया कारणास्तव श्रीपती । आम्हांप्रति तुझी दर्शनावाप्ती । यदृच्छेंकरूनियां अवचिती । जाहली निश्चिती प्रत्यक्ष हे ॥८२॥
अहो हेंचि आश्चर्य परम । आम्ही विद्वेष्टे विरोधकाम । केवळ मूर्तिमंत रजस्तम । प्रतीपधर्म पैं ज्यांचा ॥८३॥
ऐसे आम्ही द्वेष्टे पाहीं । वैर चाळितां तुमचे ठायीं । परी सात्विक भक्ताहूनि नवायी । आगळी कांहीं भाग्याची ॥८४॥
सात्विका भक्तां लागूनि ध्यानीं । तुमच्या दर्शनाची शिराणी । ते हे तुम्ही यदृच्छें करूनी । आमुचे भुवनीं संप्राप्त ॥२८५॥
यदृच्छें करूनि दर्शनातें । तुमचिया लाधलों आम्ही निरुते । हेंवि महद्भाग्य ऐसें चित्तें । आश्चर्याते मानितसों ॥८६॥
निसर्गजनितवैरानुबंधी । जातिवैशिष्ट्यें विविधा भेदीं । स्वयें वैरोचनि प्रतिपादी । त्या शुक बोधी कुरुवर्या ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP