अध्याय ८५ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एवं भगवता राजन्वसुदेव उदाहृतः । श्रुत्वा विनष्टनानाधीस्तूष्णीं प्रीतमना अभूत् ॥२६॥

राजन् ऐसें संबोधून । जें प्रायोपशयनीं ही राजमान । मोह ममता न धरी मन । यास्तव भगवान् शुक बोधी ॥१९॥
म्हणे भो राया कुरुस्रग्मेरु । ऐसा भगवंतें विचारु । कथिला ऐकोनि तो सादरु । वसुदेव सत्वर भ्रम सांडी ॥२२०॥
विवर्तजनित जे नाना धी । ते निरसली एवंबोधीं । अनेकत्वाची विनष्ट धी । राहे त्रिशुद्धी मौनस्थ ॥२१॥
अकारमात्रेचें अधिष्ठान । विवर्तजनित जे नाना धी । ते निरसली एवंबोधीं । अनेकत्वाची विनष्ट धी ॥२२॥
पूर्णावबोधें मन तटस्थ । सहजेंचि गोगण ठेला स्तिमित । यास्तव वसुदेव तूष्णींभूत । श्रोतीं संकेत जाणावा ॥२३॥
वसुदेव विसरला देहभान । ब्रह्मावबोधीं विरालें मन । यावरी देवकी तेथ येऊन । प्रार्थी आपण तें ऐका ॥२४॥

अथ तत्र कुरुश्रेष्ठ देवकी सर्वदेवता । श्रुत्वानीतं गुरोः पुत्रमात्मजाभ्यां सुविस्मिता ॥२७॥

कुरुवरश्रेष्ठा अभिमन्युतनया । यावरी देवकी तिया ठायां । आत्मजकृता परमाश्चर्या । ऐकोनि विस्मया पावली जे ॥२२५॥
सर्व देवता जियेच्या थायीं । अंशरूपें वर्तती पाहीं । भगवन्मायेच्या प्रवाहीं । जालीं तेही विमोहित ॥२६॥
रामकृष्णीं पुत्रीं दोघीं । मृत गुरुपुत्र स्वमायायोगीं । आणिला ऐसें ऐकोनि वेगीं । विस्मय आंगीं बहु भरला ॥२७॥
तेथ म्हणिजे स्वपुत्रां निकटीं । येऊनि त्यांतें प्रियतम गोठी । ऐकवी घालूनि श्रवणपुटीं । तदुक्ति मर्‍हाठी अवधारा ॥२८॥

रामकृष्णौ समाश्राव्य पुत्रान्कंसविर्हिसितान् । स्मरन्ती कृपणं प्राह वैकल्यव्यादश्रुलोचना ॥२८॥

रामकृष्णांतें ऐकवणें । करूनि मृतपुत्रां कारणें । आठवूनियां अंतःकरणें । अश्रु लोचनें विसर्जी ॥२९॥
कीर्तिमंतादि षट् पुत्रांतें । कंसहस्तें निमालियांतें । परम वैक्लव्य पावूनि चित्तें । स्मरत होत्साती काय वदे ॥२३०॥

देवक्युवाच - राम रामाप्रमेयात्मन्कृष्ण योगेश्वरेश्वर ।
वेदाहं वां विश्वसृजामीश्वरावादिपूरुषौ ॥२९॥

भो संकर्षणा रामा । अप्रमेय तुझी महिमा । श्रीकृष्ण भो मेघश्यामा । योगेश्वरांच्या ईश्वरा ॥३१॥
मी जाणतें तुह्मांप्रती । विश्वस्रष्टे जे प्रजापती । त्यांचे ईश्वर तुम्ही निश्चिती । प्रधानपुरुष प्रत्यक्ष ॥३२॥
मनुष्यनाट्यें किमर्थ नटलां । म्हणाल तरी या ऐका बोला । भूभाररूपां भूपतींला । वधावयाला अवतरलां ॥३३॥

कालविध्वस्तसत्त्वानां राज्ञामुच्छास्त्रवर्तिनाम् । भूमेर्भारायमाणानामवतीर्णौ किलाद्य मे ॥३०॥

भो भो आद्या श्रीअच्युता । भूभाररूपां नृपां उत्पथां । विध्वस्तसत्वां कालग्रस्तां । नाशावयार्थ अवतरालां ॥३४॥
मे म्हणिजे माझ्या ठायीं । तुम्हीं अवतार धरूनिं पाहीं । भाररहित केली मही । चरित्र तेंही देखियलें ॥२३५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP