अध्याय ८५ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्राणादीनां विश्वसृजां शक्तयो याः परस्य ताः । पारतन्त्र्यार्द्वसादृश्याद्द्वयोश्चेष्टैव चेष्टताम् ॥६॥

सूत्रात्मा जो कां प्राण । तो मुख्यत्वें आदिकरून । विश्वसृजनाचीं कारणें पूर्ण । भिन्न भिन्न अवगमती ॥४५॥
परंतु त्यांचिया समस्त शक्ती । त्या परमेश्वराच्याच निश्चिती । यालागीं परम कारणें ऐसें श्रुती । प्रतिपादिती ईशातें ॥४६॥
यदर्थीं प्रमाण काय म्हणसी । तरी स्वतंत्रता नाहीं तयासी । शरसामर्थ्य वेधकासी । परेशासि तेंवि हें पैं ॥४७॥
समुद्रतटीं जेंवि विहिरा । पृथक भासला जरी खरा । तरी तो समुद्राचाचि झरा । ऐसें चतुरा उमजे कीं ॥४८॥
भगवंतासी स्वातंत्र्य जेंवि । प्राणादिवर्गांसही तेंवि । नसावें कां ऐसी गोवी । वाटे जीवीं तरी ऐका ॥४९॥
प्राणादिकां आणि भगवंता । अवश्य असो स्वतंत्रता । परि उभयामाजि विसदृशता । ते तत्वता अवधारा ॥५०॥
परेश पूर्ण स्वसंवेद्य । प्राणादिवर्ग परसंवेद्य । या लागीं असदृश्य अनुवाद । उमजे विशद तें ऐका ॥५१॥
इंद्रियाणि पराण्याहुः । मन त्याहूनि परतर बहु । बुद्धि मनाहूनि स्वयमेव । परेश वास्तव बुद्धिपर ॥५२॥
सूत्रात्मत्वें स्वातंत्र्य प्राणा । परंतु परेशेंशीं सदृश न म्हणा । जेंवि शकटा अचेतना । यंत्या चेतना विसदृशता ॥५३॥
शकटोपस्थ चक्रें अक्ष । रज्वादिनिचय जड प्रत्यक्ष । सूत्रन्यायें सचेत उक्ष । परि ते विसदृश यंत्यासीं ॥५४॥
यंता नियमी जिये पक्षीं । तदनुनियमें चालिजे उक्षीं । अचेतवर्गीं चक्रादि अक्षीं । तदनुशिक्षीं अनुचर्या ॥५५॥
तेंवि सूत्ररूपें प्राणां । अंगीं स्वतंत्र जर्‍ही चेतना । तथापि प्रेरका ईश्वरा पूर्णा । वांचूनि चलना असमर्थ ॥५६॥
म्हणाल यंता नसतां धुरे । सउक्ष शकट सैराट फिरे । तेंवि प्राणांच्या स्वातंत्र्यें । क्रिया न स्फुरे अनीशत्वें ॥५७॥
वातवेगें शुष्क पर्ण । नभीं विचरे अचेतन । तथापि स्वतंत्र जेंवि सुपर्ण । जें उभया जाण विसदृशत्व ॥५८॥
तेंवि प्रेरणा ईश्वराची । सूत्रता गति मात्र प्राणांची । विसदृशता उभयां साची । ऐक्यें उभयाची गति दिसतां ॥५९॥
अथवा एकलें एक गगन । जें ब्रह्माचें उदाहरण । खं ब्रह्म खं पुराण । श्रुतिप्रमाण उपपत्ति ॥६०॥
तैसा नव्हे प्राणादिवर्ग । वैसादृश्यें वर्तनमार्ग । दोघदोषांचा प्रसंग । ऐक साङ्ग निरूपितों ॥६१॥
व्यान व्यापक सर्वशरीरीं । साक्षी उदास गगनापरी । निर्विकारी निर्व्यापारी । असे निर्धारी परिपूर्ण ॥६२॥
समान वर्ते नाभिदेशीं । ग्रंथि ऐसें म्हणती ज्यासी । बैसादृश्य या उभयासी । चळाचळत्वें कळलें कीं ॥६३॥
उदान देदीप्य राहे कंठीं । अन्नपानादिकां जो घोटी । तैजसयोगें स्वप्नसृष्टी । विविधा प्रकटी काल्पनिका ॥६४॥
विलक्षण पूर्व उभयाहून । तिसरा हृदयीं वसे प्राण । नासावदनें ऊर्ध्वगमन । स्थूला चेष्टन ज्याचेनी ॥६५॥
तोही विलक्षण उदानेंसीं । तेंवि अपान पायुनिवासी । अधोमार्गें करी क्षरणासी । एवं सर्वांसि विसदृशता ॥६६॥
एवं चेता अचेता विखीं । कीं परस्परें प्राणादिकीं । विसदृशता तुज ठाउकी । जाहली कीं ना या उपरी ॥६७॥
हा इतिहास पूर्वींच कथिला । जें प्राणादि अशेष कारणांला । प्रभूनें निर्मूनि योजिता जाहला । ब्रह्मांडसृजनीं स्वातंत्र्यें ॥६८॥
तंव त्यां अंगीं स्वतंत्रशक्ती । नाहीं आयतन सृजनाप्रती । स्रजूं न शकवे हें जाणोनि पुढती । प्रभु त्या द्योती स्वसत्ता ॥६९॥
स्वसत्ता प्रभुशक्तिद्योतन । कोणा आंगीं शक्ति कोण । करिता जाला तें व्याख्यान । श्लोकमंचकें अवधारा ॥७०॥

कान्तिस्तेजः प्रभा सत्ता चन्द्राग्न्यर्कर्क्षविद्युताम् । यत्स्थैर्यं भूभृतां भूमेर्वृत्तिर्गन्धोऽर्थतो भवान् ॥७॥

कांतिरूपा प्रभूची शक्ती । चंद्राआंगीं विलसे पुरती । तेजोमयी अग्नीप्रती । प्रभा गभस्ती माजि असे ॥७१॥
अमळ सत्ता तारांगणीं । स्फुरणरूपा सौदामनी । प्रभूची धारण्यशक्ति धरणी । माजी आधेयां आधार ॥७२॥
पुण्योगंधः पृथिव्यांच । भूतां धरी गामाविश्य च । जीवनावर्तनाचा नडनाच । हा शक्तिसंच प्रभूचा ॥७३॥
वास्तव सत्ता तुझी हे अवघी । अहाच भासे भूतां आंगीं । तेचि निरूपितों प्रसंगीं । अशेषलिंगीं अवधारीं ॥७४॥

तर्पणं प्राणनमपां देव त्वं ताश्च तद्रसः । ओजः सहो बलं चेष्टा गतिर्वायोस्तवेश्वर ॥८॥

अगा हे देवा द्योतनशीळा । तुझिया सत्ता श्रीगोपाळा । तर्पणतृप्तिजनकत्व जळा । जीवनकळा प्राणन जें ॥७५॥
तिथि वार भ योग करण । विष्णुमयचि अखिलजन । तोचि द्रवरूपें आपण । आपोनारायण प्रत्यक्ष ॥७‍६॥
तया आपांच्या ठायीं रस । तो तूं परमात्मा श्रीपरेश । रसोऽहमप्सु या वचनास । तूंचि वदलास स्मृतिरूप ॥७७॥
आणि वायूची पंचधा गती । त्या पृथक्त्वें पांच ही शक्ती । प्राणांआंगीं ज्या प्रकट दिसती । तिया निश्चिती तव सत्ता ॥७८॥
जठराग्नीचें उद्बोधन । चतुर्विध अन्नमात्रांचें पचन । आप्यायक जे तनुगोगण । तुझी ते जाण प्राणशक्ति ॥७९॥
अंतःकरणपंचकातें । सहजानंद जिचेन वर्ते । ते सहोशक्ति व्यानवायूतें । तुझिये निरुतें श्रुतिगदित ॥८०॥
ज्ञानकरणां विषयप्रवृत्ती । ते उदानीं वर्ते तेजसशक्ती । ओज ऐसें तयेतें म्हणती । तुझीच निश्चिती ते अवघी ॥८१॥
कर्मेंद्रियांची चळवळ । जेणें सावयव टवटवी स्थूळ । तये शक्ती नाम बळ । ते समानीं चळवळ तव सत्ता ॥८२॥
प्राणें पचविलें अन्नोदक । नवद्वारें त्या क्षरणात्मक । शक्ति वर्ते जे गतिनामक । तुझीच सम्यक ते अवघी ॥८३॥
भो ईश्वरा याही वरी । इये ब्रह्मान्डभाण्डोदरीं । तुझ्या शक्ति सविस्तरी । कोणे परी त्या ऐक ॥८४॥

दिशां त्वमवकाशोऽसि दिशः खं स्फोट आश्रयः । नादो वर्णस्त्वमोङ्कार आकृतीनां पृथवकृतिः ॥९॥

महदाकाश स्वयंभ एक । उपाधिवशें दिशांचा दशक । प्राक्प्रत्यगादिनामें पृथक । तो अवकाश मुख्य तूंचि स्वयें ॥८५॥
स्थाणु अथवा महामेरु । उपाधिरूप दृग्गोचरु । प्राक्प्रत्यद्गक्षिणोत्तरु । तो दिग्विस्तार तूंचि पैं ॥८६॥
सर्वव्यापक जें आकाश । तदाश्रय तूं हृषीकेश । शब्दतन्मात्र स्फोटविशेष । परा अवस्था जे वाणी ॥८७॥
तेचि पश्यंती नादरूपें । घुमघुमी अनाहतस्वरूपें । अउमकार अस्पष्ट जल्पें । मध्यमा उपांशु ॐकार ॥८८॥
पुधें प्रणवाची प्रसृती । स्पर्श उष्माण उपध्माती । नामभेदें पृथक्कृती । पदार्थमात्रचि व्यवहारीं ॥८९॥
घटपटशकटां भिन्ननामीं । तालुओष्ठपुटोद्यमीं । व्यवहारपटुता सर्वकर्मीं । वैखरीवाणी ते म्हणिजे ॥९०॥

इन्द्रियं त्विन्द्रियाणां त्वं देवाश्च तदनुग्रहः । अवबोधो भवान्बुद्धेर्जीवस्यानुस्मृतिः सती ॥१०॥

तन्मात्रांचीं पृथग्ज्ञानें । इंद्रियद्वारा भासती भिन्नें । ती ज्या प्रकाशती चैतन्यें । ते चिच्छक्ति म्हणणें तुजलागीं ॥९१॥
इंद्रियाधिष्ठात्री देवता । विष्णु चंद्रमा आणि विधाता । नारायणादि गौरीभर्ता । तो तूं तत्वता देवगण ॥९२॥
श्रवणवागादिकांचे ठायीं । ज्ञानकर्मकरणीं पाहीं । दिगग्निप्रमुखदेवतानिचयीं । तुजवीण नाहीं द्योतकता ॥९३॥
त्या देवांच्या ठायीं तुझा । अनुग्रह हाची गरुडध्वजा । सर्व शक्तीच्या समाजा । उद्बोधक तूं स्वसत्ता ॥९४॥
तेज यदादित्यगत । चंद्रामाजि ज्योत्स्नामृत । पचनपटुतर अग्नीआंत । शक्तिसामर्थ्य सर्व तुझें ॥९५॥
अनुग्रहरूपें इत्यादि शक्ती । भूतां भौतिकां वर्तविती । देवानुग्रह त्या म्हणिजती । परि तूं निश्चिती त्या अवघ्या ॥९६॥
श्रोतीं जाणिजे विशेष जल्प । किमर्थ अल्प जाणीतल्या ॥९७॥
चेष्टा ज्ञानकर्मकरणें । बाह्येंद्रियें त्यांतें म्हणणें । भांबावती विषयस्फुरणें । अंतःकरणें आंतुलिया ॥९८॥
जें कां बुद्धीचें बोद्धव्य । तो अवबोध तूं वासुदेव । तव प्रकाशें निश्चय सर्व । करी स्वयमेव जे शक्ति ॥९९॥
जे कां जीवाची अनुस्मृति । बुद्धिनिश्चया प्रतिपादिती । अनुसंधानीं चित्तवृत्ति । ते तूं निश्चिती जगदीशा ॥१००॥
अंतःकरणें कां यां नांव । येथूनि प्रवृत्ति प्रकाशे सर्व । उपरमयोगें निवृत्ति जीव । पावती स्वयमेव हृषीकेशा ॥१॥
देहतादात्म्यें अहंता बाणे । प्रवृत्तीचें तैं बैसे ठाणें । जीव अवलंबी बाह्यकरणें । विषयस्फुरणें भ्रमग्रस्त ॥२॥
तोचि पावे जैं उपरति । तैं नाहं देह ऐशिया मति । ब्रह्माहमस्मि हे सत्स्मृति । लाहे निवृत्ति या करणीं ॥३॥
अंतःकरणें बाह्यकरणें । जियें प्रकाशलीं ज्या ज्या गुणें । तियें कथितों तुजकारणें । क्षणैक श्रवणें अवधारीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP