अध्याय ८४ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चित्तस्योपशमोऽयं वै कविभिः शास्त्रचक्षुषा । दर्शितः सुगमो योगो धर्मश्चात्ममुदाबहुः ॥३६॥

शास्त्रलोचनीं विलोकून । प्राचीन कवि जे शास्त्रप्रवीण । हाचि सुगम योग म्हणून । निर्धारून दाखविला ॥५१॥
जो हा चित्ताचा उपशम । त्याचा हेतु योगोत्तम । मोक्षोपाय जो कां सुगम । परम धर्म स्वसुखावह ॥५२॥
हळूहळूच चित्तमळ । क्षाळतां होय नितान्त अमळ । तैं तें आत्मपुष्ठीचें दे फळ । स्वानंद बहळ ज्यामाजी ॥५३॥
उपशमाचा हेतु काय । योग म्हणिजे मोक्षोपाय । कर्में कर्मविमोचन होय । लागे सुखसोय हळूहळू ॥५४॥
सुगम म्हणिजे कोण परी । प्रवृत्तीच्या आश्रयावरी । करितां अवघड न वटे भारी । निजाचारीं स्वधर्मही ॥२५५॥
जो करणीय आवश्यक । यास्तव स्वधर्म हाचि मुख्य । अकरणीं प्रत्यवायजनक । करितां दोष उरों नेदी ॥५६॥

अयं स्वस्त्ययनः पन्था द्विजातेर्गृहमेधिनः । यच्छ्रद्धयाप्तवित्तेन शुक्लेनेज्येत पूरुषः ॥३७॥

भो वसुदेव वृष्णिपते । मानिसी उपनिषच्छ्रुतीच्या मतें । जें त्यागावांचूनि असमर्थें । मोक्षदानीं प्रजादिकें ॥५७॥
कर्में आणि प्रजोत्पादनें । यज्ञसिद्ध्यर्थ विविधें धनें । इहीं ऋणत्रयविमोचनें । वृथा वचनें हीं अवघीं ॥५८॥
एक्या त्यागेंचि करूनि मोक्ष । ऐशा वेदान्तीं श्रुति प्रत्यक्ष । बोलिल्या असतां तुम्ही हा पक्ष । कां पां विशेष दृढावितां ॥५९॥
तरी ऐकें गा वृष्णिपाळा । विवेकविराग उदया आला । नसतां विषयाचा सोहळा । विहिता वेगळा नाचरिजे ॥२६०॥
विषयलिप्सा वर्ते देहीं । तंववरी बद्धता ऋणत्रयीं । विहिताचरणें सुटिका पाहीं । धनसंतानें सत्कर्में ॥६१॥
कर्माचरणें चित्तशुद्धि । न होतां वैराग्य न लाभे बुद्धि । तंववरी त्यागाची उपलब्धि । न घडे त्रिशुद्धी बद्धातें ॥६२॥
विषयलिप्सा जंववरी न तुटे । तंववरी कर्मादि करणें घटे । गृहस्था द्विजा येचि वाटे । कैवल्य भेटे अनायासें ॥६३॥
गृहमेधिया द्विजा प्रति । येणेंचि मार्गें कल्याणप्राप्ति । स्वस्तिक्षेम हा पथ निश्चिती । येणेंचि निष्कृति कर्माची ॥६४॥
तो जरी कैसा म्हणसी पंथ । जो कां निष्कामश्रद्धावंत । निर्दोषद्रव्यें पैं यजिजेत । आदिपुरुष यज्ञभोक्ता ॥२६५॥
हृदयीं निष्काम श्रद्धा पूर्ण । यथाशक्ति निर्दोष धन । स्वधर्मार्जित संपादून । यजिजे भगवान आदिपुरुष ॥६६॥
गृहस्थाश्रमीं या विहिताचरणें । विमुक्त करिताती तीन्ही ऋणें । ईषणाभंगें त्यागार्ह होणें । त्यागें पावणें अमृतत्व ॥६७॥
कोण्या योगें ईषणात्याग । तोही वसुदेवा ऐकें चांग । ऋणत्रयाचा प्रसंग । तोही अव्यंग मग ऐक ॥६८॥

वित्तैषणां यज्ञदानैर्गृहैर्दारसुतैषणाम् । आत्मलोकैषणां देव कालेन विसृजेद्बुधः ।
ग्रामे त्यक्तैषणाः सर्वे ययुर्धीरास्तपोवनम् ॥३८॥

इच्छा वित्तसंपादनीं वाढे । ते वित्तैषणा म्हणणें घडे । मनौनि तीचें बिराड मोडे । तेंचि निवाडें ऐकें पां ॥६९॥
पूर्वपक्षीं विहिताचरणें । केवळ चित्तशुद्धीतें करणें । चित्तशुद्धि जाल्या वरणें । विरक्तिवनिता तन्वंगी ॥२७०॥
विरक्ति उदेजलिया हृदयीं । चिरळसी मानी ईषणात्रयीं । मग प्रवर्ते साधनोपायीं । बुद्धि निश्चयीं योजूनी ॥७१॥
कोण्या साधनें काय साध्य । तेंही ऐका कथितों विशद । स्वस्त्ययनाचा पंथा सिद्ध । ईषणात्यागें साधावा ॥७२॥
स्वस्त्ययनही म्हणाल काय । तरी जें अविनाश  अमृतालय । तत्प्राप्तीचा साधनोपाय । ईषणात्याग मुख्य तेथें ॥७३॥
गृहस्थाश्रमाच्या आचरणा । अवश्य सापेक्ष वित्तैषणा । तेथ विरक्ति उपजतां मना । वित्तैषणा खंडावी ॥७४॥
पूर्वीं संपादिलें जें वित्त । त्याचा क्षेम वाञ्छी चित्त । पुढें संपादनाचा स्वार्थ । योग म्हणिजे तयालागीं ॥२७५॥
योगक्षेमरूपें जाणा । विविध जाणिजे वित्तैषणा । तिच्या करावें खंडना । यज्ञदानाचेनी क्रमें ॥७६॥
पंचमहायज्ञादि देख । क्रमेंचि अग्निष्टोमप्रमुख । अप्तौर्यान्तक्रतु सम्यक । कीजे निःशेष वित्तक्षयें ॥७७॥
राजसूयादि हयनामेध । नृपार्ह ऐसे मख प्रसिद्ध । एवं निष्कामयज्ञकंद । वित्तैषणेचा खंडावा ॥७८॥
कीं गोभूतिलप्रमुखदानीं । निःशेषवित्तव्यय करूनी । योगक्षेम विसर्जूनी । वित्तैपणा त्यागावी ॥७९॥
तैसीच दारपुत्रैषणा । करितां गृहोचित्तभोगाचरणा । विहितप्रवृत्तिसंपादना । संपादूनि मग त्यागावी ॥२८०॥
तारुण्याच्या विलासभरें । वनिताकामीं मन मोहरे । तेथ वर्तोनि विहिताधारें । रतिसुखभोगा लंघावें ॥८१॥
ऋतुप्रसंगीं स्त्रीसेवन । तेणें होय प्रजोत्पादन । एवं रतिपुत्रफळार्थ जाण । पाणिग्रहण गृहिणीचें ॥८२॥
विहिताचरणें रतिप्रसंगें । कंदर्पक्रीडानुभव आंगें । तैसेंचि प्रजोत्पादनयोगें । रमणीरंगें रंगावें ॥८३॥
रतिसंततिफळा गृहिणी । तत्संस्कारविहिताचरणीं । दारपुत्रैषणेपासूनी । मुक्त होइजे शनैःशनैः ॥८४॥
जातकर्मादि संस्कार । व्रतबंधविवाहप्रमुख थोर । संपादूनि सविस्तर । त्यजिजे दारसुतैषणा ॥२८५॥
देहात्मनिष्ठ वित्तैषणा । तैसीच दारसुतैषणा । देहात्मता निरसतां जाणा । नलगे निरसन त्या पृथक ॥८६॥
देहात्मता शिथिल जाली । जीवात्मता तैं रूढली । लोकेषणा उदया आली । तेही निरसिली पाहिजे ॥८७॥
बाणतां जीवात्मप्रतीती । तैं कर्मफळाचा होय स्वार्थी । लोकलोकान्तरावाप्ती । कर्मानुसार साच गमे ॥८८॥
कर्म जें इष्टानिष्टमिश्र । सुरनरतिर्यक्तदनुसार । यास्तव इष्टकर्मीं सादर । लोकैषणापर होत्साता ॥८९॥
उत्तमलोकावाप्तीच्छा । लोकैषणा हा संकेत तीचा । तयेसाठीं सुकृताचा । संग्रह करी बहुसाल ॥२९०॥
शुद्धसुकृतसंग्रहबळें । लोकान्तरीं सुखसोहळे । भोगेच्छा जे मनीं खवळे । लोकैषणा तिये नाम ॥९१॥
शुद्धसुकृताचरण शुद्धि । नित्यानित्यविवेकबुद्धिं । नितान्त निर्मळ होय त्रिशुद्धी । सत्संवादीं मग विलसे ॥९२॥
सत्संवादीं रमतां मन । तैं भोगेच्छा मानी वमन । इहामुत्रार्थविरागपूर्ण । ईषणाशून्य सहजेंची ॥९३॥
अल्पायुषी नरतिर्यक । दीर्घायुषी निर्जरलोक । म्हणोनि तत्प्राप्ति सम्यक । इच्छी साधक होत्साता ॥९४॥
तंव त्या सत्संगाच्या बळें । उभय भोगीं मन कांटाळे । कृतान्त ग्रासी यथाकाळें । सुर नर तिर्यक विधि हरही ॥२९५॥
सर्व नश्वर कळल्यावरी । लोकैषणेची मग बोहरी । करूनि सद्बुद्धिंवंतीं नरीं । रिधती कान्तारीं तपोवनी ॥९६॥
उभयभोगार्थ उभयाश्रमीं । निवास करूनि वसतां ग्रामीं । तेथ विवेकोदयाची ऊर्मी । सत्संगीं आविर्भवे ॥९७॥
विवेकोदयीं ग्रमय भोग । ग्रामीं वसती भोगूनि साङ्ग । सर्वैषणात्याग । जाती सवेग तपोवना ॥९८॥
धीर म्हणिजे सुबुद्धिवंत । धैर्यें होऊनियां वनस्थ । नित्यानित्यविचारवंत । शमदम संतत साधिती ॥९९॥
एवं साधनषट्कसंपन्न । प्रमाता अधिकारी तो पूर्ण । त्रिधा आनृण्य संपादून । लाहे स्वस्त्ययनमार्गातें ॥३००॥
कैसें ऋण कवणा माथां । हेंही पुससी जरी तत्वता । ऐक तयाचीही व्यवस्था । साधन चित्ता करूनियां ॥१॥

ऋणैस्त्रिभिर्द्विजो जातो देवर्षि पितृणां प्रभो । यज्ञाध्ययनपुत्रैस्तान्यनिस्तीर्य त्यजन्पतेत् ॥३९॥

जेव्हां द्विजकुळीं जन्मला । तैं तो ऋणत्रयें बांधला । त्या न निस्तरतां त्याग केला । तरी वरपडला अधोगती ॥२॥
व्रती होऊनि वेदाध्ययन । करूनि निरसिजे ऋषींचें ऋण । गृहस्थाश्रमीं करूनि यज्ञ । निर्जरऋण निरसावें ॥३॥
यथोचितकाळीं रति । संपादूनि प्रजोत्पत्ति । पितृऋणाची निष्कृति । तदुत्तर यति त्यागार्ह ॥४॥
न करितां हे ऋणनिष्कृति । कैवल्यार्थ जाहलिया यति । तैं तो पावे अधोगति । ऋणनिर्मुक्ति न करूनियां ॥३०५॥
ऐसा अनादि आम्नायमार्ग । वसुदेवा तुज कथिला साङ्ग । यावरी तुझा अधिकार चांग । तो ही अव्यंग अवधारीं ॥६॥

त्वं त्वद्य मुक्तो द्वाभ्यां वै ऋषिपित्रोर्महामते । यज्ञैर्देवर्णमुन्मुच्य निरृणोऽशरणो भव ॥४०॥

वसुदेवा तूं आजिपर्यंत । दोन्ही ऋणांपासूनि मुक्त । वेदाध्ययनें आर्षातीत । पैत्रनिर्मुक्त संतानें ॥७॥
व्रतबंधादि वेदाध्यन । यथोक्त घडलें तुजलागून । दारपरिग्रह प्रजोत्पादन । क्रमें करून पैं जालें ॥८॥
आतां करूनि अध्वरनिचय । देवऋणापासूनि मुक्त होय । एवं निरसिल्या ऋणत्रय । योग्यता लाहें त्यागाची ॥९॥
ऋणत्रयापासूनि सुटिका । कर्में कर्म निरास निका । ऐसें क्षाळूनि कर्मपंका । यतिवरवेषा अवलंबीं ॥३१०॥
वसुदेवातें मुनिसत्तम । म्हणती तुज हा कथिला क्रम । अविशुद्धचित्तांप्रति हा नेम । तूं निःसीम कृतार्थ ॥११॥
कैसा कृतार्थ म्हणसी जरी । ते ही गोष्टी तूं अवधारीं । वसुदेवा तूं बहुतापरी । पूर्णाधिकारी प्रेमळ पैं ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP