ततः पुरीं यदुपतिरत्यलङ्कृतां रविच्छदध्वजपटचित्रतोरणाम् ।
कुशस्थलीं दिवि भुवि चाभिसंस्तुतां समाविशत्तरणिरिव स्वकेतनम् ॥३६॥

परिपंथी जे दुष्ट भूपति । समरीं भंगूनियां यदुपति । त्यानंतरें स्वपुरीप्रति । प्रवेश करिता जाहला ॥८६॥
यंत्र भेदूनि मातें हरि । प्रतापें जिंकूनि करी नोवरी । भूपति लज्जा वरूनि समरीं । अर्कतूळापरी विघुळले ॥८७॥
तरुणदुर्दशेनें माळा । घालूनि वरिलें भूमिपाळां । मजसह विजयश्री गोपाळा । वरूनि आंगीं विराजली ॥८८॥
नप भंगल्यानंतर हरि । कुशस्थळी जे द्वारकापुरी । शृंगारमंडित अतिसाजिरी । प्रवेश करी तयेमाजी ॥८९॥
सालंकृता म्हणाल कैसी । प्रासादशिखरें मंडित कळशीं । पताका झळकती पवनस्पर्शीं । ते पट रवीसी आच्छादिती ॥२९०॥
गगनचुंबित ध्वजांचे स्तंभ । निबिद पताका चित्रप्रभ । ध्वजाग्रभागीं कनककुंभ । रत्नखचित लखलखिती ॥९१॥
पुरद्वारें गोपुरें तुंगें । विचित्रतोरणें राजितशृंगें । प्रतापें पाळिली जे श्रीरंगें । स्तविजे त्रिजगें जियेप्रति ॥९२॥
स्वप्रभेसीं जैसा तरणी । विराजमान सर्वाभरणीं । प्रतीची ठाकी वेष्टितकिरणीं । चक्रपाणी तेंवि नगरी ॥९३॥
मंगळवाद्यांचे बोभाट । बिरुदावळी पढती भाट । नृत्य करिती नर्तकीनट । भंवते यथेष्ट जन पाहती ॥९४॥
पुरद्वारप्रवेशकाळीं । वोवाळूनि टाकिल्या बळी । द्विजां वांटिल्या कनकांजळी । याचक सकळी गौरविले ॥२९५॥
वंदूनि उग्रसेन नृपति । स्वगृह प्रवेशे श्रीपति । विध्युक्त विवाह करूनि निगुती । सहृदीं आप्तीं विराजला ॥९६॥
माझिया जनकें आत्मसदनीं । पूजावा जंव चक्रपाणी । तंव भूभुज अवघे अविचारखाणी । समरांगणीं मिसळले ॥९७॥
तयां नृपांची करूनि शांति । विजयलक्ष्मी वरूनि श्रीपति । प्रवेशला द्वारकेप्रति । हें ऐकूनि निगुती मम जनकें ॥९८॥
विवाहांगसंपति सकळा । सहित सुहृद स्वजनमेळा । घेऊनि द्वारकापुर पातला । साङ्ग सारिला विधि तेथें ॥९९॥

पिता मे पूजयामास सुहृत्सम्बन्धिबान्धवान् । महार्हवासोलङ्कारैः शय्यासनपरिच्छदैः ॥३७॥

उभयपक्षींचे सुहृद आले । गोत्रज मित्र सोयरे भले । माझिया जनकें ते पूजिले । संतोषविले सत्कारें ॥३००॥
मौलागळीं वसनाभरणें । अर्पिली समस्तांकारनें । शय्या आसनें सर्वोपकरणें । शिबिरें वितानें समर्पिलीं ॥१॥
वृष्णि भोज अन्धक कुकुर । सात्वत दाशार्ह यदुकुळ साग्र । पूजिले मम जनकें समग्र । दिव्योपचार समर्पूनियां ॥२॥
याज्ञसेनि कल्याणराशि । यानंतरें जामातासी । आंदण दिधलें परियेसीं । संक्षेपेंसीं तुज कथितें ॥३॥

दासीभिः सर्वसम्पद्भिर्भटेभरथवाजिभिः । आयुधानि महार्हाणि ददौ पूर्णस्य भक्तितः ॥३८॥

पृथक् एकैक सांगूं किती । ज्या ज्या अघघ्या नृपसंपत्ती । तितुक्या अर्पिल्या सप्रेमभक्ती । श्रीभगवंतीं मम जनकें ॥४॥
जपळा कुशळा चातुर्यखाणी । सालंकृता सुभगा तरुणी । जयांच्या आंगींच्या लावण्यगुणीं । निर्जररमणी न तुकती ॥३०५॥
ऐसिया दासी शतानुशत । सुभट पदाति हय गज रथ । अमूल्य आयुधें इहींसीं सहित । आणि पदार्थ बहुसाल ॥६॥
भगवान सर्व विषयीं परिपूर्ण । तयासी मम जनकें प्रार्थून । भक्तिपूर्वक हें आंदण । देता जाला आल्हादें ॥७॥
पूर्णकाम तो इच्छारहित । परंतु पुरवी स्वभक्तार्थ । बृहत्सेन जाणोनि विनीत । आंदण समस्त स्वीकेलें ॥८॥
ऐसा वरिला चक्रपाणी । तथापि ऐकें याज्ञसेनी । उत्कट हेत आमुचे मनीं । तुजलागुनी तो कथितें ॥९॥

आत्मारामस्य तस्येमा वयं वै गृहदासिकाः । सर्वसङ्गनिवृत्त्याऽद्धा तपसां च बभूविम ॥३९॥

आत्माराम जो भगवंत । पूर्णकाम कामनारहित । त्याचे सदनीं होऊं समस्त । अष्टमहिषी दासिका ॥३१०॥
जरी तूं म्हणसी द्रौपदिये । ऐसें तुमचें सुकृत काय । जें दासिका होऊनि श्रीकृष्णनिलय । अनुचरप्राय सेवाल ॥११॥
तरी ऐकें पांडववनिते । विसर्जूनि सर्व संगातें । निष्कामतपश्चर्यासुकृतें । होऊं दास्यातें अधिकारी ॥१२॥
ऐसी स्वयंवरकाहणी । याज्ञसेनीप्रति बार्हत्सेनी । वदली त्यावरी समस्ता जणी । षोडषसहस्रा निरूपिती ॥१३॥

महिष्य ऊचुः - भौमं निहत्य सगणं युधि तेन रुद्धा ज्ञात्वाऽथ नः क्षितिजये जितराजकन्याः ।
निर्मुच्य संसृतिविमोक्षमनुस्मरन्तीः पादाम्बुजं परिणिनाय य आप्तकामः ॥४०॥

म्हणती अवो पाञ्चाळतनये । पाणिग्रहणें आमुचीं माये । समासें कथितों ऐकती होय । श्रीकृष्णपाय लाधलों तें ॥१४॥
भूमितनय भौमासुर । त्रुजगीं अजिंक महाघोर । जेणें शक्रादि सुरवर । केले स्वकिंकर जिंकूनी ॥३१५॥
इंद्रमातेचीं कुंडलें हरिलीं । स्वमाते भूमीतें अर्पिलीं । रत्नशृंगादि संपत्ति नेली । प्राग्ज्योतिषपुरातें ॥१६॥
तया प्रसंगें दिग्विजयार्थ । भौम जाला उद्योगवंत । अग्नि जिंकोनि केला अंकित । पुरपरिधीकृत स्थापिला ॥१७॥
शमन केला आज्ञाधारी । निरृति परिचर्याधिकारी । वरुण प्रतापें जिंकूनि समरीं । छत्र हरिलें सुधास्रावी ॥१८॥
वायु जिंकूनि प्रतापशक्ती । घरटी देववी स्वपुराभंवती । नम्र होऊनि द्रविणपती । सख्यें निगुती वर्ततसे ॥१९॥
कर्कशतपोबळें श्रीकंठ । वशवर्ती तो केला स्पष्ट । पिशाचसेनेचे संघाट । वसवी निकट तद्योगें ॥३२०॥
ऐसिया दिग्विजयप्रसंगीं । सुरवर जिंकूनियां त्रिजगीं । कन्यारत्नें हरूनि अवघीं । संग्रह केला निजभुवनीं ॥२१॥
दिग्विजयीं जे जिंकिले राजे । तयांच्या दुहिता लावण्यतेजें । दिव्यरत्नें जाणोनि वोजें । स्वपुरीं पैजे संग्रहिल्या ॥२२॥
तिया आम्ही सहस्रें सोळा । भौमभुवनीं झालों गोळा । रोधिलों असतो घनसांवळा । दैवें त्या स्थळा पातला ॥२३॥  
स्वगणेंसहित मारूनि भौम । विजयी जाला मेघश्याम । अवलोकितां भौमधाम । आमुचे श्रम विलोकिले ॥२४॥
भौमें रोधिल्या नृपनंदिनी । जाणोनि सर्वज्ञें निजमनीं । कीं ज्या मत्पादाब्जस्मरणीं । स्वमोक्ष वांछूनि रंगलिया ॥३२५॥
ज्याचिया चरणस्मरणास्तव । भवबंदीं पडले जीव । मोक्ष पावती तेथूनि सर्व । ऐसा निर्वाह करूनियां ॥२६॥
भौमनिरुद्धा न्रुपात्मजा । ऐसें जाणोनि मत्पादकंजा । स्मरताती हें गरुडध्वजा । विदित जालें सर्वज्ञा ॥२७॥
मग सोडवूनि आम्हां प्रति । सहित भौमाची संपत्ति । द्वारके आणूनियां श्रीपति । पर्णी निगुती सर्वांतें ॥२८॥
एके घटिकेमाजी सकळा । कृष्णें पर्णिल्या सहस्रें सोळा । आप्तकामही घनसांवळा । आम्हां प्रेमळांस्तव द्रवला ॥२९॥
तयाच्या पदभजनाची प्राप्ति । भाग्यें जाली आम्हांप्रति । यावरी कांहीं वांछा चित्तीं । नाहीं निश्चिती तें ऐका ॥३३०॥

न वयं साध्वि साम्राज्यं स्वाराज्यं भोज्यमप्युत । वैराज्यं पारमेष्ठ्यं च आनन्त्यं वा हरेः पदम् ॥४१॥

अवो साध्वि पतिव्रते । वृत्तान्त ऐकें पांडवकान्ते । आम्ही न वांछूं साम्राज्यातें । स्वाराज्यातें आदिकरूनी ॥३१॥
अथवा भोज्यही न वांछूं । वैराज्य पारमेष्ठ्य न इच्छूं । आनंत्यपदही करूनि तुच्छ । विलसों स्वच्छ हरिचरणीं ॥३२॥
श्रोते म्हणती पृथगा नांवीं । साम्राज्यादि विभवें आघवीं । यांचीं स्वरूपें निरूपावीं । आस्था जीवीं हे वर्ते ॥३३॥
ऐकोनि म्हणे दयार्णव । सप्तद्वीपींचें नृपगौरव । सपत्नरहित भोगिजे सर्व । साम्राज्य नांव त्या विभवा ॥३४॥
स्वाराज्य म्हणिजे स्वर्गींचें राज्य । शतमखसुकृतें होऊनि पूज्य । लाहिजे त्याहूनि ऐश्वर्यपुंज । जें कां भोज्य दिविभौम ॥३३५॥
साम्राज्यस्वाराज्यांचे भोग । एकत्र अवक्र वडती साङ्ग । भोज्यनामें तें विभव चांग । ऐका अव्यंग वैराज्यही ॥३६॥
अणिमादिका विभूति अष्ट । ज्यातें वोळगती त्या स्पष्ट । विविधा विभवीं जो उपविष्ट । नामें विराट तो पुरुष ॥३७॥
विराजाचें जें वैभव । वैराज्य ऐसें तयाचें नांव । परमेष्ठीचें ऐश्वर्य सर्व । पारमेष्ठ्य त्या म्हणिजे ॥३८॥
आनंत्य म्हणिजे अपवर्गातें । त्याची अपेक्षा न धरूं चित्तें । द्रौपदी म्हणे तरी तुम्हांतें । प्रियतम काय तें मज सांगा ॥३९॥
ऐकूनि म्हणती समस्ता जणी । हरिपदवाञ्छा आमुचे मनीं । याहूनि आणिक या त्रिभुवनीं । याज्ञसेनी प्रिय न वटे ॥३४०॥

कामयामह एतस्य श्रीमत्यादरजः श्रियः । कुचकुंकुमगन्धाढ्यं मूर्घ्ना वोढुं गदाभृतः ॥४२॥

आम्ही समस्ता संतत पोटीं । हेचि कामना वांछूं मोठी । श्रीमद्भगवत्पदरज मुकुटीं । वाहूं गोरटी महाभाग्यें ॥४१॥
श्रीमत्पदरज कैसें म्हणसी । जें लक्ष्मीच्या कुचसंस्पर्शी । कुंकुमाक्तसौरभ्येंसीं । निरपेक्षेसीं वेधक पैं ॥४२॥
श्रीकुचकुंकुमसुगंधाढ्य । गदाभृताचे चरण सुदृढ । ते स्वमूर्ध्नि वहावे उघड । हे कामना गोड कामितसों ॥४३॥
ब्रह्मा शंकर सह सुरवर । लक्ष्मी पदरजोभरणा शिर । वोडविती ते श्री सादर । ज्याचे पदरजप्राप्तीतें ॥४४॥
ऐसें हरिपदपंकजरज । त्रिजगीं दुर्लभतर जें सहज । तत्प्राप्तीचें कामनाबीज । वसवी हृत्कंज पैं आमुचें ॥३४५॥
पाञ्चाळीये जरी तूं म्हणसी । पदरज दुर्लभ विधिहरांसी । त्याची पाप्तिं तुम्हांसी । वृथा मानसीं कामितसां ॥४६॥
तरी येथींचें ऐकें गुज । सप्रेमळ जे भक्तराज । त्यांसी सुलभ श्रीपदकंज । सहजीं सहज अनायासें ॥४७॥
सुलभ प्राप्ति कोण्हा कैसी । जाली म्हणोनि तूं जरी पुससी । तरी ऐकावें इयेविषीं । संशय मानसीं न धरूनी ॥४८॥

व्रजस्त्रियो यद्वाञ्छन्ति पुलिन्द्यस्तृणवीरुधः । गावश्चारयतो गोपाः पादस्पर्श महात्मनः ॥४३॥

काया वाचा मनेंकरून । श्रीपदकंजीं तत्पर मन । भाविक सप्रेमळ जे पूर्ण । त्यांलागून अतिसुलभ ॥४९॥
व्रजस्त्रिया साबड्या घुरटा । पुलिंदपत्न्या त्या रानटा । परंतु हरिपदकंजीं निष्ठा । वरिती अभीष्टा सुलभत्वें ॥३५०॥
महात्मया श्रीकृष्णाचें । पदरज सुलभ त्यांतेंचि साचें । तृनवल्लरीजाळि यांचे । पादस्पर्शाचे मनोरथ ॥५१॥
गाई चारित असतां वनीं । गोपी गोपाळांलागुनी । पादस्पर्शवांछा मनीं । पंकजपाणी ते पुरवी ॥५२॥
तस्मात् आमुचा जाणोनि भाव । प्रणतवत्सल वासुदेव । पदरजलाभाचें वैभव । वोपी स्वयमेव द्रौपदिये ॥५३॥
कृष्णपत्न्यांतें स्वयंवरें । पाञ्चाळीनें अत्यादरें । पुसतां तिहीं पृथगाकारें । निरूपिलीं तीं तुज कथिलीं ॥५४॥
यावरी पुढिले अध्यायीं । मुनिवर देकूनि शेषशायी । नृपांसहित भजला पाहीं । श्रवणालयीं तें वसवा ॥३५५॥
एकनाथ परमामृत । चिदानंद सुस्वादभरित । प्राशन करिता स्वानंद प्राप्त । गोविन्द निश्चित ते होती ॥५६॥
दयार्णवें तत्कृपालेश । लाहूनी श्रोतयांतें पीयूष । महाराष्ट्रभाषा वोपी सुरस । नित्यनिर्दोष हरिवरदें ॥५७॥
एवं श्रीमद्भागवतीं । जें जें वदली शुकभारती । श्रवणीं सादर परीक्षिती । जो हरिकीर्तिरसभोक्ता ॥५८॥
तये कीर्तीच्या श्रवणपठनें । षड्वैर्‍यांचें उठे ठाणें । श्रोतयां कैवल्यसुख लाहणें । हरिवरदानें सुगमत्वें ॥५९॥
श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध त्र्यशीतितम ॥३६०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां सूर्योपरागतीर्थयात्रावृष्णिकुरुसंगमवर्णनं नाम त्र्यशीतितमोऽध्यायः ॥८३॥
कालयुक्ताक्षिके मार्गे सप्तम्यां कृष्णपक्षगे । भृगौ पिपीलिकायां च हरिपत्न्युक्तिर्निरूपिता ॥१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४३॥ ओवी संख्या ॥३६०॥ एवं संख्या ॥४०३॥ ( त्र्याऐशींवा अध्याय मिळून ओवीसंख्या ३७२३१ )

त्र्याऐशींवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP