द्रौपद्युवाच - हे वैदर्भ्यच्युतो भद्रे हे जाम्बवति कौसले । हे सत्यभामे कालिंदि शैब्ये रोहिणि लक्ष्मणे ॥६॥
हे कृष्णपत्न्य एतन्नो ब्रूत वो भगवान्स्वयम् । उपयेमे यथा लोकमनुकुर्वन्स्वमायया ॥७॥

परमादरें याज्ञसेनी । वैदर्भीतें मुख्य करूनी । कृष्णानिता अवघ्या जणी । संबोधोनी प्रश्न करी ॥७६॥
अवो कल्याणी वैदर्भिये । भद्रे कैकये राजतनये । भो रौक्षेयी जाम्बवतिये । नाग्नजितिये कौसल्ये ॥७७॥
सात्राजितिये सत्यभामे । कलिन्दतनये मेघश्यामे । शैब्ये मित्रविन्दाख्ये वामे । रोहिणी प्रेमें हरिभजके ॥७८॥
अवो माद्री बार्हत्सेनी । लक्ष्मणे ललितलावण्यखाणी । कृष्णें वरिलीसि करग्रहणीं । कथीं कल्याणी तें अवघें ॥७९॥
भो भो सुभगा भूपाळदुहिता । षोडश सहस्रा श्रीकृष्णकान्ता । पृथक समस्ता स्वयंवरवार्ता । वरिला भर्ता केंवि वदा ॥८०॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । अगाध अगोचर अच्युत पूर्ण । तेणें तुमचें पाणिग्रहण । कैसें केलें नरनाट्यें ॥८१॥
स्वमायेच्या अंगीकारीं । मनुष्यचर्येच्या अनुकारीं । तुमतें पर्णिता जाला हरि । तें निजवैखरी निरूपिजे ॥८२॥
हरिललनांतें संबोधून । पाञ्चाळीनें ऐसा प्रश्न । केला असतां मग त्या कथन । करिती संपूर्ण पृथक्त्वें ॥८३॥
त्यामाजी रुक्मिणी ज्येष्ठ पत्नी । स्वकरग्रहणाची कहाणी । वदती जाली संक्षेपवाणी । ते श्रोतीं श्रवणीं परिसावी ॥८४॥

रुक्मिण्युवाच - चैद्याय मार्पयितुमुद्यतकार्मुकेषु राजस्वजेयभटशेखरिताङ्घ्रिरेणुः ।
निन्ये मृगेन्द्र इव भागमजावियूथात्तच्छ्रीनिकेतचरणोऽस्तु ममर्चनाय ॥८॥

भीमकी म्हणे वो पाञ्चाळतनये । मम स्वय ऐकें माये । दैव विचित्र सांगो काये । परमाश्चर्य झणें मानीं ॥८५॥
अनेकजन्मार्जितसुकृतें । परमप्रियतमवैष्णवव्रतें । श्रवणीं पडतां भगवच्चरितें । मानसें तेथें वेधलियें ॥८६॥
हरियश ऐकूनियां श्रवणीं । हरिरूप भरलें अंतःकरणीं । तेणें वेधतां बाह्याचरणीं । तनुविस्मरणीं वैकल्य ॥८७॥
हें जाणोनि जननी जनक । करितां स्वयंवरविवेक । ज्येष्ठबंधु हरिनिन्दक । चैद्यमुख्य वर बोधी ॥८८॥
जननीजनकें हरिअर्पणीं । उदित असतां त्यांतें न गणी । चैद्य नवरा भूभुजगणीं । निश्चय कर्णीं पडता हा ॥८९॥
विप्रहस्तें विनयविनति । प्रविष्ट होतां कैवल्यमूर्ति । मम कारुण्यें द्रवोनि चित्तीं । आला यदुपति सैन्येंसीं ॥९०॥
चैद्यपक्षी मागधप्रमुख । सुहृदभूपति पृथक्पृथक । कौण्डिन्यपुरा भंवतें कटक । त्याचें अटक देखुनियां ॥९१॥
अंबिकापुरीं ससैन्येंसीं । प्रतापें राहिला हृषीकेशी । देखोनि चैद्यमागधांसी । क्षोभ मानसीं उदेला ॥९२॥
कंसवधास्तव मागधें । मथुरे जाऊनि सतरा युद्धें । केलीं परंतु त्या गोविन्दें । जीवदानेंसीं सोडिलें ॥९३॥
अठराविये वेळीं हरि । मथुरा नेऊनि समुद्रोदरीं । सबंधु पळाला मागधसमरीं । अहंता अंतरीं हे त्याचे ॥९४॥
यास्तव मागध कारुष शाल्व । चैद्यपक्षींचे भूपति सर्व । हरिविजयाचा धरूनि गर्व । म्हणती अनर्ह हें येथ ॥९५॥
तंव मम जनकें कुळधर्मासी । नोवरी अंबिकापूजनासी । प्रेरितां बंधु भगवद्द्वेषी । मागधा चैद्यासि सुचवितां ॥९६॥
सूचना होतांचि मागधप्रमुख । वीरश्रीचा धरूनि तंवक । सन्नद्ध बद्ध एकेंएक । पातले सम्यक समरंगा ॥९७॥
अंबिकापूजना नंतर हरि । अकस्मात मातें हरी । वाहोनियां निजरहंवरीं । मृगेन्द्रापरी चालियला ॥९८॥
उद्यतकार्मुक भूभुज सकळ । उठिले असतां तिये वेळ । चरणीं मर्दूनि त्यांचें मौळ । हरी गोपाळ मजलागीं ॥९९॥
वांठिवेचे मुकुट माथां । जिया मिरविती भूपचळथा । पायां तळीं त्या मर्दुनि त्वरिता । जाला हरिता हरि मातें ॥१००॥
अजा अविकांमाजूनि भाग । मृगेन्द्र जैसा ने सवेग । गजयूथातें न करवे लाग । भूभुजवर्ग तेंवि रणीं ॥१॥
ऐसें माझें केलें हरण । पुढती विध्युक्त पाणिग्रहण । त्या श्रीनिकेतनाचे चरण । असोत पूर्ण मज पूज्य ॥२॥
अवो पाञ्चाळराजतनये । अच्युतें मातें वरिलें माये । तें तुज कथिलें सूत्रप्राय । यावरी काय आज्ञापी ॥३॥
इतुकें रुक्मिणी वदल्यावरी । श्रीकृष्णाची प्रिय अंतुरी । सत्यबामा कथन करीं । करग्रहपरी ते ऐका ॥४॥

सत्यभामोवाच - यो मे सनाभिवधतप्तहृदा ततेन लिप्ताभिशापमभिमार्ष्टुमपाजहार ।
जित्वर्क्षराजमथ रत्नमदात्स तेन भीतः पितादिशत मां प्रभवेऽपि दत्ताम् ॥९॥

भामा म्हणे माझिया जनकें । स्वबंधुवधाच्या परमदुःखें । तदभिशापाचिया कलंकें । श्रीवत्साङ्का नोकिलें ॥१०५॥
अभिशाप तो निरसावया । कृष्ण यादवां घेऊनियां । पदवीं हुडकितां निघ्नतनया । मृगेन्द्रें वधिलें देखूनी ॥६॥
मृगेन्द्राचा घेऊनि माग । पुढें चालिला करूनि लाग । तंव देखिला मृगेन्द्रभंग । ऋक्षें केला वनगर्भीं ॥७॥
ऋक्षमागोवा पुढारी । काढितां प्रवेशला तो विवरीं । तया मागें रिघोनि हरि । आणिली नोवरी रत्नेंसीं ॥८॥
मग तें रत्न माझिया जनका । अर्पूनि निरसिलें कळंका । जनकें मानूनि भयाची शंका । स्यमंतें सहित मज दिधलें ॥९॥
पूर्वीं अक्रूरादिकां कारणें । नेमिलें होतें मज वाग्दानें । कृष्णमनोभंगाच्या भेणें । मजला रत्नें सह दिधलें ॥११०॥
ऐसी सत्यभामेची उक्ती । संपतां बोले जाम्बवती । तो वृत्तान्त सावध श्रोतीं । सप्रेमभक्तीं परिसावा ॥११॥

जाम्बवत्युवाच - प्राज्ञाय देहकृदमुं निजनाथदैवं सीतापतिं त्रिणवहान्यमुनाभ्ययुध्यत् ।
ज्ञात्वा परीक्षित उपाहरदर्हणं मां पादौ प्रगृह्य मणिनाहममुष्य दासी ॥१०॥

म्हणे मम देहाचा कर्ता । जाम्बवंत जो माझा पिता । तेणें देखोनियां भगवंता । मानिली गौणता मनुजत्वें ॥१२॥
द्वंद्वयुद्धा मिसळला बळें । सत्तावीस दिवस सळें । आपुला स्वामी नेणोनि बरळें । युद्ध केलें निकराचें ॥१३॥
क्षीण जालिया सर्वशक्ति । मग ओळखिला सीतापति । तेव्हां रसरसूनियां चित्तीं । म्हणे अनुचितीं प्रवर्तलों ॥१४॥
ईश्वरावीण मजसीं कोण्ही । पुरों न शके समराङ्गणीं । ऐसा निर्धार करूनि मनीं । कोदंडपाणि परीक्षिला ॥११५॥
तेव्हां सप्रेम चरण धरी । स्तवनीं तोषवूनि श्रीहरि । रत्नें सहित मजला करीं । देऊनि परिहरी अपराधा ॥१६॥
तया प्रभूची मी दासी । सेवा वाञ्छीं चरणांपासीं । यावरी कालिन्दी कथनासी । करिते कैसी तें ऐका ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP