अध्याय ८२ वा - श्लोक २७ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अथ ते रामकृष्णाभ्यां सम्यक्वाप्तसमर्हणाः । प्रशशंसुर्मुदा युक्ता वृष्णीन्कृष्णपरिग्रहान् ॥२७॥

आपुलिया दर्शनोद्देशें । नृपति आले संतोषें । रामकृष्णीं परमोल्लासें । राजोपचारीं पूजियले ॥८६॥
रामकृष्णांच्या हस्तें करून । पूजा संप्राप्त जे नृपगण । ते प्रशंसिती वृष्णीलागून । धन्य म्हणून भूलोकीं ॥८७॥
कृष्णें प्रतिपाळिले जे वृष्णि । ज्यांचा प्रेमा सदैव कृष्णीं । जे न तपती त्रितापोष्णीं । मान्य वितृष्णीं गीयमान ॥८८॥
तया वृष्णींचा धन्य महिमा । जैसा गमला नृपसत्तमा । तदनुसार सुकृतगरिमा । वदती प्रेमपुरस्सर ॥८९॥

अहो भोजपते यूयं जन्मभाजो नृणामिह । यत्पश्ययासकृत्कृष्णं दुर्दर्शमपि योगिनाम् ॥२८॥

जन्मवंत जे जे नर । तयां मध्यें सफळतर । तुमचेंचि जन्म धन्य रुचिर । म्हणती नृपवर भोजेन्द्र ॥१९०॥
अहो या आश्चर्यें करून । कैसें म्हणती जन्म धन्य । निरंतर ज्यांतें कृष्णदर्शन । योगियांलागून दुर्लभ जें ॥९१॥
ज्याच्या योगें एकही वेळ । आम्ही देखूनि श्रीगोपाळ । धन्य मानूं जन्म सफळ । तो सर्वकाळ यांपासीं ॥९२॥
अनावर मनाचिया कल्पना । तेणें जीवां पूर्ण चैतन्या । वियोग जाला म्हणोनि नाना । योनिभ्रमणा करितसे ॥९३॥
तया मनातें कल्पनारहित । करूनि जीवां पूर्णत्व देत । वियोग भंगूनि योगयुक्त । निजात्मरत जे योगी ॥९४॥
ऐशा योगियांही दुर्दर्श । कोटि जन्म तपाचे सोस । करितां एकवार त्यांस । दर्शनास अनवसर ॥१९५॥
तो हा सदैव यादवांपासीं । क्रीडे नटोनि मनुष्यवेशीं । ज्याची पूर्णता ब्रह्माण्डासी । दुःखनिराशी सुखदानी ॥९६॥
यादवांमाजि यादवपणीं । घेऊनि मानवी अवगणी । सदैव वर्ते चक्रपाणी । परि या कोण्ही न जाणती ॥९७॥

यदिश्रुतिः श्रुतिनुतेदमलं पुनाति पादावनेजनपयश्च वचश्च शास्त्रम् ।
भूः कालभर्जितभगापि यदघ्रिपद्मस्पर्शोत्थशक्तिरभिवर्षति नोऽखिलार्थान् ॥२९॥

ज्याची त्रिजगीं अमळ कीर्ति । शश्वत स्वमुखें श्रुति स्तविती । पादावनेजन भागीरथी । पावनकर्त्ती त्रिजगातें ॥९८॥
निगमरूप ज्याची गिरा । स्वशासनीं चराचरा । शिक्षित करी प्राणिनिकरां । शास्त्रनिर्धारा । नियमूनियां ॥९९॥
तस्मात शास्त्ररूप ज्याची वाणी । तो हा प्रत्यक्ष पंकजपाणी । प्रकट नांदे यादवसदनीं । ऐश्वर्यश्रेणीसमवेत ॥२००॥
हें असो आम्हां प्रत्यय एक । बाणला असे निज निष्टंक । जो जाणती समस्त लोक । तोही सम्यक अवधारा ॥१॥
कृतयुगीं प्रकटविभवें । पूर्णैश्वर्यें भूमी मिरवे । त्रेतीं त्रिपाद धर्मा नामें । क्षीणदैवें चतुर्यांशें ॥२॥
द्वापरीं द्विपाद धर्म जाहला । तैं अर्ध ऐश्वय्रा मुकली इळा । प्रस्तु उदेजतां कळिकाळा । धर्म जाला एकाङ्घ्री ॥३॥
यास्ता भूमी कळिकाळवेगा । प्रदीप्त होतां भर्जितभगा । जाली सर्वत्र दुर्भगा । ऐश्वर्यौघा अंतरली ॥४॥
वेदाध्ययनें नव्हती साङ्ग । सन्मार्गाचा जाला भंग । दुराचारी अवघें जग । नव्हती याग विध्युक्त ॥२०५॥
तेणें होती खंडवृष्टी । निर्जळ सहजी सहज सृष्टी । फळ दळ पुष्प न पदे दृष्टी । जनपद कष्टी क्षुत्क्षात्म ॥६॥
ऐसी कळीकाळप्रवाहीं । भर्जितभाग्य असतां मही । कृष्णपादस्पर्शें पाहीं । दुभे सर्वही ऐश्वर्यें ॥७॥
कृपापादस्पर्शें शक्ति । लाहोनि पृथ्वी ऐश्वर्यवती । आम्हां नृपांतें सर्व संपत्ती । वर्षे त्रिजगती सुभगत्वें ॥८॥
कृतयुगीं पूर्णपणें । पृथ्वी दुभे ऐश्वर्यगुणें । तैसी स्पर्शतां श्रीकृष्णचरणें । आम्हां कारणें कळिकाळीं ॥९॥
एवं आम्हां भूपाळवर्गां । कृष्ण आनंददायक त्रिजगा । परंतु यादवांचिया विभागा । आला अवघा तें परिसा ॥२१०॥

तद्दर्शनस्पर्शनानुपथप्रजल्पशय्यासनाशनसयौनसपिंडबंधः ।
येषां गृहे निरयवर्त्मनि वर्ततां वः स्वर्गापवर्गविरमः स्वयंमास विष्णुः ॥३०॥

आम्हां अथवा इतरांप्रति । दुर्लभ दर्शनाची प्राप्ति । तो श्रीविष्णु तुह्मांप्रति । सुलभ सर्वार्थीं सर्वस्वें ॥११॥
तरुणां वृद्धां बाळां अबळां । नित्य सुलभ दर्शनसोहळा । यथाधिकारें स्पर्श सकळां । उचित वेळा जाणोनी ॥१२॥
मार्गीं चालतां अनुगमनें । प्रजल्प म्हणिजे संभाषणें । शयनीं एकत्र पहुडणें । लेंकुरपणें स्निग्धत्वें ॥१३॥
एकासनीं सभास्थानीं । एक पंक्ती सहभोजनीं । यौन म्हणिजे विवाहलग्नीं । शरीरसंबंधप्रसंगें ॥१४॥
गोत्रसंबंध सपिण्डयोग । अथवा सप्रेम मैत्रप्रसंग । विलास नर्मोक्तियादि चांग । हा अवघा संयोग ज्या तुमसीं ॥२१५॥
येणें करूनि विशेष काय । कोणता लाभ या माजी आहे । तरी तो ऐका म्हणती राये । भोजवर्यादि वृष्णींतें ॥१६॥
जया तुमचे गृहीं विष्णु । स्वयें अवतरला भ्राजिष्णु । तुम्हां करोनि भववितृष्णु । स्वसुखसंपन्न भवनिलयीं ॥१७॥
केवळ संसार मोहप्रचुर । तेथ गृह तें कारागार । टाकावया निरयपूर । मार्ग दुस्तर भवभ्रम हा ॥१८॥
ऐसिया निरयमार्गाच्या ठायें । तुम्हां सुलभ शेषशायी । स्वर्ग मोक्ष दोहीं विषयीं । तृष्णा कांहीं न उरों दे ॥१९॥
इहामुष्मिक नश्वर क्षणिक । बंधाविण मोक्षही फोक । कृष्ण कैवल्यसच्चित्सुख । सुलभ सम्यक ज्या तुमतें ॥२२०॥
मोक्षाहूनि विशेषतर । कृष्ण सच्चित्सुखसागर । तत्सहवासें तुम्ही सधर । म्हणती नृपवर भोजपते ॥२१॥
यालागीं जन्मा भजतयांमाजी । सफळ जन्म तुमचेंचि सहजीं । जे सहवासें गरुडध्वजीं । रंगूनि दुजी गती नेणां ॥२२॥
कृष्ण केवळ कैवल्यधाम । आप्तभावें तुम्हां तत्प्रेम । यास्तव न बाधी भवसंभ्रम । भाग्य निःसीम हें तुमचें ॥२३॥
ऐसा नृपांहीं कृष्णमहिमा । प्रशंसिला भोजसत्तमा । यावरी नंदागमनगरिमा । श्रीशुकनामा नृपा कथी ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP