मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर ततोऽभिवाद्य ते वृद्धान्यविष्ठैरभिवादिताः । स्वागतं कुशलं पृष्ट्वा चक्रुः कृष्णकथा मिथः ॥१६॥सुहृत्संबंधी नृपवर । करुसृञ्जयादि उशीनर । काम्बोज कैकय मत्स्य भद्र । नंदादि अपर व्रजौकस ॥१८॥मग ते भूपति परस्परें । सुहृद इष्ट मित्र सोयरे । नमिते जाले वृद्धाचारें । कोण्या प्रकारें तें ऐका ॥१९॥वयें धाकुटे जे जे होती । तोहीं नमिलें वृद्धां प्रति । समानवयस्यां अळंगिती । ज्येष्ठ गौरविती आशीर्वादें ॥१२०॥असो नमनाचा प्रकार । स्वागत पुसती त्या नंतर । क्षेमकुशल सह परिवार । पुसोनि अंतर तोषविती ॥२१॥त्या नंतर ठायीं ठायीं । बैसोनि द्रुमाचे शीतळ सायीं । कृष्णकथा वदती पाहीं । सप्रेम हृदयीं परस्परें ॥२२॥पुढें त्या कथांचा उल्लेख । महिमा उपसंहारात्मक । नृपातें वदला श्रीशुक । तो नावेक असो आतां ॥२३॥प्रस्तु कुन्ती स्व माहेरा । वृष्णिभोजादि सात्वत गोत्रा । देखती जाली त्या प्रकारा । सांगे नृपवरा योगीन्द्र ॥२४॥पृथा भ्रातृन्स्वसृर्वींक्ष्य तत्पुत्रान्पितरावपि । भ्रातृपत्नीर्मुकुन्दं च जहौ संकथया शुचः ॥१७॥पृथानामक जे कां कुन्ती । जाली स्वजनांतें देखती । बंधु बहिणी तत्संतती । पितरांप्रति आपुलिया ॥१२५॥चुलते चुलत्या भाऊजया । त्यांच्या प्रजाही अवघिया । रामकृष्णां स्वभाचयां । देखोनि हृदयामाजि द्रवे ॥२६॥अभिवादनें आलिङ्गनें । यथोचित आशीर्वचनें । स्वागतप्रश्नें श्रमापहरणें । परस्परें स्वजनासी ॥२७॥सप्रेमभावें सुस्निग्ध गोष्टी । कारुण्यभावें कळवळा पोटीं । तेणें अश्रु नेत्रवाटीं । पडती भूअटं परस्परें ॥२८॥भेटी जालिया बहुतां दिवसां । यास्तव स्मरोनि अनुभूत क्लेशां । पुसतां सांगतां तिया अशेषा । शोक अपैसा विसर्जिती ॥२९॥असो परस्परें संवाद । वसुदेवासी कुन्ती विशद । बोलती जाली तो अनुवाद । ऐका सावध क्षणैक ॥१३०॥कुन्त्युवाच - आर्य भ्रातरहं मन्ये आत्मनमकृताशिषम् । यद्वा आपत्सु मद्वार्त्तां नानुस्मरथ सत्तमाः ॥१८॥मुन्ती म्हणे भो श्रेष्ठा बंधु । तुम्ही स्नेहाळ कृपासिन्धु । माझेंचि विपरित प्रारब्धु । कायसा शब्द तुम्हांवरी ॥३१॥माझेचि अपूर्ण मनोरथ । तुम्ही असतां मी अनाथ । महा आपदा मजला प्राप्त । होतां किंचित न स्मरलां ॥३२॥तुम्ही सर्वदा सत्तम बले । परंतु माझिये संकटवेळे । तुम्हांसि स्मरण नाहीं जालें । अंतर पडलें दुर्दैवें ॥३३॥पाण्डुरायें परम अगाध । प्रतापें केले अश्वमेध । तैं भूतळींचें विबुध बुध । नमिती मत्पद् श्लाघ्यत्वें ॥३४॥पुढें आमुचे अदृष्टपाप । तेणें रायासि जाला शाप । मग वनवासीं कष्ट बहुत । भोगिले तप आचरतां ॥१३५॥पाण्डुराजा स्वर्गा गेला । आम्हां वनवासीं वियोग केला । धर्मभीमार्जुनयमलां । सहित अबळा आक्रंदे ॥३६॥शोकदावानळीं पडिलें । दुःखउन्हाळां वरपडलें । उभय गोत्रां विघडलें । वोघीं बुडालें कर्माच्या ॥३७॥तये संकटीं तुमचें स्मरण । करूनि विशेष केलें रुदन । तेणें कळवळोनि मुनिजन । हस्तिनापुरा पावविलें ॥३८॥तये संकटीं मजलागूनी । स्मरलां नाहीं तुम्ही कोण्ही । ऐसी केवळ दुर्दैवखाणी । तुम्ही असोनी मी जाल्यें ॥३९॥भीष्मबाह्लिकादिहीं सकळीं । पांचही बाळें आपंगिलीं । पुढें दुर्योधनादिकुटिळीं । विघ्नें रचिलीं पापिष्ठीं ॥१४०॥भीमा विषप्रळय केला । रात्रीं त्याचा प्राण गेला । पोटीं बांधोनि वज्रशिळा । मग बुडविला गंगाजळीं ॥४१॥ऐसिया दुःखाचे संकटीं । कीं तुम्हीं ही ऐकिली असेल गोष्ठी । तथापि दैवहीन मी करंटी । म्हणोनि पोटीं न द्रवला ॥४२॥पांचां पुत्रां सहित मातें । कौरवीं जोहरीं जाळिलें दुश्चितें । तेथ रक्षिलें श्रीभगवंतें । विवरपथें काढूनियां ॥४३॥विवरपथें पडिलों वनीं । घडल्या अनेक संकटश्रेणी । परि न स्मरतां तुम्ही कोण्ही । अनाथ बहिणी म्हणोनियां ॥४४॥पुढें द्रौपदीस्वयंवरीं । कौरवांतें कळल्यावरी । कैसे वांचले म्हणती वैरी । म्हणोनि विचारीं प्रवर्तले ॥१४५॥कपटद्यूतें जिङ्कूनि सकळां । सभे गांजिली द्रुपदबाळा । मायलेंकुरां विघड केला । तैं न स्मरलां तुम्ही आम्हां ॥४६॥असो ऐसीं कोठवरी । दुःखें स्मरोनि करूं अवसरी । तस्मात पापें होतीं पदरीं । ते सामग्री मज फळली ॥४७॥उभें ठाकल्या दुरदृष्ट । तैं न स्मरती जिवलग इष्ट । कोण्ही न परिहरिती कष्ट । तेंचि स्पष्ट वदे कुन्ती ॥४८॥सुहृदो ज्ञातयः पुत्रा भ्रातरः पितरावपि । नानुस्मरन्ति स्वजनं यस्य दैवमदक्षिणम् ॥१९॥दैवें जेव्हां डावलिलें । तैं कोणाचें कांहीं न चाले । सुहृद आप्त जिवलग भले । ते केतुले ते ठायीं ॥४९॥सुहृद स्नेहाळ सोयरे ज्ञाती । पुत्र बंधु चुलते किती । मायबापही पारके होती । मा मामे माउसे कोणीकडे ॥१५०॥स्वजन गणगोत धणीवरी । असोनि कोण्हीही स्मरण न करी । जयाची दैवरेखा पुरी । पाठिमोरी जैं ठाके ॥५१॥तस्मात माझें विपरीत दैव । तुम्हां कोठूनि येईल कींव । खेद कुन्तीचा परिसोनि सर्व । बोले वसुदेव तें ऐका ॥५२॥श्रीवसुदेव उवाच - अंब मास्मानसूयेथा दैवक्रीडनकान्नरान् । ईशस्य हि वशे लोकः कुरुते कार्यतेऽथवा ॥२०॥वसुदेव म्हणे बहिणी ज्येष्ठे । केंवि न झळंबों तुझिया कष्टें । परि आम्हां वोखटिया अदृष्टें । महासंकटें दाखविलीं ॥५३॥निन्द्य नैष्ठुर्यशब्द आतां । झणें ठेविसी आमुचे माथां । दुरदृष्टें दिधल्या व्यथा । त्या तुज कथितां न सरती ॥५४॥आम्ही पुतळे नर अशेष । अदृष्टसूत्रें नाचवी ईश । समस्त लोक ईश्वरा वश । करिती करवी तैसें ते ॥१५५॥तस्मात सर्व लोकां माथां । अदृष्टरूप ईश्वरसत्ता । ते तूं आमुची कर्मकथा । ऐक तत्वता कल्याणी ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP