युवां तुल्यबलौ वीरौ हे राजन्हे वृकोदर । एकं प्राणाधिकं मन्य उतैकं शिक्षयाऽधिकम् ॥२६॥

राम म्हणे गा दुर्योधना । अगा पाण्डवा भीमसेना । तुम्ही दोघे समराङ्गणा । समसमान पराक्रमी ॥९८॥
दोघे नागायुत बळिष्ठ । दोघे समान अभ्यासनिष्ठ । दोघे प्रतापी वीरपाठ । क्रूर क्रोधिष्ठ समसाम्य ॥९९॥
त्याही माजी भीम बळिष्ठ । सुयोधना तूं अभ्यासनिष्ठ । तस्मात्समरंगीं यथेष्ट । पावतां कष्ट जय नपवां ॥२००॥

तस्मादेकतरस्येह युवयोः समवीर्ययोः । न लक्ष्यते जयोऽन्यो वा विरमत्वफलो रणः ॥२७॥

तस्मात दोघांची तुल्यता । जयो न पावाल युद्ध करितां । या लागीं सांडूनि समरअहंता । राहिजे निवांत मद्वाक्यें ॥१॥
कराल तितुका संग्राम विफळ । कांहीं साध्य नोहे फळ । ऐसें जाणोनि आत्मकुशळ । जेणें होय तें कीजे ॥२॥
इत्यादि वचनीं हलायुध । वारिता जाला द्वंद्वयुद्ध । परि ते नायकती दुर्मद । तेंही विशद अवधारा ॥३॥

न तद्वाक्यं जगृहतुर्बद्धवैरौ नृपार्थवत् । अनुस्मरन्तावन्योन्यं दुरुक्तं दुष्कृतानि च ॥२८॥

बळरामाचें स्निग्धवचन । भीम सुयोधन अनादरून । एकमेकांचें इच्छूनि मरण । करिती निर्वाण गदायुद्ध ॥४॥
विषप्रळय केला पूर्वीं । कीं जोहरीं जाळिले कौरवीं । कृष्णें सांगतां नेदूनि उर्वी । आला गर्वी समरातें ॥२०५॥
तो मी आजि रणमूर्धनि । प्रतापें वधूनि समग्र धरणी । धर्मराजाच्या शासनीं । वर्त्तवीन निर्द्धारें ॥६॥
ऐसें बोलतां भीमसेन । वदे सक्रोध दुर्योधन । आजी मी भीमातें मारून । पुन्हा या धाडीन वनवासा ॥७॥
मयसभेच्या अवलोकनीं । या दुष्टें मम मानहानी । केली यातें समराङ्गणीं । आज वधीन निर्द्धारें ॥८॥
ऐसे परस्परें दुरुक्ति । स्मरूनि युद्धा न संडिती । लंघूनि रामाज्ञा निघतीं । वधूं पाहती एकमेकां ॥९॥
आज्ञाभंग देखूनि राम । होणार बळिष्ठ म्हणे कर्म । तदनुसार यांचा काम । दिसे परम अनुल्लंघ्य ॥२१०॥

दिष्टं तदनुमन्वानो रामो द्वारवतीं ययौ । उग्रसेनादिभिः प्रीतैर्ज्ञातिभिः समुपागतः ॥२९॥

यांचें प्राचीन कर्म जैसें । वोडवलें होणार तैसें । आमुचें स्नेहवादाचें पिसें । येथ कायसें उपयोगी ॥११॥
अदृष्ट अलोट हरिहरां । कर्मानुसार बुद्धि नरां । शुभाशुभांचा भोग खरा । अवश्यमेव भोक्तव्य ॥१२॥
ऐसें मानूनि निजमानसीं । राम गेला द्वारकेसी । उग्रसेनादि यादवांसी । भेटला सर्वांसि सप्रेमें ॥१३॥
शिष्यद्वयाचें गदायुद्ध । रामें पाहिलें यथाविध । भीमें केला सुयोधनवध । ऐसें विशद गदापर्वीं ॥१४॥
वामचरणें सुयोधनशिर । तुडविता जाला वृकोदर । ऐसें देखोनियां बळभद्र । क्षोभें नागर उचलिला ॥२१५॥
कृष्णें प्रार्थूनि संकषणा । निवारूनियां भीमसेना । बोधूनि अवतारचरित्रखुणा । समाधाना पावविला ॥१६॥
गदापर्वीं ऐसिया परी । वदली व्यासाची वैखरी । त्या नंतरें प्रलंबारि । द्वारकापुरीं प्रवेशला ॥१७॥
तेथ भेटूनि समस्तांसी । पुढती गेला ऋषींपासीं । सूतहत्यानिवृत्तीसी । तदाज्ञेसी आचरूनी ॥१८॥

तं पुनर्नैमिषं प्राप्तमृषयोऽयाजयन्मुदा । क्रत्वङ्गं क्रतुभिः सर्वैर्निवृत्ताखिलविग्रहम् ॥३०॥

आला जाणोनि बळराम । परमाल्हादें ससंभ्रम । पूजिते जाले मुनिसत्तम । यज्ञोत्तम मानूनी ॥१९॥
जिहीं यज्ञीं रामा हातीं । यजवित्या जाल्या मुनिवरपंक्ती । तिहीं यज्ञीं तो यज्ञमूर्ति । यजिता जाला तदाज्ञा ॥२२०॥
यज्ञमूर्ति संकर्षण । त्यातें मुनीश्वर संपूर्ण । पूजिते जाले आनंदोन । यज्ञें सहित यज्ञभोक्ता ॥२१॥
चराचरात्मा जाणोनि राम । तत्पूजनीं मुनींसि प्रेम । म्हणती ईश्वर पूर्णकाम । भाग्यें आश्रमा पातला ॥२२॥
यज्ञें सहित यज्ञमूत । मुनींहीं पूजूनि रामा प्रति । पावले परमानंदावाप्ति । करिती प्रणतिस्तवनादि ॥२३॥
ऐसा मुनींहीं पूजिला राम । जो परमात्मा पूर्णकाम । संतोषोनि तो सर्वोत्तम । कैवल्यधाम प्रबोधी ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP