गोमतीं गंडकीं स्नात्वा विपाशां शोण आप्लुतः । गयां गत्वा पितॄनिष्ट्वा गंगासागरसङ्गमे ॥११॥

येथ आशंका केली श्रोतीं । तीर्थराजचि प्रयाग म्हणती । दर्दरक्षेत्राची प्रख्याति । आधुनिकोक्ती ऐकियली ॥८४॥
तरी उभयसरितांचा संगम । तितुक्यांस हीं प्रयाग नाम । ब्रह्मप्रयाग उतमोत्तम । सार्वभौम तीर्थाचा ॥८५॥
जेथ संगत सितासिता । श्रुतींहीं ज्यांची गायिली गाथा । स्वर्गावाप्ति तत्राप्लुता । देह त्यागितां अपवर्ग ॥८६॥
या लागिं तो तीर्थराव । येर प्रयाग काय वाव । प्रतितीर्थींचा महिमा अपूर्व । वक्ता गौरव श्रीव्यास ॥८७॥
साठी सहस्रवर्षें वरी । काशीवासाची सुकृतथोरी । निमेषार्धें ते दर्दरक्षेत्रीं । वदली वैखरी व्यासाची ॥८८॥

श्लोकसंमतिः ॥ षष्टिवर्षसहस्राणि काशीवासस्य यत्फलम् । तत्फलं निमिषार्धेन कलौ दर्दरसङ्घमे ॥१२॥

असो इत्यादिमहात्म्यकथन । संगममात्र प्रयाग जाण । तीर्थराज हें अभिधान । ब्रह्मप्रयागा वाखाणे ॥८९॥
एवं शरयू अनुलोमगती । येऊनि पुलहाश्रमा प्रति । तेथील निधान सारूनि निगुती । गंगासागर ठाकियला ॥९०॥
शरयूमनुस्त्रोतेन । या पदाचें हें व्याख्यान । ग्रंथवृद्धीच्या भयें करून । केलें कथन व्यात्यासें ॥९१॥
गोमतीशरयूच्या दक्षिणतीरीं । तेथ सुस्नात झाला शौरी । तैसाचि सुस्नात शोणभद्रीं । गंडकी माझारी नाहला पैं ॥९२॥
वशिष्ठें पुत्रशोकें करून । प्राणत्यागार्थ पाशबंधन । करूनि कलेवर त्यागिलें जाण । सरिता गहन देखूनियां ॥९३॥
सर्व पाश विखंडूनी । तीरीं टाकिला वसिष्ठमुनी । विपाशानामें ते तैंहूनी । सरिताग्रणी वाखाणे ॥९४॥
तिये विपाशेचिया जळीं । परिवारेंसीं मुसळी हळी । सुस्नात होऊनि विप्रमंडळी । विधिविधानें समर्चिली ॥९५॥
तेथूनि गेला गयाक्षेत्रा । केली उत्तरदक्षिणयात्रा । क्षेत्रदेवतात्मकां पितरां । यजिता जाला सद्भावें ॥९६॥
जीवत्पितृक असतां राम । गयेसि पित्रार्चनाचें प्रेम । धरिलें ऐसें ऐकूनि विषम । श्रोतीं निःसीम न मानावें ॥९७॥
विष्णुक्षेत्रीं देवता विष्णु । शिवक्षेत्रीं देवतां स्थाणु । तैसेचि देवता पितृगणु । पितृक्षेत्रीं गये माजि ॥९८॥
पितृस्वरूपी गदाधर । तैसाचि पिता महेश्वर । वृद्ध प्रपितामहेश्वर । देवतानिकर हा तेथें ॥९९॥
कव्यवाडनळादिक । दिव्य पितर जे सम्यक । इत्यादि यजूनि अन्नोदक । ब्राह्मणपूर्वक सर्व भूतां ॥१००॥
गंगासागरविधिविधान । पूर्वींच कथिलें तें संपूर्ण । तेथूनि दक्षिणप्रान्ती गमन । करीं संकर्षण तें ऐका ॥१॥

उपस्पृश्य महेन्द्राद्रौ रामं दृष्ट्वाऽभिवाद्य च । सप्तगोदावरीं वेणां पम्पां भीमरथीं ततः ॥१२॥

पुढें जाऊनि महेन्द्राचळीं । श्रीराम पूजिता जाला हळी । सप्तगोदासागरमेळीं । केला सकळी तीर्थविधि ॥२॥
सप्तमुखें गोदावरी । होऊनि मिनली जेथ सागरीं । महर्षीच्या नामोच्चारीं । पावनकारी ते ओघ ॥३॥
तेथूनि उभयतोमुखी कृष्णा । मिनली सागरा सहित वेणा । तये सागरसंगमीं स्नाना । करूनि प्रयाणा पुढें केलें ॥४॥
जाऊनि निवृत्तिसंगमा । नमिली तुङ्गा भद्रा भीमा । कृष्णावेणीसमागमा । करूनि सागरीं समरस ज्यां ॥१०५॥
तेथूनि ठाकिली पंपापुरी । पूर्वीं तेथ राघवा हरि । भेटला केवळ जो मदनारी । सुस्नात सरोवरीं तिये जाले ॥६॥
तेथ सारूनि तीर्थविध । कपाटीं जाऊनि वंदिला स्कंद । स्वामी कार्त्तिक जो प्रसिद्ध । ब्रह्मण्यप्रद सप्तभवीं ॥७॥

स्कन्दं दृष्ट्वा ययौ रामः श्रीशैलं गिरिशालयम् । द्रविडेषु महापुण्यं दृष्ट्वादि वेङ्कटं प्रभुम् ॥१३॥

कृत्तिकानक्षत्र कार्त्तिकमासीं । पडतां पूर्णिमेचिये दिवशीं । स्वामिदर्शन घडे ज्यासी । विप्रत्व त्यासि सप्त जन्में ॥८॥
रामें करूनि स्वामिदर्शन । तेथूनि श्रीशैल्या केलें गमन । तेथ वंदिला मल्लिकार्जुन । तीर्थविधानें यथाविधि ॥९॥
पाताळगंगा नीळगंगा । तीर्थस्नानें करूनि वेगा । पूजूनि श्रीशैल्य महालिङ्गा । मग भुजंगाचळ ठाकी ॥११०॥
नंदिकोल अहोबळ । काळहस्तीश्वर निर्मळ । ते ते तीर्थीं जाऊनि बळ । करूनि सकळ तीर्थ तीर्थविधि ॥११॥
पुढें ठाकिला वेङ्कटाद्री । द्रविडदेशी पुण्यभद्रीं । जो सेविला सुरनरेन्द्रीं । इंद्रचंद्रीं विधिशवीं ॥१२॥

कामकोष्णीं पुरीं काञ्चीं कावेरीं च सरिद्वराम् । श्रीरङ्गाख्यं महापुण्यं यत्र सन्निहितो हरिः ॥१४॥

भक्तकामकल्पद्रुम । आदिवराह पुरुषोत्तम । त्यातें पूजूनियां बळराम । चालिला याम्यादि ग्भागीं ॥१३॥
पुढें ठाकिली शिवकाञ्ची । जेथ वसती कामाक्षीची । प्रकट एकाम्बरेश्वराची । क्रीडा साची सुर गाती ॥१४॥
विष्णुकाञ्ची तिये पुढें । तेथील तीर्थाचरण उघडें । विप्रवाक्याच्या उजिवडें । केलें रोकडें बळरामें ॥११५॥
तेथूनि गेला पक्षतीर्था । जेथ पूषा विधाता धाता । अहरह मध्याह्नकाळीं येतां । देखती अर्चितां जन अवघे ॥१६॥
पुढें ठाकिली कावेरी । जयेचा उगम कवेरगिरीं । शंखमुखीं पूर्वसागरीं । एका मुखें मिनलीसे ॥१७॥
भागीरथी ओघीं सहस्रीं । सप्त ओघीं गोदावरी । कृष्णा उभयतोमुखीं सागरीं । मिनली कावेरी एकमुखें ॥१८॥
गौरीमयूर मध्यार्जुन । वैद्यनाथादि कुम्भकोण । सूकर आरुणाचळ वामन । तीर्थगण तो अवघा ॥१९॥
कावेरीचें अभ्यंतर । तें ठाकिलें श्रीरंगक्षेत्र । जेथ जळलिङ्ग जम्बुकेश्वर । सर्व सुरवर निषेविती ॥१२०॥
प्रकाश न सोडी भास्करा । ताप न सोडी वैश्वानरा । तैसा श्रीरंग जिया क्षेत्रा । सन्निहितत्वें वर्त्ततसे ॥२१॥
भूअस्पृष्ट दिव्य विमान । श्रीरंगालय पुण्यपावन । तें संपादूनि संकर्षण । पुढें तेथून चालियला ॥२२॥

ऋषभाद्रिं हरेः क्षेत्रं दक्षिणां मथुरां तथा । सामुद्रं सेतुमगमन्महापातकनाशनम् ॥१५॥

श्वेतारण्य वटारण्य । चिदंबर सभास्थान । कमलालय तीर्थ पावन । नवपाषाण विलोकिलें ॥२३॥
महोदधीतें वेगवती । जेथ मीनली परम प्रीती । परिवारेंसीं तिये तीर्थीं । सुस्नात जाला बळभद्र ॥२४॥
तेथूनि दक्षिणमथुरापुरीं । जेथ मीनक्षी परमेश्वरी । सुंदरेश्वरातें स्वयंवरीं । वरिती जाली सप्रेमें ॥१२५॥
सुंदरेश्वराचे वर्‍हाडी । जेथ सुरवर तेत्तीस कोडी । तिये क्षेत्रीचिया सुरवाडी । वसती आवडी सुखवासें ॥२६॥
वेगवती पुण्यसरिता । जेथ मीनाक्षीजगन्माता । सुंदरेश्वरेंसीं विलोकितां । गणना सुकृता करवेना ॥२७॥
तेथूनि उत्तरे त्रिगव्यूती । अळगिरिनामा वेङ्कटपती । त्यातें वंदूनि राम पुढती । ऋषभाद्रीतें चालियला ॥२८॥
ऋषभाद्रि तोताद्रि त्रिकूटाचळ । गजेन्द्रमोक्षादि तीर्थें सकळ । करूनि हरिक्षेत्रा प्रति बळ । आला केवळ श्रद्धाळु ॥२९॥
हरिक्षेत्र नव त्रिपती । विलोकूनियां रेवतीपती । पुढें रामेश्वरा प्रति । सिन्धुसंगमा पातला ॥१३०॥
धनुष्कोट्यादि तीर्थावळी । यथाविधानें करूनि सकळी । क्रमें पूजूनि सुरमंदळी । भूसुरां हळी अभ्यर्ची ॥३१॥
दर्शनमात्रें पापक्षय । ऐसा तीर्थांचा समुदाय । सेतुसंगमीं समुच्चय । तितुका यदुवर्य आचरला ॥३२॥
दर्भशय्या आदिकरून । धनुष्कोटिपर्यंत जाण । लिङ्गरूप वाळुकाकण । तीर्थें संपूर्ण जलबिन्दु ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP