सोऽपतद्भुवि निर्भिन्नललाटोऽसृक्समुत्सृजन् । मुञ्चन्नार्त्तस्वरं शैलो यथा वज्रहतोऽरुणः ॥६॥

कढवा गुन्ततां लाङ्गलाग्रा । निष्टावया जंव करी त्वरा । तंव मस्तकीं मुसळप्रहारा । वैसतां धरा आश्रयिली ॥२९॥
मुसळघायें भिन्नललाट । पडला धरणीवरी पापिष्ठ । भडभडां वाहती रुधिरपाट । दुःखें अचाट अर्डाये ॥३०॥
प्राण न जाय झडकरी । दुखें आरडे आर्तस्वरीं । डोळे भंवडी लागतां चंद्री । करपद पसरी एकवटी ॥३१॥
कंठ घुरघुरी लागला घोर । नेत्र वटारी भयंकर । दांत वाजती करकर । विकळ गात्र प्राणान्तीं ॥३२॥
पुरंदराच्या भिदुरप्रहारें । पतन पाविजे जेंवि गिरिवरें । ऐसा राक्षस पडिला धरे । रंगला रुधिरें गैरिकोपम ॥३३॥
पर्वतपतनीं गैरिका विखुरे । तेणें अरुणभा त्या वरी पसरे । तैसाचि बल्वल मुसळप्रहारें । रंगला रुधिरें सर्वाङ्गीं ॥३४॥
करपद पाखडी क्षणक्षणा । नेत्र भोंवडी पसरी वदना । ऐशा प्रकारें सोडिलें प्राणां । पडिला उताणा शवदेह ॥३५॥
असो बल्वल वधिला रामें । मुनिमनोरथ साधिले नियमें । मुनिवर नाचती पूर्णकामें । स्तवितीप्रेमें हळायुधा ॥३६॥

संस्तुत्य मुनयो रामं प्रयुज्यावितथाशिषः । अभ्यषिञ्चन्महाभागा वृत्रघ्नं विबुधा यथा ॥७॥

बल्वल राक्षस रामें वधिला । देखूनि मुनिवरा आनंद जाला । मग ते स्तविती बळरामाला । जेंवि इंद्राला दिवि विबुध ॥३७॥
वृत्रासुरातें वधितां समरीं । शक्रें वरिली जैं विजयश्री । तैं तो स्तविला जैसा अमरीं । तेंवि मुनिवरीं हळायुध ॥३८॥
इंद्र अमरीं अभिषेकिला । तैसा मुनींहीं बळ पूजिला । आशीर्वचनीं गौरविला । प्रशस्त लीला लक्षूनी ॥३९॥
मुनींहीं पूजिला कवणे परी । संकेत वदली शुकवैखरी । तें व्याख्यान श्रोतीं चतुरीं । भाषाप्रकारीं श्रवण कीजे ॥४०॥

वैजयंतें ददुर्मालां श्रीधामाम्लानपङ्कजाम् । रामाय वाससी दिव्ये दिव्यान्याभरणानि च ॥८॥

अभिषेकिला शक्रापरी । बैसवूनि मग आसना वरी । अर्ध्यपाद्यादि दिव्योपचारीं । ईश्वरा परी समर्चिलें ॥४१॥
मुकुटीं लोपती सहस्रकिरण । एककुण्डलमंडित श्रवण । ग्रैवेयकादि कंठाभरण । माळा अम्लान वैजयंती ॥४२॥
जें कां लक्ष्मीचें मंदिर । आमोदवेधें सेविता भ्रमर । केवळ पीयूषसरोवर । संभव अपर अनुपम ॥४३॥
ऐसी आपाद वैजयंती । मुनींहीं अर्पिली रामा प्रति । नीलाम्बर परिधानार्थी । दिधलें सुरपतिसेव्य जें ॥४४॥
अंगदें कंकणें मुद्रिका । जडित मेखळे क्षुद्रघंटिका । बिरुदमाळा अंदू वांक्या । पदपंकजीं लेवविल्या ॥४५॥
येथ अल्पज्ञ शंका करिती । सर्वाभरणें दिव्या आयिती । मुनीं पासीं कोठें होती । जे रामा प्रति समर्पिली ॥४६॥
तरी संकल्पमात्रें सृष्टिकर्त्ते । तपोवीर्य अमोघ ज्यांतें । महासिद्धीचीं अनेक शतें । अपाङ्गपातें वोळगती ॥४७॥
तेथ हे बालिशमतीची शंका । करणें उचित प्राकृतां लोकां । वाचूनि हरिवरदाची टीका । बोधनीं मूर्खां अयोग्यता ॥४८॥
दिव्याभरणें अनेक ऐसीं । लेवविलीं बळरामासी । दिव्यावतंस मुकुटदेशीं । आणि सुमनांसी अर्पियेलें ॥४९॥
उत्तरीयाम्बर अनर्घ्य दिव्य । वैकुण्ठनायकार्ह सुसेव्य । तें अर्पितां असंभाव्य । प्रभा फांकली नभोगर्भीं ॥५०॥
केशरमिश्रितचंदनउटी । तिलक रेखिला ललाटीं । अमूल्य सुमनहार घातले कंठीं । माणिक्य अक्षता लखलखित ॥५१॥
सौरभ्य धूसर उधळिला वरी । दशांग घातला विधूमाङ्गारीं । एकारती कृत कार्पूरी । अमृत पहारीं समर्पिलें ॥५२॥
फळ ताम्बूल सुवर्णसुमन । दक्षिणे अर्पूनियां मुनिजन । मंगलदीप नीराजन । पुष्पाञ्चली वाहिलिया ॥५३॥
प्रदक्षिणा नमस्कार । ऐसे अर्पोनि सर्वोपचार । संतोषविला रोहिणीकुमर । स्तुतिस्तोत्रजयगजरीं ॥५४॥
ब्रह्महत्येच्या निरसना । म्हणाल नेमिलें तीर्थाटना । प्रायश्चित्तीं केंवि पूजना । अर्ह ऐसें खळ म्हणती ॥५५॥
यास्तव तेथेंचि ऋषीश्वरीं । ईश्वर जाणोनि प्रलंबारी । साङ्ग पूजिला दिव्योपचारीं । तें गुह्य चतुरीं जाणावें ॥५६॥
तस्मात ईश्वर संकर्षण । त्यासि कें सूतहत्यादूषण । वेदाज्ञेसि दीधला मान । लोकसंग्रहणा कारणें ॥५७॥
ज्याच्या स्मरणें स्तवनें ध्यानें । लीलाचरित्रश्रवणपठनें । कळिमलाब्धि निस्तरणें । केंवि दूषणें तो लिम्पे ॥५८॥
आकाशासि जंव लागेल मळ । प्रळयानळासि भरे तरळ । सूर्यप्रभेवरी काजळ । धरिती कुशल जरी कोण्ही ॥५९॥
हेंही घडे कदाचित । परि कर्में न लिम्पे नित्यमुक्त । प्रत्यक्ष ईश्वर रोहिणीसुत । त्यातें दुष्कृत कें बाधी ॥६०॥
धर्मसंस्थापनेचि साठीं । निगमाज्ञा वंदूनि मुकुटीं । मान्य करूनि मुनींची गोठी । निर्वेशराहटी आदरिली ॥६१॥
भारतवर्षप्रदक्षिणा । मुनींहीं कथिली संकर्षणा । तदनुसार तीर्थाटना । करिता जाला अनुक्रमें ॥६२॥
बल्वलवधाख्यान कथिलें । मुनींहीं रामा प्रति पूजिलें । हरिवरदें तें समर्थिलें । दयार्णववदनें गोविन्दें ॥६३॥
या वरी तीर्थयात्रा रामें । जैसी केली अनुक्रमें । श्रवण करितां ते सप्रेमें । तत्फळगरिमे लाहिजे ॥६४॥

अथ तैरभ्यनुज्ञातः कौशिकीमेत्य ब्राह्मणैः । स्नात्वा सरोवरमगाद्यतः सरयुरास्रवत् ॥९॥

बल्वलवधा नंतर हळी । आज्ञा देतां मुनिमंडळी । यात्रापरिवार घेऊनि सकळी । पातला कूळीं कौशिकीचिया ॥६५॥
कौशिकीनामें पुण्यसरिता । ब्राह्मणां सहित रेवतीभर्त्ता । तीर्थविधानें स्नान कर्त्ता । जाला तत्वता द्विजवाक्यें ॥६६॥
तेथ त्रिरात्रावस्थान । करूनि सारिलें तीर्थविधान । पूजिले देवद्विजवर मान्य । याचक दीन तोषविले ॥६७॥
पुढें सामान्य मार्गीं तीर्थें । श्रद्धापूर्वक रेवतीकान्तें । करूनि सरयूच्या उगमाचें । जाता जाला अनुक्रमें ॥६८॥
म्हणाल कोठूनि सरयूउगम । तरी मानससरोवर जें उत्तम । जेथ क्रीडती अमरोत्तम । मराळसद्म मुनिसेव्य ॥६९॥
अमृततुल्य जेथिंचें तोय । पुलिनें केवळ रत्ननिचय । जेथ वाळु मुक्ताफळमय । मराळनिचय तद्भोक्ते ॥७०॥
परम सुकृती भमरपक्षी । होऊनि वसती कमळवृक्षीं । मृत्युलोकीं मनुजा चक्षीं । देखावयासि दुर्गम जें ॥७१॥
संकर्षणें स्वसामर्थ्यें । समुदायेंसिं जाऊनि तेथें । तीर्थविधान सारूनि पुरतें । देवद्विजांतें तोषविलें ॥७२॥
मानससरोवरींहून स्रवली । सरयूनामका सरिता भली । उगमा पासूनि तीर्थावळी । अनुलोम करी तत्तीरें ॥७३॥
सरा पासूनि स्रवली सरिता । सरयूनामका ते विख्याता । ऐरावताच्या दंतक्षता । स्तव उद्भवली सुरसेव्या ॥७४॥
रघुनामक सूर्यवंशीं । राजा प्रतापतेजोराशी । तेणें स्वशरें सरोवरासी । भेदूनि शरयू निर्मिली ॥७५॥
सरयू म्हणती सरःसंभवा । शरयू शरप्रहरोद्भवा । पात्र जाली दोहीं नांवा । दंततालव्य सशवर्णीं ॥७६॥
ते शरयू घालूनि दक्षिणहस्तें । उगमा पासून संगमातें । जातां अनुलोम जितुकीं तीर्थें । केलीं समस्तें तें ऐका ॥७७॥

अनुस्रातेन सरयूं प्रयागमुपगम्य सः । स्नात्वा संतर्प्य देवादीञ्जगाम पुलहाश्रमम् ॥१०॥

शरयूचिया उत्तरतीरें । पुण्यतीर्थें परम रुचिरें । पदोपदीं पृथकागारें । रोहिणीकुमरें संपादिलीं ॥७८॥
पंकजनाभपादोद्भवा । किरीटभूषण जें शंभवा । ते जाह्नवीचिया नांवा । स्मरतां आघवा भव निरसी ॥७९॥
तयेसिं शरयूचा संगम । दर्दरक्षेत्र ज्याचें नाम । तोचि प्रयाग उत्तमोत्तम । तीर्थानुक्रेमें ठाकियला ॥८०॥
तेथ मुख्य भृग्वासनीं । रामें क्रमिल्या पंच रजनी । महर्षीच्या सप्तासनीं । तीर्थविधानीं भजोनियां ॥८१॥
देव बाह्मण अनाथ दीन । त्यांतें यथोचित अभ्यर्चून । पुलहाश्रमा संकर्षण । जाता जाला अनुक्रमें ॥८२॥
पुलहाश्रम म्हणाल कोण । हरिश्रेत्र ज्या अभिधान । तेथील समस्त विधिविधान । पद्धतिप्रमाण सारियलें ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP