अध्याय ७४ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अयाजयन्महाराज याजका देवबर्चसः । राजसूयेन विधिवत्प्राचेत्समिवामराः ॥१६॥

महाराज या संबोधनें । श्रीशुक परीक्षितीतें म्हणे । यजिते झाले विधिविधानें । मंत्रपठनें ऋत्विज ते ॥१९॥
पूर्वीं जेंवि वरुणयज्ञीं । बृहस्पतिप्रमुखनिर्जरगणीं । साङ्गता केली विधिविधानीं । तेंवि मुनिजनीं धर्ममखीं ॥१२०॥
निर्जरतुल्य तेजःपुञ्ज । धर्मराजाचे ऋत्विज । यजनकाळीं दाविती ओज । धूम्रध्वज संतुष्ट ॥२१॥
प्रतिदिनीं यथोक्त करिती इष्टि । सदस्य सुरवर पाहती दृष्टी । हव्यवाहना परम तुष्टी । करिती गोष्ठी परस्परें ॥२२॥
पुढें सोमाभिषवदिवशीं । वर्तणूक जाहली कैसी । तें तूं परीक्षिति परियेसीं । कांहीं अल्पसी निवेदितों ॥२३॥

सुत्येऽहन्यवनीपालो याजकान्सदसस्पतीन् । अपूजयन्महाभागान्यथावत्सुसमाहितः ॥१७॥

सोमनिष्पत्ति विधिविधानीं । प्रवर्तिजे जिये दिनीं । तया म्हणिजे सुत्येहनी । अर्थ सर्वज्ञीं जाणावा ॥२४॥
तिये दिवसीं धर्मराजा । सुरभूसुरभूवरपूजा । करावया यथोक्तवोजा । नियतेन्द्रिय जाहला ॥१२५॥

सदस्याग्र्यार्हणार्ह वै विमृशंतः सभासदः । नाध्यगच्छन्ननैकांत्यात्सहदेवस्तदाब्रवीत् ॥१८॥

ऋत्विजांचा पूजाक्रम । सूत्रीं बोलिला अनुक्रम । विचार करणें नलगे परम । जाणोन निगमप्रतिपाद्य ॥२६॥
सदस्यांमाज दिधला क्षण । कश्यपनामा तो ब्राह्मण । त्याचें करूनियां पूजन । पुसे यजमान सर्वांसी ॥२७॥
ऋत्विज सदस्य सर्व वरिष्ठ । विवरूनि सांगा मजला स्पष्ट । सदस्यार्हणग्रहणा श्रेष्ठ । कोणता सुभट भूभर्ता ॥२८॥
मग ते सदस्य विचार करिती । शौर्यादित्य जो क्षत्रियजाती । अग्रपूजार्ह तोचि नृपती । श्रुतिसंमतीं निर्दिष्ट ॥२९॥
वीर्य शौर्य तुळितां देखा । आगळे दिसती एकएकां । श्रेष्ठत्वाचा न करवे लेखा । कथनीं शंका सभासदां ॥१३०॥
सर्वांमाजी एकचि श्रेष्ठ । असतां वदों शकिजे स्पष्ट । बहुतां श्रेष्ठांमाजि वरिष्ठ । म्हणतां कष्ट त्यां गमती ॥३१॥
एकाहूनि एक आगळा । देखूनि ऐसियां बहु भूपाळां । स्तब्ध झाला सदस्यमेळा । मग बोलिला सहदेव ॥३२॥
अग्रपूजेचा अग्रणी । कोण्ही सदस्य न वदती प्राणी । ऐसी अनवस्था देखोनी । बोले वचनीं माद्रेय ॥३३॥

अर्हति ह्यच्युतः श्रेष्ठ्यं भगवान्सात्वतां पतिः । एष वै देवताः सर्वा देशकालधनादयः ॥१९॥

श्रेष्ठत्वाचें प्रशंसन । करूं न शकती सदस्यगण । यदर्थी सदस्य गमला कोण । तो विवरून प्रकटावा ॥३४॥
सूर्य प्रकट असतां गगनीं । कासया गिंवसिजे तारकागणीं । प्रकट असतां मंदाकिनी । सरितां लागूनि कां पुसिजे ॥१३५॥
सफळ सद्गुणी अमरतरु । प्रकट दिसतांहि समोरु । बोरी बाभळी अर्कखदिरु । वज्र शेर विवरावें ॥३६॥
तैसे अनेक कुलीन भूप । वीर्यशौर्यादिप्रतापवंत । देखोनि सदस्य न करिती जल्प । तरी न कीजे कोपै मद्वचनीं ॥३७॥
यादवपति भक्तपात । षड्गुणैश्वर्यसंपत्ति । अच्युत तो हा सात्वतपति । अखिलात्ममूर्ति श्रेष्ठत्वें ॥३८॥
तो हा श्रीकृष्ण प्रकट असतां । संदेह कोण तुमचिया चित्ता । मार्तंड गवेषणा खद्योतां । माजि करितां कां न लजां ॥३९॥
अग्रपूजेचें श्रेष्ठत्व । द्यावया योग्य श्रीकेशव । हाचि केवळ देवता सर्व । काळावयवादिकरूनि ॥१४०॥
देश काळ वस्तु विशेष । इहीं न करवे निर्देश । अपरिच्छेद्य हृषीकेश । कां पां कोणास नावगमे ॥४१॥
श्रेष्ठत्व असतां जनार्दना । अग्र्यार्हणीं विषाद कोह्णां । झळंबेल ही शंका मना । तरी मम वचना अवधारा ॥४२॥
सकळ करणें एका देहीं । तरी प्राणावदानें मुखाच्या ठायीं । योजितां संतोषती सर्वही । कीं विषाद कांहीं गमे तयां ॥४३॥
तेंवि जगदात्मा श्रीकृष्ण । पूजितां संतुष्ट आब्रह्मभुवन । तेंचि वदतों प्रकट वचन । कीजे श्रवण सर्वांहीं ॥४४॥

यदात्मकमिदं विश्वं ऋतवश्च यदात्मकाः । अग्निराहुतयो मंत्राः सांख्यं योगश्च यत्परः ॥२०॥

आत्मा म्हणिजे देहाप्रति । तरी विश्व हें ज्या कृष्णाची मूर्ति । ऋतुकलाप वदल्या श्रुति । ते मख निश्चिती कृष्णतनु ॥१४५॥
अग्नि कृष्णाचें शरीर । कृष्णमयचि आहुतिमंत्र । आज्यसमिधादिक संभार । तो हा श्रीधर एकात्मा ॥४६॥
साङ्ख्य म्हणजे केवळ ज्ञान । आत्मानात्मविचारण । गुरुशिष्यात्मकमीमांसन । केवळ कृष्ण बोधात्मा ॥४७॥
योग म्हणिजे उपासना । अनादिवियोगपृथगापूर्णा । करावया तत्संयोजना । ज्या साधना साधिजे ॥४८॥
ब्रह्मरंध्रीं जें चैतन्य । अविद्याबिम्ब भासोनि भिन्न । आधारपर्यंत अधोवदन । प्रत्यग्बोधें अवगमलें ॥४९॥
तुरीय कारण सूक्ष्म स्थूळ । गुणकंचुकें प्रत्यय बहळ । लाहोनि भवभ्रम हा टवाळ । घाली गोंधळ विषयार्थ ॥१५०॥
परंतु मी कोण ऐसें नुमजे । अविद्याभ्रमरसपानें माजे । घेऊनि अहंता देहा ओझें । फुंजे रंजे कर्तृत्वें ॥५१॥
सुखदुःखचे साटपाठी । वाजतां हांव अधिकचि उठी । भोगी जन्ममरणाच्या कोटी । परि नुमजे गोठी सुटकेची ॥५२॥
जेंवि मंचकीं सुखशेजारीं । निद्रित होतां निज मंदिरीं । स्वप्नभ्रमें दुःखसागरीं । सुखदुःखलहरी वरपडणें ॥५३॥
तया अविद्याभ्रमितां जीवां । चेयिरें व्हावयाचिया उपावा । कृपा उपजे श्रीकेशवा । तैं जाजावा तो पावे ॥५४॥
भ्रमिष्ठ जाहलों येथूनि सुटणें । भ्रमितां न कळे भ्रमलेपणें । अतिकारुणिकें श्रीभगवानें । कृपा करणें तें उमजे ॥१५५॥
तैं जाजावे स्वप्नातिशयें । उत्कट भयें वोसणाये । येथूनि कैसी सुटका होये । तैं हें लाहे वैराग्य ॥५६॥
तैसा प्राणी भावावर्ती । त्रासोनि लाहे विषयोपहती । शरण जाय सद्गुरुप्रती । भवनिर्मुक्ति वाञ्छूनी ॥५७॥
तैं सद्गुरु बोधी ज्ञान । जो परमात्मा पूर्णचैतन्य । तदंश जीवात्मा तूं भिन्न । अविद्या वरून झालासी ॥५८॥
अविद्यावरण तें निरसाया । पूर्णचैतन्या परमात्मया । भजसी तैं तूं मुळींच्या ठायां । समरस पावसी तत्प्रेमें ॥५९॥
ऐसें बोधूनि सद्गुरुनाथ । कृपेनें मस्तकीं ठेवूनि हात । पूर्णचैतन्य सर्वगत । बोधी भजनार्थ क्रम त्याचा ॥१६०॥
अधोमुख जी कुण्डलिनी । मुख आधारीं पुच्छ मूर्ध्नि । आसनमुद्राप्रानरोधनीं । ऊर्ध्ववदनी ते कीजे ॥६१॥
आधार स्वाधीन मणिपुर । अनाहत विशुद्ध आज्ञाचक्र । भेदूनि पाविजे सहस्रार । परमसधीर सप्रेमें ॥६२॥
प्रपंचप्रेमा ते आसक्ति । भगवत्प्रेमा नाम भक्ति । तत्सिद्ध्यर्थ हे योगपद्धति । भवनिर्मुक्ति कारण पैं ॥६३॥
उपास्य जें तें पूर्णचैतन्य । उपासक प्रत्यगात्मा आपण । अविद्याभ्रमें वियोग जाण । तत्संयोजन या मार्गीं ॥६४॥
यया मार्गा म्हणिजे योग । तन्मय केवळ हा श्रीरंग । मान्त्रिकांचा भिन्नप्रसंग । म्हणाल सांग तरी ऐका ॥१६५॥
सबीज करोनि मंत्रोपदेश । बोधी ब्रह्मरंध्रीं उपास्य । अष्टधा बाह्य जड जें दृश्य । तेथ भजनास उपपादी ॥६६॥
दैनंदिन प्रळयास्तमानीं । सौषुप्त प्रेतत्व पावे रजनी । तन्निरसना अपर दिनीं । अधिकारसाधनीं प्रवर्तिजे ॥६७॥
उषसीं जागृत होऊनि साङ्ग । देहशुद्ध्यर्थ मलोत्सर्ग । मृज्जलें शौच सारूनि चांग । मुखक्षालन विद्ध्युक्त ॥६८॥
विसर्जूनि रात्रीचें वसन । करूनि धौताम्बर परिधान । एकाग्र कीजे आत्मचिन्तन । तनु झांकोन दृढवसनें ॥६९॥
आधारपर्यंत प्रत्यगात्मत्व । षट्चक्रक्रमें तें जीवित्व । ब्रह्मरंध्रीं जें पूर्णत्व । त्यामाजि एकत्व पावविजे ॥१७०॥
भावना मात्र करूनि ऐसी । पुन्हां भजिजे अन्वयासी । पूर्णचैतन्य शरीरकोशीं । भरलें ऐसें चिन्तावें ॥७१॥
शिव होऊनि शिवातें यजिजे । ऐसें मान्त्रिकें जें बोलिजे । तें जाणावें इये ओजें । भजनाधिकारप्रसंगें ॥७२॥
सगुणमूर्तीचें उपासन । तरी नचान्योऽस्मि अहं कृष्ण । ब्रह्माहमस्मि हें चिन्तन । निर्गुणभजकीं भावावें ॥७३॥
स्नानादिकर्मारंभीं सहसा । भजनाधिकारसिद्ध्यर्थ ऐसा । संकल्प कीजे निजमानसा । माजि फळाशा न धरूनी ॥७४॥
दक्षिणकनिष्ठाग्रें करून । जळीं कीजे यंत्रलेखन । आधारादिपीठपूजन । उपास्य ध्याऊन ब्रह्मरंध्रीं ॥१७५॥
नासाश्वासें यंत्रपीठीं । प्रधानोपास्य तें प्रतिष्ठीं । त्यातें पुजूनि आवरणघरटी । क्रमपरिपाठीं पूजावी ॥७६॥
तया प्रधानपदजळीं । आपण मारावी बुडकुळी । मग निघूनि तीर्थकुळीं । करावीं सकळीं नित्यकर्में ॥७७॥
मग येऊनि देवतासदना । करूनि यथोक्त भूशोधना । आसनीं बैसोनि दिग्बंधना । भूतशोधना करावें ॥७८॥
प्राणायामक्रमें पूर्ण । पापपुरुषाचें निर्द्दहन । रेचकाख्य समीरण । तद्भस्म तेणें उडवावें ॥७९॥
पुढती अमृतबीजें पूर्ण । चंद्रामृतें अभिवर्षोन । अमृतरूप तनु नूतन । चैतन्यघन भाववी ॥१८०॥
अंतरमात्रा बहिर्मात्रा । यथागमें न्यसिजे गात्रा । प्राणप्रतिष्ठापूर्वक तंत्रा । लक्षूनि पात्रां आसादिजे ॥८१॥
आधारादिपीठपूजन । यंत्रीं प्रतिमादिकीं जाण । कीं शालिग्रामादि पंचधा बाण । मांडूनि अर्चन करावें ॥८२॥
वामदक्षिणपद्धतिभेद । परस्परें कर्मविरोध । असो किमर्थ हा अनुवाद । काम्य निषिद्ध त्यागावें ॥८३॥
शुद्ध मुमुक्षु जे साधक । काम्य निषिद्ध त्यां बाधक । चित्तशुद्ध्यर्थ उपासक । सद्विवेकें आचरती ॥८४॥
पुष्पाञ्जलि घेऊनि करीं । पूर्ण उपास्य ब्रह्मरंध्रीं । नासाश्वासें त्या बाहेरी । प्रतिमायंत्रीं प्रतिष्ठिजे ॥१८५॥
सबीजमंत्राचें जें ध्यान । सावयव उपास्य तें चिन्तून । सर्वोपचार समर्पून । साङ्ग सावरण पूजूनियां ॥८६॥
पुढती संहारमुद्रायोगें । आकर्षूनि नासामार्गें । ब्रह्मरंध्रीं स्वयंयोगें । ऐक्यबोधें विसर्जिजे ॥८७॥
मान्त्रिकपूजा योगक्रमें । तैसे तन्निष्ठ असतां नियमें । सहसा नाकळिजे भवभ्रमें । उपास्य अवगमे उपासकीं ॥८८॥
एवं उपासना म्हणिजे योग । तोही कृष्णमयचि जाणिजे साङ्ग । कृष्णार्चनें साङ्गोपाङ्ग । ब्रह्माण्ड अव्यंग संतुष्ट ॥८९॥
मीमांसादि सांख्ययोग । कृष्णमय हे कथिले साङ्ग । वेदान्तप्रतिपाद्य श्रीरंग । तोही प्रसंग अवधारा ॥१९०॥
योग साङ्ख्य आणि मीमांसा । ऐक्यबोध यां घडे कैसा । तरी तें एकाग्र परिसा । श्रुतिरहस्या विवरूनि ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP