अध्याय ७१ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ऊचुः स्त्रियः पथि निरीक्ष्य मुकुंदपत्नीस्तारा यथोडुपसहाः किमकार्यमूभिः ।
यच्चक्षुषां पुरुषमौलिरुदारहासलीलावलोककलयोत्सवमातनोति ॥३६॥

चंद्रासवें जैशा तारा । तैशा कृष्णेंसीं सहचरा । देखोनि हरिरमणी नागरा । परस्परें म्हणताती ॥८॥
मार्गीं मुकुंदअनुगामिनी । सुभगा हरिरमणी देखोनी । नागरवनिता वदती वदनीं । सुकृतखाणी म्हणोनियां ॥९॥
इहीं केलें सुकृत काय । जेणें जोडले मुकुंदपाय । विभय भोगिती कमलाप्राय । धन्य हा उदय भाग्याचा ॥३१०॥
नरसुरवरिष्ठ पुरुषमौळीं । त्याचा मुकुटमणी वनमाळी । ज्या कारणास्तव तो हे सकळी । ललनामंडळी प्रोत्साही ॥११॥
उदार म्हणिजे प्रसन्न हास । लीलावलोक श्रृंगाररस । तेणें यांचिया लोचनांस । उत्साह जगदीश विस्तारी ॥१२॥
यास्तव धन्यतमा हरिरमणी । अपरा दुर्भगा भवभ्रमखाणी । ऐशा नागरा वदती वाणी । अंतःकरणीं रसरसूनी ॥१३॥
तथापि म्हणती आम्ही धन्य । नयनीं देखोनीं श्रीभगवान । अनेक जन्मींचा हरला शीण । हरिरसपानें मन धालें ॥१४॥
असो वनितांची कल्पना । वार्धुषवर्गीं पूजिलें कृष्णा । तें तूं ऐकें कुरुभूषणा । करी कथना योगीन्द्र ॥३१५॥

तत्र तत्रोपसंगम्य पौरा मंगलपाणयः । चक्रुः सपर्यां कृष्णाय श्रेणीमुख्या हतैनसः ॥३७॥

पुण्यमार्गें येतां हरी । वार्धुषवर्गाचिया हारी । आपुलाल्या स्वव्यापारीं । शतसहस्रीं जे मुख्य ॥१६॥
श्रेणीमुख्य जे नागरजन । करीं घेऊनि उपायन । कृष्ण पावतां आपुलें स्थान । करिती पूजन यथोचित ॥१७॥
वसनक्रयी स्वर्णक्रयी । इत्यादि अनेक जे व्यवसायी । कृष्ण येतां ते ते ठायीं । अतिलवलाहीं भेटती ॥१८॥
करीं घेऊन मंगळ हव्यें । कल्याणरूपें जीं जीं द्रव्यें । स्वधारूपें नव्हती कव्यें । जें कां गव्यें दध्यादि ॥१९॥
ऐशा अनेक वार्धुषश्रेणी । पृथक पूजिती चक्रपाण । कृष्णदर्शनें पातकधुणी । जैसे तरणी वितिमिर जे ॥३२०॥
तया निष्पापांची पूजा । घेऊनि चालिला सात्वतराजा । धर्मालयासमीप सहजा । आले वोजा तें ऐका ॥२१॥

अंतःपुरजनैः प्रीत्या मुकुन्दः फुल्ललोचनैः । ससंभ्रमैरभ्युपेतः प्राविशद्राजमंदिरम् ॥३८॥

धर्मसद्मासमीप कृष्ण । येतां अंतःपुरचरजन । कृष्णदर्शना प्रफुल्ल नयन । करिती अभिगमन सप्रेमें ॥२२॥
अंतःपुरजन म्हणाल कोण । ऐका तयांचें उपलक्षण । देहळीं सदसीं ज्यांचें स्थान । आज्ञानियमन अनुल्लंघ्य ॥२३॥
दुर्गरक्षक दिग्विभागीं । दुर्गाधिपतीचे संसर्गी । आयव्ययलेखक जे नियोगी । धनधान्यादिसंगोप्ते ॥२४॥
वृद्धाचारें नृपमंदिरें । सौविदल्लक अंतःपुरीं । पाण्डवावरोधरक्षणकारी । आले बाहेरी ते अवघे ॥३२५॥
प्रेमाह्लाद भरला देहीं । प्रफुल्ललोचनीं समस्तीं तिहीं । प्रीतीकरूनि मनोबाहीं । मुकुन्द हृदयीं आळंगिला ॥२६॥
जुहारूनि प्रभूचें पद । पुढें ठाकती समर्याद । राजमंदिरीं श्रीगोविन्द । सहवधूवृन्द प्रवेशविती ॥२७॥
प्रवेशतां नृपमंदिरीं । न बैसोनियां सभागारीं । पृथा नमावया श्रीहरी । गेला भीतरीं तें ऐका ॥२८॥

पृथा विलोक्य भ्रात्रेयं कृष्णं त्रिभुवनेश्वरम् । प्रीतात्मोत्थाय पर्यकात्सस्नुषा परिषस्वजे ॥३९॥

आपुल्या बंधूचा नंदन । भेटावया आला कृष्ण । पृथा उठिली मंचकावरून । येतां देखोनि सप्रेमें ॥२९॥
सामान्य नोहे बंधुतनय । त्रिभुवनेश्वर कमलाप्रिय । ज्यातें वंदिती समस्त आर्य । यदुकुळधुर्य जगत्पति ॥३३०॥
येतां देखोनि त्या गोपाळा । स्नुषा ते कां दुपदबाळा । तयेसहित हृदयकमळा । क्षेमालिम्गनीं कवळिला ॥३१॥
असो पृथेचें आलिङ्गन । येरीकडे पाण्डुनंदन । प्रेमें विस्मृत प्रपंचभान । तें व्याख्यान शुक वर्णी ॥३२॥

गोविंदं गृहमानीय देवदेवेशमादृतः । पूजायां नाविदत्कृत्यं प्रमोदोपहतो नृपः ॥४०॥

देव म्हणिजे निर्ज्जर सर्व । त्यांचा देव जो वासव । तयाचा ईश श्रीकेशव । द्वारकाराव गोविंद ॥३३॥
गोविन्दातें निजमंदिरीं । धर्में आणूनि सप्रेमगजरीं । पूजाप्रकार विविधोपचारीं । आह्लादभरीं न स्मरती ॥३४॥
परमानंदें निर्भर झाला । कृष्णदर्शनीं तटस्थ ठेला । पूजा व्यवहारकृत्य विसरला । कृष्णें मानिला संतोष ॥३३५॥
मद्दर्शनें प्रेमनिर्भर । पूजांमाजि हें पूजासार । अंतर जाणोनि रुक्मिणीवर । म्हणे हा युधिष्ठिर धन्यतम ॥३६॥
पृथा देवी पितृष्वसा । तिणें आलिङ्गितां जगदीशा । येरें नमिली त्या विशेषा । कुरुनरेशा शुक बोधी ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP