अध्याय ७१ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


आनर्त्तसौवीरमरूंस्तीर्त्वा विनशनं हरिः । गिरीन्नदीरतीयाय पुरग्रामव्रजाकरान् ॥२१॥

प्रथमदिवशीं आनर्त्तदेश । सौवीरलंघना द्वितीय दिवस । तिसरे दिवसीं हृषीकेश । मरुंमडला पातला ॥२००॥
मरुमंडळीं निर्जळमही । तो देश लंधूनि शेषशायी । पुष्करतीर्था सह समुदायीं । क्रमिलें त्रिरात्र संतोषें ॥१॥
राठापुरींचा अवघड घाट । लंघूनि चालिले घडघडाट । कुरुक्षेत्रीं श्रीवैकुंठ । झाला प्रविष्ट सेनेसीं ॥२॥
तेथ क्रमूनि पंचरात्र । तीर्थविधानें यथासूत्र । आचरूनि सह कलत्र । आणि सर्वत्र कटकेंसीं ॥३॥
मार्गीं लंघून दुर्गम गिरि । दुस्तर सरिता चक्रमूनि हरि । पुरीं ग्रामीं व्रजीं आकरीं । पृथगाकारीं कृत वसती ॥४॥
परिवारेंसी प्रयाण केलें । म्हणोनि मार्गीं स्थिर चाले । तत्प्रसंगें दाखविले । नाना देश वधूवर्गा ॥२०५॥
नाना नद्या नाना गिरि । नानातीर्थीं क्षेत्रीं उपरीं । राहूनि तेथींचा महिमा हरि । प्रकट करी सर्वांतें ॥६॥

ततो दृषद्वतीं तीर्त्वा मुकुंदोऽथ सरस्वतीम् । पञ्चालानथ मत्स्यांश्च शक्रप्रस्थमथागमत् ॥२२॥

त्यानंतरें दृषद्वती । परम दुर्गम जीतें म्हणती । तेही लंघूनि रुक्मिणीपती । मध्यप्रान्ती पातला ॥७॥
तदुपरि सरस्वतीचें पाणी । परिवारेंसी चक्रपाणी । त्रिरात्र प्राशूनि विधिविधानीं । पांचाळधरणी अतिक्रमिली ॥८॥
तयापुढें मत्स्यविषय । ल्म्घूनि चालिला देवकीतनय । पुढें प्रेरिला वार्तिकनिश्चय । सबंधु कुरुवर्य बोधावया ॥९॥
यावरी शक्रप्रस्था हरि । येता झाला सह परिवारीं । वार्ताऐकुनि षाण्डुकुमरीं । तोषले भारी तें ऐका ॥२१०॥

तमुपागतमाकर्ण्य प्रीतो दुर्दर्शनं नृणाम् । अजातशत्रुर्निरगात्सोपाध्यायः सुहृद्वृतः ॥२३॥

समीप ससैन्य हृषीकेशी । आला म्हणूनि वार्ता ऐसी । श्रवणीं पडतां पाण्डवांसी । तोष मानसीं न सांठें ॥११॥
परमप्रीतीनें आथिला । म्हणे अलभ्य लाभ झाला । ज्याचें दर्शन मनुष्याला । दुःखें श्रमतां दुर्लभ पै ॥१२॥
श्रीकृष्णाच्या दर्शनासाठीं । एक रिघती गिरिकपाटीं । दुर्धर तपश्चर्यांच्या कोटी । करिती हठी दृढनियमें ॥१३॥
वात पर्जन्य शीत उष्ण । साहती होऊनियां वितृष्ण । इत्यादि दुःखें त्यां दर्शन । दुर्लभ पूर्ण प्रनुजांतें ॥१४॥
तो हा प्रत्यक्ष पंकजपाणी । आला शक्रप्रस्थालागुनी । परम भाग्योदय मानूनी । कुरुवरमणी हरिखेला ॥२१५॥
अजातशत्रु धर्मराजा । भेटावया गरुडध्वजा । निघता झाला कोणे वोजा । उत्तरातनुजा तें ऐका ॥१६॥
बंधु सुहृद उपाध्याय । मंत्री अमात्य सह समुदाय । ज्येष्ठकनिष्ठ भगवत्प्रिय । परिवेष्टित निघाला ॥१७॥
जैसा उत्साह झाला मनीं । तो अवतरला सर्वां करणीं । तेणें सभ्रम कुरुपाटनीं । ऐका श्रवणीं तो आतां ॥१८॥

गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण भूयसा । अभ्यायात्स हृषीकेशं प्राणाः प्राणमिवादृतः ॥२४॥

कृष्णाभिगमना कुरुराव । निघतां निशाणीं घातला घाव । तेणें हरिदर्शनातें सर्व । निघती माव पुरवासी ॥१९॥
ताल मृदंग वीणे चांग । घन कांसोळा वितंतोपांग । पणवपटहप्रमुख चांग । वाजती साग वाजंत्रें ॥२२०॥
गायक गाती सप्तस्वरीं । नृत्य करिती नृत्यकारी । जेंवि अप्सरा अमरपुरीं । तेंवि सुंदरी वारांगना ॥२१॥
वादित्रघोषें भरलें नभ । त्यामाजि ब्रह्मघोष स्वयंभ । कृष्णप्रेमाचें वालभ । मानूनि दुर्लभ द्विज पढती ॥२२॥
ब्राह्मणोत्तम धर्मानिकटीं । विष्णुसूक्तीं शान्तिपाठीं । शाखाभेदें घडघडटीं । मंत्र वाक्पुटीं पढताती ॥२३॥
शाकल बाष्कल आश्वलायन । माण्डूकेयादि बह्वृचगण । ऋग्वेदाचें करीत पठन । आशीर्वचन पुरःसर ॥२४॥
कृष्णयजुष यातयाम । तैत्तिर ऐसें जयासि नाम । शाखाषट्कें पुरुषोत्तम । स्वतिती सप्रेम श्रुतिघोषें ॥२२५॥
अयातयामत माध्यंदिन । याज्ञवल्क्य कात्यायन । वाजसनेयप्रमुख गण । करिती स्तवन शुक्लयजु ॥२६॥
सहस्रशाखी जे सामक । सामें बृहत्सामादिक । पठनीं स्तविती पुण्यश्लोक । नित्य निर्दोष शुभसूक्तीं ॥२७॥
तैसेचि अथर्वांगिरस । अथर्वहृदय शिरोरहस्य । मंत्रप्रयोगपठनीं घोष । करूनि जगदीश तोषविती ॥२८॥
भूयसा म्हणिजे बहु ब्राह्मण । वहुशाखांचें बहुधा पठन । करितां ब्रह्मघोषें गगन । नादें संपूर्ण कोंदलें ॥२९॥
ऐसा युधिष्ठिर कृष्णाप्रति । गेला सामोरा अतिप्रीति । प्राणांसम्मुख इंद्रियवृत्ति । प्रफुल्ल होती जयापरी ॥२३०॥
प्रावृटीं सुभरें वर्षतां मेघ । ब्रह्माद्रीहूनि गौतमीवोघ । ठाकी महोदधीचें आंग । तेंचि श्रीरंग युधिष्ठिरें ॥३१॥

दृष्ट्वा विक्लिन्नहृदयः कृष्णं स्नेहेन पांडवः । चिराद्दृष्टं प्रियतमं सस्वजे‍ऽथ पुनःपुनः ॥२५॥

ऐसा महोत्साह सप्रेमगजरीं । युधिष्ठिर सहित बंधु चार्‍ही । पुढें येऊनि अत्यादरीं । पाहे मुरारी निज नयनीं ॥३२॥
धर्में देखोनि श्रीकृष्णातें । हृदयीं कोंदलें सप्रेम भरतें । हृदय द्रवलें चंद्रकान्तें । चंद्रदर्शना जेंवि लाहतां ॥३३॥
हरि जगदात्मा जगत्प्रिय । सुहृद्भावें मातुलेय । चिरकाळें तो अज अव्यय । देखोनि तन्मय युधिष्ठिर ॥३४॥
कृष्ण धर्मा जों नमस्कारी । येरू कवळी वरिच्यावरी । आलिङ्गूनि हृदयीं धरी । प्रेमलहरी अनावर ॥२३५॥
पुनःपुनः दृढालिङ्गी । ते घटिकेचा आल्हाद त्रिजगीं । उमाणूं न शकती भोगी त्यागी । अथवा योगी आत्मरत ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP