अध्याय ७१ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दोर्भ्यां परिष्वज्य रमामलालयं मुकुंदगात्रं नृपतिर्हताशुभः ।
लेभे परां निर्वृतिमश्रुलोचनो हृष्यत्तनुर्विस्मृतलोकविभ्रमः ॥२६॥

दोर्भ्यां म्हणिजे दोहीं बाही । रमानिलय जें निर्मळ पाहीं । श्रीकृष्णहृदय तें आपुलें हृदयीं । धर्म लवलाहीं आलिंगी ॥३७॥
कुरुवंशीं जो सार्वभौम । भविष्यमाण राजा धर्म । तेणें आलिंगूनि मुकुंदवर्ष्म । जाला निःसीम हुतशुभ ॥३८॥
आयसा आलिंगी स्पर्शमणी । अशुभ काळिमा तेचि क्षणीं । सांडूनि निवडे स्वर्णपणीं । दिव्याभरणीं हेम जैसें ॥३९॥
तेंवि कवळूनि मुकुंदगात्र । निष्पाप झाला युधिष्ठिर । सबाह्य परमानंद प्रचुर । नयनीं पाझर प्रेमाचे ॥२४०॥
हषनिर्भर झाली तनु । तेणें रोमांचपुलकोद्गमन । आपादमस्तक स्वेदजीवन । विश्रांतिपवनें सकंप ॥४१॥
श्वासविगत लागली काष्ठा । विस्मृत लौकिक विक्रम चेष्टा । बाणली कृष्णवैधैकनिष्ठा । अखिल कष्टां नष्टत्व ॥४२॥
कृष्णालिंगनीं ऐसी दशा । धर्मा झाली कुरुनरेशा । त्यानंतरें भीम कैसा । भेटला ईशा तें ऐका ॥४३॥

तं मातुलेयं परिरभ्य निर्वृतो भीमः स्मयन्प्रेमजवाकुलेंद्रियः ।
यमौ किरीटी च सुहृत्तमं मुदा प्रवृद्धबाष्पाः परिरेभिरे‍ऽच्युतम् ॥२७॥

आपुल्या मातुळाचा पुत्र । कृष्ण परमात्मा त्रिजगन्मित्र । आलिंगूनि त्याचें गात्र । झाला चिन्मात्रमय भीम ॥४४॥
प्रेमवेधें हरिली स्मृती । विराली देहभावाची ज्ञप्ति । आनंदजीवनें नेत्र ढळती । परम विश्रांती उपलब्ध ॥२४५॥
लवण भेटतां स्वकारणा । विसरे आंगींच्या कठिनपणा । तेंवि करणां प्राणांसह अभिमाना । माजि चैतन्या नुरणूक ॥४६॥
भीम भेटला ऐसिये परी । मग अर्जुनें आणि माद्रीकुमरीं । सोयरा जिवलग श्रीमुरारी । सप्रेमभरीं अलिंगिला ॥४७॥
त्र्यंबकीं लागतां घन वांकुडी । गौतमीपात्र भरे तांतडी । तेंवि अष्टभावांची प्रवृद्ध प्रौढी । नेत्रीं अनुघडी सुख बाष्पा ॥४८॥
अच्युतालिंगनें ऐसीं स्थिती । माद्रीकुमारांसी अर्जुनाप्रति । जालियावरी परिष्वंगरीती । कौरवपति अवधारीं ॥४९॥

अर्जुनेन परिष्वक्तो यमाभ्यामभिवादितः । ब्राह्मण्येभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च यथाऽर्हतः ॥२८॥

आधीं वंदूनि ब्राह्मणां । मग भेटावें कुरुनंदना । ऐंशिया क्रमाच्या लंघना । घडलें कृष्णा या साठीं ॥२५०॥
पाण्डवांचा प्रेमोत्कर्ष । देखोनि कळवळिला जगदीश । धांवूनिं वंदितां धर्मास । तेणें परेश वरि धरिला ॥५१॥
क्षेमालिंगनीं भेटतां धर्म । वयें आगळा जाणोनि भीम । कृष्णें करूं जातां प्रणाम । धरी तो वर्ष्म उचलूनी ॥५२॥
भीमें आलिंगिला कृष्ण । अर्जुनें वंदितां श्रीकृष्णचरण । कृष्णें समयवस्क तो जाणून । क्षेमा कवळून सुखी केला ॥५३॥
त्यानंतरें माद्रीपुत्रीं । श्रीकृष्णाचरण उत्तमगात्रीं । स्पर्शोनि बाष्पोदकें नेत्रीं । द्रवतां भूपात्रीं क्षाळिले ॥५४॥
कृष्णं स्पर्शोनियां करतळें । अबघ्राळ केलीं उभयमौळें । मग वंदिलीं द्विजांचीं कुळें । त्यावरी नमिले कुरुवृद्ध ॥२५५॥
प्रधान मंत्री अमात्य सचिव । नगरनागरिक महाजन सर्व । तिहीं वंदितां द्वारकाराव । सम्मान यथार्ह त्यां दिधला ॥५६॥
त्यावरा राजे माण्डलिक । कृष्णदर्शनें पावले हरिख । नभिते झाले एकें एक । तो हा श्लोक अवधारा ॥५७॥

मानिनो मानयामास कुरुसृंजयकैकयान् । सूतमागधगंधर्वान्बंदिनश्चोपमंत्रिणः ॥२९॥

कुरुदेशींचे सामंत पृथक । सृंजय कैकय कोसल प्रमुख । उभे ठाकूनि कृष्णसम्मुख । दंडप्राय नमिताती ॥५८॥
त्यांमाजि पूर्वीं वृद्धमान्य । त्यांतें तैसाचि सम्मान । देऊनियां जनार्दन । संतोषविता जाहला ॥५९॥
पुढें सूत मागधबंदी । कौतुकें दर्शक जे विनोदी । एवं उपमंत्री इत्यादि । पाहोनि संधी स्तव करिती ॥२६०॥
वंदूनि श्रीकृष्णाचे चरण । सूत मागध बंदिजन । विद्योपजीवी प्रशंसन । करिती सगुण प्रकटूनी ॥६१॥

मुदंगशंखपटहवीणापणवगोमुखैः । ब्राह्मणाश्चारविंदाक्षं तुष्टुवुर्ननृतुर्जगुः ॥३०॥

मुरजमंदल मृदंगजजाती । कंबु कल्याणरवें गर्जती । चर्मपिनद्धपटहपंक्ती । ढक्के दुंदुभि पणवादि ॥६२॥
ब्रह्मविपंची रुद्रवीणा । शारदा वल्लकीवादनप्रवीणा । सप्तस्वरीं गायनरचना । सारमंडळें सुरतंत्री ॥६३॥
मुखश्वासपूरित वाद्यें । तद्विद वाहूनि दाविती विद्ये । घंटा जेंगटें झल्लरी शब्दें । ताळ कांसोळ किंकिणिका ॥६४॥
वदना स्पष्ट अष्टोधारी । वेणु वाजती सप्तस्वरीं । नटवे नटिनी नृत्यकारी । नृत्य करिती चपळांगीं ॥२६५॥
सप्तस्वरीं गंधर्व गाती । किन्नर किन्नरी ताल धरिती । दिव्याप्सरी नृत्य करिती । रंग भरिती त्रौर्यत्रिक ॥६६॥
सूत मागध बंदिजन । करिती वंषप्रशंसन । भाट बिरुदावळीचें पठन । करिती वदनीं दीर्घस्वरें ॥६७॥
शांतिपाठ कल्याणसूक्तें । पढती द्विजवर्य वेदोक्तें । एक पढताती निरुक्तें । सांगोपांग वेंदांगें ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP