अध्याय ६९ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - इत्याचरंतं सद्धर्मान्पावनान्गृहमेधिनाम् । तमेव सर्वगेहेषु संतमेकं ददर्श ह ॥४१॥

शुक म्हणे गा परीक्षिति । पावना धर्मातें श्रीपति । इत्यादि आचरणीं त्याप्रति । मुन सत्पथीं अवलोकी ॥५१॥
वेदविहित ते सद्धर्म । गृहस्थाचें नित्य कर्म । सर्वां गेहीं मेघश्याम । आचरे त्यातें मुनि देखे ॥५२॥
एवं गृहस्थधर्मा पाहीं । एक असतां सर्वां गेहीं । आचरत्यातें देखूनि हृदयीं । मुनि नवायी हे मानी ॥५३॥
मुनिनारदें हरि प्रार्थिला । जे मायामोहीं न भुलवीं मजला । ऐसें ऐकूनि अनुग्रह केला । पुत्र मा खिदः म्हणोनियां ॥५४॥
अनुग्रह कैसा म्हणसी राया । कृपेनें कथिली निजात्ममाया । धर्मस्थापनाचिया कार्या । लोकशिक्षार्थें नरनाट्य ॥३५५॥
तया कृपानुग्रहप्रकाशें । एक होत्साता अनेक वेशें । आपणा दाविलें हृषीकेशें । नारदा ऐसें उमजलें ॥५६॥

कृष्णस्यानंतवीर्यस्य योगमायामहोदयम् । मुहुर्दृष्ट्वा ऋषिरभूद्विस्मितो जातकौतुकः ॥४२॥

ऐसा अनंतवीर्य श्रीकृष्ण । त्याचें योगमायाचरण । महोदयरूप अनुलक्षून । वारंवार बहु सदनीं ॥५७॥
ज्याचा योगमायामहोदय । जाणों न शके श्मशाननिलय । विधाता वज्री विदुषनिचय । तेथ काय अल्पमति ॥५८॥
ऐसा असतां विधिनंदना । योगमाया कळली जाणा । हे कृष्णाची अनुग्रहकरुणा । यास्तव मना स्मय मानी ॥५९॥
अद्भूतपूर्व हें कौतुक । मानूनि वारंवार सम्यक । विस्मित होय विरंचितोक । हा विवरीं विवेक कुरुवर्या ॥३६०॥
इतुकें कथूनि पुढतें काय । शुक नृपातें कथिता होय । तें परिसावया श्रोतृनिचय । चातकन्यायें सादर हो ॥६१॥

इत्यर्थकामधर्मेषु कृष्णेन श्रद्धितात्मना । सम्यक्सभाजितः प्रीतस्तमेवानुस्मरन्ययौ ॥४३॥

ऐशा प्रकारें कामधर्मार्थ । साधावयाचें परम आर्त । दावी स्वदेहीं भगवंत । श्रद्धावंत होत्साता ॥६२॥
तेणें नारद बरव्या परी । भजविला होत्साता स्वशरीरीं । मग सप्रेमप्रीतीकरूनि हरि । अनुस्मरूनि निघाला ॥६३॥
स्मरत होत्साता त्या कृष्णातें । अनुलक्षितें विविधें चरितें । वारंवार आठवी चित्तें । गगनपथें जातां तो ॥६४॥
त्यावरी नारदें देखिली लीला । एक्या श्लोकें तें कुरुपाळा । प्राञ्जळ प्रेमें शुक बोलिला । तो अर्थ परिसिला पाहिजे ॥३६५॥

एवं मनुष्यपदवीमनुवर्तमानो नारायणोऽखिल भवाय गृहीतशक्तिः ।
रेमेऽङ्गषोडशसहस्रवरांगनानां सव्रीडसौहृदनिरीक्षणहासजुष्टः ॥४४॥

एवं म्हणिजे पूर्वोक्तपरी । मनुष्यनाट्यमार्गकुसरी । अनुलक्षूनि वर्ततशरीरीं । नारायण जो नररूपी ॥६६॥
अखिलचराचरांच्या उत्पत्ती । कारणें जो अनेक मूर्ती । धरूनि प्रकटे अनेक शक्ति । अनेकां सदनीं विविधरूपें ॥६७॥
अंग ऐसिया संबोधनें । शुकाचार्य नृपातें म्हणे । जो सोळा सहस्र अंगनेक्षणें । रमता झाला सुसेवित ॥६८॥
नव्हती समान प्राकृता जना । ज्या कां केवळ वरांगना । सव्रीड सुहृद निरीक्षणा । हास्यविभ्रमें भुलविती ज्या ॥६९॥
वरांगना म्हणाल कैशा । निगमोत्तमांगश्रुति सुवेशा । सगुणनिर्गुणभावीं सरिशा । ज्या परेशा अनुसरती ॥३७०॥
प्रधानगुणसाम्या जिये म्हणती । पयोब्धिमथनीं सगुणोत्पत्ति । पावोनि रमा रमणीय मूर्ति । सेवी श्रीपति अभिन्नत्वें ॥७१॥
तियेचिसरिशा पयोब्धिभवा । अप्सरा सुरांगना ज्या अभिनवा । त्या येथ वरललना केशवा । ललितलाघवा भजविती ॥७२॥
सलज्जहास्यनिरीक्षणीं । सप्रेमसौहार्दविनयभाशणीं । सोळा सहस्रा वरांगनीं । अभीष्टक्रीडनीं क्रीडविला ॥७३॥
ऐसा तिहीं सेविला हरि । सकळ भावाची उत्पतीवारी । मनुष्यपदवीच्या अनुकारीं । अनेकापरी जो एका ॥७४॥
एवं ऐसीं मनुष्यनाट्यें । अभिनवकर्में श्रीवैकुंठें । केलीं तियें जो ऐके पढे । श्रेय घडे तें ऐका ॥३७५॥

यानीह विश्वविलयोद्भववृत्तिहेतुः कर्माण्यनन्यविषयाणि हरिश्चकार ।
यस्त्वङ्गगायति शृणोत्यनुमोदते वा भवितर्भवेद्भगवति ह्यपवर्गमार्गे ॥४५॥

अंग ऐसिया आमंत्रणें । बादरायणि नृपातें म्हणे । अभिनव कर्में केलीं कृष्णें । जीं पढतां वदनें भवहंतीं ॥७६॥
विश्वसृजनावनान्तभूतें । असाधारणें जियें कर्में येथें । केलीं न वचती आणिकांतें । कर्ता त्यांतें हरि झाला ॥७७॥
नृपातें मुनि म्हणे भो अंग । तीं हरिकर्में जो गाय सांग । अथवा परिसे जो अव्यंग । किंवा अभंग अनुमोदी ॥७८॥
श्रोत्यां वक्त्यांतें देखून । नमनें पूजनें सम्मानून । धन्य म्हणोनि अनुमोदन । करितो पावन हरि साम्यें ॥७९॥
अव्यभिचारिणी भगवद्भक्ति । अपवर्गातें जे प्रसवती । मोक्षप्रद मार्गाची दाती । करी प्रसरती त्रिजगीं तो ॥३८०॥
राया तुज हा संशय एक । सृजनावनान्तकर्में पृथक । विरंच्यादि यां प्रवर्तक । यदुनायक केंवि हेतु ॥८१॥
तरी तें मायिक गुणत्रय । तिये मायेसी जो आश्रय । तो हा केवळ अज अव्यय । देवकीतनय हरि येथ ॥८२॥
गुणत्रयाची सामर्थ्यशक्ति । तियेचें कारण जे प्रवृत्ति । निजांगें स्फुरद्रूप श्रीपति । दावी ते स्थिति तुज वदलों ॥८३॥
विरंचीनें करावें सृजन । तेणें करितां वत्साहरण । वत्सें गोपाळ हरि होऊन । मोहित पूर्ण तो केला ॥८४॥
पाहों पातला हरिगरिमेतें । तंव ते गोपाळ वत्सें समस्तें । हरिरूप देखूनि आपणयातें । नेणे स्मृतीतें सांडवला ॥३८५॥
अवघे दरारिगदाब्जपाणी । तितुक्या पृथक ब्रह्माण्डश्रेणी । आपुल्या मूर्ति तितुकिया चरणीं । अनेका देखूनि निर्बुजला ॥८६॥
कीं उदधीमाजी द्वारका सृजिली । नकळत मथुरा तेथ नेली । कीं रासरसार्थ रजनी केली । विधिष्माण्मासिक निजयोगें ॥८७॥
गोपां निकटीं सुप्त गोपिका । रासरंगणी रत सकळिका । एकल्या किंवा पृथक्पृथका । सृजिल्या ऐसें विधि नेणे ॥८८॥
मुचुकुन्दासी अनुग्रह केला । पूर्ववेश तैं प्रकटिला । तद्दृक्पातें यवन वधिला । हरवरदाला वंचूनी ॥८९॥
कीर्तिश्रवणशुक्लावारी । आत्मप्रकृति जे सुन्दरी । हरिली वैदर्भी नोवरी । विधिहर थोरी हे गाती ॥३९०॥
रुक्मिणीचे हरणसंधी । जरासंधादि राजे वरदी । जंकूनि कीर्ति कोणें कधीं । केली ऐसी सांग पां ॥९१॥
रुक्मि विटंबूनि समरंगीं । रुक्मिणीमानसातें न भंगी । ऐसा अंतरवेत्ता जगीं । दुसरा कोण दावीं पां ॥९२॥
आंगीं सामर्थ्य असतां पुरतें । प्रद्युम्नहरणीं सशोक वर्ते । रुक्मिणीमानस मोही पुरतें । वेत्तृत्व कोणातें हें सांग ॥९३॥
भक्तकामकल्पद्रुम । जाम्बवताचा अहंताभ्रम । भंगूनि संतुष्ट आत्माराम । पूर्णकाम तत्सुता वरी ॥९४॥
श्वशुरहंता शतधन्वान । त्यासी वधूनि श्रीभगवान । तत्संमतही अक्रूर जाण । स्वभक्त जाणून बुझाविला ॥३९५॥
आत्मनिरता नृपात्मजा । त्यांच्या जाणूनि हृदयकंजा । पांचही वरिल्या जाणोनि पैजा । स्वभक्तकाजा कळतळुनी ॥९६॥
ऐसा भक्तवत्सल हरि । असाधारणें कर्में करी । केलीं न वचती नरनिर्जरीं । भूचरीं खेचरीं असुरींही ॥९७॥
भौमें अदितीचीं कुण्डलें । सहित मणिशृंगही हरिलें । वरूणच्छत्र हिरोनि नेलें । परि विक्रम न चले देवांचा ॥९८॥
अमरीं येऊनि द्वारकापुरीं । ग्लानि दावूनि प्रार्थिला हरि । तैं भौमातें समरीं मारी । तें सुरवर स्वपुरीं यश गाती ॥९९॥
भामाप्रीतीस्तव सुरतरु । हरितां क्षोभला पुरंदरु । कृतघ्न होऊनि करितां समरु । कृष्णें सत्वर त्या दमिलें ॥४००॥
पार्यात आणूनि दिधला भामे । सोळा सहस्र कन्या भौमें । संग्रहिल्या त्या पुरुषोत्तमें । वरिल्या नियमें पृथक्त्वें ॥१॥
एके घटींत अवघ्या जणी । वरिल्या पृथक पाणिग्रहणीं । ऐसी असाधारण करणी । केली कोणीं सांग पां ॥२॥
तया पाणिग्रहणावसरीं । सर्वां मंडपीं सर्व सामग्री । सृज्ली पृथक्पृथगाकारीं । हे शक्ति पुरी हरिआंगीं ॥३॥
सांदीपनीचा पुत्र यमें । नेला त्यातें पुरुषोत्तमें । आणिलें ऐसीं अवनकर्में । आणिक कोणा करवती षैं ॥४॥
साक्षात् रुद्रही रक्षणपर । असतां छेदिले बाणकर । समरीं जिंकूनि श्रीशंकर । आणिलें वोहर निजनगरा ॥४०५॥
ब्रह्मशापें अंधकूपीं । अधोमुखी सरठरूपी । ऐसिया नृगातें निष्पापी । करूनि स्थापी सुरसद्मीं ॥६॥
काशीश्वरात्मज सुदक्षिण । तेणें तोषवूनि ईशान । अभिचारकृत्याहुताशन । द्वारकादहनीं क्षोभविला ॥७॥
कृत्यानळाची बोहरी । सुदक्षिणेंसीं काशीपुरी । ऋत्विज आचार्य सहपरिवारीं । जाळी श्रीहरि क्षणमात्रें ॥८॥
ऐसी प्रळयात्मकें कर्में । अनेक केलीं पुरुषोत्तमें । एवं गुणत्रयाचीं जन्में । संकल्पनियमें जो प्रकटी ॥९॥
प्रस्तुत राया ये अध्यायीं । हरिलीलेची नवनवलायी । कथिली ते त्वां श्रवणालयीं । भरिली कीं ना सांग पां ॥४१०॥
येथ षोडश सहस्रां सदनीं । नारदें देखिला चक्रपाणि । विविधा क्रीडा विविधाचरणीं । तुज व्याख्यानीं निवेदिल्या ॥११॥
विश्वस्थितिलयसृजनात्मकें । गुणकर्में जीं पृथक्पृथकें । केलीं एकें यदुनायकें । अलौकिकें अघहंतीं ॥१२॥
जो या कर्मांतें अनुमोदी । ऐके पढे आणिकां बोधी । तो भक्तीची परम सिद्धि । अपवर्ग साधी हरिभजनीं ॥१३॥
इतुकी कथा बादरायणि । परीक्षितीचे घाली श्रवणीं । शौनकसत्रीं रौमहर्षणी । जें वाखाणी सप्रेमें ॥१४॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मुनिगदित । दशमस्कंधीं कृष्णचरित । नारदेक्षिक हरिलीला ॥४१५॥
शुकपरीक्षितिसंवादमिषें । जगदुद्धरणास्तव श्रीव्यासें । पारमहंसी संहिता तोषें । पीयूषवल्ली पल्लवली ॥१६॥
ऊनसप्ततितम दशमांतील । अध्याय अमरतरूचें फूल । श्रोते होऊनि अळिउळ । हरियशः परिमळरस घेती ॥१७॥
एकनाथी प्रतिष्ठानीं । पिंगलाब्दीं अवर्षणीं । प्रौष्ठपदीं सित हरिदिनीं । भाषाटिप्पणी दयार्णवी हे ॥४१८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायांदयार्नवानुचरविरचितायां षोडशसहस्रहरिलीलावलोकनलालसा नारदनिर्यांपणं नामोनसप्ततितमोऽध्यायः ।
शके ॥१६९२॥ विकृतिनामसंवत्सरे फाल्गुनशुक्ल एकादशी प्रभातेधारुरीअध्यायसमाप्त ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका ओव्या ॥४१८॥ एवं संख्या ॥४६३॥ ( एकोणसत्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३२१३५ )

एकोणसत्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP