मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६९ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ६९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ६९ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर विभक्तरथ्यापथचत्वरापणैः शालासभाभी रुचिरां सुरालयैः ।संसिक्तमार्गांगणवीथिदेहलीं पतत्पताकाध्वजवारितातपाम् ॥६॥विभागें विभक्त पृथक्पृथक । विशाळ विस्तीर्ण राजमार्ग। सूत्रें धरूनि निर्मिले साङ्ग । शोभती अव्यंग चौबारें ॥५९॥दोहीं भागीं दुकानश्रेणी । निर्मिल्या दिव्यरत्नीं सुवर्णीं । सूर्यप्रभेचे वैदूर्यमणि । दिवसरजनि नुमसविती ॥६०॥पण्यशाळा विराजित । भरले अनेक पदार्थ । वार्धुष बैसले समर्थ । करिती यथार्थ क्रयविक्रय ॥६१॥द्वारकारचनावर्णनकारीं । पण्य सभा शाळा सकळी । कथिल्या तिहीं पुरी शोभिली । तैसी पाहिली मुनिवर्यें ॥६२॥पंचायतनीं देवालयें । रत्नखचितें कनकमयें । शिखरें गोपुरें त्रिदिवप्रायें । देखता होय मुनि नेत्रीं ॥६३॥केशरकस्तुरीचन्दनसडे । मार्गी घातले चहूंकडे । वीथि अंगणे प्राङ्गणें कोडें । सिंपिलीं निवाडे लखलखिती ॥६४॥मण्डप गोपुरें देहलिया । भगवच्चरित्रें चित्रिलिया । ध्वजपताका कलशाथिलिया । गगनीं तळपती प्रभंजनें ॥६५॥प्रचुर पताकांचीं वसनें । गगनीं विस्तीर्ण लंबायमानें । तळपतां वारिती भास्करकिरणें । द्वारका तेणें सुशोभित ॥६६॥ऐसिये द्वारके माझारी । सशत सोळा सहस्रां घरीं । विराजमान सर्वां परी । अन्तःपुर कृष्णाचें ॥६७॥तस्यामंतःपुरं श्रीमदर्चितं सर्वधिष्ण्यपैः । हरेः स्वकौशलं यत्र त्वष्ट्रा कार्त्स्न्येन दर्शितम् ॥७॥नारदें पाहिलें द्वारकापुर । वैकुंठभुवनाहूनि सुन्दर । त्यामाजी हरीचें अंतःपुर । लक्षुनि सत्वर प्रवेशला ॥६८॥तें अंतःपुर म्हणाल कैसें । सर्व धिष्ण्यषीं अर्चिलें असे । पदार्थरक्षकांचेनि मिषें । वास्तुविशेषें विराजती ॥६९॥धिष्ण्यप म्हणिजे लोकपाळ । पूर्वभागीं आखण्डळ । हयगजगोधनादिक क्रमेळ । शिक्षी रक्षीं अजस्र ॥७०॥पाकशाळा आधिष्ठून । सावध सर्वदा कृशान । शयनशाळेचें रक्षण । करी आपण संयमिता ॥७१॥आयतनमळजळपरित्याग । मळोत्सर्ग शाळामार्ग । तें स्थळ निरृति रक्षी साङ्ग । सावध अव्यंग अहर्निश ॥७२॥वस्त्राशाळा रक्षी वरुण । शस्त्रशाळा प्रभंजन । द्रविणभाण्डार वैश्रवण । रक्षी आपण अंतद्रित ॥७३॥देवायतनशाळेप्रति । वर्ते अधिष्ठूनि पशुपति । जो कां लोकपाळांचे पंक्ति । ईशान म्हणती दिग्नाथ ॥७४॥असो धिष्ण्यप ऐसिये परी । श्रीकृष्णाचे अन्तःपुरीं । सर्वदा स्वर्चित स्वाधिकारीं । सादर वर्तती हरिप्रेमें ॥७५॥निखिल कुशलत्वाची सीमा । अन्तःपुरीं श्रीहरिधामा । निर्मूनि दावी विश्वकर्मा । पुरुषोत्तमा तोषार्थ ॥७६॥ऐसीं अन्तःपुरमंदिरें । षोडशसहस्र पृथागाकारें । कृत्स्नकौशल्यें त्वष्टारें । निर्मूनि सुंदरें दाखविलीं ॥७७॥तत्र षोडशभिः सद्मसहस्रैः समलंकृतम् । विवेशैकतमं शौरेः पत्नीनां भवनं महत् ॥८॥सोळा सहस्र सदनें करूनि । हरि अन्तःपुरीं विराजमान । त्यामाजी कोणे एके स्त्रीचें भुवन । विधिनंदन प्रवेशला ॥७८॥मुनि प्रवेशला जे मंदिरीं । ते सदनींची लावण्यकुसरी । सादर पाहता झाला नेत्रीं । शुकवैखरी ते वर्णी ॥७९॥विष्टब्धं विद्रुमस्तंभैर्वैदूर्यफलकोत्तमैः । इन्द्रनीलमयैः कुड्यैर्जगत्या चाहतत्विषा ॥९॥चौं श्लोकीं ते भुवरचना । शुकें निवेदिली कुरुभूषणा । श्रवणमात्रें अमरसदना । देखिलें वाटे श्रोतयां ॥८०॥वास्तुवेदिका पाचुबंदी । वज्रस्तंभनें निरवधि । बिदुमस्तंभ दडपिले बुद्धी । वैदुर्यउथाळीं अष्टदळें ॥८१॥भित्ती इंद्रनीळमय शोभती । शक्रोपळमय निबद्ध जगती । उभयप्रभाभासुरकान्ति । निरभ्रनभ भासतसे ॥८२॥पुष्करागाचे तुळवट । पद्मरागाचे किलचा पाट । गोमेदाचे कांसवट । दांडे निघोंट मारकती ॥८३॥वज्रमनि कोरूनि निगुती । हिंदोळियाची केली आयती । मंचकपालकलंबनाप्रति । शृंखळा युक्ति निर्मिल्या ॥८४॥रत्नभितीचे कोनाडे । कौशल्याकळितां कंजज नाडे । लक्ष्मीलालस लक्षील कोडें । ऐसिये चाडे करी त्वष्टा ॥८५॥कर्बुरकर्दमनिर्मितभित्ति । अमररत्नाच्या चित्राकृति । विश्वकर्मा निर्मीं निगुती । त्रैलोक्यपति तोषावया ॥८६॥हर्म्यभित्ती भर्ममया । शर्मद सर्वांच्या डोळ्या । कर्में सात्त्विकें पहावया । अर्ह होती सुकृति जे ॥८७॥ऐसिये भुवनीं विलाससदनीं । निःशंक प्रवेशे नारदमुनि । तेथिची शोभा श्रीशुक वर्णी । तेही श्रवणीं अवधारा ॥८८॥वितानैर्निर्मितैस्त्वष्ट्रा मुक्तादामविलंबिभिः । दांतैरासनपर्यंकैर्मण्युत्तमपरिष्कृतैः ॥१०॥अमल्यवितानें भुवनगर्भीं । विश्वकर्मा स्वयंभ निर्मी । उपमा द्यावया तिये कर्मीं । निर्जरसद्मीं लक्षेना ॥८९॥चंद्रपुटाचे चांदवे । मुक्ताफळांचे घोंस बरवे । त्यांमाजी रत्नमणींचे यावे । निजस्वभावें प्रकाशती ॥९०॥अष्टदिग्भागीं बंधनें । निर्मिलीं जाम्बूनदसुवर्णें । जिया वितानांकारणें । पृथग्विधानें अनेक ॥९१॥खणोखणीं वितानें भिन्न । तिहींकरूनि शोभाढ्य भुवन । सादर पाहोनि विधिनंदन । कौतुकें आन अवलोकी ॥९२॥क्षीरोदमथनोद्भव कुंजर । तत्संतति तत्तुल्य अपर । तयांचे दंत विशालतर । आणूनि सादर त्वष्ट्यानें ॥९३॥पर्यंक निर्मिले कुसरी । उत्तम मणि जडिले वरी । जैसे दिनमणि प्रकटले रात्रीं । हरिमंदिरीं बहुरंगी ॥९४॥कनककौशेयसंमिश्रवसनें । ज्यांवरी चित्रिलीं निर्जरभुवनें । ऐसीं जवनिकें विधिनंदनें । पाहोनि नयनें स्मय मानी ॥९५॥हंसपिच्छांच्या तळिका । सुरंगवसनीं छादिल्या देखा । कुंजरदंताच्या पर्यंका । सोपबर्हणा विराजती ॥९६॥रत्नखचितगण्डूषपात्रें । मंचकातळीं पंकजाकारें । विशेष ताम्बूलष्ठीवनाधारें । कार्तस्वरमय जडितांचीं ॥९७॥ऐसी उपकरणसामग्री । वदतां मौनावे वैखरी । कुशला पटुतर तत्परिचारीं । किंकर किंकरी तें ऐका ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP