मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४९ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ४९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ अध्याय ४९ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर एकः प्रसूयते जंतुरेक एव प्रलीयते । एकोऽनुभुंक्ते सुकृतमेक एव च दुष्कृतम् ॥२१॥कुक्टुंबकर्तृत्वाभिमानी पुरुष । संग्रहूनि अवघे दोष । भोगी अनेक गर्भवास । तद्भोगास नये दुजा ॥२७०॥जननीजनक कामासक्त । रमतां मिले शुक्लशोणित । तेथ संभवे अकस्मात । अवधीपर्यंत जाचतसे ॥७१॥विष्ठादाथर मूत्र आधण । गर्भखोळे उल्बावरण । वांती पित्त चिळसी स्थान । वदन घ्राण निरोधित ॥७२॥ऐसिये गर्भखोळे स्तब्ध । अधोमुख प्राणरोध । दुःखयातना होती विविध । त्या सोसी सखेद एकाकी ॥७३॥पुढें प्रसूति होते काळीं । प्रसूतिवाताची वाहुटुळी । अधोर्ध्व गर्भातें घोंटाळी । तेणें तळमळी गर्भस्थ ॥७४॥वेणे वरी येती वेणा । गर्भिणी सोडूं पाहे प्राणा । होय गर्भाचा घोळणा । तें दुःख कोण्हा सांगेल ॥२७५॥त्यामाजि प्राणि जे सुकृती । ते लाहती सुप्रसूति । येरां पापिष्ठां विपत्ति । उपप्रसूति करघातें ॥७६॥सुइणी आणिती प्रसवचाडे । मग त्या जाणोनि सांगडें । उपाय करिती कठिण कुडे । गर्भाकडे न पाहती ॥७७॥असो न बोलूं विचकट । पूर्वोक्त मोहांध पापिष्ठ । एकट भोगी प्रसवकष्ट । न पवे इष्ट तेथ दुजा ॥७८॥मातृकोदरा बाहीर पडे । जातमात्र गात्रें उघडें । नवनीतपिंडाचेनि पाडें । तोडिती किडे चहूंकडुनी ॥७९॥माता निजवी शय्येवरी । तेथ मत्कुण झोंबती गात्रीं । कोमळ रुधिर प्राशिती वक्त्रीं । भरती नेत्रीं घुंगरडीं ॥२८०॥मक्षिका झोंबती चहूंकडे । चिलटें पिया मुंग्या माकोडें । तेणें दुःखें तळमळी आरडे । तैं माता कोडें गरळा दे ॥८१॥यवानी चावूनि देतां गरळा । तेणें मुखाचा होय हुरपळा । परि तें दुःख नेणे बरळा । वाणि सरळा कथूं न शके ॥८२॥एकलाचि त्या दुःखें मिडके । साहों न शके विषम तिडके । पडिले ठायीं कुडे लिडके । परि न फडके तेथूनी ॥८३॥पुन्हा तारुन्यीं ममताभरें । क्षोभे कामाचें काविरें । षड्रिपूंच्या महामारें । दुःखें अघोरें वोसंती ॥८४॥अपेश पावे रडे पडे । पुन्हा आंगीं हव्यास चढे । अष्टमदांच्या उफाडें । कर्म कुडें प्रिय मानी ॥२८५॥एका कर्मी पोळे आपटे । सवेंचि आणिके कर्मीं वेंठे । परंतु न टकी कर्म खोटें । भोगी दुर्घटें दुष्कर्मं ॥८६॥तेथही एकाकी आपण । वाढवूनियां देहाभिमान । भोगी दुर्घट दुःख कठिण । पावे मरण एकाकी ॥८७॥संगे न येती जायापुत्र । वृत्तिक्षेत्र स्वकुलगोत्र । अर्थ स्वार्थ जिवलगमित्र । दुहिता दौहित्र न येती ॥८८॥पाप अथवा पुण्य जोडी । जिता मेलियाही न सोडी । भोग विफळ भोगपरवडी । जे ज्यां आवडी शुभाशुभीं ॥८९॥करितां कर्म वाटे नीट । भोगितां होय हृदयस्फोट । यालागीं विवेकविचारनिष्ट । सहसा अनिष्ट नाचरती ॥२९०॥कुरुवरिष्ठा अंबिकातनया । नीति विवरूनि प्रवर्त्तें न्याया । पुत्रममता राज्यमाया । धरितां अपाया आतुडसी ॥९१॥अन्यायोपार्जित जें धन । मानिती मोहांध तें जीवन । तेणें गुणीं पावती व्यसन । तें आख्यान अवधारीं ॥९२॥अधर्मोपचितं वित्तं हरंत्यन्येऽल्पमेधसः । संभोजनीयापदेशैर्जलानीव जलौकसः ॥२२॥प्राणप्रियतम जायाकुमर । ऋणानुबंधें वियोगपर । तदर्थ धनधान्य मंदिर । जोडिती पामर अन्यायें ॥९३॥लोभ धरिला जेणें भावें । तैसा तयाचा उपयोग नव्हे । प्रतिपदीं दुःखद जे ते आघवे । शत्रु मानावे तैं ना ते ॥९४॥म्हणाल वियोगें दुःखद होती । प्रियसंवासें सुखावाप्ति । हेही न घडे येथ युक्ति । ऐक व्युत्पत्ति श्लोकाक्त ॥२९५॥अल्पमेधस जो मंदमती । परमपुरुषार्थ ज्या विषयावाप्ति । पांचभौतिक आत्मप्रतीति । जायासंतति समवेत ॥९६॥अधर्मक्लेशोपार्जितधन । पुत्रकलत्रमिषेंकरून । पोष्यवर्गें करिती हरण । तैं त्या मरण धनहरणीं ॥९७॥लोभिया मंदमतीचें धन । जेंवि मत्स्याचें जीवन । पोष्य होऊनि करिती हरण । तैं त्या मरण धनहरणीं ॥९८॥एकला मत्स्य क्रीडतां जळीं । जीवनसंग्रहें जैसा बळि । त्यासि कामेच्छा जैं कवळी । तैं आदरी केली शफरीशीं ॥९९॥कामलोभें क्रीडती सुखें । स्वादुजीवन प्राशिती मुखें । तोषती संततिबाहुल्यहरिखें । एकमेकें हृत्कमळीं ॥३००॥तेथ सहवासी जळचर । कर्ककच्छपादि दर्दुर । पोष्यमिसें जलापहार । करिती साचार यथेष्ट ॥१॥कर्क उकरितां पदती छिद्रें । तद्द्वारा तें जळ पाझरे । कूर्म मंडूक रोधितां झरे । पुन्हा न भरे जळ तेणीं ॥२॥संतति आणि जलौकसें । आप्त मानिलीं निजसंवासें । वृद्धि होतां येणें मिसें । अवचट माणुसें देखती त्यां ॥३॥मग ढीवर घालिती जाळ । जळ तें डहुळिती तत्काळ । शोधूनि काढिती मत्स्य स्थूळ । क्लेश बहळ मग भोगी ॥४॥एवं सहवासें प्रियतम । तद्व्याजें ते शत्रुचि सम । ऐसें नेणे नर जो अधम । दुःखपरम तो भोगी ॥३०५॥ऐकें राया प्रज्ञाचक्षु । न उन्मळिजे स्वधर्मवृक्षु । हृदयीं करूनि ईश्वर साक्ष । अन्यायपक्ष सोडावा ॥६॥आप्त मानूनि जायातनय । पोशी करूनि परमान्याय । त्या मूर्खातें तेंचि स्वकीय । घेऊनि राय उपेक्षिती ॥७॥तें या श्लोकीं अक्रूर कथी । परिसा योगींद्रवरभारती । क्षणैक अवधान देऊनि श्रोतीं । हृदयीं निगुती विवरावी ॥८॥पुष्णाति यानधर्मेण स्वबुद्ध्या तमपंडितम् । तेऽकृतार्थं प्रहिण्वंति प्राणा रायः सुतादयः ॥२३॥ज्यातें पोषी जयासाठीं । न त्यासी घडतां तैसी राहटी । तेणें दुःखाग्नि प्रज्वळे पोटीं । विरुद्ध गोठी परस्परें ॥९॥तें अधर्मोपार्जित धनें करून । ज्यातें पोषिलें आप्त मानून । तेंचि हिरूनि घेती धन । उपेक्षूनि त्या अपंडिता ॥३१०॥परम मूर्ख तो अपंडित । जैसे इच्छी मनोरथ । ते सुखभोग न होतां प्रपत । करिती आप्त धनहरण ॥११॥आप्त मानूनि जे पोषिले । ते धना हिरोनि पारिखे झाले । त्यां निमित्त जे अधर्म केले । ते ते भोगिले पाहिजती ॥१२॥राज्य करावें आपुल्या पुत्रीं । निष्कंटक एकच्छत्री । समुद्रवलयांकित धरित्री । आज्ञापत्रीं शासनत्वें ॥१३॥ते सुत आपणा देखतां मरती । तैं निष्फळतां मनोरथीं । आमरणान्त दुःखावाप्ति । मेल्या दुर्गति अधर्में ॥१४॥जित असतां प्रतीप झाले । तर्ही मनोरथ वायां गेले । जिता मेल्या क्लेश दिधले । भोग इच्छिले न लभोनी ॥३१५॥धनसदनादिराष्ट्रधरणी । सुखा कारणें अधर्माचरणीं । जोडिली ते बलिष्ठ जनीं । घेतां हिरोनि दे दुःख ॥१६॥अधर्माचरणें विषय जोडी । पिंडपोषणें प्राणावडी । ते प्राण जैं त्यजिती कुडी । तैं देइजे बुडी दुःखडोहीं ॥१७॥जिता मेल्या वियोगयोगें । पोष्यें देती दुःखें अनेगें । त्यांच्या पोषणीं करितां अघें । भोगणें लागे तें ऐकें ॥१८॥स्वयं किल्बिषमादाय तैस्त्यक्तो नार्थकोविदः ।अद्धिसार्थो विशत्यधं स्वधर्मविमुखस्तमः ॥२४॥पुत्रादि पोष्यें जियें परम । राय ऐसें धनाचें नाम । क्षुधा तृषा प्राणधर्म । कीजे अधर्म यांसाठीं ॥१९॥तंव ते विपरीत पुत्रादिक । करिती धनाचा अभिलाख । तेणें अत्यंत पावे दुःख । करी शोक आठवितां ॥३२०॥शोकें जर्जर पंजर होय । तैं प्राणवर्गही त्यजूनि जाय । तदर्थ केला पापनिचय । तो नवजाय त्या सरिसा ॥२१॥जेम्वि शत्रु हाणी घाय । क्षत ठेवूनि शस्त्र जाय । तैसा आप्तांचा समुदाय । विमुख होय अघदानें ॥२२॥जेथ जेथ स्नेहबंधन निकें । हृदयीं शोकशंकुचि तितुके । मोहें रोंविले अविवेकें । देती दुःखें अहरह ते ॥२३॥पुढें होईल ऐसी दशा । अनर्थज्ञ तो नेणे ऐसा । पात्र होऊनि अधर्मदोषा । मग भोगी क्लेशा अंधतमीं ॥२४॥समस्तांचिया पोषणभिडा । स्वयें पापाचा उकरडा । आप्तीं त्यागिला जो निचाडा । इच्छिल्या चाडा न पुरतां ॥३२५॥मग तो अपूर्ण मनोरथ । ज्यातें म्हणिजे असिद्धार्थ । स्वधर्मविमुख पैं दुर्वृत्त । भोगी अनंत यातना ॥२६॥नरकमार्गीची सिदोरी । स्वयें तो किल्विष बांधोनि पदरीं । अंधतमीं प्रवेश करी । नरकाधिकारी आकल्प ॥२७॥इहलोकीं शोकाभिभूत । घनपिशाचमृतप्रेत । पुढें यमयातना अनंत । भोगूनि प्रवेशत अंधतमीं ॥२८॥असिपत्रीं निक्षेपण । तप्तताम्रभूमिके शयन । कुंभपाकीं करिती कथन । विषमाचरण स्मरविती ॥२९॥वज्रचंचूंचे वायसनिकर । वृश्चिकवृकव्याघ्रादि हिंस्र । ऐसे निर्दय यमकिंकर । अधर्मीं पामर ते पीडिती ॥३३०॥पूयपंकीं क्लेदन करिती । रजोरुधिरीं निमज्जिती । विष्ठाभांडामाजि पचिती । कीं जाचिती दंडवरी ॥३१॥सहस्रें सहस्र वृश्चिकजाति । विषोल्बण जे क्रूरनिधाती । एकएका रोमगर्तीं । क्रोधें स्पर्शती यमाज्ञा ॥३२॥किंबहुना तियें दुर्दंशपेवें । तेथ जाचिती दुष्कृतिजीवें । एवं भोगूनि निरय अघवे । अंतीं पावे अंधतमीं ॥३३॥म्हणाल नरक पृथगाकारें । मूळीं न कथिलें व्यासकुमरें । तरी विवाह म्हणतां संभ्रमगजरें । संस्कारचतुरें जाणावें ॥३४॥कीं तट लंघूनि भरला पूर । मग सोपानपंक्ति समग्र । क्रमें अतिक्रमूनि चढलें नीर । हें तो चतुर जानती ॥३३५॥येर्हवीं सामान्य जरी राजा । दंड करी जैं पापपुंजा । तैं ताडन बंधन शासन वोजा । शूळाग्रध्वजां करी अंतीं ॥३६॥तेथ शूळारोपण सर्व वदती । चतुर शासनक्रम जानती । तिहीं कथितां अबळांप्रति । वृथा वदंती न मनावी ॥३७॥ऐसी अक्रूरें कुरुभूपाप्रति । अधर्मकर निरयपंक्ति । कथूनि उपसंहरी अंतीं । ते शुकोक्ति अवधारा ॥३८॥तस्माल्लोकमिमं राजन्स्वप्नमायामनोरथम् ।वीक्ष्यायम्याऽत्मनाऽत्मानं समः शांतो भव प्रभो ॥२५॥तस्मात् कोण्हाचें नोहे कोण्ही । इहलोकींची विचित्र कहाणी । कौरवभूषा ऐकें श्रवणीं । सावध होऊन क्षण एक ॥३९॥जैसा बुद्धिबळाचा डाव । क्रीडामिसें अहंभाव । क्षोभोनि जैसी चढे हांव । तेंवि हे माव संसारीं ॥३४०॥खेळ खेळतां वाव झाला । परी आयुष्यक्षय वृथा केला । हें तो न कळे पामराला । जेंवि तस्करीं लुटिला निद्रिस्त ॥४१॥निद्रेमाजीं स्वप्नीं राजा । विगुंतला त्या संभ्रमकाजा । बाहिरी चोरी लुटिला पैजा । तें निर्लज्जा स्मरएना ॥४२॥माया म्हणिजे दैवकृत । तन्निष्ठप्राणी मोहग्रस्त । विषयीं होऊनि आसक्त । निजपरमार्थ विसरती ॥४३॥विषय स्वप्नाभ क्षणभंगुर । तेथ होऊनि स्वार्थपर । अधर्माचरनें निरय घोर । अनेक दुस्तर भोगिती ॥४४॥विषयाभास ते कल्पना । संस्कारजनित मनोरथरचना । चित्प्रकाशें स्फुरती मना । गुणानुसार शुभाशुभ ॥३४५॥तदनुसार पामर प्राणी । भांबावोनि विषयाचरणीं । प्रवर्तती त्या पातकश्रेणी । यमजाचणी तद्भोगें ॥४६॥आंगीं तारुण्याचा भर । प्रबल कामाचा संचार । कन्याभगिनीमातृशरीर । देखतां विकार उमटती ॥४७॥विकारांसरिसा तनुसंगम । झालिया कायिक पापोद्गम । दर्शनमात्रें चित्तोद्यम । करी त्या नाम मानसिक ॥४८॥सूक्ष्मकामोर्मि अंतरीं । जर्ही तो वर्तें सदाचारीं । तर्हीं स्वप्नीं बलात्कारीं । काम विकारीं व्यभिचारे ॥४९॥माता दुहिता भगिनीसम । स्वप्नीं पारांगनासंगम । तरी तें मानसिक दुष्कर्म । घडलें निःसीम जाणावें ॥३५०॥कायक्रोधांच्या आवेशें । सकामजल्पें साभिलाषें । घडे कीं न घडे पाहे ऐसें । वाचिकादोषें तो लिंपे ॥५१॥याचिसाठीं तारुण्यभरीं । संन्यास न कीजे प्रेषोच्चारीं । मनोनिग्रहविरक्ति नरीं । अभ्यासकुमरीं साधावा ॥५२॥सच्छास्रश्रवणें सद्विचारें । सत्संगमें सदाचारें । श्रद्दधानें अभ्यंतरें । अभ्यास मोहरे मन लागे ॥५३॥कृतदोषांचा पश्चात्ताप । तेणें जळे त्रिविधताप । प्रायश्चित्त विधानकल्प । शास्त्रविकल्प निर्णीत जे ॥५४॥शौचकूपें दुर्दैवें पडिला । पश्चात्तापें कांटाळला । प्रायश्चित्तें न क्षाळला । तंव सोवळा नव्हे कीं ॥३५५॥पश्चात्ताप प्रायश्चित्त । उभययोगें अधनिर्धूत । मनोनिग्रहीं अतंद्रित । तें तो अभ्यस्त सुख भोगी ॥५६॥वामाचारें इंद्रिय बरळ । यथेष्टाचरणीं अनर्गळ । जर्ही तो दावी अभ्यासशीळ । तर्ही तोइ बाश्कळ निर्धारें ॥५७॥पश्चात्ताप प्रायश्चित्त । वानप्रस्थाश्रमपर्यंत । चतुर्थाश्रमीं आरूढ पतित । प्रायश्चित्त त्या नाहीं ॥५८॥यालागीं मनाची कल्पना । स्फुरवी विषयात्मक वासना । तो जागृति उत्कर्ष माजि स्वप्ना । भासे कीं ना विवरा ही ॥५९॥पूर्वसंस्कारदैवबळें । शुभाशुभविषयीं वृत्ति खवळे । धर्माधर्म तेणें मेळें । करी आंधळे अज्ञान ॥३६०॥तस्मात् स्वप्न क्षणभंगुर । माया मिक्थ्या भ्रममंदिर । मनोरथ केवळ कल्पनामात्र । या तिहीं तुल्य असार हा लोक ॥६१॥यदर्थीं काय म्हणसी यत्न । दैव माया प्रेरी मन । तैसें कल्पीं विषयभरण । तैं क्षोभे करनसमुच्चय ॥६२॥जो जागृतीं तीव्र अध्यास । तैसाचि दिसे स्वप्नाभास । कोण समर्थ आवव्रावयास । अधर्मदोष केंवि चुके ॥६३॥तरी ऐकें गा अंबिकातनया । माया स्वप्न मनोरथमया । तिहीं उपमा लोका यया । जाणोनिया सम होईं ॥६४॥आत्मना म्हणिजे मनेंकरून । देहात्मा जो इंद्रियगण । यत्नें आवरीं नियमून । अधर्माचरण सांडवी ॥३६५॥मनीं उठतां अधर्मांकुर । इंद्रियें हों पाहती तत्पर । तेथ कीजे विवेक सधर । शास्त्रनिर्धार अनुतापें ॥६६॥राया अनुताप म्हनसी कैसा । तरी अधर्में पाविजे नन्रकवासा । तेथील अनुलक्षूनि क्लेशा । दृढमानसा आवरिजे ॥६७॥याचिसाठीं शास्त्रसंपन्न । स्वस्तिश्रियेचे विद्वज्जन । धर्मवेत्ते सुब्राह्मण । त्यांसि पुसोन वर्तावें ॥६८॥जर्ही अधर्में आवडे लाभ । तो जाणिजे नरककोंभ । तदर्थ होतां वृत्तिक्षोभ । विवेकें लाभ खंडावा ॥६९॥याचिसाठीं भगवद्गुणीं । मानस बुभुक्षु कीजे श्रवणीं । नामस्मरणाविणें वाणी । अर्धक्षणीं न वसावी ॥३७०॥नीतिशास्त्रें राज्यभार । चालवूनि निर्विकार । नित्य नियमीं निजांतर । शांत सुधीर सम होई ॥७१॥स्वपुत्रांवरी स्नेहगौरव । पांडवांचा विषमभाव । त्यजी ऐसें शब्दलाघव । बोधूनि सर्व सूचविलें ॥७२॥प्रभो ऐसें संबोधन । कीं तूं स्वभावें चक्षुहींन । मनोनिग्रही एकाग्रपण । सहज संपूर्ण सामर्थ्य ॥७३॥सांडूनि दुष्टाची संगति । श्रवणें नेघावि दुरुक्ति । मन न घालावें अधर्मपंथीं । यदुवर्योक्ति हे कथिली ॥७४॥हें ऐकोनि कौरवनृपति । बोले अक्रूरेंसीं मथुरोक्ति । चौं श्लोकीं ते शुकभारती । सावध श्रोतीं परिसावी ॥३७५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP