श्रीमद्गोविंदात्मने नमः ॥
गौरव धरितां लघुत्व भेटे । लघुत्वें भजतां गुरुत्वें वेंठ । राहटीमाजि ऐसें घटे । भजनवाटे नमो तुझिये ॥१॥
बृहत्वें वेंठतां स्मरणीं । तैं सांठवें ईश्वरपणीं । शुद्धसत्वाची गवसणी । मायावरणीं आवृत ॥२॥
समष्टि सर्वज्ञत्वा धरी । तंव ये व्यष्टित्वामाझारी । अल्पज्ञत्वें मानी थोरी । तिर्यक्स्थावरीं मग पैठे ॥३॥
गौरवें लघुता ऐसी पावे । लक्षचौर्‍यांसीं योनि भंवे । सत्यानृत न होतां ठावें । केवळ मावे वरपडवी ॥४॥
गौरवावरमें ऐसी दशा । उभारूनि विश्वाभासा । माजि विचंबवी प्रकाशा । पात्र क्लेशा करूनियां ॥५॥
येथें कर्म कोठें होतें । गौरवाभिमानें लघुत्व आते । एवं राहाटीचेनि पंथें । अवस्तुत्वातें वस्तु ये ॥६॥
आपदा भोगी नानापरी । तथापि गौरवाची आस्था धरी । तंव तंव साट वाजती शिरीं । लघु लघुतरीं अवतरतां ॥७॥
श्वान सूकर खर वानर । इत्यादि योनि नीचतर । तेथही आपणा मनी थोर । धरी अहंकार गौरवीं ॥८॥
तों तों विशेष क्लेश पावे । परंतु वर्म नोहे ठावें । भाग्यें कृपा केलिया देवें । तैं सत्सेवे अधिकार ॥९॥
चित्त रंगतां सत्संगतीं । पश्चात्ताप होय चित्तीं । गुरुत्व पाहे सर्वां भूतीं । लघुत्वीं वसती स्वयें ॥१०॥
विश्वीं पाहे विश्वंभर । जगद्रूप जगदीश्वर । आपण लघुतर दीन पामर । पापसागर दुर्वृत्त ॥११॥
प्राणिमात्राचें करी स्तवन । न दुखवी कोणाचेंही मन । जनीं लक्षूनि जनार्दन । लघुत्वें शरण सर्वांसी ॥१२॥
ऐसी निष्ठा दृढ बाणतां । प्रकटें सर्वत्र एकात्मता । निंदा द्वेष नुधवी माथा । अभेद समता प्रकाशे ॥१३॥
सत्संगती रमतां मन । सद्गुरुमहिमा होय श्रवण । तेव्हां सांडूनि देहाभिमान । अनन्यशरण स्वयें होय ॥१४॥
नित्यानित्यवस्तुविचार । सद्गुरुबोधें वारंवार । प्रत्यय बाणतां संसार । मृषा असार जाणों ये ॥१५॥
इहामुत्रार्थीं विरक्त । होऊनि विवरी आत्महित । गुरुसेवनीं अतंद्रित । शोधी चित्त सन्मार्गें ॥१६॥
उपास्यदैवत सद्गुरुमूर्ति । आत्मनिवेदनान्त भक्ति । करितां अपरोक्षज्ञानावाप्ति । भ्रमनिवृत्तिपूर्वक ॥१७॥
ऐसा होतां निजात्मरत । नरसुरविधिहर वांछिती तीर्थ । लघुत्वें गौरव ऐसें प्राप्त । ब्रह्मपर्यंत समरसतां ॥१८॥
यालागिं लघुत्वें भजनपथा । सप्रेमभावें वंदूनि माथां । हेंचि प्रार्थितों सद्गुरुनाथा । जे प्रणतां लघुता रुचवावी ॥१९॥
येथें श्रोते शंका करिती । शिष्य लघुत्वें गुरुत्वीं भजती । तैं शिष्यासि गौरवप्राप्ति । लघुत्वावपति मग कोणा ॥२०॥
लघुत्वें भजतां गौरव पावें । हें शिष्यत्वीं दिसे आघवें । तेथ गुरूनें कें लघुत्वा यावें । प्रतिपादावें हें कैसें ॥२१॥
ऐसें जरी न प्रतिपादिजे । तरी व्याख्यान करूं वक्ता लाजे । इये शंकेच्या निरसनकाजें । श्रवण कीजे विचक्षणीं ॥२२॥
आदिनाथ तो ईश्वरु । त्यासही भव्य अवश्य गुरु । शक्तीसि बोधूनि प्रबोधसारु । ध्यानीं तत्पर स्वयें होतां ॥२३॥
तैं देवीनें केला प्रश्न । पूर्णब्रह्म तूं सनातन । तुजही ध्येय असे कोण । तें मज निरूपण करावें ॥२४॥
मग तो म्हणे ऐकें शक्ति । मज न करितां सद्गुरुभक्ति । ऐश्वर्याची होईल च्युति । लघुत्वावाप्ति अनायासें ॥२५॥
यालागीं सद्गुरुपदाचें ध्यान । मी न विसंबें अर्धक्षण । यास्तव करितां स्थितिलयसृजन । अलिप्त पूर्ण नित्यमुक्त ॥२६॥
दक्षिणामूर्ति सर्वां शिरीं । देदीप्यमान सहस्रारीं । भजनविमुखा भवसागरीं । लघुलघुतरीं अवतरतां ॥२७॥
गुरुत्वें करूनि शिष्यबोधा । स्वयें भजिजे सद्गुरुपदा । लघुत्व विसंबूं नये कदा । या अनुवादा शिव वदला ॥२८॥
यालागिं गुरुपरमगुरु - । प्रमुख परमेष्ठी परात्परु । ईश्वरपर्यंत उत्तरोत्तरु । मार्ग सधर भजनाचा ॥२९॥
लघुत्वें आपुल्या गुरूसि भजिजे । तेणें लाघव जतन कीजे । पर्रंपरेच्या रक्षणकाजें । शिष्य बोलिइजे तदाज्ञा ॥३०॥
शिष्य बोधूनि गौरवगरिमा । घेऊनि सांडील गुरुपदप्रेमा । तो तैं पावेल योनि अधमा । ऐसिया नेमा समजा हो ॥३१॥
जंववरी संप्रज्ञातवृत्ति । तंववरी न टकिजे सद्गुरुभक्ति । असंप्रज्ञात बाणल्या स्थिति । तैं अभेद भक्ति सायुज्य ॥३२॥
दक्षिणामूर्ति सर्वां शिरीं । तैं सर्वीं भजावें सहस्रारीं । म्हणाल परंपराव्यवहारीं । वृद्धाचारीं कां पडिजे ॥३३॥
इये शंकेचा परिहार । ऐका होऊनि एकाग्र । शुद्धसत्वात्मक ईश्वर । अमळ विशुद्ध परब्रह्म ॥३४॥
प्रवृत्तिप्रकाश प्रथम स्फुरण । न रमे एकाकी म्हणोन । बहुत्वाचें अभिलाषण । ईश्वरपण या नांव ॥३५॥
ऐसी वाढलिया प्रवृत्ति । तेणें अनुल्लंघ्य संसृति । यास्तव कारुण्यें निवृत्ति । दक्षिणामूर्ति प्रबोधी ॥३६॥
शुद्धसत्वात्मक प्रथम स्फुरण । तेथ वामाम्गीं ईश्वरपण । दक्षिणांगीं करूणापूर्ण । दक्षिणामूर्ति गुरुवर्य ॥३७॥
प्रवृत्ति प्रकाशूनि ईश्वर । करितां गुरुपदभजनादर । स्वसंवेद्य निर्विकार । नित्यमुक्त निर्लेप ॥३८॥
पुढें अष्टधाप्रकृतियोगें । जीवकोटि योनिविभागें । चिज्जडग्रंथी स्थिरचर जगें । रजतमप्रसंगें मलिनता ॥३९॥
यास्तव स्वसंवेद्यता नाहीं । तरी दक्षिणामूर्ति भजती कहीं । म्हणोनि परंपराप्रवाहीं । गुरुपद तेहीं भजावें ॥४०॥
वेदांतवाक्यार्थबोधेंकरून । होतां तत्वंपदशोधन । परोक्षमात्र शब्दज्ञान । गुरुपदभजन अपरोक्ष ॥४१॥
न लगे तत्वंपद शोधावें । गुरुपद भजतां अन्यभावें । परोक्ष स्वसंवेद्यता फावे । हें वर्म जाणावें प्रणतजनीं ॥४२॥
ऐसिया गुरुपदभजनपथा । बद्धांजळि नमितां माथा । कृपा अनावर सद्गुरुनाथा । आरब्धकथा ते वदवी ॥४३॥
गुरुकृपेचा वर्षतां घन । उदुंबरमूळीं गौतमीवन । येरे ब्रह्माद्रि जीवन । ते सज्जन बहुबोध ॥४४॥
सर्व मिळोनि गोदावरी । ते गुरुकृपा परमेश्वरी । दयार्णवाचे अभ्यंतरीं । प्रकाश करी प्रज्ञेचा ॥४५॥
तेथ प्रश्नमिसें सज्जन । श्रवणीं बैसोनि सावधान । वक्तृत्वाचें पुष्टीकरण । अंतःकरण प्रशस्तीं ॥४६॥
म्हणती श्रीकृष्णें अक्रूरा । पाठवूनि हस्तिनापुरा । रामउद्धवेंसिं आला घरा । ऐसें कुरुवरा मुनि वदला ॥४७॥
पुढें अक्रूराकडील मात । पुसावया राजा उदित । हें जाणोनि व्याससुत । सांगे वृत्तांत न पुसतां ॥४८॥
अक्रूरें जाउनि हस्तिनापुरा । लक्षिताम धृतराष्ट्र अन्तरा । भजे वैषम्यें भ्रातृपुत्रां । या निर्धारा प्रकटिलें ॥४९॥
गौतम गांगेय भारद्वज । बाल्हीकादि सहात्मज । सर्व सभ्यां कलहबीज । प्रकट गुज प्रकाशिलें ॥५०॥
मग पातला मधुपुरासी । वृत्तांत कथिला कृष्णापासीं । इतुकेनि समाप्ति पूर्वार्धासी । एकोणवन्नासीं अध्यायीं ॥५१॥
तो ये कथेचा विस्तार सरला । शुक निरूपी कुरुशार्दूळा । एकाग्र करूनियां हृत्कमळा । श्रोतीं परिसिला पाहिजे ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP