कृष्ण कृष्ण महायोगिन्विश्वात्मन्विश्वभावन । प्रपन्नां पाहि गोविंद शिशुभिश्चावासीदतीम् ॥११॥

अगा ये क्रुष्णा कलुषांतका । तव चिंतनें क्षय पातका । शरणागतजनैकपक्षका । जगद्रक्षका जगदीशा ॥२७॥
भो भो कृष्णा कलिमलमथना । भक्तवत्सला करुणाघना । हरिसी तापत्रयवेदना । शरण शरण्या सर्वेशा ॥२८॥
कृष्णनामाच्या संबोधनें । सूचिलें अवतारकार्यसूचने । कौरवांचें अर्नाय करणें । हें तुज कारणें विदित असो ॥२९॥
म्हणसी विदित होऊनि काय । तरि तत्परिहरणीं उपाय । संबोधनीं सूचिती होय । योगिवर्य म्हणोनियां ॥१३०॥
जीवेश्वर योगाभ्यासी । सिद्धि तिष्ठती तयांपासीं । महायोगी तूं हृषीकेशी । तुझेनि सर्वांसि साफल्य ॥३१॥
तुझिया सत्तयोगबळें । माया अचेत जडही चळे । अनंतब्रह्मांड ढिसाळें । केवळ स्वलीळे चेष्टविसी ॥३२॥
सृजनस्थितिलय मायाकार्य । तुझेनि वर्ते हें गुणमय । तेथ केतुलें कौरवभय । तत्कृतानार्यपरिहरणीं ॥३३॥
तत्कृतानार्य कथिलें कोणें । ऐसी शंका करिसी मनें । तरी विश्वात्मन् या संबोधनें । करी सूचने तें ऐका ॥३४॥
विश्वात्मा तूं विश्वंभर । सहज जानसी विश्वांतर । कौरवांचें कुडें अंतर । सर्व सविस्तर तुज विदित ॥१३५॥
चराचरांचें न्यूनपर्ण । पहावया काय कारण । यदर्थीं सूचवी संबोधन । विश्वभावन म्हणोनियां ॥३६॥
तूं विश्वाचा पालनपटु । निरपराधें छळिती दुष्ट । त्यांचा समूळ भरूनि घोट । स्वधर्मनिष्ठ स्थापिसी ॥३७॥
याचिसाठीं युगीं युगीं । साधुच्छलनाचे प्रसंगीं । अवतरोनियां लागवेगीं । दुष्टांलागीं संहारिसी ॥३८॥
नक्रें गजेंद्रा दिधली ग्लानि । तो प्रवर्तला तुझ्या स्तवनीं । तुवां धांवोनि चक्रपाणि । वैर छेदूनि उद्धरिलें ॥३९॥
ब्रह्मा छळिला शंखासुरें । वेद हिरोनि नेले असुरें । तैं तां नटोनि मत्स्यावतारें । असुर निकरें संहरिला ॥१४०॥
रसातळा जातां क्षोणि । तुवां देखोनि तिची ग्लानि । प्रकटलासि गोगोपनीं । कूर्म होऊनि गोविंदा ॥४१॥
हिरण्याक्षें दैत्यें दृढें । तैसीच धरणी नेतां पुढें । वराहवेषें मोडिलीं हाडें । धरिली दाढे वसुंधरा ॥४२॥
हिरण्यकशिपु त्याचाचि बंधु । तेणें गांजितां प्रह्रादु । तुवां करूनि स्तंभभेदु । केला वध दुष्टाचा ॥४३॥
बळीनें घेऊनि अमरपुरीं । अमर घातले गिरिकंदरीं । तेव्हां होऊनि ब्रह्माचारी । यज्ञागारीं बळि छळिला ॥४४॥
हैहय अन्याय आचरला । यज्ञधेनूचा अभिलाष धरिला । तपस्वी महर्षि मारिला । त्रिजगीं झाला हाहाकार ॥१४५॥
तैं तां क्षोभोनि परशुधरें । हैहयसहस्रबाहु निकरें । छेदूनि निक्षत्री केलें धरे । तर्पिलीं पितरें तद्रुधिरीं ॥४६॥
रावणें अमर घातले बंदी । स्वधर्मकर्में पदलीं सांदीं । तैं तां घेऊनि कपींची मांदी । निर्जरदंदी तो वधिला ॥४७॥
आतां कळीची प्रवृत्ति । उत्पथगामी दृप्त नृपति । वधावया कृष्णव्यक्ति । धरूनि क्षितीं आलासी ॥४८॥
निरपराध मज कौरवीं । गांजितां दुःखें दाटलें जीवीं । शरण आलें मज गौरवीं । घालीं रौरवीं या दुष्टां ॥४९॥
बाळकें सहित मी दुःखिता । दृष्टीं दुष्कर्मीं त्रासितां । शरण आलें मातें आतां । होई त्राता कृपाळुवा ॥१५०॥
तुजविण शरण जावया ठाव । अन्यत्र नाहीं हा निर्वाह । म्हणोनि तवांघ्रिराजीव । त्रिजगीं जीव आश्रयिती ॥५१॥

नान्यत्तव पदांभोजात्पश्यामि शरणं नृणाम् । बिभ्यतां मृत्युसंसारादीश्वरस्यापवर्गिकात् ॥१२॥

त्रिजगीं त्रिधा जीवयोनि । देवतिर्यक्मनुष्यपणीं । सुकृत दुष्कृत क्षपिती दोन्ही । मनुजाचरणीं शुभाशुभें ॥५२॥
नृणां म्हणिजे त्यां मनुजांसी । मृत्युसंसारभयत्रस्तांसी । पदाब्जावीण आणिजे देशीं । विश्रांतीसी स्थळ नाहीं ॥५३॥
म्रुत्युसंसारभय तें काय । षड्विकार तापत्रय । आणि षड्वैरिसमुदाय । छळिती विषयप्रलोभें ॥५४॥
यांचा कथावा विस्तार । किमर्थ पुढती वारंवार । एवं दुःखाचा सागर । मृत्युसंसारभयजनक ॥१५५॥
ऐसिया भवाब्धीपासून । भयें त्रासला मनुजगण । त्यासि तव पदाब्जावीण । नाहीं शरण्य स्थळ दुसरें ॥५६॥
तूं ईश्वरांचा ईश्वर । शरणां शरण्य परमेश्वर । तव पदाब्जावीण थार । न देखें अपर त्रिजगीं मी ॥५७॥
म्हणसी कैसें तें तव पद । भवत्रस्तांसि मोक्षप्रद । यालागिं त्याहूनि स्थान सुखद । त्रिजगीं विशद मी नेणें ॥५८॥
ऐसा निश्चय वदोनि मनें । सप्रेम कृष्णाच्या चिंतनें । उत्सुक सबाह्य कृष्णध्यानें । करी नमनें तें ऐका ॥५९॥

नमः कृष्णाय शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने । योगेश्वराय योगाय त्वामहं शरणं गता ॥१३॥

सबाह्य अधोर्ध्व दशदिग्भागीं । कृष्ण उत्सुकांगी । संबोधूनि ते प्रसंगीं । नमी वेगीं प्रणतत्वें ॥१६०॥
कृष्णाकारणें माझें नमन । जो कां कलिभयोत्पथशमन । म्हणाल त्या जरी कलिसंक्रमण । तरी शुद्ध म्हणोन पुन्हा नमी ॥६१॥
धर्मसंस्थापनासाठीं । कळिभव उत्पथ कोट्यानकोटी । अवतरोनियां समरीं निवटी । शुद्ध जगजेठी धर्मात्मा ॥६२॥
दुष्ट वधिल्या कैसा शुद्ध । ऐसा मानाल जरि विरोध । तरी तृतीयनामें हा प्रसिद्ध । अर्थ अविरुद्ध प्रतिपादी ॥६३॥
ब्रह्माकारणें नमन माझें । जेथ न सेर द्वैत दुजें । अपरिच्छिन्नें सहजीं सहजें । विश्वीं स्वतेजें विलासिजे ॥६४॥
मनःकल्पित विश्वाभास । नसतां देखे प्रसुप्त पुरुष । तेंवि मायिक जग अशेष । ब्रह्मप्रकाश प्रकाशीं ॥१६५॥
मायातीत अपरिच्छिन्न । सर्वत्र परिच्छेदविहीन । निर्विकार सनातन । त्या तुज नमन ब्रह्मरूपा ॥६६॥
ब्रह्म कूटस्थ सर्वगत । असोनि अप्राप्य उपयोगरहित । म्हणसी तरी तूं त्रिजग आप्त । त्या तुज नमित परमात्मया ॥६७॥
जीवसखा जो सुहृदपणें । त्या तुज परमात्मयाकारणें । नमन माझें तनुवाड्मनें । शरणा शरण्यें रक्षावें ॥६८॥
योगेश्वराकारणें नमो । तवांघ्रिपद्मावीण न रमो । सिद्धिसौभाग्य मृषा गमो । तुजविण विरमो भगभान ॥६९॥
अणिमादि ज्या विभूति श्रेष्ठ । तद्युक्त योगेश्वर वरिष्ट । आणि जीवब्रह्मैक्यज्ञान स्पष्ट । तो तूं उत्कृष्ट ज्ञानात्मा ॥१७०॥
जीवब्रह्मैक्य म्हणिजे योग । तो तूं ज्ञानात्मा श्रीरंग । तूंतें शरण मी आल्यें चांग । माझा उबग न मनावा ॥७१॥
तूं विश्वाचा आर्तिहरण । दुर्मदउत्पथनृपदारुण । कलिमलवारणविदारण । तुज मी शरण दुःखार्ता ॥७२॥
विशेष माझा तूं भ्रातृपुत्र । पितृष्वस्रेय माझे कुमर । आम्ही अनागस तव किंकर । छळिती दुष्कर अन्यायें ॥७३॥
यांसि दंडूनि कमलापति । प्रणतां देईं स्वपादरति । दीर्घस्वव्रें हें स्मरोनि कुंती । करूनि विनति रुदतसे ॥७४॥

श्रीशुक उवाच - इत्यनुस्मृत्य वचनं कृष्णं च जगदीश्वरम् ।
प्रारुदद्दुःखिता राजन्भवतां प्रपितामही ॥१४॥

कुरुकुलमानसमरालतिलका । राया श्रवणसुधारसरसिका । शुक म्हणे गा नृपधार्मिका । कुंती शोकाकुल ऐसी ॥१७५॥
स्मरोनि आपुलें माहेर । इष्टमित्र मातापितर । चुलत्या चुलते सहोदर । बंधुकुमर बळकृष्ण ॥७६॥
भाच्या भाउजया आणि बहिणी । आता माउशा सनंदिनी । धाकुटपणींच्या आपुल्या गडिणी । कुंती स्मरोनि रुदतसे ॥७७॥
आपुली अवस्था स्मरोनि रडे । सहित पहिले बालक्रीडे । त्यांमाजि कृष्णाचे पवाडे । वर्णी निवाडें ऐश्वर्य ॥७८॥
जगदीश्वरा श्रीकृष्णातें । आणि आपुलिया स्वजनातें । स्मरूनि कुंती करी रुदनातें । दुःखें बहुतें आठवूनी ॥७९॥
तुझिया पित्याची पितामही । राया कुंती तिये समयीं । रुदन करितां अक्रूरा हृदयीं । द्रवली नई कारुण्यें ॥१८०॥
मग ते अक्रूर विदुर दोघे । कुंतीसमान द्रवले वोघें । तिचिया सुखदुःखविभागें । जाहले आंगीं द्रवीभूत ॥८१॥

समदुःखसुखोऽक्रूरो विदुरश्च महायशाः । सांत्वयामासतुः कुंतीं तत्पुत्रोत्पत्तिहेतुभिः ॥१५॥

परमार्थरूपचि ज्याचें यश । अवंचकभावें हृषीकेश । प्रियतम केला तो कुंतीस । विदुर विशेष संबोखी ॥८२॥
विदुर अक्रूर दोघेजण । करिती कुंतीचें क्लेशहरण । पुत्रोत्पत्तीकारणें भिन्न । प्रबोधून श्रेष्ठतरें ॥८३॥
कुंतीसि कांहीं झालिया सुख । ज्यांचे मानसीं दाटे हरिख । कुंतीदुःखें दुखवती देख । कथूनि विवेक सांतविती ॥८४॥
अहो पृथे मायबहिणी । सहसा दुःख न धरीं मनीं । तुझिये जठरीं रत्नखाणी । तनय तरणीसम गमती ॥१८५॥
तरणि तनयप्रवर यम । तो तव ज्येष्ठ कुमर धर्म । दुसरा बलिष्ठ जो कां भीम । हनुमद्विक्रम मारुति हा ॥८६॥
अमरां माजि जंभभेदी । तो हा अर्जुन विशाळबुद्धि । नासत्य जे अमरसंसदीं । ते हे माद्रीसुत दोन्ही ॥८७॥
पंचतत्वांचीं स्तवें जाण । कीं रुद्राचे पंच प्राण । कंदर्पाचे पंच बाण । तेंवि लावण्यें मिरविती ॥८८॥
क्षात्रविद्येंचें पंचायतन । पंच प्रलयहुताशन । पंचत्व कौरवांलागून । द्यावयापूर्ण अवतरले ॥८९॥
ऐसीं रत्नें असतां पोटीं । सपत्नविषमें न वदें वोठीं । सिंहशावकां कौरवकरटी । केंवि संकटीं आकळिती ॥१९०॥
येथूनि स्वस्थचित्तें राहें । भगवल्लीलालाघव पाहें । एवं बोधूनि कुंती माये । अक्रूर काय करी पुढें ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP