मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४९ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ४९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ अध्याय ४९ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर कृतं च धार्तराष्ट्रैर्यद्गरदानाद्यपेशलम् । आचख्यौ सर्वमेवास्मै पृथा विदुर एव च ॥६॥दुर्योधनादि धृतराष्ट्र । कर्ण शकुनि द्रोणकुमर । इहीं करूनि दुर्विचार । केले अपकार पांडवां ॥८८॥भीमाअर्जुना मारिल्याविण । आम्हां कैंचें सिंहासन । ऐसें चिकीर्षित विवरून । करिती यत्न तद्धननीं ॥८९॥जलक्रीडामिसें सकळीं । प्रवेशोनि गंगाजळीं । धर्मादि गोवूनि पृथग्मेळीं । अर्जुन तळीं बुडविला ॥९०॥मृगयाव्याजें सन्नद्ध बद्ध । शस्त्रें करूं पाहती वध । ऐसिया विचित्र क्रीडा विविध । करितां सावध हननार्थी ॥९१॥भीमासि विषप्रलय केला । रात्रीं गंगेंत तो टाकिला । धृतराष्ट्रासि हा अन्याय कळलां । परि कुमरांला न कोपे ॥९२॥इत्यादि अन्याय कौरवकृत । कुंतीविदुरवदनें श्रुत । पांडुमरणापासूनि वृत्त । केलें विदित अक्रूरा ॥९३॥केव्हां विदित केलें म्हणसी । ऐकें राया इयेविषीं । जैं अक्रूर गेला कुंतीपासीं । एकांतासीं सांतवना ॥९४॥सभे भेटोनि सर्वांप्रति । कुंतीसि भेटला मग एकांतीं । तिणें सुखदुःखांच्या युक्ति । कथिल्या नृपति त्या ऐकें ॥९५॥पृथा तु भ्रातरं प्राप्तमक्रूरमुपसृत्य तम् । उवाच जन्मनिलयं स्मरंत्यश्रुकुलेक्षणा ॥७॥अक्रूर स्नेहें सदना आला । देखोनि पृथेसि आल्हाद झाला । बंधु चिरकाळें भेटला । पुरस्कारिला अभिगमनें ॥९६॥त्वरें जाऊनि अक्रूराप्रति । आणूनि बैसविला आसनीं निगुती । जन्मभूमि स्मरोनि चित्तीं । अश्रुपाती भू भिजवी ॥९७॥पिता शूरसेन भरला मनीं । आणि आठवी मारिषा जननी । बंधु वसुदेवाची ग्लानि । स्मरतां नयनीं जळ वाहे ॥९८॥कैसी दैवरेखा विचित्र । तदनुसार कर्मसूत्र । देवकी पर्णूनि क्लेशा पात्र । झाला पवित्र वसुदेव ॥९९॥मागें ऐकिली नाहीं कोण्हीं । ते उदेली गगनवाणी । कंसें शंकोनि रक्षणीं । केली जाचणी यदुवंशा ॥१००॥इत्यादि कंसमरणवरी । स्मरोनि यदुकुळींची अवसरी । कुंती सखेद अश्रुधारी । अक्रूर करीं परिमाजीं ॥१॥कुंतिभोजें पालन केलें । पांडु वरिला दैवबळें । तैहूनि माहेर अंतरलें आजि । देखिलें तव वदन ॥२॥धणीभरी असोनिया गणगोत । झालें परदेशीं अनाथ । भाग्यें देखिलासि अवचित । परी सांगें वृत्तांत यदुकुळींचा ॥३॥अपि स्मरंति नः सौम्य पितरौ भ्रातरश्च मे । भगिन्यो भ्रातृपुत्राश्च जामयः सख्य एव च ॥८॥सौम्य ऐसें संबोधन । अक्रूर चंद्रावतार म्हणोन । आणि निवविता चंद्राहून । अमृतवचनीं मनुजांतें ॥४॥सौम्यबंधु भो अक्रूरा । माझें स्मरण कधींही पितरां । बंधुवर्गा सहोदरां । होते अंतरा आठवण ॥१०५॥माझ्या भगिनी सहोदरी । पितृव्यभगिनी यदुकुळकुमरी । स्वभावें पातलिया माहेरीं । केव्हां तरी मज स्मरती ॥६॥ माझ्या बंधूचे जे पुत्र । रामकृष्णादि पुण्यपवित्र । वृष्णि यादव सर्व गोत्र । प्रीतिपात्र मज स्मरती ॥७॥जामया म्हणिजे कुळस्त्रिया । लहान थोरा भाउजया । चुलत्या आता बंधुतनया । सख्य वयसिया शिशुपणींच्या ॥८॥कधीं कोण्ही स्मरती मातें । माझी अवसरी करिती चित्तें । ऐसें पुसतां अक्रूरातें । दाटे भरतें शोकाचें ॥९॥पांडु कुरुवंशींचा राजा । दैवें वरूनि झालें भाजा । तोही त्याग करूनि माझा । निर्वाणकाजा अनुसरला ॥११०॥मद्ररायाची नंदिनी । माद्री माझी धाकुटी बहिणी । झाली पांडुसहगामिनी । मजला वनीं टाकिलें ॥११॥जातमात्र पांचही बाळें । वनीं एकली दुःखें आहळें । सिद्धवृंदें करुणाशीळें । वचनें कोमळें शांतविती ॥१२॥पुढें आणितां कौरवपुरा । कौरवीं गौरव केला पुरा । तेणें शोकनदीच्या पूरा । माजि कापुरासम हारपें ॥१३॥माझ्या दुःखाचें निरसन । करूनि माझा हरिती शीण । भ्रातृपुत्र दोघे जण । मजलागून कैं स्मरती ॥१४॥भ्रात्रेयो भगवान्कृष्णः शरण्यो भक्तवत्सलः । पैतृष्वस्रेयान्स्मरति रामश्चांबरुहेक्षणः ॥९॥भ्रातृपुत्र तो श्रीकृष्ण । यशस्वी श्रीमंत वदान्य । सर्वज्ञ विरक्त ऐश्वर्यपूर्ण । षड्गुणसंपन्न ईश्वर तो ॥११५॥शरणागतासि शरन्य । भक्तवत्सल करुणापूर्ण । असुरउत्पथप्रभंजन । दुष्टदमन दुरितारि ॥१६॥तैसाचि संकर्षण दुसरा । प्रतापें वश्य ज्यातें धरा । कमललोचन नरनिर्जरा । वरशृंगारा मुकुटमणि ॥१७॥पुराणपुरुष हे माझे भाचे । कळले वदतांच गगनवाचे । विशेष रहस्य नारदाचें । आणि गर्गाचें प्रभाषित ॥१८॥मी तयांची पितृष्वसा । मज तयांचाचि भरंवसा । कधीं तर्ही आपुल्या दासां । माझ्या पाडसां स्मरती ते ॥१९॥मी अनाथ बहुतां गुणें । माझें तयांसि न साहे उणें । मम संकट त या कारणें । विदित कोणें करावें ॥१२०॥सापत्नमध्ये शोचंतीं वृकाणां हरिणीमिव । सांत्वयिष्यति मां वाक्यैः पितृहीनांश्च बालकान् ॥१०॥बहुतां लांडगियांचे मळीं । हरिणी जैसो सांकडली । किंवा व्याघ्रांचे मंडळीं । धेनु पडली आक्रंदे ॥२१॥कौरवांमाजि मज ते दशा । असहनशीळा तत्कृतक्लेशां । रामा आनि जगदधीशा । माझें स्मरण कें होतें ॥२२॥पितृष्वसा हे आपुली । दैवें दुष्टीं दुःखी केली । स्मरतां हृदयातें जाकळी । माझी करुणा कैं त्यांसी ॥२३॥अमृतापरिस मधुरोत्तरीं । माझें सांत्वन करील हरि । जनकरहित बाळांवरी । करील मुरारि अनुकंपा ॥२४॥आपुले शिरीं आमुचें दुःख । घेऊनि निरसील अवघा शोक । आमुचा उजळला मस्तक । म्हणती लोक तैं धन्य ॥१२५॥ऐसी वदत वदतां पृथा । दीर्घस्वरें कृष्णनाथा । धांवें पावें निरसीं व्यथा । म्हणे ते कथा अवधारा ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP