कञ्चित्पशव्यं निरुजं भूर्यम्बुतृणवीरुधम् । बृहद्वनं तदधुना यत्रास्से त्वं सुहृद्वृतः ॥२६॥

उभयात्मजीं प्रसक्तबुद्धि । म्हणोनि पुसतो व्रजींची शुद्धि । ते ऐकावी यथाविधि । श्रवणकोविदीं सर्वज्ञीं ॥३२॥
महावन का बृहद्वन । हें गोकुळाचेंचि अभिधान । पुसे तेथींचें वर्त्तमान । वृष्णिनंदन नंदातें ॥३३॥
तेंबृहद्वन आजि सकळ । पशूंसि आहे कीं अनुकूळ । गुल्म वल्ली तृणें कोमळ । निर्मळ जळ आरोग्य ॥३४॥
पुत्र कलत्र सुहृद पोष्य । इष्ट मित्र दास शिष्य । परिवारेंशीं तुझा घोष । सुखसंतोष पावे कीं ॥२३५॥
इत्यादि परिवारेंशीं युक्त । तूं नांदसी जेथें नित्य । तें बृहद्वन आनंदभरित । कांहीं कच्चित् असे कीं ॥३६॥
हें पुसावया हाचि हेत । तेथ असती उभय सुत । गोगोपिकास्तन्यें तृप्त । सुख संतत पावती ॥३७॥
यया बुद्धी उतावीळ । पुशिलें अनामय कुशळ । आतां पुसेल प्रांजळ । पुत्रवत्सल वसुदेव ॥३८॥

भ्रातर्मम सुतः कच्चिन्मात्रा सह भवद्व्रजे । तातं भवन्तं मन्वानो भवद्भ्यामुपलालितः ॥२७॥

सखया तुझिये व्रजभुवनीं । माझा पुत्र सहितजननी । तात ऐसें तूंतें मानी । जे तुम्ही त्यालागुनी लालितां ॥३९॥
कांहीं एक क्रीडापर । तुम्हांसि मानुनि मातापितर । रोहिणीसहित माझा कुमार । कच्चित्सुखतर वर्ते कीं ॥२४०॥
ऐसा मोहें कवळिला । पुत्रवियोगें गहिंवरला । सद्गदित कंथ झाला । काय बोलिला तें ऐका ॥४१॥
सखया संसारामाजीं सार । पुत्र कलत्र सुहृद मित्र । यांच्या वियोगें क्लेशपात्र । देहमात्र पोसलिया ॥४२॥

पुंसस्त्रिवर्गो विहितः सुहृदो ह्यनुभावितः । न तेषु क्लिश्यमानेषु त्रिवर्गोऽर्थाय कल्पते ॥२८॥

धर्म आचरिजे परलोकार्थ । धर्में जोडिजे विशुद्धार्थ । धर्मासि अविरुद्ध जो विषयस्वार्थ । काम पुरुषार्थ बोलिजे ॥४३॥
त्रिवर्ग म्हणजे हे पुरुषार्थ तीन्ही । पुरुषें प्रयत्नें संपादूनि । बंधुसुहृदां अनुभवूनि । धन्य जनीं म्हणवावें ॥४४॥
तोचि त्रिवर्ग पुरुषासी विहित । जो कुटुंबेशीं अनुभविजेत । कुटुंब झालिया क्लेशभूत । वृथा पुरुषार्थ अवघेही ॥२४५॥
सुहृदकुटुंबीयें क्लिश्यमान । स्वदेहाचेंचि परिपालन । त्याचा त्रिवर्ग विफल जाण । दुःख दारुण तो भोगी ॥४६॥
ऐशी निगमाममर्यादा । हेंचि कारण स्नेहवादा । तें मज घडे भाग्यमंदा । म्हणोनि खेदा बहु करीं ॥४७॥

नंद उवाच - अहो ते देवकीपुत्राः कंसेन बहवो हताः । एकावशिष्टावरजा कन्या सापि दिवं गता ॥२९॥

नंद कळवळूनि बोले । प्रेमजळें भरिले डोळे । केवढे कष्ट दैवें विफळें । तुवां भोगिले वसुदेवा ॥४८॥
तुझेनि कष्टें माझें हृदय । तप्त झालें सांगों काय । उष्णपुलिनीं मत्स्य प्राय । विकळ होय बहुसाल ॥४९॥
देवकीचीं गर्भरत्नें । कंसें मारिलीं दुर्जनें । कनिष्ठकन्या घेतां प्राणें । तेही गगना पैं गेली ॥२५०॥

नूनं हृदृष्टनिष्ठोऽयमदृष्टपरमो जनः । अदृष्टमात्मनस्तत्त्वं यो वेद स न मुह्यति ॥३०॥

नंद निश्चयें बोले वचन । जेणें वसुदेव पावे समाधान । अदृष्टनिष्ठचि हा जन । तें प्रकरण प्रतिपादी ॥५१॥
उपजोनि पडे जों शरीर । तोंपर्यंत अदृष्टतंत्र । म्हणोनि अदृष्टनिष्ठ हा विचार । ज्ञाते साचार जाणती ॥५२॥
जेव्हा पुत्रादि सुखप्रद अदृष्ट । तेव्हां तेणें नेदावे कष्ट । कष्टप्रदचि जाहलें स्पष्ट । तैं तें अभीष्ट नं मानावें ॥५३॥
अमृत ऐसें नाम ज्याई । परी सेविल्या भेटवी मरणासी । तें वेष म्हणतां मानसीं । शंका कायशी सांग पां ॥५४॥
तैसें पुत्रसुखा नेदुनी । अदृष्टफळें विपरीतपणीं । तैं ते पुत्र ऐसें मनीं । काय म्हणोनि कल्पावें ॥२५५॥
जरी ते पुत्रचि साच असते । तरी पुत्रसुखातें ओपिते । विपरीतभावें फळले त्यांतें । पुत्र जाणते न म्हणती ॥५६॥
अदृष्टें वियोग घडे जाण । पुनः तैसेंचि संयोजन । करावया अदृष्ट प्रधान । अन्य कारण असेना ॥५७॥
तस्मात्सुखदुःखांचें कारण स्पष्ट । अवंचक अव्यभिचारी अदृष्ट । हें जाणे तो न पावे कष्ट । मोह दुष्ट न बाधी त्या ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP