श्रीकृष्णपरमात्मने नमः । मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं मधुसूदनः । मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलं गरुडध्वजः ॥१॥

गोविंद गुरुत्वें आगळा । वस्तूहूनि तुकितां तुळा । कृपेनें छेदूनि मायाजाळा । आणी अबळां वस्तुत्वा ॥१॥
वेद निःश्वासीं उपजवी । वेदवेत्ता वेदार्थपदवी । अबळें बोधूनि स्वानंदचवी । वेदानुभवीं प्रापक ॥२॥
गुरुत्व निरसूनि गौरव देणें । हे हातवटी जाणिजे कोणें । यालागीं वेदशास्त्रें पुराणें । केलीं जेणें शहाणीं ॥३॥
आपण आपणामाजीं होणें । आपण आपणामाजीं वर्त्तणें । आपुलेपणीं सांठवणें । आपण उरणें पूर्णत्वें ॥४॥
हे एक सद्गुरुचि जाणे रीति । येरीं अभ्यासितां बहुतीं । ठेलीं अपाडें अरुतीं । तीं दृष्टांटीं कळविलीं ॥५॥
समुद्र आपणामाजीं आपण । तरंगत्वें जन्मवर्त्तन । शेखीं आपणामाजीं लीन । परिपूर्णपणें विसरला ॥६॥
सिंधु संपूर्ण जरी भरला । ऊर्ध्व अवकाश रिता उरला । मग लाजोनि मागुता वोसला । असाम्य झाला उपमेसी ॥७॥
हेम आपण आभरणें । होणें वर्त्तणें उपसंहरणें । कर्त्त्याविण होऊं नेणे । इतुकें उणें ये ठायीं ॥८॥
असो ईश्वरही समर्थ । कर्मसंस्कारें जन्मवित । कर्मफळांतें भोगवित । परी कर्मातीत न करीची ॥९॥
ईश्वर सृष्टि अभिवर्धित । तो न इच्छी संसृतिघात । यालागीं समर्थ सद्गुरुनाथ । जो वरें छेदी भवभान ॥१०॥
जैसें उदैजतां मार्तडें । शार्द्वर सर्वत्र सहजें दडे । तैसा ज्याचे दृष्टीपुढें । विवर्त्त उडे नाथिला ॥११॥
ईश्वरहृदयींचें ध्येयध्यान । जें ब्रह्मींचें अहेवपण । संसारश्रांतांलागीं सगुण । सद्गुरुपण आवगलें ॥१२॥
कोटिजन्में निष्काम भक्त । उभयभोगीं अनासक्त । तया प्रेमळालागीं आसक्त । होऊनि रिगत हृत्कमळीं ॥१३॥
दास्यसुखाचिया कामा । शिवें ओसंडिली उमां । काम जाळूनि रिकामा । श्रीपादपद्मा सेवितो ॥१४॥
रमा डावलूनि श्रीविष्णु । झाला द्विजांघ्रिसहिष्णु । होऊनि विश्वश्रीवितृष्णु । श्रद्धासत्प्रश्नु गुरुप्रेमें ॥१५॥
सनकादिक सांगों किती । गुरुप्रेमाची आसक्ति । धरूनि मुनीश्वव्रांच्या पंक्ति । अद्यापि करिती तपश्चर्या ॥१६॥
इतर प्राणियें बापुडीं । नेणती गुरुप्रेमाची गोडी । पडिलीं प्रपंचबांदवडीं । न चुके भवंडी भवस्वर्गीं ॥१७॥
असो सद्गुरुवरदकृपामृतें । यया ब्रह्मांडा आतौतें । नोहे गुरुभक्तां अपैतें । हें अवघड तें नायकिजे ॥१८॥
म्हणोनि समर्थ सद्गुरु । साधकांचा कल्पतरु । ज्याचे कृपेचा आधारु । घेऊनि सुधरू श्रुतिमाथां ॥१९॥
परंतु एथें एक निकें । प्रेमें अनुसरतां भाविकें । तेव्हांचि त्याचे हृदयीं ठाके । आंवरूं न शके तें ध्यान ॥२०॥
उदया येतां रविमंडळ । सन्मुख झालिया सोज्वळ । आंवरूं न शके उतावीळ । प्रतिमंडळ तो जैसें ॥२१॥
नामा चकोरें चंद्राकडे । प्रेमें पाहिती पीयूषचाडें । चंद्रें केलियाहि अचाडें । निरोध न घडे त्या सुखा ॥२२॥
तैसा सद्गुरु सेवितां भावें । जरी तो म्हणे मी प्रसन्न नोहें । परी कृपा तयासि नावरवे । येणें लाघवें प्रियतंत्र ॥२३॥
यालागीं सोपें सद्गुरुभजन । परंतु पाहिजे अनन्य शरण । कायावाचामनोवर्त्तन । तदर्थ पूर्ण तत्प्रेमें ॥२४॥
येणें सद्गुरुभजन सप्रेमजळें । उत्फुल्ल होतां हृत्पद्ममुकुलें । सुरसिद्धभ्रमरकुळांचे पाळे । तत्परिमळें वेधती ॥२५॥
उपेक्षूनि त्रैलोक्यविभव । योगी वसती तोचि ठाव । पघळ करूनिया सद्भाव । महानुभाव धांवती ॥२६॥
ऐशिया अनंतविभवराशि । गुरुचरणींच्या भजनलेशीं । तो माझिये हृदयदेशीं । सावकाशीं नांदतो ॥२७॥
मी सर्वस्वीं अकिंचन । सप्रेमविभवें पदार्चन । करितां स्वामी सुप्रसन्न । आज्ञावरदान ओपिलें ॥२८॥
‘ गुरोराज्ञां प्रकुर्वीत ’ । हेंचि गुरुभक्तांचें मुख्यव्रत । प्राणावीण जैसें प्रेत । येर भजनार्थ तो तैसा ॥२९॥
गुरुआज्ञेसि अनुसरणें । सकळ भजना चैतन्य तेणें । ऐसें गुरुदास्य सफळ करणें । अनन्यशरणें तत्सत्ता ॥३०॥
विषयकर्दमीं विषयासक्त । गाईसारिखे जन प्राकृत । रुपले देखोनि सद्गुरुनाथ । करुणावंत कळवळला ॥३१॥
श्रीमद्भागवतामृत । वर्षोनि श्रवणसरिता भरित । प्रवाहें क्षालूनि विषयासक्त । करी निर्मुक्त रुपलिया ॥३२॥
ऐसा सद्गुरुदयावर्षाव । होतां भरला दयार्णव । अपार मनीषा अथाव । बुडवी नांव भवाचें ॥३३॥
दयेनें दयार्णव उचंबळला । माजी सद्गुरु बिंबला । ध्यानसुखें तो कवळिला । मग आदरिला आज्ञार्थ ॥३४॥
श्रीमद्भागवतींचा दशम - । स्कंधांतील अध्याय पंचम । ऐकावया नृपोत्तम । झाला सप्रेम सादर ॥३५॥
तरी पंचमाध्यायीं जातकर्म । नंद करील अत्युत्तम । अर्पूनि कंसा वार्षिक नियम । ससंभ्रम परतेल ॥३६॥
वसुदेव ऐकोनि नंदागमन । त्याचिया बिढारा जाऊन । परस्परें क्षेमकथन । गोकुळीं विघ्न तो सांगे ॥३७॥
तेणें नंद सविस्मय । चित्तीं चिंतिला कमलाप्रिय । इतुका कथेचा अन्वय । पंचमाध्यायीं प्रकाशी ॥३८॥
शुक म्हणे या परिक्षिती । श्रवणसुखाची तूं मूर्त्ति । तरी हे परिसें कृष्णोत्पत्ति । सुखविश्रांति त्रिजगाची ॥३९॥
देवकीउदरीं जन्म मात्र । पुढें योगमायाचरित्र । आणि दुर्मंत्रियांचा मंत्र । हा विस्तार निरोपिला ॥४०॥
आतां जन्मसोहळा । भाग्य पातलें गोकुळा । त्रैलोक्यविभव श्रीमंगळा । मंगलायतन कृष्ण ॥४१॥
तया मंगळा सांठवण । पुण्यशीळांचें निर्मळ श्रवण । करूनि अमंगलक्षालन । विमल मन सत्पात्रा ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP