गोप्यः सुमृष्टमणिकुण्डलनिष्ककण्ठ्यश्चित्राम्बराः पथि शिखाच्युतमाल्यवर्षाः ।
नन्दालयं सवलया व्रजतीर्विरेजुर्व्यालोलकुण्डलपयोधरहारशोभाः ॥११॥

गृहीं लेइल्या जीं भूषणें । चपळ चालतां चंचळपणें । शोभलीं तीं बादरायणें । सिंहावलोकनें वर्णिलीं ॥१३०॥
मणिमय कुंडलें उज्वळ । चपळ चालतां तरळ बहळ । तये प्रभेनें गंडयुगळ । सकुंतल प्रकाशे ॥३१॥
कंठीं पदकें एकावळी । हार डोलती वक्षस्थळीं । कंचुकीयुक्त कुचमंडळीं । प्रभा आगळी विलोक ॥३२॥
हेमवल्लीचे पल्लव तरळ । तैसे झळकती चैलांचळ । अमूल्य वसनीं बल्लवीमेळ । जवनशीळ प्रकाशे ॥३३॥
कुंतलीं कुसुमें ग्रथिलीं होतीं । चपळ चालतां पडती पंथीं । स्वर्गाहूनि उतरतां भागीरथी । तेंवि वीथी धवळिल्या ॥३४॥
नंदालया वेगवत्तर । जातां शोभती बल्लवीभार । कंकणें कुंडलें कुचांकुर । तरळ हार तळपती ॥१३५॥
आत्मप्रत्ययें इंद्रियवृत्ति । उपरमोनि हृदया येती । तैशा गोपिकांचिया पंक्ति । सदना जाती नंदाच्या ॥३६॥

ता आशिषः प्रयुञ्जानाश्चिरं पाहीति बालके । हरिद्राचूर्णतैलाद्भिः सिञ्चन्त्यो जनमुज्जगुः ॥१२॥

नंदालया गोपदारा । पातल्या पाहती नंदकुमारा । अर्पूनि उपायनसंभारा । नाना उपचारां निवेदिती ॥३७॥
स्तवनीं स्तवूनि श्रीभगवान । चिरकाळ बालका कल्याण । असो म्हणोनि आशीर्वचन । सर्व मिळोनि ओपिती ॥३८॥
बाळका रक्षीं चिरकाळ । म्हणोनि गाती त्रैलोक्यपाळ हरिद्राचूर्ण तैल जल । यशोदा गोपाळ न्हाणिती ॥३९॥
हरिद्रातैल शिंपणीं । परस्परें करिती बल्लवपत्नी । हर्षोत्कर्षें उच्चस्वनीं । चक्रपाणी त्या गाती ॥१४०॥
नंदगोकुळा आला हरि । उत्साह सर्वांचे शरीरीं । प्रेमें नाचती नरनारी । वाद्यगजरीं स्वानंदें ॥४१॥

अवाद्यन्त विचित्राणि वादित्राणि महोत्सवे । कृष्णे विशेश्वरेऽनन्ते नन्दस्य व्रजमागते ॥१३॥

वाजंत्रांचा विचित्र गजर । मृदंग वाजती गंभीर । वीण तार मंद्र घोर । सप्तस्वर षड्जादि ॥४२॥
भेरी निशाण दुंदुभिघोष । ऐकोनि अमरावती ओस । अमरां हृदयीं कोंदला हर्ष । जगदधीश अवतरतां ॥४३॥
विमानें दाटलीं अंतराळीं । पुष्पवृष्टि करिती गोकुळीं । विश्वसुखाच्या सुकाळीं । श्रीवनमाळी प्रकटतां ॥४४॥
अनंत सुख अनंत विभवें । अनंत चरित्रें अनंत नांवें । अनंत गाती अनंतभावें । अनंतदेवें अवतरतां ॥१४५॥
अनंतविभवें कल्याणखाणी । जन्मला असतां नंदसदनीं । ब्रह्मानंदीं समरसोनि गेली विरोनि भवभ्रांति ॥४६॥
गोपी गोपाळ गोकुळवासी । देह गेह नाठवे त्यांसी । निमग्न चित्सुखसमरसीं । आनंदेंशीं नाचती ॥४७॥

गोपाः परस्परं हृष्टा दविक्षीरघृताम्बुभिः । आसिञ्चन्तो विलिम्पन्तो नवनीतैश्च चिक्षिपुः ॥१४॥

गोपाळ नाचती आनंदें । परस्परें शिंपिती दुग्धें । चंदन कस्तूरी नानागंधें । चंदनोदकें शिंपिती ॥४८॥
दधि लेपिती परस्परीं । घृतें चर्चिती मिथः शरीरीं । नवनीतगोळ उरीं शिरीं । नेत्रीं वक्त्रीं हाणिती ॥४९॥
नाचती आनंदें धुमाळीं । ब्रह्मानंदें एकीटाळीं । ब्रह्मादि देवीं पुष्पांजळि । गोपां मौळीं सांडिल्या ॥१५०॥

नन्दो महामनास्तेभ्यो वासोऽलंकारगोधनम् । सूतमागधबन्दिभ्यो ये‍ऽन्ये विद्योपजीविनः ॥१५॥
तैस्तैः कामैरदीनात्मा यथोचितमपूजयत् । विष्णोराराधनार्थाय स्वपुत्रस्योदयायं च ॥१६॥

विषयनिष्ठ बोलिजे पुरुष । आत्मनिष्ठ तो महापुरुष । तैसें मन जाणे प्रपंचास । आत्मज्ञास महामन ॥५१॥
प्रवृत्तिप्रतिपादक तें वाक्य । आत्मप्रतिपादक महावाक्य । म्हणोनि परमात्मयाचा जनक । व्रजनायक महामन ॥५२॥
लोह पालटी स्पर्शमणि । कां गुरुचरणांच्या स्पर्शें पाणि । वंद्य होय निर्जरगणीं । तीर्थश्रेणीसमवेत ॥५३॥
तैसा श्रीकृष्ण भरतां पोटीं । औदार्यादि सद्गुणकोटि । नंदमानसीं उठाउठीं । झाली पैठी सत्त्वश्री ॥५४॥
झालें मानस सुप्रसन्न । अमरद्रुमाहूनि वदान्य । यालागीं अदीनात्मा हें अभिधान । व्यासनंदन बोलिला ॥१५५॥
ब्राह्मणांचा दानप्रसंग । तो पूर्वींच कथिला साङ्ग । सूतमागधादिकां त्याग । करी विनियोग औदार्यें ॥५६॥
पौराणिकांसि धेनु वसनें । हेमरत्नेम दिव्याभरणें । श्रीविष्णूचे प्रीतीकारणें । नंदें सन्मानें ओपिलीं ॥५७॥
तैसेंचि स्तोत्रपाठकांसी । वंशावळीप्रशंसकांसी । धनें वसनें गौरवी त्यांसी । श्रीऋषीकेशीप्रीत्यर्थ ॥५८॥
गायक वादक नर्त्तक । विद्योपजीवी अन्य याचक । धनें वसनें कनक । व्रजनायक त्यां ओपी ॥५९॥
कुलाल पांचाळ शिल्पकार । गुरव भराडे माल्यकार । कनक वसनें रत्नभार । नंद आपार त्यां वोपी ॥१६०॥
जलवाहका भाल्याकारी । उपप्रसूति मलापहारी । वस्त्राभरणीं बहु प्रकारीं । उपपुरंध्री पूजिल्या ॥६१॥
ज्याचे जैसे मनोरथ । तैसे ओपोनि त्या दिव्य पदार्थ । याचक केले इछारहित । श्रीकृष्ण समर्थ प्रकटला ॥६२॥
स्वपुत्रकल्याण अभ्युदय । इच्छूनि भूतमात्रीं सदय । होऊनि पूजिले समुदाय । यथान्वय यथोचित ॥६३॥
सुहृद गौरविले अहेरीं । रत्नीं वसनीं कनकभारीं । चंदनसुमनीं दिव्योपचारीं । वाद्यगजरीं पूजिले ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP