व्रजः संमृष्टसंसिक्तद्वाराजिरगृहान्तरः । चित्रध्वजपताकास्रक्चैलपल्लवतोरणैः ॥६॥

सेकोपलेपसंशोधनें वीथि शोधूनि संमार्जनें । प्रोक्षूनि कुंकुमें सुचंदनें । नानास्थानें रेखिलीं ॥८८॥
वीथि चौबारे चौहाटे । सर्व श्रृंगारिले नेटें । प्रांगणें देहली दारवंटे । नीट निघोट रेखिले ॥८९॥
चित्रविचित्र रंगवल्ली । अंगणें सर्वत्र रेखिलीं । जैशीं विश्वकर्म्यानें श्रृंगारिलीं । श्रियाथिलीं सुरसदनें ॥९०॥
अष्टधातूंच्या रंगकांती । नवरत्नांतें लाजविती । तैशा विचित्र ओप देती । रंगाकृति सोज्वळा ॥९१॥
कमळें रेखिलीं नानास्थळीं । भासती तडागें विचित्रोत्पलीं । माजीं नाना सुमनवल्ली । जैशीं फुललीं कल्हारें ॥९२॥
द्वारें रेखिलीं मनोहर । विचित्र भिंतींचे प्रकार । पुतळे जैसे नृत्यकार । ह्म्स मयूर शुकपंक्ति ॥९३॥
नाना शाळा नाना सदनें । विचित्र बैठका सभास्थानें । भिंती स्तंभ सुरंग वसनें । झांकूनि वितानें उभारिलीं ॥९४॥
अंतर्गृहें दवागारें । चित्रविचित्र मनोहरें । तोरणें पताका गोपुरें । जैशीं शिखरें मेरूचीं ॥९५॥
विचित्र ध्वजांचिया हारी । सुमनमाळा परस्परीं । सदीप पूर्णकलश द्वारीं । उभयहारीं लखलखती ॥९६॥
मध्यरात्रीं प्रसूतिकाळ । तेथूनि हरि खेळे गोकुळ । दीपमाळा अतिसोज्वळ । तेजबंबाळ पुरगर्भीं ॥९७॥
मखरीं चैलपल्लवशोभा । जन्म जाणोनि निजवल्लभा । महासिद्धि झाल्या सुलभा । गोकुलगर्भीं श्री आली ॥९८॥
यथाशास्त्र शौचाचार । गुरूपदिष्ट आत्मविचार । विष्णुभक्तांचें अभ्यंतर । तैसें व्रजपुर शोभलें ॥९९॥
मोडूनि अमंगळ विषयासक्ति । निर्मळ बाणली विष्णुभक्ति । करणीं रेखिली भवविरक्ति । आत्मस्थिति उपरमे ॥१००॥
ऐसें विशुद्ध गोकुळ । झालें सबाह्य निर्मळ । आतां पश्वादि गोपी गोपाळ । परम निर्मळ शोभले ॥१॥

गावो वृषा वत्सतरा हरिद्रातैलरूषिताः । विचित्रधातुबर्हस्रग्वस्त्रकाञ्चनमालिनः ॥७॥

गाई वृषभ वत्सतरी । चर्चिली हरिद्रातैलधारीं । शृंगारिली नानापरीं । कलाकुसरीकौशल्यें ॥२॥
रक्त पीत नील श्वेत । विचित्रधातुरंगभरित । शृंगें अंगें विचित्रित । गुच्छयुक्त चामरें ॥३॥
मयूरपिच्छांचिया माळा । हस्तलाघवें निर्माण केल्या । सुंदर पक्षीं ज्या मिरविल्या । पक्षियातिलाअण्यें ॥४॥
तया पक्ष्यांचे रमणीय पक्ष । ठायीं ठायीं बल्लव दक्ष । योजूनि अलंकारिती उक्ष । जैसा प्रत्यक्ष शिवनंदी ॥१०५॥
रत्नखचित मोहोरकिया । कौशेय कृमिज माथाटीया । जांबूनदाच्या सांकळिया । कंठाभरणें घंटिका ॥६॥
पृष्ठीं क्षौमाचीं श्रेष्ठ वस्त्रें । वरी निर्मिलीं तकटीं चित्रें । हेमरत्नीं विषाणाग्रें । जैशीं नक्षत्रें नभोगर्भीं ॥७॥
अनेक शोभा सुशोभित । गाईवृशभ वत्सांसहित । जन्म पावतां रमाकांत । आनंदभरित गोकुळ ॥८॥
ऐसे उत्साह घरोघरीं । तंव गोपाळ सालंकारीं । नाना वाद्यांचिये गजरीं । नंदमंदिरीं प्रवेशती ॥९॥

महार्हवस्त्राभरणकञ्चुकोष्णीषभूषिताः । गोपाः समाययू राजन्नानोपायनपाणयः ॥८॥

श्रवणभूषणें कंठमाळा । करमुद्रिका गोपां सकळां । करकंकणें कटिमेखळा । फांकती किळा पदकांच्या ॥११०॥
ऐशीं महामूल्य आभरणें । दिव्यसुरंगी शिरोवेष्टणें । अमूल्य कंचुक लेइले तेणें । चंद्रकिरणें लाजलीं ॥११॥
नानाकटिबंधनें तगटीं । पल्लव सोडूनि वेष्टिलीं कंठीं । विचित्र प्रावरणें पुष्पें मुकुटीं । हार कंठीं सुमनांचे ॥१२॥
अहेर उपायनें परोपरी । घेऊनि बल्लवांचिया हारी । प्रवेशती नंदमंदिरीं । विचित्रगजरीं वाद्यांच्या ॥१३॥

गोप्यश्चाकर्ण्य मुदिता यशोदायाः सुतोद्भवम् । आत्मानं भूषयांचक्रुर्वस्त्राकल्पाञ्जनादिभिः ॥९॥

पुत्र प्रसवली नंदपत्नी । गोपिका ऐकोनि आपुल्या कर्णीं । आनंदोनि अंतःकरणीं । अलंकरणीं प्रवर्तल्या ॥१४॥
शृंगारिलीं गृहाजिरें । अलंकारिलीं निजलेंकुरें । स्वभूषणीं अत्यादरें । निजशरीरें भूषिती ॥११५॥
विंचरूनि केशपाश । माल्याभरणीं ग्रंथिती केश । रत्नभूषणीं वेणिकांस । पुष्पें विशेष गुंफिती ॥१६॥
ग्रैवेयकें कंठाभरणें । श्रवणीं परोपरीचें लेणें । मुक्ताफळांचें चांदिणें । शशांककिरणें जों लोपी ॥१७॥
उभय कुंडलें विद्युत्प्रभा । दंत हिरियांची हरिती आभा । नवकुंकुमकिंजल्कशोभा । स्मरवल्लभा विरमवी ॥१८॥
हरिद्राचर्चितें मुखपंकजें । स्निग्धांजनीं नेत्रकंजें । पल्लवीं गल्ल विलसती तेजें । हनु राजसा गोंदिल्या ॥१९॥
मुक्ताहार एकावळी । कंठाभरणीं मोलागळी । वज्र गोमेद पाच प्रवाळीं । बाहुभूषणें जडितांचीं ॥१२०॥
रत्नखचित हस्तीं चुडे । मागें पुढें कंकण जोडे । मुद्रिकांवरी जडिले खडे । ते चहूंकडे प्रभा तरळे ॥२१॥
कंचुकिया विचित्ररंगीं । बाणल्या गोपींचिया अंगीं । सूवर्नसूत्रें सुचिकामार्गीं । करकौशल्यें झळकती ॥२२॥
क्षौमांबरें पट्टसूत्रें । नाना पटदुकूलें विचित्रें । शुद्ध कौशेय कनकांबरें । तगटीं वस्त्रें अमूल्यें ॥२३॥
अनेक जातींचीं विचित्र वसनें केलीं गोपींहीं परिधानें । मेखळांवरी जडिलीं रत्नें । तारांगणें लाजविती ॥२४॥
विचित्र कनकांबराच्या बुंथी । घेऊनि बल्लवांचिया युवती । नंदसदना समस्त जाती । हंसगति सांडूनी ॥१२५॥

नवकुङ्कुमकिञ्जल्कमुखपङ्कजभूतयः । बलिभिस्त्वरितं जग्मुः पृथुश्रोण्यश्चलत्कुचाः ॥१०॥

केशर बोलिजे कुंकुम नामें । हेमप्रभा त्यांचीं कुसुमें । नूतनविकासित तंतुसाम्यें । अनानपद्में गोपींचीं ॥२६॥
केशर कुसुमें किंजल्ककांती । तत्पकांचना लाजविती । तैशा गोपींच्या आननपंक्ति । विराजती स्मरतेजें ॥२७॥
मंगलद्रव्यें अनेकपरी । उपचारपात्रें घेऊनि करीं । चपळ चालती व्रजसुंदरी । जेंवि लहरी सुधार्णवीं ॥२८॥
नितंबभाग पृथु टोंचर । पीन उन्नत कुचांकुर । चपल चालतां चंचलतर । अमूल्य हार शोभती ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP